जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २

Submitted by मार्गी on 31 July, 2015 - 05:17

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन!

जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १

मदत कार्यातील पहिली संध्याकाळ

५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी श्रीनगरमध्ये पोहचलो आणि सेवा भारतीचं कार्यालय बघितलं. हे एका निवृत्त पोलिस अधिका-याचं घर आहे आणि ते संस्थेने भाड्याने घेतलेलं आहे. दुमजली घर आहे. तिथे सांगितलं गेलं की, पूर आला तेव्हा पहिला मजला पूर्ण पाण्याखाली गेला होता. अजूनही एक- दोन जागी चिखल साचलेला दिसतो आहे. इथे ७ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबरपर्यंत पाणी भरलं होतं. नंतर ते हळुहळु कमी होत गेलं. खालच्या मजल्यावरच्या जागेमध्ये औषधे, रेशन, खाण्याचे पॅकेटस असं सामान ठेवलेलं आहे. काही कार्यकर्तेही खाली राहात आहेत. वरच्या मजल्यावर जाण्याच्या शिडीवरच्या लाकडावर पाण्याचे डाग दिसत आहेत. वर जास्त कार्यकर्ते मुक्काम ठोकून आहेत. कार्यालय वरच आहे. किमान पंचवीस तरी कार्यकर्ते इथे असावेत.

सेवा भारतीच्या मदत कार्यावर देखरेख करणा-या ज्येष्ठ अशा दादाजींनी गेल्या गेल्या स्वागत केलं. त्यांचं खरं नाव वेगळं आहे; पण इथे सगळे जण त्यांना दादाजीच म्हणतात. ते मूळचे बंगालचे आहेत; पण दहा वर्षांपासून कश्मीरलाच आहेत. बंगाली वळणाच्या हिंदीत ते बोलतात. येण्यापूर्वी त्यांना फोनवर विचारलं होतं की, कसं काम असणार आहे सांगता का, त्याप्रमाणे तयारी करून येऊ शकेन. त्यावर त्यांनी इतकंच म्हंटलं होतं की, 'तू फक्त तन, मन आणि बुद्धी सोबत घेऊन ये, बस्स.' आता हळु हळु इथली स्थिती समजेल आणि मला काय करायचं आहे हे स्पष्ट होईल. दादाजींनी सांगितलं की एक मीटिंग होणार आहे आणि मला त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे. श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौकाच्या जवळ रेसिडन्सी रोडवर एक जुना आश्रम आहे. सेवा भारतीच्या कामासाठी आलेले अनेक डॉक्टर्स आणि कार्यकर्ते तिथे थांबले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून दररोज तिथे एक आरोग्य शिबिर घेण्यात येतं. तिथे आज सर्व डॉक्टरांची अनुभव सांगण्यासाठीची मीटिंग आहे. तिथेच सगळ्यांशी ओळखसुद्धा होईल.

त्या सगळ्या लोकांना भेटल्यावर शरीराला आपोआप साठ तासांच्या प्रवासाचा जणू‌ विसरच पडला. थकवा जाऊन काम करण्याचा उत्साह आला. बैठकसुद्धा खूप रंगली. देशाच्या अनेक राज्यांमधून आलेल्या डॉक्टर्स आणि कार्यकर्त्यांनी ह्या कामामध्ये आलेले अनुभव सांगितले. आत्तापर्यंत कश्मीरच्या सर्व पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबिर झाले आहेत- कुपवाडा, गांदरबल, बांदीपोरा, पुलवामा, श्रीनगर, अनंतनाग, बड़गाम इ. इथे सेवा भारतीचे एकल विद्यालयमध्ये शिक्षक किंवा क्षेत्र प्रमुख असे काम करणारे स्थानिक कार्यकर्ते सोबत असतात. एकल विद्यालय हा देशाच्या सर्वदूर आणि दुर्गम भागांमध्ये एक शिक्षक असलेल्या शाळा चालवणारा मोठा प्रकल्प आहे. ह्याद्वारेच सेवा भारती अगदी गावोगावी पोहचली आहे. इतकंच नाही, जेव्हा पूराचा तडाखा बसला, तेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंग आणि राबदेव बाबांच्या एका संस्थेने मदत कार्यासाठी सेवा भारतीच्या ह्या कार्यकर्त्यांना विकत घेण्याचाही प्रयत्न केला होता. ह्या कार्यकर्त्यांना त्यासाठी मोठ्या ऑफर आणि पैसेसुद्धा देऊ केले होते; कारण इथे इतक्या तळागाळात संपर्क असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या कमीच असणार. पण ही ऑफर मिळूनही ते सेवा भारतीच्याच सोबत राहिले. असे दोन कार्यकर्ते आणि दोन किंवा अधिक डॉक्टर्स एका एका गावात जाऊन शिबिर घेत आहेत, असं समजलं.

