शब्द पुष्पांजली: माचीवरला पहिलट्कर

Submitted by घारुआण्णा on 1 March, 2016 - 22:54

आजवर अनेकदा राजमाचीला गेलोय, बाकीपण बरेच किल्ले केले.आप्पानां प्र्त्यक्ष पहायचं त्यांच्या बरोबर भटकायची सुवर्णसंधी मिळालीच नाही, पण त्यानी मागे ठेवलेले हे भ्रमणगाथेतले शिलेदार वेळोवेळी भेटत राहीले आणी नवीन काहीतरी देउन गेले.. अशाच एका शिलेदारने एका पहिलट्कर ट्रेकरच्या आयुष्यात छोटेसे बीज रुजवुन ठेवले..जा दुर शहरात पोटापाण्याचा व्यवसाय ही करा पण , तुमचे हे गडकोट आणि त्याभोवताल्ची हि माणसं यानां ही लक्षात ठेवा... प्रत्येक प्रवासात ही तुमच्यासाठी सोबतीला असतील....
"राजमाची" मनरंजन आणि श्रीवर्धन ची तटबंदी...मुंबई पुणे घाटातुन कोणत्याही ट्रेनने जा....जणू खुणावते कधी येताय... आजही उत्साहात आजुबाजुला कोण ओळखी-अनोळखी सहप्रवासी आहेत याची चिंता न करता,मी खिडकीतुन डोकावतो... पहिला बोगदा .., आता दुसरा आता आधी श्रीवर्धन ची तटबंदी,मग मनरंजनचे बुरुज... नुस्ती तोंडी कॉमेंट्री चालु राहाते .... माझी मुलगी शेजारी असेल तर ती विचारते "बाबा तुम्ही इथेच तुमचा पहीला ट्रेक केलात ना .... आणि पुण्याकडे पळणा-या गाडीतुन मन मागे जाते ... राजमाचीकडे... २६-२७ वर्षमागे...
ऐन मे महिन्यातली शुक्रवारची दुपार ३.-३.३० ... तळेगावातल्या विठ्ठल मंदीराच्या कट्ट्यावर बसुन पाच सहा कॉलेजची मुलं आणि एक शाळकरी पोरगा विषय राजमाची की ,राजगड नक्की कोणता ट्रेक करुया.... पंधराव्या मिनीटाला बेत ठरतो,सव्वासहाची लोकल "चलो राजमाची". आज निघुन रविवारी संध्याकाळी परत.घरुन काहीतरी खाउन निघु,रात्रीचे जेवण बनवुन घेउ,वाटेत थांबुन ढाक-बहिरीच्या तिठ्यावर जेऊ. दुपारचे जेवण वरतीच बनवु आणि रात्रीचे जेवण खंडबा उंबरेंकडे. रविवारी सकाळीच न्याहारी करुन निघु परत ..
कोण येणार,अजुन कोण नाही,करत एकएक लोकल सोडत शेवट ९.१५ ची शेवटची लोणावळा लोकल... मिळाली ए्कदाची
चौघेच जण उदय,रामभाउ कुबेर,महेश जोशी,नाईक आणि मी पाचवा ...यातले बाकीची नेहेमीचे शिलेदार मी मात्र नवखा,अगदी पहिलटकर ना भाउ...!
रात्री दहाला लोणवळा स्टेशनला उतरलो,सगळेच माहितगार ... चहाची टपरी कु्ठे उघडी असेल,मालक कुठे झोपलेला बरोबर माहीती ... हाकारे घालुन उठवलाच आणि चहा घेउन निघालो. पदयात्रा सुरु झाली...राजमाचीचा रस्ता आता तसा फार कठीण नाही, गाडी रस्ता झालाय पण पायपिट मात्र पोटात गोळा उठवते अजुनही... आणि तेहाही...बरोबर पाठेवर् शाळेचं दप्तर जुन्या पद्धतीचं,नवख्याला कशाला स्याक.. हा शेरा,त्यात फक्त भाक-या आणि नारळाची चटणी बांधलेली.बाकीच्यांकडे मात्र तांदुळ,डाळ, कांदे बटाटे डाव पातेली असे ट्रेकरचा "राष्ट्रीय मेनू खिचडी" बनवायला लागणारी सगळी साधनं स्याक मधे.राजमाचीवर रात्री जाणं म्हणजे १६-१७ किलोमीटरचे चालणे. भोवती नुस्ता अंधार,रातकीड्यांची किरकीर आणि उदय रामभाऊचे राजमाचीचे कौतुककिर्तन..
