काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून निघाले. थोडा वेळ होता म्हणून नरिमन पॉईंट ते व्हीटी चालत आले. कुर्ला स्टेशनवर उतरून भाजी घेण्यासाठी बॅगमध्ये वॉलेट शोधू लागले तर वॉलेट गायब. मी ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ उभी राहते आणि बॅगवर कायम लक्ष ठेवून असते त्यामुळे बॅग मधून काढणेही कठीण होते. ऑफिसमध्येच राहून गेले असावे म्हणुन ऑफिसमध्ये फोन केला तर त्यांनी डेस्क वर काहीच नाहीये असे सांगितले. म्हणजे ते ड्रॉवर मध्ये राहिले असावे असा विचार मनात आला. पण कदाचित तिथे नसेल तर , मी बँकेत गेले होते तिथे तर राहिले नसेल ना, त्यानंतर ऑफिस समोरच्या फूड जॉइंटवर इडली खाल्ली होती तिथे विसरले असेन तर... असे विचार मनात येऊ लागले. प्रथम घर गाठावे, तिथून पैसे घेऊन मग वाटल्यास पुन्हा नरिमन पॉईंटला यावे असा विचार करून रिक्षात बसले. घरी आल्या आल्या नवर्याला फोन लावण्यासाठी बॅग उघडली तर फोन गायब..... मेंदुला झिणझिण्या आल्या. रिक्षात बसताना फोन जवळ होता आणि आता लगेच दिसेनासा कसा काय झाला काहीच कळेना. वॉलेट आणि फोन दोन्ही गेले तर २५००० चा फटका बसणार होता. इतर फॉर्मॅलिटीज कराव्या लागणार ते वेगळेच. लँडलाईन वरुन फोन लावला तर रिंग जात होती पण कुणी उचलला नाहि. म्हणजे कदाचित अजुन कुणाच्या हाताला लागला नसावा. पाणि सुद्धा न पिता तडक बाहेर आले आणि स्टेशन कडे पायी चालत (जवळजवळ धावत) गेले. रस्त्याने जाताना येणार्या जाणार्या रिक्षावाल्यांचे चेहरे ओळखायचा प्रयत्न करत होते. जिथुन रिक्षात बसले त्या जागी गेले आणि फोन तिथे पडलाय का ते पाहिले. तिथे आजुबाजुला एक्-दोन रिक्षावाले होते त्यांनी काय झाले म्हणून विचारले. त्यांना सांगितल्यावर त्यांनीही इथे तिथे थोडे पाहिले. एका माणसाने स्वतःच्या फोन वरुन नंबर लावला. पुन्हा नुसतीच रिंग आणि नो रिप्लाय. म्हणजे फोन मिळण्याच्या आशा जिवंत होत्या ..... पोलिस स्टेशन, येस्स पोलिस स्टेशन गाठायला हवे. जवळपास पळत घरी आले. फोनची कागदपत्रं उचलली आणि पोलिस स्टेशनवर गेले.
पोलिस स्टेशन मध्ये गेल्यावर चौकशी केल्यावर कळले की ट्रॅकर त्यांच्या मध्यवर्ती ऑफिसमध्ये आहे आणि इथून रिक्वेस्ट पाठवल्या वर ते आयएम ई आय ट्रॅकर वर टाकून ट्रॅक करतात. पण जर फोन न वापरता तसाच ठेवला तर ट्रॅक करणे कठीण जाते... इ. मला एका बाजुला बसायला सांगून तिथला स्टाफ त्यांची कामे करत होता. मी आजुबाजुला पाहिले.... जेल... हो तिथे एक जेल सुद्धा होते. त्यात काही कळकट माणसं गज हाताने घट्ट धरून उभी होती. मग पाहिलं तर कुणी तरी कुणाला तरी हातभर जखम कशी झाली त्याची तक्रार दाखल करत होता. अचानक इतका वेळ फोनच्या गोंधळात हरवलेल्या माझ्या मनात एक अनाहूत भीतीची लहर उमटली... ओह आपण पोलिस स्टेशन मध्ये बस्लो आहोत. रात्रीचे जवळपास आठ वाजत आहेत. नवर्याला माहितच नसावे आपण कुठे आहोत ते. तो चिंतेत असावा.
