९ जून २०१५ ला मला कोल्हापूरहून पुण्याला जायचे होते. नेहमीप्रमाणेच पहिला पर्याय म्हणून मी रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाची स्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली. शाळांच्या सुट्ट्या संपत आल्यामुळे रोजच्या गाड्यांना प्रचंड वेटिंग लिस्ट होती. अगदी कोयनेलाही १५३ वेटिंग होते. अलीकडील काळात कोल्हापूर-पुणे रेल्वे प्रवासासाठी नवे आणि चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ९ जूनसाठी मी १२१४७ कोल्हापूर ह. निजामुद्दिन एक्सप्रेसचा पर्याय निवडला. ही गाडी सुरू झाल्यापासून मी या पर्यायाचा बऱ्याचदा उपयोग करून घेत आहे. या गाडीतील जागाही संपत आल्याचे लक्षात येताच, प्रवासाच्या तीन दिवस आधी माझे आरक्षण करून घेतले आणि मी थोडा निवांत झालो.
९ जूनला गाडीची वेळ सकाळी ९.०५ची होती. मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे आणि मी स्वतःच तयार केलेल्या नियमानुसार मी किमान तासभर आधीच रेल्वे स्टेशन गाठले. कोल्हापूर स्टेशनच्या आवारातच असलेल्या पूर्वीच्या रेल्वे फाटकाजवळ येताच गाडी फलाटावर येत असल्याचे दिसले. गाडी तिच्या जागेवर (फलाट क्र. २) येऊन थांबल्यावर निव्वळ उत्सुकतेपोटी मी थोडे पुढे असलेल्या बुकींग कार्यालयात जाऊन गाडीच्या जनरलसाठीच्या गर्दीचा अंदाज घेऊ या असा विचार केला. कारण ही गाडी सुरू झाल्यानंतर जनरलमध्ये गर्दी खूप वाढलेली आहे आणि त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारला जाणाऱ्यांचा समावेश असतो. पण त्या दिवशी कोल्हापुरातून निघताना जनरलला गर्दीच फारशी नव्हती. आरक्षण मात्र फुल्ल झाले होते. त्यानंतर मी माझ्या डब्याजवळ पोहचलो. पाहिले तर तब्बल २४ वर्षे जुना डबा. म्हणजे आणखी चार-पाच वर्षांमध्ये हा डबा सेवेतून काढून घेणे अटळ. केवळ लोकप्रिय आणि अनावश्यक घोषणा, मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्या सुरू करतानाच डागडुजी-साफसफाई, संचालन यातील कर्मचारी कपात यासारखे निर्णय होऊ असल्याने त्याचा रेल्वेच्या आरोग्यावर कसा परिणाम होत आहे त्याचे हे पहिले दर्शन झाले. त्या डब्याचे पीओएच (म्हणजे जुन्या डब्याला नव्यासारखे पुन्हा सजविणे) होऊन सव्वा वर्षच झाले होते, तर पुढच्या पीओएचचा ड्यू मंथ ऑक्टोबर २०१५ निश्चित करण्यात आले आहे. त्याचा अर्थ अजून चार महिने तरी या डब्याची स्थिती सुधारणार नाही.
माझ्या सीटवर पोहचलो, तर साईडच्या बर्थला सीटमध्ये रुपांतरित करता येणे शक्य नाही हे लक्षात आले. कारण बर्थ वर केल्यावर त्याला आधार देणाऱ्या क्लिप गायब होत्या. बाहेर हवा चकचकीत असली तरी जून असल्याने कोल्हापुरात हवा बरीच दमट झाली होती आणि आकाशात वेगवेगळ्या रंगांचे ढगांचे थर अतिशय आकर्षक दिसत होते. पंखा लावावा म्हटले, तर डब्यातील कोणताच पंखा चालत नसल्याचे माझ्याबरोबरच अन्य प्रवाशांच्या लक्षात आले. गाडी सुटण्याची वेळ जशी जवळ येत होती, तशी फलाट व गाडीतील लगबग वेग घेत होती. मात्र यापेक्षा शेजारच्या फलाट क्र.-१ च्या शेजारील लोको स्टॅबलिंग लाईनवर शांतपणे उभे असलेले कृष्णराजपुरमहून आलेले निळ्या-पांढऱ्या रंगसंगतीतील मोहक डब्ल्यूडीपी-४ हे इंजिन अधिक लक्ष वेधून घेत होते. न राहून मी त्याचा फोटो काढून घेतला.
