लाल माठ व मूगडाळीचे वरण

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 January, 2016 - 08:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लाल / तांबड्या माठाची पाने - मूठभर (किंवा थोडी जास्त), स्वच्छ धुवून व ओबडधोबड चिरून
शिजलेली व घोटलेली मूगडाळ - २-३ वाट्या
टोमॅटो - १ लहान आकाराचा किंवा मध्यम आकाराचा अर्धा टोमॅटो, बारीक चिरून
धणेपूड
लाल तिखट
हिरवी मिरची / ठेचा
गूळ
मीठ
कसूरी मेथी (आवडत असल्यास)
पाणी

फोडणीसाठी साहित्य :
तेल (किंवा तूप)
जिरे
हिंग
कढीपत्ता
लसूण पाकळ्या - ४-५ किंवा लसूण पेस्ट

क्रमवार पाककृती: 

तेल / तुपाला कढईत गरम करून त्यात क्रमाने जिरे, हिंग, कढीपत्ता व लसूण घालून खमंग फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालून परताव्यात. वरून धणेपूड, तिखट, हिरवी मिरची किंवा ठेचा (आवडत असल्यास) घालून टोमॅटो चांगले परतून घ्यावेत. आता त्यात लाल माठाची ओबडधोबड चिरलेली पाने घालून नीट मिसळावे व भाजी चांगली शिजू द्यावी. हवे तर कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.

lal maath1.jpg

शिजलेल्या भाजीत मुगडाळीचे घोटलेले वरण / शिजवलेली मूगडाळ घालावी. चवीनुसार मीठ, किंचित गूळ व चिमूटभर कसूरी मेथी भुरभुरून नीट मिसळावे व या डाळीला एक उकळी आणावी. आपल्या आवडीनुसार वरणाचा दाटपणा पाणी घालून अ‍ॅडजस्ट करावा. मस्त लाल-गुलाबी रंगाची डाळ तयार होते.

lal maath2.jpg

पिवळा, हिरवा, लाल, गुलाबी असे वेगवेगळे रंग असल्यामुळे दिसायलाही आकर्षक! अशी गरमागरम डाळ पोळी / फुलका किंवा भातासोबत खावी.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात तीनजणांपुरती डाळ / वरण तयार होते.
अधिक टिपा: 

१. मूगडाळीऐवजी तूरडाळ किंवा मसूरडाळही वापरता येईल. मूळ कृतीत तूरडाळच वापरली आहे.
२. हिरवी मिरची वगळली तरी चालू शकेल.
३. सकाळी केलेल्या डाळीची चव सायंकाळी अधिक खुलते.
४. पालेभाजीचा फोटो काढायला विसरले. भाजीबाजारात चक्कर मारेन तेव्हा फोटो काढून इथे डकवेन.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट (मधुराज् रेसिपी साईट) व मूळ रेसिपीत मी केलेले थोडेसे बदल.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
लाल माठ आमच्याघरी नाही आणला जात. मला शेवटी कधी त्याची भाजी खाल्लीय ते आठवतही नाही. आता आणून करून पाहायला हवी.

अरे वा! हे काँबिनेशन कधी पाहिलं नव्हतं. लाल माठ नेहमी आणला जातो. आता करून बघेन एकदा.

लाल माठ बहुतेककरून ओळखतात लोक. त्यामुळे इथे फार चर्चा व्हायची नाही Proud

माठाची परतून, पीठ पेरूनच भाजी केली आहे आत्तापर्यंत. वरण-माठ भाजीबद्दल ऐकलंय, पण केली नाही कधी.

वा वा मस्त!
आमच्याकडे (आजोळी) बहुतेक पालेभाज्यांना वरणात मिसळून वरून लसणीची फोडणी देऊन एक अधिकचं तोंडीलावणं केलं जातं. अंगणातल्या भोपळ्याचा पालाही याला अपवाद नाही. लाल माठाला मसूरडाळीचं वरण घातलं तर अधिक चव खुलते भाजीची. यात थोडे भिजवून उकडलेले शेंगदाणे घातले तर एकदम मस्त लागतात.

अकु, 'तेल / तुपाला कढईत गरम करून' असं लिहिलंस, तर मग पुढेही 'त्यात क्रमाने जिरे, हिंग, कढीपत्ता व लसणीला घालून खमंग फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेल्या टोमॅटोच्या फोडींना घालून परताव्यात. वरून धणेपूड, तिखट, हिरवी मिरची किंवा ठेच्याला (आवडत असल्यास) घालून च्यालांना चांगले परतून घ्यावे. आता त्यात लाल माठाची ओबडधोबड चिरलेली पानांना घालून नीट मिसळावे व भाजीला चांगले शिजू द्यावे. हवे तर कढईवर झाकण ठेवून एका वाफेला येऊ द्यावे' असं लिहायचं होतंस Angry

लाल माठाची नुसती कांदा किंवा लसूण घालून फोडणी दिलेली भाजी आणि भाकरी प्रचंड आवडते. असं वरण भारतात आल्यावर केलं पाहिजे.
लाल माठ बहुतेककरून ओळखतात लोक. त्यामुळे इथे फार चर्चा व्हायची नाही > Lol
मंजूडी, तू काय वेगळं लिहिलंयस ते समजायला फार वर-खाली करावं लागतंय, मूळ वाक्य आणि बदललेलं वाक्य असं व्यवस्थित मुशो कर पाहू. Wink

योकु, आधी ते मच्छरदाणी वाचलं. मग मंजूडी मसुराच काहीतरी म्हणत्येय म्हणून तू लाडात मसुराराणी म्हणतोयस वाटलं. Proud

लाल माठ मी फक्त पाणी भरायचा पाहिलाय.. Happy

फोटो देऊ नका, कारण फोटो मीही पाहू शकते गुगलून. आणि पाहून काय उपेग? मिळत तर नाहीच,पण कसा लागतो कोण जाणे. Happy

मस्त. माझी आवडती डिश.. मी कधी कधी चवीत बदल म्हणून लसणाऐवजी रसम पावडर टाकते चमचाभर.

सकाळच्या उरलेल्या कुठल्याही पालेभाजीला बरेचदा मी अशीच वरणात ढकलून किंचित तेलात फोडणी घालून रात्रीच्या जेवणात सद्गती देते.

मस्तच.

मुलाने पालेभाज्या खाव्यात म्हणून मी पण अशी आमटी करते, आम्ही मुगडाळच वापरतो. कढीत पण घालते. मग लेकरू आवडीने खाते.

मंजूडी Proud च्यालांना परतल्यावर कशी काय चव लागेल कोणास ठाऊक! Lol
टाईप करतानाच चुकीची विनम्र जाणीव झाली होती. परंतु विनम्र जाणिवेवर आळसाने मात केली. Wink

वरदा, पालक - मेथी - शेपू - चुका यांचे वरण काँबो माहीत होते, खाल्लेही होते. पण लाल माठाला वरणात ढकललेले कधी पाहिले नव्हते. खरे सांगायचे तर नेहमीची माठाची परतून भाजी (लसूण, मिरची, कांदा घालून) मला कधी कधी बोअर होते. त्यात माठाची जुडी भली थोरली असेल तर दोन्ही जेवणांतही ती भाजी संपल्या संपत नाही. या कृतीमुळे भाजीत जरा तेवढीच बचकाभर पाने कमी घालायला निमित्त मिळाले!