इतक्यात मला तिथल्या अधिकार्यांनी टेबलाजवळ बसायला सांगितले आणि फोन हरवल्याची नोंद करण्यासाठीचा विनंती अर्ज लिहायला सांगितला. त्यांनी सांगितलं तसा अर्ज लिहिला. तिथल्या जेवढ्या स्टाफशी संवाद साधला ते सर्वजण मदत करण्यास अगदी तत्पर वाटले. मुद्दाम अडवणूक वगैरे असा काही प्रकार जाणवला नाही. उलट तिथल्या एका अधिकार्यांनी माझ्या नंबरवर एसेमेस पाठवून वाचणार्याने लगेच नेहरू नगर पो. स्टे मध्ये संपर्क साधावा असे लिहिले. दुसर्या एका अधिकार्यांनी माझ्या नवर्याला फोन करायचा प्रयत्न केला पण त्याचा फोन लागतच नव्हता. फॉर्मॅलिटि पुर्ण झाल्यावर त्यांना बिलाची कॉपी हवी होती. म्हणून मी बाहेर पडले तर अर्ध्या रस्त्यात नवरा भेटला. तो माझ्या वाटेकडे डोळे लावून होता. कॉपी पो स्टे मध्ये सुपुर्द करून आम्ही घरी आलो. इतक्या वेळात जितक्यांदा माझा नंबर लावला होता, तितक्यांदा तो वाजला होता पण कुणी उचलत नव्हते.
घरी आल्यावर नवरा म्हणाला, पुन्हा एकदा लावून पाहतो. यावेळी फोन लावला तर कुणीतरी उचलला. नवरा त्या व्यक्तीशी बोलला. बोलण्याच्या ओघात त्याने पो स्टे मधल्या तक्रारीचा उल्लेख सुद्धा केला. त्याच्याशी बोलणे झाल्यावर नवर्याने जे सांगितले ते असे की... मी स्टेशन वरून ज्या रिक्षाने आले त्या रिक्षात फोन पडला. रिक्षावाल्याला याची कल्पना नव्हती. पण जेव्हा फोन वाजला तेव्हा मागच्या पॅसेंजरने त्याला सांगितले आणि त्याने फोन ताब्यात घेतला. त्यानंतर सतत त्यावर फोन येत होते. पण स्मार्ट फोन कसा ऑपरेट करतात हे माहित नसल्याने तो फोन उचलू शकला नाही. शेवटी आता त्याने एका पॅसेंजरच्या मदतीने फोन रिसिव्ह केला. त्याने मला कुठे ड्रॉप केले हे अर्धवट आठवत होते. तेव्हा नवर्याने त्याला नीट पत्ता समजावला. तो १५ मिनिटात येतो म्हणाला.
माझ्या मनावरचे मणामणाचे ओझे उतरले. मी लगेच सोसायटीच्या कंपाउंड मध्ये जाऊन वाट पहात बसले. सांगितल्या प्रमाणे तो देवदूतासमान रिक्षाचालक प्रकट झाला आणि त्याने माझा फोन परत केला. त्याला योग्य ते बक्षिस दिले. त्याचे मनापासून आभार मानले. जगात प्रामाणिक माणसं अजुनही आहेत, याची खात्री पटली. तेवढ्यात नवरा सुद्धा आला. पो स्टे चे नाव ऐकुन तो थोडा घाबरला होता. म्हणून त्याने आम्हा दोघाना पो स्टे पर्यंत सोडून तक्रार मागे घ्यायची विनंती केली. आम्हीही लगेच आत जाऊन झाला प्रकार सांगुन तक्रार मागे घेतली. त्यावेळि आधीचा स्टाफ ड्यूटी संपल्याने घरी गेला होता. त्यामुळे त्यांचे आभार मानता आले नाहीत म्हणून माझ्या नंबरवर एसेमेस ज्या अधिकार्यांनी केला होता त्यांना मेसेज करून त्यांचे आभार मानले. त्यांनी लगेच फोन करून चौकशी केली. पोलिसांच्या सहकार्याला आणि सहृदयतेला मी मनोमन सलाम केला. तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. मी उचलल्यावर कळले की, संद्याकाळी रस्त्यात ज्या मांणसाच्या नंबर वरून कॉल केला होता त्याचा फोन होता. तो सुद्धा फोन सतत ट्राय करत होता. फोन मिळाल्याचे कळल्यावर त्याच्या आवाजावरून त्यालाही हायसे वाट्ले असावे असे वाटले.