बैठकीमध्ये डॉक्टर्स आणि व्हॉलंटिअर्स ह्यांचे अनेक गट केले आहेत. त्यानुसार गटातील एक जण पुढे येऊन अनुभव सांगत आहे. बहुतांश डॉक्टरांच्या सांगण्यात आलं की, स्थानिक लोकांनी चांगलं आदर आतिथ्य केलं. आरोग्य शिबिर घेतल्यामुळे तिथल्या लोकांना उपयोग झाला, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. काही गावांमध्ये शिबिर रात्री उशीरापर्यंत चालली; त्यामुळे डॉक्टरांना गावातच थांबावं लागलं. तिथे सर्वांनी आग्रहाने त्यांना घरी बोलावून त्यांची सोय केली. काही ठिकाणी तर पूरामुळे घराचं नुकसान झाल्याने लोक एकाच खोलीत राहात होते. तरीही त्यांनी डॉक्टरांची चांगली व्यवस्था केली. काही डॉक्टरांच्या सांगण्यात आलं की, लोक शिबिर संपलं‌ तरीही येतच होते. शेवटपर्यंत औषधे मागत होते आणि काही ठिकाणी दुस-या दिवशी परत जातानाही लोक औषधे दिल्याशिवाय सोडत नव्हते.

तिथेच हेसुद्धा कळालं की, काही शिबिर दहशतवाद्यांच्या पॉकेटसमध्येही झाली आहेत. 'इंडियन डॉग्ज गो बॅक' असाही‌ बोर्ड एका डॉक्टरने बघितला असं सांगितलं. काही जणांनी सांगितलं की, घरी मुक्काम केला असताना काही वेळेस टोकाच्या चर्चासुद्धा झाल्या. एखाद- दोन ठिकाणी रात्री घरात थांबले असताना डॉक्टरांना भारत सरकारबद्दल बरंच काही ऐकावं लागलं; ज्याच्यावर ते शांत राहिले. शक्यतो आम्ही शांत राहिलो, पण काही वेळेस बोलावं लागलं असं डॉक्टर्स म्हणाले. एक आसामचे डॉक्टर होते, त्यांनी सांगितलं की, जेव्हा लोक भारत सरकारला नावं ठेवू लागले, तेव्हा आम्हांला बोलावं लागलं. आम्ही त्यांना सांगितलं की, आसाममध्येही मोठा पूर आला आहे आणि तिथे केंद्र सरकारने पाच हजार कोटींची मदत घोषित केली आहे पण कश्मीरला सरकारने एकवीस हजार कोटींची मदत घोषित केली आहे! असेच प्रसंग एक- दोघांनी सांगितले. एकाने म्हंटलं की, जेव्हा मदत कार्यासाठी कश्मीरला येण्याचा निर्णय घरच्यांना सांगितलं, तेव्हा ह्या 'वेडेपणाबद्दल' घरचे चांगलेच रागावले. एकाने तर निघताना आपले विमा घरच्यांच्या हवाली केले! 'एक ना एक दिवस मरायचेच आहे, तर तोच मृत्यु कश्मीरच्या लोकांना मदत करताना आला तर काय हरकत आहे,' असाही विचार एकाने केला होता!

