सवस्दी खा

Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2015 - 07:15

मागच्या महिन्यात थायलंड बघायला गेलो होतो. पटाया, बँकॉक व फुकेत ही तीन शहरे पाहिली. एकुण अनुभव सुखद होताच. पटाया व बँकॉकला दोघांसाठी स्वतंत्र साईट सीइंगची व्यवस्था पुण्यातील लिओनार्ड कंपनीकडून करून गेलेलो होतो. फुकेतला बायकोचा चुलतभाऊ व वहिनी १५ दिवस आधीपासूनच एक दुमजली घर घेऊन राहात होते. तेही फिरायलाच गेलेले होते. त्या चुलतभावाने आधी त्या देशात पाच वर्षे कामही केलेले होते त्यामुळे त्याने आम्हाला सर्व योग्य ते मार्गदर्शन केले. फुकेतला आम्ही त्याच्याकडेच राहिलो. एकुण आठ दिवस थायलंडमध्ये होतो. बँकॉकला जरा हेक्टिक शेड्यूल झाले पण पटाया व फुकेत येथे भरपूर आराम, खाणे-पिणे आणि फिरणे झाले. थायलंडमधील स्वच्छता, शिस्त वगैरेंनी प्रभावितही झालो. बायको आधी परदेशी जाऊन आलेली होती. मी प्रथमच देशाबाहेर गेल्यामुळे माझा चेहरा नैसर्गीक बावळट होऊन बसलेला होता. पण निरिक्षणातून काही गोष्टी जाणवल्या.

१. अशी अनेक ठिकाणे पाहिली जेथे भारतीयांना तुलनेने अपमानास्पद वागणूक दिली जात होती. इमिग्रेशन काऊंटरवरील प्रश्नांचा टोन, बँकॉकच्या बायो-के स्काय हॉटेलचा काऊंटरवरील काही स्टाफ, काही कॅबचालक, पटायाच्या एका बीचवरील बहुतांशी स्टॉल्सचे मालक, बोटीतील काही स्टाफ अश्या काही ठिकाणी युरोपिअन वगैरे लोकांना प्रचंड आदर व भारतीयांना कडवट वागणूक असे प्रकार आढळले.

२. अनेक ठक भेटतात असे जाण्याआधी अनेकांनी सांगितले होते पण सुदैवाने आम्हाला अशी काही चमत्कारीक व्यक्तीमत्त्व भेटली नाहीत.

३. भारतीयांबाबत असलेला राग भारतीयांच्याच वर्तनामुळे आहे असेही समजले. सहसा चांगल्या ठिकाणी जाऊन आल्यावर लोक प्रेक्षणीय फोटो अपलोड करतात पण मी आपल्या लोकांच्या वर्तनाचे काही फोटो अपलोड करू इच्छितो. आपले लोक विमान सुरू झाले की डबे उघडून खाऊ लागतात असेही ऐकले. हे आम्ही पाहिले नाही. मात्र येतानाच्या विमानात पलीकडे बसलेला एक भारतीय तरुण विमान टेक ऑफसाठी सज्ज होऊन सुरू झाले तरी फोनवर बोलत होता. थाई एअरवेजच्या विमानाने आम्ही बूकिंग केलेले होते. त्यातील स्टाफ त्या माणसाला एकदोनदा समजावून जागेवर जाऊन बसला. शेवटी आजूबाजूच्यांनी त्याला दटावल्यावर त्याने फोन बंद केला. जंगल सफारीदरम्यान एका सार्वजनिक ठिकाणी (रेस्टॉरंट नव्हे, तर मुसाफिरांसाठी असलेल्या डायनिंग हॉलमध्ये) इतर सर्व लोक अत्यंत शिस्तीत वागत होते व खात होते. आपले लोक रांगेतही ढकलाढकली करत होते. एकदोघांचे तर वादही झाले. आश्चर्य वाटले नाही की तेथे भारतीयांसाठी अक्षरशः वेगळे दालन ठेवलेले होते. पिंजर्‍यातील प्राण्यांकडे बघत अचकट विचकट आविर्भाव करणे, आवाज करणे वगैरे प्रकार सहज पाहायला मिळत होते. आम्ही असेही ऐकले की बीचवर आपले लोक मावा वगैरे तत्सम पदार्थ खाऊन थुंकतात म्हणून त्यांना थाई लोक हिडीस फिडीस करतात. वॉकिंग स्ट्रीट (पटाया) आणि बांग्ला स्ट्रीट (फुकेत) येथे रात्री जत्रा भरलेली असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. तेथे काही जॉईंट्सवर भारतीयांना जाऊच देत नव्हते हेही आम्ही पाहिले. सुदैवाने दोन तीनदा भारतीय रेस्टॉरंटमध्ये भारतीय जेवण मात्र इथल्याहीपेक्षा उत्तम मिळाले. अल कझार शो दरम्यान अजिबात मोबाईल व कॅमेरे ऑन करायचे नाहीत हे सहा सहा वेळा सांगूनही शो सुरू झाल्या झाल्या आपल्या लोकांनी जणू उलटा नियम असल्याप्रमाणे फोन काढून फोटो / शूटिंग सुरू केले.