रात्री झोपताना मनात विचार आला, समाजातल्या काजळीला असलेल्या सोनेरी किनारी आज मला या प्रसंगाने पहायला मिळाल्या.
पर्सचे काय झाले?
पर्सचे काय झाले?
पर्स मिळाली. ऑफिस मध्ये
पर्स मिळाली. ऑफिस मध्ये ड्रॉवर मध्ये होती.
काय ग अमि. काळजी घे.
काय ग अमि. काळजी घे.
एखादा दिवस असा येतो की
एखादा दिवस असा येतो की आपल्याला नेमके त्याच दिवशी बरोबर सर्व अडचणी येतात..
तुम्हाला तुमचा मोबाईल आणि वाॅलेट हरवून परत मिळाले.. अभिनंदन!!
रिक्षा वाल्याच्या प्रामाणिक पणा चे कौतुक वाटते!!
@मुग्धा....खरंच काळजी घ्यायला
@मुग्धा....खरंच काळजी घ्यायला हवी. आपल्या धांदरटपणाचा इतरांना त्रास ...
>> एखादा दिवस असा येतो की आपल्याला नेमके त्याच दिवशी बरोबर सर्व अडचणी येतात..
> भाव दीप , अगदी अस्संच माझ्या मनात आलं .
खरंच सोनेरी किनार
खरंच सोनेरी किनार
अमि लकी आहेस गं, कुर्ला
अमि लकी आहेस गं, कुर्ला स्टेशनच्या गर्दीत कुठे पडला असता फोन तर मिळणे कठीणच होते.
यापुढे काळजी घे.
खूप आश्वासक वाटले वाचुन
खूप आश्वासक वाटले वाचुन
(No subject)
असाच किस्स्सा माझा पन,
असाच किस्स्सा माझा पन, गोरेगाव station रिक्शयत रहिला होता. परत मिलाला
लक्की यु.. मला फोन बाबत अधीच
लक्की यु..


मला फोन बाबत अधीच हा अनुभव आला नाही..म्हणजे गेला तो गेलाच
मागे ऑटो मधे पाऊच हरवलं पुण्यात .. त्यात दादासाठी घेतलेली स्विस वॉच, ५००ची नोट आणि एटीएम, पॅन, एलेक्शन कार्ड, अक्षरधारा च मेम्बरशीप कार्ड अस सगळ काही होत.. २ ४ दिवसांनी अक्षरधारा मधुन फोन आला कि तुमच हे हे सामान हरवल होत का ? ते या या पोस्टात मिळेल तुम्हाला.. सगळे कार्ड्स व्यवस्थित होते बस पैसे आणि दादासाठी घेतलेली वॉच तेवढी नव्हती
आतल सामान नेमक कोणी लंपास केल काही पत्ता नै
नशीब आहे तुमचे...माझा असाच
नशीब आहे तुमचे...माझा असाच हरवलेला फोन कधीच नाही मिळाला...एका पोलीस स्टेशन वर गेले, तर त्यांनी हे आमच्या एरियात नाही, दुसरीकडे जा म्हणून पळवून लावले...दुसरीकडे पोलीसांनी इतक्या "उत्साहाने" तक्रार लिहून घेतली आणि इतक्या "सौजन्याने" बोलले, की माझी अशी ठाम खात्री झाली, की स्वतः च्या वस्तू स्वतःला सांभाळता न आल्यास पोलीसात तक्रार करून त्यांना ह्या शोध-कामाला लावायचा आपल्याला कोणताही अधिकार नाही....हो, आणि त्या हरवलेल्या फोन चा जर कुणी गैर-वापर केला, तर त्यानंतर आपण काय कराय्चं ह्याला उत्तर नाही!
हुश्श झालं शेवटी अशा गोष्टी
हुश्श झालं शेवटी
अशा गोष्टी शेअर व्हायला हव्यात. वाचायला बरं वाटतं.
पोलिसांचा आजवरचा सगळा अनुभव आम्हालाही चांगला आहे. अगदी गुन्हा दाखल करण्यापासून ते पासपोर्ट व्हेरिफिकेशन. कुठेही मनस्ताप झालेला नाही.
अशा गोष्टी शेअर व्हायला
अशा गोष्टी शेअर व्हायला हव्यात. वाचायला बरं वाटतं.