एकीकडे हे सर्व घडत असताना गाडी सोडण्यासाठीची तयारी रेल्वे कर्मचारी करत होते. वेगवेगळ्या विभागांकडून डॉक्युमेंटेशन सुरू होतेच. स्टेशन मास्तरने पुण्याहून सेक्शन कंट्रोलरकडून गाडीला सोडण्यासाठी परवानगी घेतली होती. दरम्यानच्या काळात ब्रेक पॉवर सर्टिफिकेट आणि अन्य कागदपत्रांवर ड्रायव्हर आणि गार्डच्या नोंदी आणि स्वाक्षऱ्याही घेऊन झाल्या होत्या. योग्यवेळी स्टेशन मास्तरने आपल्या केबीनमधील ब्लॉक इस्ट्रुमेंटच्या माध्यमातून दोन किलोमीटर पुढे असलेल्या गूळ मार्केटच्या स्टेशन मास्तरला इलेक्ट्रॉनिक संदेश (ट्रेन कमिंग फ्रॉम) पाठविला, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने ट्रेन गोईंग टू संदेश पाठविला आणि निजामुद्दीन एक्सप्रेस कोल्हापुरातून प्रस्थान करण्यासाठी स्टार्टर आणि ॲडव्हांस्ड स्टार्टर सिग्नल ऑफ झाला. सिग्नल मिळाल्यावर आमच्या लोको पायलटने हॉर्न वाजवून त्याची सूचना गार्डला दिली. गार्डनेही ठीक ९.०५ वाजता हिरवा बावटा दाखविल्यावर पुण्याच्या ११३८८ या क्रमांकाच्या डब्ल्यूडीएम-३डी अश्वाने आमच्या १९ डब्यांच्या रथाला गती देण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज मात्र कर्कश्य होता. गाडी फलाटावरून बाहेर पडताना रोलिंग आऊट हटमध्ये बसून अखेरची तपासणी करण्यासाठी कर्मचारी गाडीच्या चाकाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. कोल्हापूर-पुणे प्रवासासाठी निजामुद्दीन एक्सप्रेस आणि अहमदाबाद एक्सप्रेस हे दोन चांगले पर्याय उपलब्ध झाल्यामुळे अलीकडील काळात या शहरांदरम्यान रेल्वेची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे.
आता गाडीने वेग घेतला आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.-४, वलिवडे हॉल्ट स्टेशन व त्यानंतर पंचगंगा नदी ओलांडले. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या गूळ मार्केट स्टेशनमध्ये नुकतील एक मालगाडी दाखल झाली होती आणि आलेल्याच डब्ल्यूडीजी-४ च्या मदतीने तिचे लगेच शंटिंग सुरू होते. माल उतरवून घेण्यासाठी ट्रकवाल्यांचीही ट्रकसकट धावपळ सुरू झाली होती. कारण उशीर झाला तर डिमरेज चार्जस लागण्याची शक्यता. बऱ्याच वर्षांनी या स्टेशनमध्ये अशी हालचाल पाहून खूपच उत्साहित व्हायला झाले. भविष्यात येथूनच कोल्हापूर कोकण रेल्वेला आणि कदाचित कराडलाही थेट जोडण्याची योजना आहे. पंचगंगेच्या पुलावर वेग मर्यादा लागू असल्यामुळे गाडीचा वेग थोडा कमी झाला होता. मात्र रुकडीचा डिस्टंट डबल यलो असल्याने वेग कमी होत गेला होता. रुकडीत मेन लाईनवर आम्ही सातारा-कोल्हापूर पॅसेंजरची वाट पाहत उभे होतो. काही मिनिटांतच खचाखच भरलेली पॅसेंजर आली आणि लागलीच आम्हाला रुकडी सोडण्याची परवानगी मिळाली. प्रवासातील पहिले क्रॉसिंग वेळेत पार करून गाडी पुढे धावू लागली. हातकणंगले, जयसिंगपूर अशी स्थानके आणि हो कृष्णेचे जवळजवळ कोरडे पात्र ओलांडत असताना या गाडीत ऑन-बोर्ड हाऊस किपिंग सुविधा सुरू झालेली पाहून सुखद धक्का बसला. त्यासाठीच्या कर्मचाऱ्यांनी गाडीची वरवर स्वच्छता केली. माझ्या कम्पार्टमेंटमध्ये असलेल्या लहान मुलांचे इकडे-तिकडे फिरत वेफर्स वगैरे खाणे चालले होते. त्यामुळे आमच्या सीटजवळ कचरा जमण्यास सुरुवात झाली होती. ते पाहून स्वच्छता अधिकाऱ्याने त्यांना कचरा न करण्याचे जरा दरडावतच बजावले. अजून गाडी सुटून एक तासही झालेला नाही आणि तेवढ्यात तुम्ही असा कचरा करायला सुरुवात केलेली आहे असे त्याने ऐकविले. त्यानंतर चेकर आला आणि आमची तिकिटे तापसू लागला. माझ्याजवळ बसलेल्या लहान मुलीला गमतीने त्याने तिकीट विचारल्यावर ती अक्षरशः आपल्या आजोबांच्या पाठीमागे लपून बसली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सर्वांनाच हसवत होते.
