विपुतल्या रेसिप्या ७ पाटवडी रस्सा

Submitted by मेधा on 3 October, 2015 - 15:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

वड्यांसाठी
बेसन २ वाट्या,
हळ्द, तिखट , मीठ, हिंग, तेल, ओलं खोबरं, कोथिंबीर , मोहरी , जिरं

आमटी साठी
कांदा, सुके खोबरे. तीळ, खसखस, दालचिनी, लवंग , मिरे , काळा मसाला, बडीशेप , आले, लसूण, तमालपत्र, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करायचे. मोहरी, जिरे, हिंग, हळद, थोडी कोथिंबीर घालुन लाल तिखट घालुन ते जळु न देता लगेच पाणी घालायचे. मग मीठ, आणखी थोडी कोथिंबीर घालुन उकळी आणायची. मग डाळीचे पीठ एका हाताने घालुन भराभर हलवायचे. सरसरीत होईपर्यंत पीठ घालुन झाकण ठेवायचे. एका पसरट ताटाला आधीच तेल लावुन ठेवावे. मग एक वाफ आली की ते पीठ हाताला आणि उलथन्याला तेल लावुन छान पसरवुन घ्यायचे. वड्या कापायच्या लगेच. कोथिंबीर आणि खोबरे(असल्यास) भुरभुरवायचे. रस्सा झाला कि थोड्या वड्या वगळुन बाकिच्या त्यात सोडुन एक उकळी आणावी. झालं.

मी पाककृती इथेच थोडक्यात लिहिते वेळेअभावी. पण त्यात जर काही शंका असेल तर नक्की विचारा, मी उत्तर देईन. पाट्वड्या कश्या करतात हे तुला (तुच म्हणते... स्मित )माहिती असेल असे गृहित धरत आहे. मसाल्यासाठी दोन छोटे छोटे कांदे गॅस वरती म्हणजे आचेवरती डायरेक्ट भाजुन, सोलुन घ्यायचे. १ छोटा कांदा अगदी बारीक चिरुन घ्यायचा. पाव खोबरे-वाटी च्या पातळ काप / चकत्या करुन तेलात गुलाबी तळुन घे. मग ८-१० पाकळ्या लसुण, १ इंच आले, थोडी कोथिंबीर छान मिक्सर वर बारीक वाटुन घे. तेलात २ तमालपत्र घालुन चिरलेला कांदा जरा मीठ घालुन थोडा परतुन घे. मग वाटलेला मसाला, थोडे मीठ घालुन तेल सुटेपर्यंत परतायचा, तेल जरा जास्त घालावे लागते. मग १ चमचा धणे पावडर, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा काळा मसाला, कोथिंबीर जरा परतुन गरम पाणी घालावे. लाल तिखट घातल्यावर ८-१० दाणे साखर घालते मी. पाण्याला उकळी आली कि चव बघुन झाकण ठेवुन कमीत कमी ५-७ मिनीटं उकळी येवु द्यायची, झाकणाला जरा फट असु दे म्हणजे तेल सगळे झाकणाला लागणार नाही. मग वड्या सोडुन २-३ मिनीटांनी गॅस बंद करायचा. मध्ये मध्ये आणि शेवटी कोथिंबीर घालायची. मसाल्यामध्ये वाटतांना बडीशोप, तीळ, खसखस, मिरे, लवंगा, दालचिनी ह्याची वेगळी गोळी वाटुन ती मसाल्यामध्ये एकत्र करतात पण मला स्वःताला त्याच्या शिवाय च आवडते ही करी.

ही मूळ विपूमधली रेसिपी.
मी वड्या करताना फोडणीत अर्धी वाटी पाणी घालते . दोन वाट्या बेसन दीड वाटी पाण्यात नीट मिसळून घेते. अजिबात गुठळ्या राहू देत नाही. आणि ते फोडणीत घालते. उकळत्या पाण्यात कोरडे बेसन घातले की थोड्या तरी गुठळ्या रहातातच.

इथे सुके खोबरे अगदी पांढरे शुभ्र, बारीक खवलेले मिळते. सोयीस्कर आहे, पण त्याला सुक्या नारळ वाटीचे तुकडे किसून मग भाजून वाटल्यासारखी चव येत नाही.

वाढणी/प्रमाण: 
४-५-६ जणांना
अधिक टिपा: 

ही रेसिपी माझ्या विपु मधे बंगळूरु बाफवरच्या अश्विनी.. या आयडीने लिहिली होती . (जुना आयडी sanash_in_spain )

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेस्पी! प्रसिद्ध विपूकर्तीची असेल असं वाटलेलं आधी; पण तिची कृती आहेच इथे.
वरच्या रेसीपीमध्ये बरेच जिन्नस आलटून पालटून आहेत; त्याचा असा वेगळा स्वाद असेलच. काळा मसाला वापरल्यानी काळपट रंगाची ग्रेव्ही झालेली आहे बहुतेक. रस्स्याला नंतर तेल सुटत असेल ना?

व्वा! फारच सही आहे...
विदर्भात खल्लेली चव अजून जिभेवर आहे...

आता परत खावीशी वाटते आहे. Happy

कसले भारी फोटो आहेत. पहिल्या फोटोतले जिन्नस घरी असेच खपतिल, रश्श्यातुन ताटात यायची वाट पाहिली जाणार नाही Happy

मस्त रेसिपी आहे.
आजच करुन बघितली. एकदम यम्मी.
फक्त त्या वड्या ताटावर एकसमान पसरायचे फारसे चांगले जमले नाही. त्यामुळे वड्या गुळगुळीत छान दिसल्या नाहीत. पसरवताना पिठ एकदम पातळ हवे की घट्टसर?
रेसिपीकरता थँक्यु .

वा. काय सुरेख फोटो आहे मेधा. आम्ही झुणक्याच्या वड्या करतो त्या म्हणजेच या पाटवड्या होतील ना?
पण ती करी कधीच केली नाहीये. आजच करून बघ्णार नुस्ती करी.

सावली , मी नाशिकमधे खाल्ला होता असा रस्सा तर त्यांच्या वड्या जरा जाडसर पण एकदम इव्हन होत्या.

मी केले तेंव्हा बेसन जरा जास्त घट्ट झाले होते ( सुरळीच्या वड्यांना असते त्यापेक्षा) त्यामुळे असेल कदाचित . पण माझ्या पण अन - इव्हन झाल्या होत्या.

नाशिक साईडला जाडच करतात थोड्या वड्या, गरम रस्सा ओतल्यावर सुधा वडि टिकली पाहिजे म्हणुन असेल... तिथे ताटलित आधी वद्या ठेवुन वरुन रस्सा सर्व करतात

कढईत गोळा फिरायला लागला की पीठ थापायचे. वरून खडबडीत वाटत असेल तर वाटीच्या मागच्या भागाला किंचीत तेलाचा हात लावून त्याने तो गोळा थापायचा. छान गुळगुळीत पाटवड्या होतात.
माहेरी गौरीविसर्जनाच्या दिवशी नैवेद्याला पाटवड्या करतात. नैवेद्य दाखवून झाला की आम्ही जेवायला घेताना त्या तव्यावर खमंग परतून घेऊन खातो.
आता एकदा रश्श्यातल्या पाटवड्या करायला हव्या. पाटवड्यांची आमटी ती हीच का?