>>
+१
मलाही खुप बरं वाटलं वाचून.
टिने, सेम पिंच! माझही वॉलेट मला त्यातल्या सगळ्या कार्ड्स सकट परत मिलालं होतं. फक्त पैसे नव्हते. पण आयेम ग्लॅड की किमान कार्ड्स इथल्या इथे मिळाली
मलाही पोलिसांचे आणि एकंदर
मलाही पोलिसांचे आणि एकंदर व्यवस्थेचे बरे अनुभव आलेत. (काही बँका सोडून.) एकदा रेल्वे स्टेशनवर ब्रीफ केस गर्दीमुळे म्हणा किंवा कुणीतरी खेचल्यामुळे म्हणा हातांतून निसटून गाडीबाहेर पडली. गाडी फास्ट होती. पुढच्या स्टेशनवर उतरून स्टेशन मास्टरच्या कार्यालयातून त्या लोकांनी मागच्या स्टेशनला फोन लावला. प्लॅटफॉर्मवर उद्घोषणा केली गेली. माझ्या एव्हढे लक्षात होते की जवळपास एक रेल्वे पुलीस होता. कदाचित त्यामुळे असेल पण थोड्या वेळाने बॅग स्टेशनमास्टरच्या कचेरीत पोचली आणि तसा निरोप पुढच्या स्टेशनवर आला. मग मी मागे जाऊन ती बॅग ताब्यात घेतली. फक्त एकच की उद्घोषणेमुळे तिथे गर्दी जमली होती आणि गेल्यावर बॅगेतील वस्तूंचा पंचनामा केल्यावर मग त्या मिळाल्या. पण भारी काळाचष्मा, घड्याळ, सेफ डिपॉझिट लॉकरची किल्ली, घराची किल्ली, पैसे, चेक बुक, शिवाय क्रेडिट कार्ड यासारख्या वस्तू मिळाल्या नसत्या तर खूप त्रास झाला असता. एकदा रिक्षातून छोटा पाउच बाहेर पडला तोही स्टेशनबाहेरच्या गर्दीत. पण त्यातल्या आय. कार्डवरील फोन नंबरमुळे ज्याला मिळाला त्याने घरी फोन केला. एकदा तर सोसायटीतल्या फ्लॅटचे शेअर सर्टिफिकेट काही कामासाठी फोल्डरमध्ये गुंडाळून घेतले होते ते रिक्शातच राहिले. आम्ही शोधाशोध करतो आहोत हे पाहून दोन रिक्शावाल्यांनी आपापल्या रिक्शा दामटल्या आणि आमच्या वर्णनानुसारच्या रिक्शावाल्याकडून ते मिळवले. त्याला बिचार्याला माहीतच नव्हते की त्याच्या रिक्शात असे काही पडलेय. पासपोर्ट किंवा अन्य काही कामासाठी गेल्यावर पोलिस स्टेशनवर चक्क चहा मिळालाय. कित्येकदा लांब अंतरावर रिक्शाने जायचे असेल आणि रिक्शावाल्याला मधल्या ठिकाणापर्यतच जाणे शक्य असेल तर तो ते ठिकाण आल्यावर पुढे जाऊ शकणारी दुसरी रिक्शा अदबीने आणि आपुलकीने शोधून देतो. एकदा रिक्शाने जात असताना रस्त्यात मध्येच एक मोठा काँक्रीट्चा ब्लॉक पडला होता. डिवाय्डरवर बसवतात त्यातला एक निखळलेला आणि मधोमध आलेला. मी रिक्शा थांबवून रिक्शावाल्याला म्हटले, थोडा रुकिये, ये पत्थर हटाते हैं. मी त्या दगडाला हात घातला तसा तो आणि आणखी दोघेजण कुठूनसे आले. आणि आप रिक्शामें बैठियेजी, हम हटाते हैं असे म्हणून तो जड अडथळा त्यांनी बाजूला केला. आजकाल भाडी वाढवून दिल्यापासून मुंबईतले रिक्शावाले बरेच नम्रतेने वागतात असे वाटते. चांगुलपणाचे अनुभव लक्षात राहातात आणि भांडणाचे बहुधा विसरले जातात असे असावे.
माफ करा, प्रतिसाद जरूरीपेक्षा मोठा झालाय, पण कृतज्ञतेपोटी लिहिलंय हे सगळं.