गाडी मिरजेत वेळेच्या आधी १०.०२ वाजता पोहचली. दरम्यानच्या काळात तृतीयपंथीय ठराविक प्रवाशांकडून पैसे उकळून गेले होतेच. आज वेळेआधी येऊनही मिरजेचा होम सिग्नल ऑफ मिळाल्याने गाडी थेट फलाट क्र.-१ वर येऊनच थांबली. इकडे एक नंबरवर आमची गाडी येत होती, त्याचवेळी दोनवर अजमेरहून आलेली २३ डब्यांची १६२०९ बेंगळुरु एक्सप्रेस कृष्णराजपुरमच्या डब्ल्यूडीपी-४ बीबरोबर येत होती, तर पलीकडे हुब्बळ्ळीच्या दिशेने आलेली बीसीएन मालगाडी दोन डब्ल्यूडीजी-४ सह पुण्याच्या दिशेने सिग्नल मिळण्यासाठी वाट पाहत उभी होती. पण रेल्वेवाहतुकीत प्रवासीगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने सांगलीच्या बाजूने येणाऱ्या अजमेर बेंगळुरु एक्सप्रेससाठी ही गाडी आधीपासूनच तेथे थांबवून करून ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही आमची गाडी मिरजेतून सुटून पुढचे ब्लॉक स्टेशन (सांगली) गाठल्याशिवाय या मालगाडीला जागेवरून हलता येणार नव्हते.
मिरज म्हटले की, गरमागरम चहा आणि इडली-वडा आलाच. हे सगळे फलाटावरील प्रवाशांची गर्दी गाडीत चढले होते. मीही गरमागरम वडा-पाव खाण्याचा बेत आखला. मस्तच आणि गरमागरम होता तो वडा-पाव. गाडीत आला हळुहळू नवे प्रवासी आपापल्या जागा शोधून स्थानापन्न झाले होते. तोपर्यंत तिकडे अजमेर-बेंगळुरुचे गार्ड व चालक बदलले गेले होते. वेळ झाल्यावर पुन्हा एकदा मिरजेच्या उप स्टेशन मास्तरने सांगलीहून लाईन क्लिअर घेऊन आम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला होता. मात्र मिरजेनंतर लगेचच झोन बदलत असल्याने अजमेर-बेंगळुरुला आणखी काही वेळ मिरजेत घालवावा लागणार होता. कारण ही गाडी पुढे सोडण्याआधी पुणे आणि हुबळीच्या सेक्शन कंट्रोलर्सने संदेशांची देवाणघेवाण करणे आणि पुण्याच्या कंट्रोलरने मिरजेच्या स्टेशन मास्तरला त्यासाठी परवानगी देणे आवश्यक होते.