४. त्या लोकांशी नीट वागले तर अतिशय चांगली मैत्री होऊ शकते व ते मदतही करतात असे अनुभवास आले.

५. एकुण देशाची इकॉनॉमी म्हणजे बायकॉनॉमी आहे. जवळपास प्रत्येक व्यवसायात बायकांचाच वावर आहे.

६. रात्री साडेबाराला फुकेतच्या एका ट्रॅफीक सिग्नलला आमचा कॅबचालक एकटाच दिड मिनिट थांबला तेव्हा अगदी भरून आले. मी मोजत होतो, आठ दिवसात मोजून दोन वेळा हॉर्न ऐकू आले आणि एकदाच एक लहानसा खड्डा अनुभवला.

मी जवळपास साडे बाराशे फोटो काढले. पण वर म्हंटल्याप्रमाणे आपल्या लोकांचे ठसे जाणवतील असे एक दोन फोटो येथे देत आहे. बाकी मुंबईला उतरून बाहेर आल्या आल्या विद्या बालन दिसली. दोन फोटो घाईघाईत काढले पण ते हलले. त्यामुळे वैताग आला.

जवळच डस्टबीन असूनही आपले लोक जराही कष्ट करत नव्हते ह्याची ही मनोहर दृश्ये:

IMG_9503.JPGIMG_9526.JPGIMG_9527.JPG

================

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< वर्मावर >>
तेही खरंच. पण ते आडनाव असल्याने मी तो शब्द टाळत होतो. आठवा पु.लं. ची ती कॉमेंट माणिक वर्मांच्या विवाहा विषयीची..
;- हिनं वर्मावरच घाव घातला.

उफ, मैने कैसे मिस किया ये Happy

बेफी.. पहिल्यांदा गेलात ना थायलँड ला मग या लँड ऑफ स्माईल्स बद्दल लिहा की
थाय लोकं खूप रेवरंट असतात.वागायला मृदु , हसतमुख ही.. (स्वानुभावाने!!!)

रच्याकने ते सवादी खा आणी सवादी खाप असा उच्चार आहे.. दॅट्स ओके!! Happy Happy

थायलँड मधे बरीच वर्षं काढली असल्याने आमचा पुष्कळच मोठा, प्रेमळ थाय मित्र परिवार आहे. आम्हाला अपमानस्पद वागणुकी चा पर्सनली काही अनुभव नाही.. पण थोड्या स्वस्तातल्या मार्केट्स मधे, नाईट मार्केट्स मधे भारतीय
अतिशय वाईट्टं वागतात.. सर्वच बाबतीत.. आता तर काय स्वस्त दरात घेऊन जाणार्‍या टूरिस्ट कंपनींमुळे
भारतीयांचा सुळसुळाट झाला असेल तिकडे.. आपण जेंव्हा दुसर्‍या देशात जातो तेंव्हा आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो, हे भारतीय ग्रुप च्या मनावर बिंबवलेच पाहिजे त्या त्या टूर ऑपरेटर्स नी!!

थायलँडच नव्हे तर हाँगकाँग , चायना, मलेशिया मधे ही भारतीय टूरिस्टना अशीच वागणूक दिली जाते..आणी मजा म्हंजे त्यांना याचंही काही वाईट वाटताना दिसत नाही.. Uhoh

विमानात तर भयानक वागतात.. विमानात वापरायला दिणारे ब्लँकेट चोरणे, कटलरी पळवणे, अल्कोहोलिक
ड्रिंक्स भराभरा संपवून पुनर्मागणी करणे ( उर्मटपणे शुक शुक वगैरे करून ), एक्झॉटिक थाय फळे अजून मागून घेणे ( घरी घेऊन जाण्याकरता), लँड होऊन टॅक्सी करत असलेल्या विमानात उभे राहून वरून सामान काढणे, एअर होस्टेस च्या विनंती ला न जुमानता लाईन लावून गडबड करणे..
जाऊ द्या.. वेगळा बाफच होईल यावर,,
तुम्ही एंजॉय केलेले क्षण लिहा.. मेरा मोस्ट फेव फूड इज थाय फूड.. नुस्तं आठवलं तरी जीभ चाळवते
तुम्ही ट्राय केलं कि नाही??

बेफी,

चांगला धागा काढलात !!

भारतीयांच वागण त्या त्या देशाप्रमाणे असत !!