100_3714.JPG
खरतरं एकाच डोंगर रांगेच्या छोट्याश्या खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या माच्या असुन ही तहात दोन वेगळे दाखवलेले किल्ले,लांब आणी निबीड जंगल रस्त्याचा राजमाची,तिथला वाटेवरचा ऎन उन्हाळ्यात कोरडा आणि पावसाळ्यात दुथडी भरुन वाहाणारा तो ओढा, मधेच चकवा दाखवणारी पण भक्ताला सहसा न चुकवणारी ढाकच्या बहीरीची वाट, शेवट्च्या अर्ध्या मैलात जागोजागी लागलेले वाघरांच्या अस्तित्वाचे आणि आपण त्यांच्या वा्टेतुन जातोय ही जाणीव करुन देणारे फॉरेस्टांचे बोर्ड,मध्येच थांबुन काजवे पकडणे आणि ते रिकाम्या ओंजळीत पणतीसारखे धरणे,माची गावची वेस, वेशी जवळचा मारुतीचा कट्टा,आणि खंडबा उंबरेचा माची गाव....आला एकदाचा. 100_3737.JPG बाकी सगळ्या कथा, माहीती ठीक हो पण हे 'खडंबा उंबरे" नाव मात्र चांगलच कुतुहलाचा विषय होता..गो.नी.दांडेकराच्या, आप्पांच्या दुर्ग भ्रमणातला हा राजमाचीचा अनभिषिक्त शिलेदार .. यांच्याच जिवन प्रवासात आप्पांना बहुदा " माचीवरला बुधा" सापडला असावा..राम प्रहरी माची गावात पोहोचलो ... सगळा गाव चिडीचूप अंधारात गाढ झोपलेलं.भल्या पहाटे,गावतल्या मारुतीच्या देवळात सगळा पसारा टाकाला.
संध्याकाळी अर्धवट खाउन नि्घालेलो,वाटेत बरेचदा भुकेने कावळे कोकलले होते पोटात पण, एकुणच आजुबाजुचा अंधार,जनावरांची भीती,यामुळे कुठेही ही न थांबता तडक गावा्तच पोहोचलो हो्तो.आता भुक अनावर होत होती..सामान टाकुन भाक-या आणि चटणीची पिशवी का्ढली ... आणी हाय रे देवा... सगळ्या बाजुला आंबुस वास ...गरम भाक-या आणि प्लास्टीकच्या पिशवीत बांधलेली ओल्या नारळाची चटणी,पूर्ण आंबलेली आणि त्याच्या ओलसरंपणामूळे भाक-याही मऊ पडुन बुजल्या होत्या...
पण भुक काही ऎक ऎकायला तयार नव्हती... तशाच भाक-या आणी चटणीवर ताव मारला..पण भुक काही संपली नाही...साधारण पहाटेचे ४..०० वाजेलेले इतक्या सकाळी काही खिचडी बनवणे शक्य नव्हते,तेव्हडी ताकदच नव्हती अंगात आणि गाव तर सगळा साखर झोपेत...
आला मारुतीरायाचं जणु त्याच्या भुकेल्या शिलेदारांच्या मदतीला ... शनिवारी शेंदुर करायला देवाचा पुजारीच देवळात आला... अडचण सांगितल्यावर ऑम्लेट आणि ब्रेड मिळेल, पण पुजा झालयावर गावातुन आणतो...चालेल.. अर्ध्या तासाने का होईना काहीतरी सोय होणार हे नक्की झाले.. मनापसुन सांगतो पुजा संपेपर्यंत "मारुतीला कीती तो शेंदुर लावतात" असा एक नास्तिक विचार सारखा पोटातुन येत होता..शेवटी पुजा संपवुन तासाभरानी पुजारी बाबानी गावातुन ब्रेड ऑम्लेट आणुन आमची भुक भागवली. आणी त्या मारुतीच्या देवळाच्या आवारात, शनिवारच्या दिवशी "अतिथी देवो भव" चा खरा अर्थ समजुन गेला . मग अक्षरश: सहा वाजता जी ताणुन दिली देवळाच्या ओसरीत ती पार ११ वाजेपर्यन्त. दुपारी जाग आली आणी धावपळ करत दुपारच्या उन्हात श्रीवर्धन आणी मावळतीपर्यंत मनरंजन करुन आंम्ही रात्री देवळात परत आलो.येताना गोळा करुन आणलेली जंगलातली लाकडं, दगडाची चूल आणि मसालेदार मुग बटाटा खिचडी चा बेत...आहाहा.. पंचपक्वान्नाहुन चविष्ट
दिवसभरात खंडबांची भेट झालीच नव्हती. ते पहाटेच शेतावर निघुन गेले होते आणि रविवारी दुपारच्या जेवणाला परत येणार होते.पण पुजारी बाबानी त्याना बहुदा निरोप दिल्यामुळेच उद्या दुपारचे जेवण त्याच्या घरीच होणार होते. रविवारी सकाळी माचीवर एक फेरी मारुन खंडबाच्या घरी जेवायला गेलो. पत्रवाळीवर नागलीची भाकरी,कुळथाची पिठी, भात आणी हिरव्या मिरचीचा खर्डा.. आहाहा..! ती चव अजुनही जिभेवर अगदी लिहितानाही जाणवावी इतकी.रविवारी सकाळी परतीचा प्रवास सुरु झाला आणी पुस्तकातला जिवंत व्यक्ती पहायला मिळणार अशी भाबडी उत्सुकता त्यावेळी मनातच राहीली.