आमची गाडी मिरज सोडण्याच्या तयारीत असतानाच आणखी काही तृतीयपंथीय धावत-धावत डब्यात वसुली करून गेले होते. नंतर सांगलीत अधिकृत वेळेइतकाच थांबा घेऊन निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. सांगलीतही मालगाडीचे मार्शलिंग सुरू असताना दिसले. दरम्यान प्रवाशांच्या आपापसात गप्पा-टप्पा सुरू होत्याच. केवढे वैविध्य होते त्यांच्या गप्पांच्या विषयांमध्ये. मात्र माझे लक्ष खिडकीच्या बाहेरच जास्तीतजास्त होते. त्या दिवशीचे वातावरणच माझे लक्ष सतत खिडकी बाहेर वेधून घेत होते. कोल्हापूरपासून जेजुरीच्या अलीकडेपर्यंत चकचकीत हवा, निळे आकाश आणि त्यावर काळ्या, राखाडी आणि पांढऱ्याफटक अशा तीन रंगांच्या ढगांनी केलेल्या आकृत्या यांनी साथ दिली आणि प्रवास खूपच आल्हाददायक केला. इतकेच काय वळवाच्या पावसाने थोडेसे भिजलेले डोंगर आणि त्यावर हलकेच उगवू लागलेली कोवळी हिरवळ आणि त्या डोंगरांवर पडलेली ढगांची सावली आणि उन ही दृश्येही मस्तच होती. हे ढग आणि इतर घटक मान्सून जवळ आल्याचेच संकेत देत होते. त्यामुळे आजूबाजूच्या शेतांमध्येही शेतकऱ्यांची खरीपासाठीची लगबग दिसत होती.
सांगलीनंतर मला अपेक्षा होती भिलवडीत गोंदियाहून कोल्हापूरकडे निघालेली ११०४० महाराष्ट्र क्रॉस होईल. मात्र हे क्रॉसिंग थोडे अलीकडेच - नांद्रेत झाले. तेथे महाराष्ट्र लूपवर जात असतानाच निजामुद्दीन तेथे आली होती. परिणामी नांद्रेच्या स्टेशन मास्तरने आम्हाला होमलाच दोन मिनिटे डिटेन करून ठेवले होते. महाराष्ट्र डाऊन होम ओलांडून त्याच्या पुढे ॲडिक्वेट डिस्टंसवर गेल्यावर स्टेशन मास्तरने लगेचच भिलवडीहून लाईन क्लिअर घेतल्याने आम्ही दोन-तीन मिनिटांतच मेन लाईनवरून पुढे निघून गेलो. पुन्हा आमच्या निझामुद्दीन एक्सप्रेसने वेग घेतला. वेगात किर्लोस्करवाडी ओलांडले, तेव्हा तिथं मिरजमार्गे हुबळीकडे निघालेली बीआरएन-बोस्ट वाघिणींची मालगाडी डिटेन केल्याचे दिसले. दरम्यान पुन्हा सिव्हील ड्रेसमधील अनेक तिकीट तपासनीस आणि पोलीस गाडीत चेकींग करण्यास आले. त्यांना आमच्या पुढच्या कम्पार्टमेंटमध्ये एक जण सापडलाच. माझ्या मनात विचार आला, आज काय चाललय काय - आधी ऑन-बोर्ड हाऊस किपिंग, कधी नव्हे ते या गाडीत आणि कोल्हापूर-पुण्यादरम्यान दोन-दोनदा तिकीट तपासणी.
आमच्या येथे आल्यावर माझ्या शेजारच्याने त्यांना पंखे बंद असल्याचे सांगितले. त्यात मागच्या बाजूच्या चेकरने त्या प्रवाशाला विचारले की, कधीपासून बंद आहेत पंखे. पण त्या प्रवाशाला हे ऐकू न आल्याने त्याने वेगळेच उत्तर दिल्याचे पाहून चेकर आवाज चढवून जरा उद्धट स्वरातच बोलू लागला. पण त्यानंतर १० च मिनिटांमध्ये पंखे सुरू झाले, हे विशेष. दरम्यान मधली स्थानके पार करत आम्ही पावणेबाराला कराडला आलो. तेथे आणखी गर्दी आत शिरली. दोनच मिनिटात गाडी सातारा या आपल्या पुढच्या व्यावसायिक थांब्याच्या दिशेने निघाली. इकडे गाडीचे साताऱ्याच्या दिशेने मजल-दरमजल करणे सुरू झाले, तसे तिकडे प्रवाशांचे आपल्याजवळचे डबे उघडून जेवण सुरू झाले. दरम्यान व्हेज बिर्याणीवाला चार-पाच फेऱ्या मारून आपली सर्व बिर्याणी खपवून गेला. या काळात भेळवाला, चहावाला आणि पाणीवाला इतकंच काय तृतीयपंथीयांचीही ये-जा सुरू होतीच. खिडकीतून सहज बाहेर जरा जास्तच डोकावून गाडीच्या मागे पाहिले, तर दोन-तीन डबे मागच्या खिडकीतून एक हात मोठ्या ताटासकट बाहेर आलेला दिसला. ताटाची अगदी मस्त धुलाई चालली होती. मात्र तसे करताना त्या महाशयांना हेही समजत नव्हते की हे पाणी त्यांच्या मागील बऱ्याच खिडक्यांमधून प्रवाशांच्या अंगावर जात आहे. आपला समाज किती आळशी, किती बेफिकीर आणि किती बेजबाबदार आहे, याचे हे उदाहरण. अशी उदाहरणे भारतीय रेल्वेवर अगदी आरामात दिसतात आणि आपण आपले रेल्वेलाच याचा सगळा दोष देऊन भारताची अमेरिका करण्याची स्वप्ने पाहत राहतो.
