जिद्दी व स्वयंप्रेरित नागरिक आणि आताचे नागरिकशास्त्र अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता
.
.
माझे फेबुमित्र लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची कायद्यातल्या पळवाटांचा फायदा घेऊन कोणी छळवणूक केली. त्यामुळे हताश न होता त्यांच्या पत्नीने स्वत:च कायद्याचा अभ्यास करून वकिलीची सनद प्राप्त केली. त्यावेळी त्यांची मुलगी दहावीत होती. त्यांच्या निश्चयाला सलाम.
स्वत:ला वाईट अनुभव आल्यावर जिद्दीने त्याबाबतीत काही करणारे विरळा असले तर अलीकडे स्वयंप्रेरणेने त्याची तड लावण्याचा निश्चय करताना पाहिले आहेत.
माझे दूरचे एक नातेवाईक प्रथितयश वकील होते. डोळ्यांचे ऑपरेशन अयशस्वी झाल्यावर त्यांचे दोन्ही डोळे गेले. हा मोठाच धक्का होता. पण स्वस्थ न बसता त्यांनी त्यांच्या वकील मित्रांना त्यांच्या सवडीने घरी येऊन विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करण्याची विनंती केली. मित्रांनी ती मान्य केलीही. पण असे किती दिवस चालणार? अखेर त्यांच्या शास्त्र विषयाच्या प्राध्यापक मुलाने त्यांना कायदेविषयक काही बातम्या वाचून दाखवायला सुरूवात केली. ते करताना त्यांना स्वत:च त्या विषयात रस उत्पन्न झाला. त्यातून त्यांनी स्वत: वकिलीच्या परीक्षा दिल्या व परीक्षेमध्ये सुवर्णपदकही मिळवले.
फर्टिलिटीसंबंधी उपचार करणा-या एक तज्ज्ञ महिला डॉक्टर भेटल्या होत्या. या क्षेत्रातले कायदे फार किचकट आहेत व त्यासंबंधी सदैव वकिलांवर अवलंबून रहावे लागते असे त्यांच्या बोलण्यात आले. तेव्हा याबाबतीत कायदेशीर तरतुदी आहेत तरी काय, हे स्वत: पडताळून पाहण्याच्या उत्सुकतेपोटी त्यांनी स्वत:च कायद्याचा अभ्यास केला आणि त्या क्षेत्रातली पदवी मिळवली.
माझ्या एका मित्रानेही त्याच्या कंपनीने त्याच्यावर आकसाने शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर स्वत: कायद्याची पदवी मिळवत त्या अन्यायाविरूद्ध यशस्वी लढा दिला.
यावरून आठवले, झिंबाब्वेमध्ये जन्मलेल्या माझ्या गौरवर्णीय केमिकल इंजिनिअर मित्राने त्याच्या नागरिकत्वाशी संबंधित ब्रिटनविरूद्धची कायदेशीर लढाई युरोपियन युनियनमध्ये कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वत: लढली व स्वत:चा हक्क मिळवला. एवढेच नव्हे, तर गंमतीचा भाग म्हणजे हा लढा जिंकल्यानंतर त्याने ते नागरिकत्व धुडकावून लावले. या अन्यायाबद्दल ब्रिटनला धडा शिकवायचा हेच त्याचे उद्दिष्ट बनले होते. हे तर पूर्णत: अविश्वसनीय.
एखाद्या क्षेत्रात जम बसलेला असल्यावर कायद्यासारख्या रूक्ष विषयाचा अभ्यास करणे ही गोष्ट अजिबात साधीसुधी नाही. शिवाय एखादा विचार मनात येणे व तो पूर्णत्वास नेणे याही दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
यावरून एक विचार मनात येतो. ज्याप्रमाणे आताच्या शिक्षणामध्ये कृषीसारख्या विषयांबद्दल पूर्ण उदासिनता असते, त्याचप्रमाणे कायदेविषयक गोष्टींपासूनही आताचे शिक्षण अतिशय दूर असते. याबाबतीत सर्वांनाच या विषयाची तोंडओळख तरी होईल.
नगरपालिकेचे काम काय, तर दिवे लावणे, रस्ते झाडणे, एवढ्यापुरते सध्या शिकवले जाणारे नागरिकशास्त्र बाळबोध राहिलेले नाही. मात्र पोलिस स्टेशन, महापालिकेची विविध कार्यालये, माहितीचा अधिकार, सेवा अधिकार या व अशा गोष्टींमधील नागरिकांचा सहभाग आता शिक्षणाचाच भाग झाला तर या सा-या गोष्टी अधिक पारदर्शक व लोकाभिमुख होतील.
अनेक थोरामोठ्यांची माहिती
अनेक थोरामोठ्यांची माहिती वाचताना असे लक्षात येते की व्यवसायाला पूरक म्हणून ते कायद्यातील पदवी प्राप्त करतात.
कारकीर्दीची पहिली आठ, दहा वर्षे झाल्यानंतर अशी निकड निर्माण झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
नागरीकशास्त्राचे कनेक्शन लक्षात आले नाही.
नागरिकशास्त्रात कायद्यासह
नागरिकशास्त्रात कायद्यासह उल्लेख केल्या अनेक दुर्लक्षित अंगांचीही तोंडओळख करून दिली जावी या अनुषंगाने तो भाग आला आहे.
होय पण कृषी, नागरीकशास्त्र
होय पण कृषी, नागरीकशास्त्र आणि लॉ ह्यांचे शिक्षण वेगवेगळे आणि शाळेतच (बेसिक पातळीवरचे फक्त) मिळावे असे म्हणणे अधिक संयुक्तीक वाटते मला. असो.