अरब देशात हेच भारतीय पर्यटक जरा वचकुनच वागत असतात ! कारण तिथेले कायदे !

भारतीयांचे परदेशातील वागणे ह्या विषयावर बोलताना ही, रायगढ जिल्ह्यातल्या एका गावात माननिय मोदींच्या स्वच्छता अभियाना अगोदर पासुनच स्वच्छता कशी राबवली जाते अश्या प्रकारची लिंक देणारेही तसल्याच खालच्या मनोवृत्तीचे आहेत. देशाला पंतप्रधानांनी चालवलेल्या स्वच्छता मोहीमेची खुपच गरज आहे हे
सगळ्यांना पटले असेलच !!

बेफिकीर

सुरेख लिहिले आहे... एकदम पटले.

वर्षु ताई +१

हा अनुभव अनेक ठिकाणी येतो. आशियाइ देशात जास्त येतो. आता ह्या देशांनी पर्यटन स्वस्त केल्याने, अनेक भारतिय मोठ्ठ्या संख्येने तिकडे जातात. हल्ली अशी परिस्थीती आहे की केरळ पेक्षा थायलंड स्वस्त पडते!!! बरं तिकडे अनेक सुखं हात जोडुन उभी असल्याने अनेक प्रकारचे लोक तिकडे जातात. हा अनुभव युरोप मधेही येतो.

युरोप मधे आमच्या बरोबरच्या एक बाई माउंट टिटलिस च्या इकडे टॉयलेट मधे मशेरी लावत होत्या. त्यांना पाहुन एका युरोपियन बाईने मला विचारले "इज शी हॅविंग ड्रग्ज".... मी काय उत्तर देणार, पण ते औषध आहे हे सांगुन वेळ मारुन नेली. त्या बाईंनी त्या ट्रिप मधे जाम उच्छाद आणला होता. त्या मशेरी अ‍ॅडिक्ट होत्या. बस मधे देखिल गाईड ने तक्रार केली होती. त्यांचा नवरा बायकोवर जाम उखडला होता. आपण सार्वजनिक ठिकाणी असताना तरी हे करु नये.

युरोपियन्स ना उग्र वास लगेच कळतो. मागे आम्ही एका हॉटेल मधे असताना एका भारतिय कुटुंबाने लसणीची चटणी पावाला लावुन खायला सुरुवात केली. त्याच्या आजुबाजुच्यांनी टेबल बदललं..... कित्येक ठिकाणी तुमचे पदार्थ काढुन खायला परवानगी नसते. तरीही लोकं खातात....

सत्तार भाय, लिंक वाचल्या बद्द्ल, बघितल्या बद्द्ल धन्यवाद.

देशाला पंतप्रधानांनी चालवलेल्या स्वच्छता मोहीमेची खुपच गरज आहे हे
सगळ्यांना पटले असेलच !!>>>>

स्वच्छतेची आवड असण्यासाठी जात, धर्म, पक्ष- पार्टि,कशाची गरज नसते
.प्र्त्येकजण स्वच्छता ठेऊ शकेतो की नाही माहित नाही पण स्वच्छता प्र्त्येकाला आवडते हे माहित आहे.

अश्या प्रकारची लिंक देणारेही तसल्याच खालच्या मनोवृत्तीचे आहेत. >>>हे वाचुन बुद्धीची किव करावी की हसावे.

असो!

पटले बरेचसे मुद्दे. अनुभवले पण आहेत.
आपल्याइतकाच गरीब(?) देश आहे पण अत्यंत कष्टाळू माणस अन हसत्मुख. त्यांच्या सारख मनापासून हसून स्वागत ( एयर्पोर्ट , रेस्टॉरंट , ऑफिसेस , होटेल वगैरे) करणारे इतर कोणी नाही. जपानात पण अगत्य असत पण त्यात एक औपचारीक भाव असतो इथे मनापासून !

बाकी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळापेक्षा सुपिरियर आहे.

(वर्षू - मस्त प्रतिसाद. पण गूगलवर सवसदी दिसत आहे आणि मी तिकडे ऐकायचो ते मला तसेच ऐकू यायचे म्हणून तसे लिहिले. दुरुस्तीबद्दल धन्यवाद!) Happy

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळापेक्षा सुपिरियर आहे... वॉव रिअली???