साताऱ्यात शिरताना मनात आले की, आता इथे थोडा वेळ थांबावे लागेल. कारण निजामुद्दीन म्हैसूर सुवर्ण जयंतीचे क्रॉसिंग होईल असे वाटले. पण दोनच मिनिटांमध्ये आमच्याच अश्वाची कर्कश्य शिट्टी ऐकली आणि मनाशीच म्हटले सुवर्ण जयंती लेट आहे. म्हणजे आता पुढे कुठेतरी शक्यतो आदर्कीत थांबावे लागेल बहुतेक. पण साताऱ्याच्या पुढचेच जरंडेश्वर आले आणि गाडी अचानक थांबली. मग वाटले आली वाटतं सुवर्ण जयंती. १० मिनिटे झाली, १५ झाली, २० झाली आणि मग वेगवेगळे विचार डोक्यात सुरू झाले. काय झालंय, अजून गाडी क्रॉस होत नाहीए. वाटलं पुढे काही तरी प्रॉब्लेम - गाडी घसरणं वगैरे असावा. मग दाराशी गेलो, तेव्हा आमचा असिस्टंट लोको पायलट स्टेशन मास्तरच्या केबीनकडे जाताना दिसला आणि तो माझ्या पुढे असलेल्या एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देत होता. त्याचे थोडे टेक्निकल बोलणे त्या प्रवाशाच्या लक्षात आले नाही, तो मला म्हणाला इंजिन गरम झाले आहे. गाडी थांबली की आतील गर्दी लगेच बाहेर येते. हा नियम येथेही लागू झालाच.
इंजिनात निर्माण झालेल्या बिघाडाची माहिती स्टेशन मास्तरच्या वहीत नोंदविण्यासाठी तो लोको पायलट तेथे गेला. याची कल्पना गार्डलाही दिली गेली. मग मीही खाली उतरून इंजिनाकडे जाण्यास सुरुवात केली. तेव्हा आमचा अश्व दमल्याचे (इंजिन बंद पडल्याचे) लक्षात आले. मग रेल्वेच्या पातळीवर खरोखरच झपाट्याने हालचाली सुरू झाल्या. आम्हाला लाईन क्लिअर दिलेली होती, तो सिग्नल स्टेशन मास्तरने कँसल केला. इंजिनातील बिघाडाची बातमी लगेच पुण्याला सेक्शन कंट्रोलरला कळविण्यात आली. त्यानेही लगेच कारवाई सुरू केली. तोपर्यंत जरंडेश्वरच्या स्टेशन मास्तरच्या वहीत इंजिनाच्या बिघाडाची नोंद झाली होतीच. त्यानंतर आमचा असिस्टंट लोको पायलट पुन्हा इंजिनाकडे गेला. त्याच्या पाठोपाठ पाईंटस्मनही स्टेशन बुक आणि बावटे घेऊन इंजिनाकडे गेला. माझ्यामागोमाग इंजिनाजवळ आलेला तो (इंजिन गरम झाले आहे म्हणणारा) प्रवासी मला विचारू लागला, आता कधी गाडी हलणार. मी उत्तर दिले मध्ये (सातारा-पुण्याच्या मध्ये) कोठेतरी मालगाडी असली तर त्याची इंजिने येतील लवकरच. आणि झालेही तसेच.
