http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध
http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड
http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी
http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड
http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला
http://www.maayboli.com/node/53394 - दिवस ५ मारवंथे
=======================================================================
दिवसभर जरी उकाड्याने हैराण झालेलो असलो तरी मारवंथेच्या रुममधले एसी फारच पॉवरफुल होते. इतके की रात्री चक्क हुडहुडी भरल्यामुळे मला उठून ते बंद करावे लागले.
दुसरे दिवशीची सकाळ उगवली आणि बाहेर आलो तर तशीच चिडचिडी हवा. वाळत घातलेले कपडे तसेच किचकिचीत. झालं म्हणजे आज राखीव सेट काढावा लागणार. इतके दिवस तोच जोड रात्री धुवून वाळत घातला की सकाळपर्यंत वाळत होता. त्यामुळे पुण्याहुन निघाल्यापासून केशरी जर्सी आणि ब्लॅक शॉर्टस यावर काम भागवले होते.
तर, आवरून तयार झालो. काल स्लो ग्रुपचाही स्पीड चांगला पडल्याने आणि उपेंद्रमामा आणि आपटे काका मँगलोरवरून परत जाणार असल्याने आज सगळ्यांनी एकत्रच जायचे ठरवले. आजचे अंतरही ११० किमीच होते त्यामुळे भल्या पहाटे उठून जायची काही गरज नव्हती. त्यामुळे आम्ही हेड लाईट्स, बॅटरीवगैरे बॅगेत भरून टाकली.(आणि परत पुण्याला येईपर्यंत ती बाहेर काढण्याची एकदाही गरज पडली नाही).
हॉटेलवाल्याला नाष्टा सांगितला असता तर त्याने दुपारच केली असती त्यामुळे हॉटेलच्या समोरच एका टपरीमध्ये कॉफी बिस्किटांचा फडशा पाडला. त्यावेळी मी आपली टकळी चालू केली. मोहीमेमध्ये फोटोग्राफीचे महत्व असा आजच्या व्याख्यानाचा विषय होता. मोमेट्स कॅप्चर करण्यावरून मग सगळ्यांना इतके पिडले की सर्वानुमते मला हभप असे टोपणनाव बहाल करण्यात आले. पण शेवटी काही मोमेंट्स कॅप्चर केल्याच.
साथी हाथ बढाना...साथी रे
प्रमुख आकर्षण....बाबुभाई
लान्सदादांचे मोहक हास्य...एक दुर्मिळ क्षण
गहन चर्चा
पारितोषिक विजेते छायाचित्रकार
इथेच मला बिंदु मिळाली. आपल्या बिस्लेरीसारखा लोकल ब्रँड. पण त्या बाटलीचा आकार इतका परफेक्ट होता की दरवेळी नविन बाटली घेऊन आधीची टाकून देण्याची सवय मोडली आणि याच बाटलीत पाणी भरून तीच वापरत राहीलो. तिनेही शेवटपर्यंत मला साथ दिली आणि त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मेरी प्यारी बिंदु...मेरी भोली रे बिंदु सुरु व्हायचे.
नकाशात पाहिले असता मारवंथेवरून गांगोलीमार्गे कुंदपुराला जायला सागरी वाहतूक असती (कोकणात फेरी सर्व्हिस असते तशी) तर खूप अंतर वाचले असते. पण तशी काही खात्रीलायक माहीती मिळाली नाही त्यामुळे बराच लांबचा वळसा घालून किमान एक चार-पाच वेळेस पंचगंगावली नदीची खाडी पार करून जावे लागले. त्यातून रस्ताही अतिशय वाईट. जागोजागी खड्डे पडलेले, त्यात बारीक खडी आणि आजुबाजूला हेवी ट्रक्स. त्यामुळे अतिशय जपून, बेताबेताने सायकल चालवावी लागत होती. अधुनमधुन काही गुळगुळीत रस्ते सुखद धक्का देत होते पण कोटापर्यंत रस्त्याने जीव काढला.
हळुहळु निसर्गशोभा वाढू लागली होती
२६-२६ किमी अंतरावरच्या कोटा इथल्या हॉटेलात नाष्ट्यासाठी जेव्हा थांबलो तेव्हा तिथे थांबलेल्या दोन मुली हळुच हसतायत असा भास झाला. आणि काय झाले म्हणून स्वतला न्याहाळले तेव्हा लक्षात आले. ऐनवेळी कपडे न वाळल्यामुळे मी राखीव ड्रेस चढवला होता खरा पण त्याची रंगसंगती इतकी भयाण होती की मी पुण्यात असे काही घालून फिरलो असतो तर विनाचौकशी येरवडाच.
माझा साधारण अवतार असा होता, लाल-पांढऱ्या रंगाचे हेल्मेट, त्यावर पांढऱ्या रुमालाची कपाळपट्टी, लाल-काळे ग्लोव्हज, फ्लोरंसटं ग्रीन रंगाची जर्सी त्यावर निळ्या रंगाचा स्कार्फ, खाली मोरपंखी रंगाची श़ॉर्ट्स, ब्राऊन मोजे आणि पांढरे शूज...आणि इतक्याने भागले नाही म्हणून काय सायकलच्या कॅरीयरवर माझे केशरी जर्सी आणि ब्लॅक शॉर्टस वाळत घातलेले होते.