चर्चेच्या शेवटी दादाजींनी सर्वांचं कौतुक केलं. काही डॉक्टरांना आलेल्या अनपेक्षित अनुभवांबद्दल त्यांनी सांगितलं की, हे बघा, प्रत्येक घरामध्ये एखादा तरी असा माणूस असतो जो सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. प्रत्येक ठिकाणी एक तरी बिघडलेला मुलगा असतो जो व्यसनी असतो किंवा मारामारी करतो. तसेच इथेही काही लोक आहेत. त्यांनी पुढे सांगितलं, जशी आई आपल्या बिघडलेल्या मुलावरही सारखंच किंबहुना जास्त प्रेम करते, तसाच विचार आपण अशा लोकांबद्दल मनात बाळगला पाहिजे. त्यांनी एक गोष्ट विशेष करून सांगितली की अशा थोड्या गोष्टींवरून आपण सर्व लोकांबद्दल मत बनवू नये. दादाजींनी पुढे सांगितलं की, काही शिबिरं तर आतंकवाद्यांच्या बालेकिल्ल्यातही झाली आहेत. एक शिबिर तर अफजल गुरूच्या गावाजवळच झालं आणि इतकंच नाही तर एका कार्यकर्तीचे वडील पूर्वी अतिरेकी होते. परंतु आता परिस्थिती‌ बदलली आहे आणि तिचे वडीलही आता तिच्यासोबत सेवा भारतीच्या कार्यालयात येतात! एक शिबिर पुलवामा जिल्ह्यातल्या एका गावात होणार होतं; ते एक दिवस उशीरा करावं लागलं; कारण नियोजित दिवशी तिथे एक एनकाउंटर झालं! दादाजी म्हणाले की, जशी झारखण्डमध्ये, महाराष्ट्रात आणि अन्य राज्यांमध्ये गोळी चालते, तशीच ती इथेही‌ चालते! त्याची इतकी चिंता करू नका. आपण इथे कोणाला समजवायला आलेलो नाहीत तर सर्व काही समजून घेण्यासाठी आलेलो आहोत!

एका डॉक्टरांनी एका गावामध्ये भेटलेल्या एकमेव शीख कुटुंबाबद्दल सांगितलं. ते त्या गावातलं एकमेव शीख कुटुंब आहे आणि इतर शीख परिवार आधीच ते गाव सोडून गेलेले आहेत; पण हे मात्र अजूनही तिथे ताठ मानेने जगत आहेत. चर्चेच्या शेवटी एका तरुणाला आपल्या भावना आवरल्या नाहीत आणि डोळ्यात अश्रू असताना त्याने सांगितलं की, फार वर्षांनंतर तो त्यांच्या गावाजवळ जाऊ शकला आहे. तो कश्मिरी‌ हिंदु होता आणि कश्मीर खो-यातून हिंदु निर्वासित झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या गावाच्या इतक्या जवळ गेला होता. आणि श्रीनगरमध्येही‌ तो इतका निर्धास्तपणे पहिल्यांदाच फिरत होता; जे पूर्वी शक्य नव्हतं. त्याला विश्वास वाटत होता की, पूरामध्येही जर देशातून इथे इतके डॉक्टर्स आणि कार्यकर्ते येऊ शकतात तर मग परिस्थिती का बदलणार नाही!

उशीरापर्यंत ती मीटिंग चालली आणि अनेकांशी ओळख झाली. इथे देशाच्या जवळजवळ सगळ्या भागांमधून लोक आलेले आहेत. दोन डॉक्टर चेन्नैहून आले आहेत. त्यांना तर सेवा भारतीबद्दल काहीही माहिती नव्हतं. पूरग्रस्तांच्या मदतीला जायचं हा निश्चय करून ते श्रीनगरला पोहचले. सेवा भारतीची माहिती त्यांना टॅक्सीवाल्याकडून मिळाली! अशाच प्रकारे अनेक लोक सेवा भारतीच्या संपर्कात आले आणि मदत कार्यात सहभागी झालेले आहेत. आता सगळे सोबत काम करत आहेत. गुजरातमधूनही अनेक सिनिअर डॉक्टर्स आणि इंटर्नशिप करणारे डॉक्टर आले आहेत. नॅशनल मेडिको ऑर्गनायजेशन अर्थात् एनएमओनेसुद्धा अनेक डॉक्टरांना पाठवलं आहे.