बेफी.. असहमत!!! भरपूर कारणं आहेत.. पण इकडे नको... लेख भरकटेल तुमचा.. Happy

एकदा आमच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे लँड केले गेले, तेव्हा तिथल्या स्टाफने सॅण्डविचेस आणि कोल्ड ड्रिंकचे कॅन प्रवाशांना वाटले. फ्लाईट लँड व्हायच्या तासभर आधीच जेवण देण्यात आले होते, तरीही विमानात असलेले प्रवाशी ( सगळे भारतीयच होते) असे तुटुन पडले की याआधी कधी जेवले नव्हते आणि नंतर परत कधीच जेवण मिळणार नव्हते. अन्न वाटप करणार्‍या जर्मन स्टाफच्या चेहर्‍यावरुनच मला आपल्या लोकांची लायकी कळली होती. Sad

रांगा लावणे हे भारतीयांना कधी जमणार कोण जाणे! कुठलाही विमानतळ असो गेटवर घोळका करुन उभे राहतात. कोणी चुकुन रांग लावली तरीही त्याला इतके फाटे पाडतात की कळतच नाही रांग कुठे सुरु करावी.

आपल्यापेक्षा मागास समजल्या जाणार्‍या देशांच्या फ्लाईटसाठी सुद्धा त्या देशांतले लोक नीट रांगेत उभे असतात.

<< रांगा लावणे हे भारतीयांना कधी जमणार कोण जाणे! कुठलाही विमानतळ असो गेटवर घोळका करुन उभे राहतात. कोणी चुकुन रांग लावली तरीही त्याला इतके फाटे पाडतात की कळतच नाही रांग कुठे सुरु करावी.

आपल्यापेक्षा मागास समजल्या जाणार्‍या देशांच्या फ्लाईटसाठी सुद्धा त्या देशांतले लोक नीट रांगेत उभे असतात. >>

हम जहाँ खडे होते है लाईन वहाँसे शुरू होती है म्हणणारे नायक इतर देशांतील जनतेचे आदर्श नसतात.

सवयी आणि बेफिकिर( आयडि नव्हेच ह!) मनोवुर्त्तीचा भाग आहे तो!... आपल्याला अभियानाबरोबर कडक कायद्याची गरज आहे, ... उदा:.. बाईक वर हेल्मेट घालणे हा नियम फार पुर्विपासुन आहे पण त्याची सक्ति, नियम मोडल्यास द.न्ड वैगरे केल्यावर लोक ते वापरतातच..)

गम्मत आहे!
सगळ्या भारतीयांना या विषयावर बोलणे निघाले की लेखात जे मुद्दे मांडले आहेत ते पटतातच. असा एकहि भारतीय नाहि भेटला कि तो भारतीयांच्या या वागणुकीचे समर्थन करतो किंवा तो स्वतः असे वागला आहे असे म्हणतो.
पण मग नक्कि कोण लोक असे वागतात ? नक्किच पाकिस्तानी असतील आणी भारतीय म्हणुन सांगत असतील.

बाकि सत्तारभाइ माननीय पंतप्रधान आणी त्यांच्या समस्त मंत्रीगणांनी जी मोहिम चालवली आहे तशी सर्व भारतीयांनी चालवायची म्हणली तर रस्ते सोडाच, आपापली घरे देखील घाण रहातील कारण सेल्फि काढण्यातच सर्व वेळ जाइल.

छान लेख.
या देशात भारतीयांना वाईट वागणूक मिळण्याचे कारण आपल्या वाईट सवयी आहे हे वादातीत आहेच , त्या व्यतीरीक्त कारण तुमचे चलन-अर्थात तुमच्या राष्ट्राचे जागतिक राजकारणातले स्थान.
उदाहरणार्थ- भारतापेक्षा नेपाल मध्ये स्वच्छतेचे काही वेगळे चित्र नाही, पण तिथेही, भारतीय प्रवाशांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते...बरेचदा युरोपातले प्रवाशी अवाच्यासवा किमती देऊन जे सुवेनिअर/भेटवस्तू खरेदी करतात त्यांसाठी भारतीय घासाघीस करतात...!

संपुर्ण देशात एका रायगढ मधल्या एका छोट्या गावात स्वच्छते बद्द्ल जरा भान असल तर मिडीयातील लोक पार लेव्हल सोडुन बरळतात की बघा मोदी फुकटच "स्वच्छता मोहीम" चालवत आहेत, ह्या अमुक गावात फार फार अगोदर पासुनच स्वच्छता मोहीम चालु आहे.

आणी अश्या मिडीयाच्या लिंका देणारे लोकच ह्या चांगल्या धाग्यावरही देशातील पक्षाच्या भांडणाला घेऊन आलेत !!

https://fetzthechemist.wordpress.com/2012/04/08/a-plane-full-of-indians-...

या लिन्क मधील लोकांची मते वाचा.
भारतीय लोकांबद्दल इतर लोकांचा द्रुष्टिकोन फारच तिरक्सारणीय आहे.
नक्कीच त्याला आपल्या लोकांचे वागणे पण कारणीभुत आहेच.

लेखात खालील मतांमध्ये नमुद केल्याप्रमाणे एअर होस्टेस पन भारत बाउंड विमानात काम करायला नाखुश असतात.

Pages