काजूच्या ग्रेव्हीतली पनीर भाजी

Submitted by सायो on 3 November, 2015 - 20:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर- बोटाएवढे लांब तुकडे करून (नानकचं एक छोटं पॅकेट घेतलं), काजू (साधारण पाव वाटी) भिजवून त्याची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा (पाव कांदा), आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, रजवाडी गरम मसाला, हळद, जिरं, तेल, थोडी कसुरी मेथी, वरून थोडं क्रिम, चवीप्रमाणे मीठ, वरून कोथिंबीर.

क्रमवार पाककृती: 

काजू निदान तासभर तरी पाण्यात भिजवून पेस्ट करून घ्यावी. पनीर रूम टेंप.ला आणून बोटाएवढे लांब तुकडे करून घ्यावेत. कांदा अगदी बारीक चिरावा म्हणजे भाजीत दिसणारही नाही.

तेलाची जिरं घालून फोडणी करून त्यात कांदा चांगला परतावा. त्यावर आलं लसूण पेस्ट, रजवाडी गरम मसाला, लाल तिखट घालून आणखी परतावा. मग त्यात काजूची पेस्ट घालून मिक्स करावं. त्यातच थोडी हळद घालून चुरून कसूरी मेथीही घालावी (साधारण दोन चमचे पुरेल). मग त्यात पनीर घालून बारीक गॅसवर उकळी काढावी. वरून थोडं क्रिम घालून कोथिंबीर घालून सर्व करावं.

वाढणी/प्रमाण: 
दोन तीन जणांना पुरेल.
अधिक टिपा: 

पनीर कॅप्सिकम करायला भोपळी मिरच्या नव्हत्या आणि मखनी करायला टोमॅटो प्युरे नसल्याने ह्या झटपट भाजीचा जन्म झालेला आहे.
नेहमी घालता त्यापेक्षा किंचीत जास्त लाल तिखट घालून चालेल. काजू पेस्ट आणि क्रिममुळे माईल्ड होते तशी.
पनीरचं प्रमाण काजूची पेस्ट, क्रिम ह्याच्या तुलनेत थोडं कमी असावं नाहीतर भाजी ड्राय वाटते- स्वानुभव.

माहितीचा स्रोत: 
मीच ती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! करून पाहाणेत येईलच.

विचारूच का? आपले ते हे यात घालून जमेल का? तळून घ्यायचे ना पण आधी? पौष्टीकपणाकरता बोगातु घातला तर? Biggrin

वॉव.. मस्तच फोटो आणि पाकृ पण! तुझी पनीर माखनी सॉल्लीड हिट असते हां सायो पॉटलक मधे. अनेकानेक धन्यवाद त्या रेसिपीसाठी. आणि आता ही अजून एक Happy नक्की करून पाहेन.

योकु, कोण ते आपले हे? कोणी आयडी नाही ना तळून घालणार? Proud
नुसती यम्मी यम्मीच नाही तर सोप्पी सोप्पीही आहे प्रचंड. मोठ्या पार्टीकरता वगैरे बेस्टच. मी ही पुढच्या आठवड्यात पुन्हा करावी अशा विचारात आहे.

आज अशीच मेथी मटर मलई केली. मस्त झाली आहे. मेथी, कांदा, टोमॅटो बाऽरीक चिरून तेलात परतले. त्यात आलंलसूण पेहळद, थोडी हळद, लाल तिखट, गरम मसाला घातला आणि ४-५ काजू दुधात वाटून घातले. चवीला मीठ साखर... मस्त झाली आहे भाजी.

मटार फ्रोजन होते, त्यामुळे तेही कांदा-टोमॅटो-मेथी थोडे शिजल्यावर त्यात घालून टाकले. जरा झाकण ठेवून सगळं नीट शिजवून घेऊन बाकी मालमसाला घातला. सगळ्यात शेवटी काजूचे पेस्ट घातली.

इकडे मिळणारी दीपची फ्रोजन मेथी मटर मलई चवीला भारी असते पण फ्रोजन असल्यामुळे फार आणली जात नाही. त्यात खवा असतो असं अंधुकसं आठवतंय. काजू पेस्ट घालूनही मस्तच होईल बहुतेक.

भाजी मस्तच दिसतेय. करून बघेन आणि खाईन.

इकडे मिळणारी दीपची फ्रोजन मेथी मटर मलई चवीला भारी असते >>> जय दीप!

मी मागच्या आठवड्यात करुन पाहिली, मस्तच झाली, एकदम सोप्पी आणि पट्कन झाली. फोटो काढायचा राहिला. नवर्‍याने अगदी कढई चाटुन पुसुन खाल्ली. मला वाट्टय कसुरी मेथी जास्त झाली असावी कारण आज सकाळी नवरा म्हणाला ती मेथी-पनीर भाजी पुन्हा कर ना आपल्याला...

सायो

हि रेसिपी अगदी सोपी व छान वाट्तेय.

पनीरमाखनीच्या रेसिपीची प्रशंसा वाचून शोधायचा प्रयत्न केला पण सापडली नाही, कुणी प्लीज लिन्क देउ शकेल का?

धन्यवाद!

प्रिया

आज मी अशीच ग्रेवी करुन त्यात मिक्स भाज्या घातल्या. मटार, फ़रसबी, सिमला मिरची थोडी थोडी शिल्लक होती, भरीला कांदा, टॉमेटो, आधी तेलात परतुन घेतले. मस्त झाली भाजी.

Pages