100_3734.JPG
परत तोच रस्ता तीच वाट ...मात्र येताना पावसानी सोबत करायला सुरवात केली होती. डोंगराखालची उन्हात तापणारी कपार आता थंड पडायला लागली होती आणी कोरडा ओढा पाण्यानी भरु लागला होता.भर दुपारंच काळोखून आलं आणि चालण्याचा वेग वाढवायला हवा या विचारानी पावल झपझप चालु लागली.. ओढ्याच्या पुढ्च्याच वळणावर खांद्यावर लाकडी नांगर घेतलेले साधारण साठीचे वाटावा असा एक माणुस, कंबरेला गुडघ्यापर्यंत धडुत आणि खांद्यावर एक मळकुटं बाकि सगळे अंग अगदी डार्क चोकले्ट वाटावं अशा रंगाचा.
हाळी घालुन थांबला... कोण पाहुणे... लगेच रामभाऊंनी ओळख दिली,तळेगावातुन आलोय परतीला निघालोय... काळोखीमुळे दुरुन चेहेरा दिसला नसावा,पण उदय ने ओळखले, "खंडबा उंबरे" शेतावरुन परत येत होते .. राम राम नमस्कार झाले .ओळखी पाळखी निघाल्या,आप्पांच्या गावचे म्हट्ल्यावर बोलण्यात अजुनच गोडवा आला असावा आणि खंडबा सहज म्हणाले "नका निघु पाउस पाण्याचं चलां परत.." पण घरी पोचायला उशीर होइल अस म्हणताच "बरं मग येतो तुमच्या बरोबर बहिरीच्या तीठ्यावर "असं म्हणुन निघाले पण..
पु्स्तकातला माणुस पाहिल्याचं अप्रुप आणि त्यांच वय त्यांच्या कष्टाचे प्रकार ऎकुन वाटेत राहुन राहुन परत बुधाचीच आठवण येत होती... वाट संपली बहिरीच्या तिठ्यावरुन खंडबा परत फ़िरले. आंम्हीही सुखरुप लोणावळा तळेगाव करत घरी पोहोचलो..100_3710.JPG
खरतर पहीलाच ट्रेक खुप काही पाहीलं बघीतलं अस झालचं नाही पण त्या ट्रेकनी नवीन जाणीव मात्र दिली.सह्य़ाद्री डोंगरकड्यावर फिरताना या गावकुसातल्या शिलेदारांकडेच लक्ष ठेवले पाहीजे हे गड को्टावर राहाणारे आपलेच शिलेदार,आजही एक तीळ वाटुन खाण्याच्या आणि सुखात राहायचा विचार जपुन आहेत.फार काही लागत नाही त्याच्या आयुष्याच्या गरजांसाठी.दोन शब्द गोडाचे कायमचे लक्षात ठेवतात...त्यानंतर काही वर्षानी खंड्बा परत भेटले ते शेवट्चे, तळेगावात उदयच्याच घरी आलेले , येताना एक भलीशी पिशवी भरुन नागली घेउन ...वय साधारण ७०च्या पुढे..पक्के लक्षात ठेवले त्यानी "मुंबैचे पाहुणे ना पहिल्यांदाच राजमाचे केला होतास."
आता माची गाव खुपच छान झालयं नळाचं पाणी, शाळा, खंडबाची पुढची पिढी गावात सरपंच वगैरे आहे. पण आजही माचीवर जाताना ओढ्यापुढ्च्या वळणावर जाताना आठवतात ते खंडबा, ते मारुतीचे देउळ आणि आंबुस चटणी भाकरीचा तो वास.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय! तुम्ही खंडबा उंबरे यांना प्रत्यक्ष भेटलात हे वाचून मलाही छान वाटलं Happy
तहात एकाच किल्ल्याची २-३ नावं देऊन संख्या वाढवणं हा भारी प्रकार होता. सिंहगड, खांदकडा, स्कंधदुर्ग या ३ नावांनी मिळून फक्त सिंहगडच तयार होतो, तसंच माहुलीचंसुद्धा! पुरंदरच्या तहात २३ किल्ले दिले, ते असे!