आमच्या गाडीसाठी जरंडेश्वरच्या पुढच्या स्टेशनमध्ये - पळशीमध्ये मिरजेकडे निघालेली मालगाडी डिटेन करण्यात आली होती. सेक्शन कंट्रोलरने त्या गाडीची इंजिने काढून आमच्या गाडीला जोडण्याचा निर्णय घेतला आणि ती इंजिने जरंडेश्वरला धाडली. रेल्वेवाहतुकीत प्रवासीगाड्यांना प्राधान्य मिळत असल्याने आणि त्यातच आमची गाडी सुपरफास्ट श्रेणीतील असल्याने हे करणे आवश्यक होते. जरंडेश्वरमध्ये ती इंजिने आमच्या गाडीला बंद पडलेल्या इंजिनाच्या पुढे जोडली गेली. त्याचीही पळशी आणि जरंडेश्वरच्या बुकात नोंद घेतली गेली. या सर्व घडामोडींत ५० मिनिटे गेली. दरम्यान सुवर्ण जयंतीही जवळ आली होती. आमची इंजिने रेडी होईपर्यंत सुवर्ण जयंतीला साताऱ्याच्या दिशेने जाण्यास परवानगी मिळाली आणि लूप लाईनवरून ती क्रॉस झाली आणि दोनच मिनिटांत आम्हालाही लाईन क्लिअर मिळाल्याचा इंजिनाचा हॉर्न ऐकू आला. या नव्या इंजिनांचा हॉर्न मात्र कर्कश नव्हता. अशा रितीने बरोब्बर ६० मिनिटांनी आमची निजामुद्दीन एक्सप्रेस तीन अश्वांसह पुण्याकडे निघाली. पुढचे ब्लॉक स्टेशन (पळशी) ओलांडताना ज्या मालगाडीची इंजिने आमच्या गाडीला जोडली गेली होती, ती आता नव्या अश्वांच्या प्रतीक्षेत उभी असलेली दिसली. आता या गाडीला पुण्याहून बदली इंजिने येईपर्यंत तेथेच वाट पाहत उभे राहावे लागणार होते.
आता मला वाटत होते की, आम्हाला पुण्यात पोहोचायला किमान सव्वापाच वाजतील. पण गाडीचा वेग अनुभवतानाच एक बाब लक्षात आली की, आमची गाडी सुपरफास्ट श्रेणीतील असल्याने सेक्शन कंट्रोलरने पुण्यापर्यंत अन्य सर्व गाड्या बाजूला ठेवून आमच्या गाडीला पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिला जात आहे. त्यात लोकमान्य टिळक (ट) हुबळी एक्सप्रेस, कोयना, पुणे कोल्हापूर पॅसेंजर आणि आणखी दोन मालगाड्यांचाही समावेश होता. दुसऱ्या गाड्यांचे चालक-गार्ड, स्टेशन मास्तरशी सिग्नल एक्सचेंज करत आम्ही पुढे सरकत होतो. दरम्यानच्या काळात जेवणानंतर डुलक्या काढून काही जण पुण्यात उतरण्यासाठी फ्रेश होऊ लागले होते. चेकरही सारख्या फेऱ्या मारत होताच. जेव्हा पुण्यात फलाट क्र. १ वर आलो, तेव्हा घड्याळात १६ वाजून ०२ मिनिटे झाली होती. म्हणजे मधल्या गोंधळामुळे वाया गेलेला वेळ निजामुद्दीन एक्सप्रेसने बराच भरून काढत पुण्यात पोहोचण्यासाठी केवळ ७ मिनिटांचा उशीर केला होता. मात्र रेल्वेतील अशा प्रयत्नांना आपण फारच कमी लक्षात घेत असतो आणि प्रशंसा करण्यास कायमच कचरत असतो. रेल्वे किंवा अन्य सरकारी यंत्रणा म्हणजे शिव्याशाप घालण्याचे हक्काचे लक्ष्य अशी आपली समजूत झालेली असते. तशी समजूत करून देण्यात माध्यमेही आघाडीवर असतात.
अशा प्रकारे चेकरच्या सारख्या फेऱ्या, ऑन-बोर्ड हाऊस किपिंग, इंजिन बंद पडणे, त्यानंतरच्या घडामोडी आणि एक तास वाया जाऊनही जवळजवळ वेळेतच पोहचलेली गाडी हे या गाडीच्या प्रवासात मी पहिल्यांदाच अनुभवले.