आता ह्या कामाबद्दल थोडी माहिती मिळते आहे. पण मनात काही प्रश्नही आहेत. बहुतेक डॉक्टरांनी सांगितलं की लोकांना शिबिरांचा खूप फायदा झाला. पण लोकांची खरी गरज काय होती, ह्याबद्दल थोडेच डॉक्टर्स बोलले. मनात असा प्रश्न आला की, असं तर नाही की लोकांची गरज वेगळी‌ आणि मदत वेगळी चालू आहे. मनातल्या मनात नकळत ह्या मदत कार्याची तुलना मागच्या वर्षी उत्तराखंडच्या पूरामध्ये केलेल्या मदत कार्यासोबत चालू झाली. त्यावेळेस परिस्थिती आणि आव्हाने अगदी वेगळी होती. तेव्हा तिथे सर्व रस्ते कोसळले होते; कनेक्टिव्हिटी सर्वांत महत्त्वाची गोष्ट होती. नदीच्या तोंडावरून दुर्गम पायवाटेने दूरवर चालावं लागत होतं. इथे तर कनेक्टिव्हिटी पूर्ण आहे; रस्तेही चांगले आहेत. सगळ्या ठिकाणी कार्यकर्ते वाहनांनीच जात आहेत. पायी जाण्याची गरज कुठे दिसत नाहीय. आणखी एक गोष्ट जाणवली की त्या वेळेस ज्या संस्थेसोबत मदत कार्य केलं होतं ती पुण्याची मैत्री संस्था एका अर्थाने रिलिफ कामामध्ये स्पेशलायझेशन असलेलीच होती. इथे सेवा भारती मात्र शिक्षण, आरोग्य, उपजीविका अशा मुद्द्यांवर काम करणारी एक संस्था आहे. त्यामुळे तेव्हाचं काम आणि हे काम ह्यामध्ये फरक असणारच. . .

आता सगळ्यांसोबत मिळून काम करायचं आहे. काही जण रात्री आश्रमातच थांबतील तर दादाजी व अन्य साथीदारांसह मला मगरमल बागेतील कार्यालयात जायचं आहे. रात्री मोहक थंडी आहे आणि आकाश निरभ्र आहे. ओळखीचे तारे नित्याप्रमाणे तळपत आहेत. . . उद्या सकाळी खालून पाणी आणायचं आहे. इथे अजूनही पाणी व विजेची कमतरता आहे.


मदत कार्यातील डॉक्टर्स, कार्यकर्ते आणि मान्यवर

पुढील भाग: जम्मू कश्मीर मदकार्याच्या आठवणी- ३

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'एक ना एक दिवस मरायचेच आहे, तर तोच मृत्यु कश्मीरच्या लोकांना मदत करताना आला तर काय हरकत आहे,' असाही विचार एकाने केला होता! >>>>> काय जबरदस्त मानसिकतेचे लोक आहेत हे - केवळ दंडवत...

सारेच अनुभव वाचून अवाक झालोय ...

तुम्ही सगळी मंडळी (ते डॉ., कार्यकर्ते) केवळ ग्रेट आहात ...

सेवा भारती विषयी जरा सविस्तर लिहिणार का ??

प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. पण एक विनंती की हे काम खूप ग्रेट आहे; उदात्त आहे असं कृपया मानू नका. स्वाभाविक व उत्स्फूर्त असं हे काम असतं आणि ते सामान्य लोकच करत असतात. आपण सर्व जणच कुठे ना कुठे असं काम करतच असतो. त्यामुळे दंडवत- उदात्त- ग्रेट असे लेबल लावण्याची गरज नाही! धन्यवाद! पुढच्या भागांमध्ये अपेक्षित तपशील येतीलच.