हिरा.. इतक काय काय हरवलय तु
हिरा..
इतक काय काय हरवलय तु
रीये, मला वॅलेट पन नै मिळाल अगं..फक्त कार्ड्स.
रडकुंडी आली होती मी अक्षरशः .. हातात एक खडकु नव्हता अश्यावेळी भांडणाभांडणी खेळत असलेला माझा मित्र मला धड पोलिसस्टेशन पन जाऊ द्यायला तयार नव्हता..एकटी नको जाऊस म्हणे ते बरेचदा विचित्र बोलतात आणि तु भडक डोक्याची उगा कै बोलुन येशील म्हणे..ते कार्ड्स जवळ यायला २ ४ दिवस जावे लागले पण हरवल्या दिवशी त्यान माझ्या हातात स्वतःच एक्स्ट्रा असलेल एटीएम कोंबल सर्व पैस्यांसहित ..
I do have such darling friends..
अशा गोष्टी शेअर व्हायला
अशा गोष्टी शेअर व्हायला हव्यात. वाचायला बरं वाटतं.>> +१
वरील लिखाण वाचून खूप बरे
वरील लिखाण वाचून खूप बरे वाटले. एखादी गोष्ट जाउन परत मिळणे हे खूप रेअर झाले आहे.
असाच काही वर्षांपूर्वी मुंबईत नवीन नोकरीवर रुजू होण्यापूर्वी घडलेला प्रसंग आठवला. कंपनीच्या बोरिवलीतील guest-house कडे जाताना चुकून रिक्षात मागच्या कप्प्यात बैकपैक विसरली. (दुसर्या मित्राने सगळे सामान काढले हा गैरसमज झाला)
बैगेत सगळी ओरीजीनल डॉक्यूमेंटस आणि अन्य महत्वाची कागदपत्रे होती. लगेचच पोलिस स्टेशनला जाउन तक्रार नोन्दविलि. घरी अर्थातच कळवलेले नव्हते पण दुसर्या दिवशी घरूनच (कोल्हापूरहून) फोन आला कि एका रिक्षावाल्याने तिकडे फोन करून माझा नंबर मिळवला आहे आणि तो ती बैग परत करायला येणार आहे. माझ्या एका फ़ाइल मध्ये माझ्या आत्तेभावाचे Business कार्ड मिळाल्यामुळे हा गुंता सुटला होता.
ठरल्याप्रमाणे तो प्रामाणिक मनुष्य बैग घेऊन आला आणि नंतर त्याला बक्षीस देऊ केले तरी घेइना. शेवटी चक्क त्याच्या खिशांत ठेवावे लागले. त्याचे अनेक आभार मानले आणि प्रामाणिकपणा कुठेतरी शिल्लक आहे हे बघून खूप बरे वाटले.
छान वाटलं वाचून. खरंच सोनेरी
छान वाटलं वाचून. खरंच सोनेरी किनार
@टीना, बर्याच वस्तू
@टीना, बर्याच वस्तू मिस्प्लेस झाल्यायत पण इर्रिट्रीवेब्ली लॉस्ट अशी एकही नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय आमच्या मुंबईकरांना. एखादी वस्तू हरवण्याचा मी निकराचा प्रयत्न करावा आणि ती वस्तू तितक्याच सौजन्यपूर्वक पुन्हा कोणीतरी सापडवून देऊन तो हाणून पाडावा ही मुंबईकरांची नियत आणि माझी नियती.
आणि असं हरवण्यातलं आणि हरवून जाण्यातलं सुख मला वारंवार मिळतं, हे काय कमी आहे!
अरे बापरे! काय हे घोर
अरे बापरे!
काय हे घोर सत्ययुग!!
आता कसं व्हायचं आमच्यासारख्या आळशी, कामचुकार आणि खादाडखाऊ लोकांचं!!!
-गा.पै.
अशा गोष्टी शेअर व्हायला
अशा गोष्टी शेअर व्हायला हव्यात. वाचायला बरं वाटतं.
>>
+१
>>
+७८६
दुर्दैवाने मला मात्र फार चांगला अनुभव नाही अश्याच एका मोबाईले हरवण्याच्या केसमध्ये, म्हणून नाही शेअर करत.
