महिला दिन सामाजिक उपक्रम २०१५ - आढावा

Submitted by कविन on 22 July, 2015 - 01:00

नेहमीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्यापैकी काही मायबोलीकरांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रमासाठी मायबोलीवर आवाहन व घोषणा केली. या आवाहनातून वाचकांना त्यांच्या माहितीत असलेल्या, चांगले काम करणार्‍या गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे ते कळविण्यास सांगितले. थोड्याच दिवसांत आपल्याकडे ७ सेवाभावी संस्थांची माहिती व त्यांची निकड काय आहे याची एक मोठी यादीच जमा झाली. त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोलीवर एक जाहीर आवाहन केले.

याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी देऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले. त्यामुळे त्या संस्थेकडून देणगीची पावती घेणे, ती देणगीदारांस सुपूर्द करणे व ज्या कामासाठी किंवा वस्तूसाठी देणगी दिली आहे त्या कामाची / वस्तू खरेदीच्या प्रगतीची संस्थेकडून माहिती घेणे यासंदर्भात आम्ही थोडीफार मदत करू शकलो. ज्यांनी असा पसंतीक्रम कळवला नव्हता त्यांना देणगी देण्यासाठी आपण संस्था अशाप्रकारे निवडून दिल्या की जेणेकरुन प्रत्येक संस्थेला शक्यतो समप्रमाणात देणगी मिळणे शक्य व्हावे. असं करताना आपण त्या त्या संस्थेच्या गरजेची पुर्तता होईल याकडेही शक्य तेव्हढं लक्ष दिलं आहे.

सांगावयास आनंद वाटतो की या उपक्रमाची माहिती वाचून मायबोलीचे सभासद नसलेल्या, किंवा मायबोलीवर केवळ वाचनमात्र येणार्‍या काहीजणांनीही मदतीचा हात पुढे केला.

यावर्षी एकूण रु.२,२४,१००/- (रुपये दोन लाख चोविस हजार शंभर मात्र) इतकी देणगी जमा झाली.त्यामधून प्रत्येक संस्थेला मिळालेली रक्कम व त्याचा त्यांनी केलेला विनियोग खाली देत आहोत. संस्थांकडून मिळालेले आभार पत्रं, बीलं तसेच खरेदी केलेल्या वस्तूंची प्रकाशचित्रं वेगळा धागा काढून लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.

1. अंधशाळा :- मिळालेल्या रु.२५०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र) या देणगीतून त्यांनी शैक्षणिक वस्तू ( वेगवेगळ्या क्षमतेची मॅग्निफ़ायर्स इ.) यांची खरेदी केली आहे. २०१३ साली दोन देणगीदारांनी ’हायजीन प्रॉडक्ट्ससाठी देणगी’ असा प्राधान्यक्रम नोंदवला होता. त्यावेळी अंधशाळेची जेव्हढी गरज होती त्याची पुर्तता होऊन हा निधी शिल्लक राहीला होता ज्याच्यातून काही हायजीन प्रॉडक्टसची खरेदी करण्यात आली आहे.

इथे या संदर्भातली अधीक माहिती वाचता येईल

2. अस्तित्त्व प्रतिष्ठान, पुणे : मिळालेल्या रु.२५०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र) या देणगीचा वापर कौशल्य प्रशिक्षण वर्ग/ व्यवसयिक प्रशिक्षण वर्ग/ संगणक प्रशिक्षं वर्ग, घरगुती उपकरणे इत्यादी साठी करण्यात येणार आहे

3. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग : रु.२८१००/- (रुपये अठ्ठावीस हजार शंभर मात्र) इतकी रक्कम देणगी दाखल देण्यात आली आहे. देणगी रकमेतून गावात सोलार दिवे वाटप करण्यात आले.

4.मैत्री संस्था, पुणे : रु.२५०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र) इतकी रक्कम देणगी दाखल देण्यात आली आहे.
या देणगीचा विनियोग "शैक्षणिक कृती कार्यक्रम", दिवाळी शिबिर/आनंदमेळावा, कोरकू-मराठी द्विभाषिक पुस्तके तसेच मुलांच्या अभ्यासाला पूरक असे इतर काही उपक्रम याकरीता केला जाईल. सन २०१३-१४ मधे देखील असेच काही उपक्रम त्यांनी राबवले होते ज्यांना मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

"पुरेशा संख्येने स्वयंसेवक मिळाले नाहीत त्यामुळे प्रत्येक महिन्यात प्रत्येक गावामध्ये कोणीतरी जाणे अपेक्षित होते ते घडले नाही. चांगले स्वयंसेवक मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत" असं त्यांच्या २०१३-१४ च्या अहवालात वाचले. त्यादृष्टीने जर कोणाला काही करणं शक्य असेल तर त्यांना संपर्क साधावा ही विनंती.