गाडीतून उतरल्यावर नेहमीच्या सवयीने लांबच्या गेटमधून स्टेशनच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. स्टेशनबाहेरील सिटी बसच्या स्थानकाकडे जाताना अचानक पुणे सिकंदराबाद शताब्दीच्या सायडिंग ट्रॅकवर उभ्या असलेल्या दोन डब्यांनी लक्ष वेधून घेतले. मग काय थोडा वेळ तेथे थांबून ते नवे कोरे डबे न्याहाळून बाहेर पडलो.
विद्युतीकरण करून वेगवान
विद्युतीकरण करून वेगवान गाड्या असायला हव्यात उत्तर भारतात जाळे आहे तसे. मुंबई-पुणे-कोल्हापूर-सोलापूर-नाशिक हे सगळे एकमेकांपासून शेकडो लोक ३-४ तासांत जाउ शकतील असे जोडले पाहिजे (त्यामानाने अकोला, जळगाव, चाळीसगाव, नागपूर कनेक्शन्स चांगली असावीत थ्रू ट्रेन्स मुळे. नक्की माहीत नाही).
उत्तर भारतात भौगोलिक परिस्थिती तशी आहे मैलोंमैल पसरलेले गंगेचे अंन यमुनेचे प्लेन (दिल्ली युपी बिहार बंगाल) किंवा पठारे (एमपी) ह्याच्यामुळे हा सेक्शन जगातला एक सर्वाधिक ट्रॅक डेंसिटी असलेला भाग आहे .
अकोला-नागपुर बद्दल आपले म्हणणे खरे आहे डबल ट्रॅक अन विद्युतीकरण फार आधी झालेले आहे , मी तिकडचाच आहे कलकत्ता मुंबई मेन लाइन आहे ती अकोला नागपुर साधारण पाच तास नॉर्मल गाड़ीला व् साढेतीन तास गीतांजली एक्सप्रेस ला लागतात बाकी नॉर्मल मेल वगैरे चार तास घेतात. अकोला नागपुर अंतर बरोब्बर दोनशे पन्नास किलोमीटर आहे कदाचित एखाद किमी जास्त असेल. पुणे मिरज मधे डोंगर अन वाट इतकी वाकड़ी आहे की ती डबल ट्रॅक करताना असंख्य प्रॉब्लेम्स ना फेस करायला लागणार आहे
चांगला पर्याय अशासाठी म्हटले
चांगला पर्याय अशासाठी म्हटले की, मध्ये एक तास जाऊनही जवळजवळ वेळेतच गाडी पुण्यात आली. मी याआधी जेव्हाजेव्हा या गाडीने पुणे-कोल्हापूर-पुणे केले आहे, तेव्हा एखादी वेळ सोडल्यास सव्वासहा तासात प्रवास पूर्ण झालेला आहे.
सोन्याबापू, धन्यवाद
सोन्याबापू, धन्यवाद माहितीबद्दल. मेक्स सेन्स.
ही माझी नेहमीच पसंतीची गाडी.
ही माझी नेहमीच पसंतीची गाडी. मस्त लिहिलं आहे तुम्ही.
छान
छान
या गाडीने गेलो नाही. पण
या गाडीचा प्रवास केला नाही.
एकदा नक्की करा. सिटस
एकदा नक्की करा. पंक्च्युअॅलिटी, सिटस अवैलॅबिलिटी आणि स्पीड सगळंच भारी आहे.. मात्र ही ट्रेन वीकली आहे (कदाचित त्यामुळेच लिमिटेड पब्लिसिटी अन गर्दी असावी..!).
हीच ट्रेन कोल्हापुर-अहमदाबाद म्हणुन जाते. तेच टाईम फक्त कराड ला थांबत नाही म्हंणुन उपयोगाची नाही.
मी परवा सांगलीला गेले होते
मी परवा सांगलीला गेले होते तेव्हा येताना मिरजेस्नं हॉलीडे स्पेशल पकडली. जाम गारठा होता थर्ड एसी मध्ये. सकाळी ठाण्याला उतरलो. सेंट्रल परेन्त गेलोच नाही. मजा आली. जाताना शिवनेरी सारखीच शिवशाही आहे त्याने गेलो. इथे बस मध्ये चार्जर पॉइन्ट पण आहेत.
Pages