पण माझे नशीबच खोटे म्हणा वा माझा विसरभोळा धांदरट स्वभाव म्हणा, त्यामुळे अधूनमधून आपले काहीतरी नुकसान होणारच अश्या मनाच्या तयारीत असतोच मी नेहमी..
स्वताच्या मुर्खपणामुळे गमावलेल्या गोष्टींचे किस्से मात्र शेअर करेन कधीतरी ..
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्द्ल
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्द्ल धन्स. हरवलेली वस्तु परत मिळण्यासारखं सुख जगात नाही. पण ते नेहमीच नशिबी येत नाही. त्यामुळे भविष्यात काळजीपुर्वक वागेन.
प्रसार माध्यमांमधुन पोलिसांबद्दल बरेच नकारात्मक/ निराशाजनक चित्र उभे केले जाते. त्याला अपवाद म्हणून हा किस्सा इथे लिहिला. जर काही वाईट घडत असेल तर ते लगेच शेअर केले जात, मग काही चांगले केल्यास तेही शेअर करायलाच हवे ना?
छान वाटलं वाचून. . लिहिले पण
छान वाटलं वाचून. . लिहिले पण मस्त.आहे ..
आम्ही एकदा बहिनीकडे गावी जात होतो वीटी वरुन आमची ट्रेन होती..
आम्ही रात्री ८ वाजता निघालो . नेहमी प्रमाने अधेंरीवरुन आम्हाला रिक्षा मिळत नव्हती. मग खुप वेळाने मिळाली.. आम्ही पटापट रिक्षात बसलो .. पण लगेच मला हाताला कायतरी लागले..बघीतले तर एक नविनच मोबाईल (smartphone). आम्हाला समजले कोण तरी उतरले असणार त्याचा मोबाईल असेल. पण आम्हाला वेळ नव्हता त्याला CONTACT करुन मोबाईल द्यायला . जवळच दिराचे घर होते त्याना बाहेर बोलवले आनि हा मोबाईल वरुन फोन आला तर पत्ता देऊन त्याला मोबाईल परत करायला सांगुन आम्हि निघालो.. मग ट्रेनमध्ये बसल्यावर दिराला फोन केला .. ते बोलले मोबाईल घेउन गेला (कोन तरी सुरतवरुन आला होता मुबंईत तो विसरला पैसे देत होता पण घेतले नाहीत )
हरवलेली वस्तु ज्याची त्याला मिळाली की मनाला किती बरे वाटते..:)

नवर्याचा मोबाईल हरवला होता असाच रिक्षात पण नाही मिळाला.. ८ दिवसच झालेले घेऊन.
छान अनुभव. माझ्या भावाला
छान अनुभव.
माझ्या भावाला मिक्स अनुभव आहेत. एकदा त्याचं पूर्ण volet पडलेलं, पैसे आणि कार्डस होती. दोन मुलं घरी रात्री द्यायला आली. बक्षीस पण घ्यायला तयार नाहीत.
नंतर एकदा हरवलेला महागडा मोबाईल मात्र नाही मिळाला त्याचा. पोलीस कम्प्लेंट केली होती.
सृष्टी गुड, तू गावाला जात असताना पण जी तत्परता दाखवलीस ह्याबद्दल कौतुक. तुझा किस्सा वाचून मला त्या दोन मुलांची आठवण झाली.
सृष्टी गुड, तू गावाला जात
सृष्टी गुड, तू गावाला जात असताना पण जी तत्परता दाखवलीस ह्याबद्दल कौतुक.>>>:)

अग अस दोनदा झाले पण एकदा ती व्यक्ती आनि त्यांच कुटुंबसमोरच उतरले माझ्या मग मी लगेचच बोलवुन मोबाईल दिला..
टिने, मला ही वॉलेट नव्हतं गं
टिने, मला ही वॉलेट नव्हतं गं मिळालं परत. आणि माझं फार लाडकं वॉलेट होतं ते
असो!
मला कार्ड्स मिळाल्याचा आनंद जास्त आहे.
वरती चुकून वॉलेट परत मिळालं लिहिलं आहे. आय मिन कार्ड्सच. पैसे नाही मिळाले
रीया, मलाही पर्स परत मिळाली
रीया, मलाही पर्स परत मिळाली पण पैसे सगळे गायब होते.
अमि, छान अनुभव आहे तुमचा.
अमि, छान अनुभव आहे तुमचा.
अमि, छानच अनुभव!!
अमि, छानच अनुभव!!