5. निवासी अपंग कल्याण केंद्र, सटाणा, जि. नाशिक : ग्रामीण भागातील विकलांग व गरीब मुलांना शिक्षण, फिजियोथेरपीसारखे उपचार आणि वैद्यकीय मदत देणार्‍या या संस्थेला मिळालेल्या रु.३६०००/- (रुपये छत्तीस हजार मात्र) या देणगीतून शैक्षणिक वस्तू तसेच इतर गोष्टींची पुर्तता झालेली आहे.

५. सावली सेवा ट्रस्ट, पुणे : सावली संस्थेच्या बुधवार पेठ रेड लाईट एरियामधील गरजू मुलांची शाळा - कॉलेज व वेगवेगळ्या क्लासेसची फी भरण्यासाठी त्यांना निधीची आवश्यकता असल्याचे संस्थेने कळविले होते. तसेच मुलांचे गणवेश, चपला-बूट इत्यादी खरेदी करण्यासाठीही त्यांना निधीची गरज होती. मिळालेल्या रु.२५०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र) या देणगीतून त्यांनी मुलांच्या शाळा-कॉलेज-क्लासेस चे शुल्क भरणे व गणवेश - दप्तरे - चपला - बूट यांची खरेदी केली आहे

इथे या संदर्भात अधिक माहिती मिळेल.

६. शबरी सेवा समिती, ता. कर्जत : या संस्थेला त्यांच्या कशेळे येथील वसतीगृहात बसवण्यासाठी सोलार दिव्यांची गरज होती. त्यांना मिळालेल्या रु.३५,०००/- (रुपये पस्तीस हजार मात्र)

इथे या संदर्भातले फोटो बघता येतील

७. सुमति बालवन, पुणे : संस्थेने त्यांना मिळालेल्या रु.२५०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र) या देणगी रकमेमधून अनाथाश्रमाकरता किराणा माल आणि कपाटांची खरेदी केली.

इथे या संदर्भात अधिक माहिती मिळेल.

सर्व संस्थांनी आपल्या स्वयंसेवकांच्या नावाने आभारपत्रे दिली आहेत व ज्यांना शक्य आहे त्यांनी साहित्य खरेदीच्या पावत्या, साहित्याचे फोटोग्राफ्स, बांधकाम / प्रकल्पाचे फोटोग्राफ्स आपल्यासाठी पाठविले आहेत. ते आपल्या वाचनासाठी वेगळा बाफ काढून लवकरच प्रकाशीत केले जातील.

उपक्रमासाठी काम करणारे स्वयंसेवक : अरुंधती कुलकर्णी, सुनिधी, मो, स्वाती२, जाई., साजिरा, जिज्ञासा, मुग्धानंद, कविन,.
विशिष्ठ संस्थांबरोबर समन्वयाचे काम करणारे मायबोलीकर : हर्पेन

या सर्व उपक्रमामध्ये प्रत्येक पावलाला मायबोलीकरांनी खूपच मोलाचे सहकार्य केले. मायबोली प्रशासनाने मायबोलीचे माध्यम वापरण्याची परवानगी दिली यासाठी त्यांचे खास खास आभार. सोशल नेटवर्किंगमधून काही उत्तम, विधायक व समाजोपयोगी कार्य करता येणे व त्यानिमित्ताने अगोदर कधी न भेटलेल्या मायबोलीकरांनी एकत्र येऊन काम करणे हा अनुभव आम्हां सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी होता.

काही उल्लेख नजरचुकीने राहिलेले असल्यास आपण लक्षात आणून द्यालच ह्याची खात्री आहे.

सस्नेह,

सामाजिक उपक्रम २०१५ स्वयंसेवक टीम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोशल नेटवर्किंगमधून काही उत्तम, विधायक व समाजोपयोगी कार्य करता येणे व त्यानिमित्ताने अगोदर कधी न भेटलेल्या मायबोलीकरांनी एकत्र येऊन काम करणे हा अनुभव आम्हां सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी होता.

>>> मस्तच! Happy

धन्यवाद कविन! चांगला आढावा आहे.

सामाजिक उपक्रमांतर्गत ज्या सेवाभावी संस्थांना व त्या अंतर्गत गरजू मुलांना व स्त्रियांना मदत करता आली त्या प्रत्येक संस्थेने पाठवलेली आभारपत्रे, वस्तूखरेदीच्या पावत्या आणि शक्य झाले असल्यास धाडलेले फोटोग्राफ्स वगैरे तपशील वेगवेगळ्या धाग्यांद्वारे मायबोली वाचकांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना आवडली. त्यामुळे सुटसुटीत स्वरूपात धागे प्रकाशित होतील, शोधायलाही सोपे जाईल व त्यांच्या लिंक्स एकत्रित स्वरूपात या मुख्य धाग्यावर देता येतील. फारच छान! Happy