अपुन का स्टाईल एकदम हटके है...कोई शक??...
असामी असामी मधल्या नानू सरंजामेसारखा माझा अवतार बघुनच त्या पोरी हसत असणार याची मला खात्री पटली. पण आता काही करण्यासारखेच नव्हते. त्यामुळे इथे कुणी ओळखत नाही त्यामुळेच मी इथे असे काहीतरी घालू शकतो असे म्हणत निवांत बसलो. (इतकेच नाही तर पुढचे चार पाच दिवस मी याच कॉम्बोमध्ये फिरलो. म्हणलं चला या निमित्ताने तरी किमान मला लोकं लक्षात ठेवतील)
कोटावरून निघाल्यानंतर एरोडीच्या पुढे सीथा (सिता) नावाची नदी लागली. म्हणलं आता हिचा नकाशात पाहून उगम शोधला पाहिजे. दंडकारण्यातून येत असावा बहुदा. नंतर घरी आल्यावर खरेच पाहिले तर सोमेश्वर अभयारण्यातून या नदीचा उगम आहे. त्याकाळी ते दंडकारण्यातच असणार बहुदा. सीतानदी ही व्हाईट वॉटर राफ्टींगसाठी प्रसिद्ध आहे अशीही माहीती मिळाली.
सितेनंतर नायमपल्लीच्या अलीकडे आडवी आली ती सुवर्णा नदी. एकूणच इथल्या नद्यांची नावे आपल्या कोकणी नद्यांसारखीच लडीवाळ वाटली. बहुदा किनारपट्टीचा हा स्थायीभाव असावा.
असो, तर कालच्याप्रमाणे आजही एक महत्वाचे मंदिर वाटेत होते ते म्हणजे उडपीचे श्रीकृष्ण मंदिर.
विकिपिडीयावरून मिळालेल्या माहीतीनुसार १३ व्या शतकात माधवाचार्य यांनी या मंदिराची स्थापना केली. मूळ मंदिर हे पूर्णपणे लाकडी होते आणि कालांतराने त्यात बद्ल होत गेला. माधवाचार्य यांनी श्री विष्णु तीर्थ (सोडे मठ), श्री वामन तीर्थ (शिरुर मठ), श्री राम तीर्थ (कन्नियूर मठ), श्री अडोकशाजा तीर्थ (पेजावरा मठ), श्री हृषिकेष तीर्थ (पलिमारु मठ), श्री नरहरि तीर्थ (अडामारु मठ), श्री जनार्दन तीर्थ (कृष्णापुरा मठ) आणि श्री उपेंद्र तीर्थ (पुट्टिगे मठ) अशा आठ मठांचीही स्थापना केली.
खरे सांगायचे झाले तर इथूनच खऱ्या अर्थाने दाक्षिणात्य कर्मठपणाला सुरुवात झाली. मुरुडेश्वराचे मंदिर इतके भव्य पण त्यात बाकी कटकटी काही नव्हत्या. आता इथे म्हणजे उघड्या अंगानेच जायचे, बरोबर काही ठेवायचे नाही. सुदैवाने अजुन लुंगी नेसायचा फतवा नव्हता (तो पुढे केरळात आला). मला मनापासून या प्रकाराचा तीटकारा आहे. देवाच्या दरबारात कसली अधिकारशाही. पण इतिहास पाहिला तर सगळ्यात राजाच्या दरबाराइतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त अधिकार शाही देवाच्याच दरबारात गाजवली गेली आहे. तिदेखील देवानी नाही, तर देवाबद्दल आपल्याला जास्त कळते असा बडेजाव मिरवणाऱ्या महंतांनी (यात हिंदुच नव्हे तर मुसलमान आणि ख्रिचनही अपवाद नाहीत). त्यामुळे एकदंरीत या मंदिर प्रकाराबाबत माझ्या मनात एक नाराजीची ठिणगी पडत गेली आणि पुढे कन्याकुमारीला तिचा स्फोट झाला. पण ते पुढचे पुढे.
मंदिराचा इतिहास वाचला तेव्हा असे कळले की श्रीकृष्णाच्या कनकदास या एका निस्सिम भक्ताला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला तेव्हा श्रीकृष्णानेच मंदिराच्या मागच्या बाजूस एक छोटा झरोका करून त्यातून आपले दर्शन घडवले. म्हणलं, निस्सिम भक्तांनाही हे सोडत नाही, आपल्याला तर आयुष्यभरासाठीच बहिष्कृत केले पाहिजे.
देवांच्या प्रतिमांचेही आयुष्य क्षणभंगुर...आपले काय घेऊन बसलात म्हणतो मी
त्यामुळे इथे मी इमानेइतबारे जसे बाकीचे लोक्स करताय त्याप्रमाणे शर्ट काढून उघड्या अंगाने त्या इवल्याश्या झरोक्यातून देवाचे दर्शन घेतले. अर्धा पाऊण तास घामाच्या धारा सहन करत रांगेत उभे राहून केवळ पाव सेकंद त्या झरोक्यातून दिसणाऱ्या दर्शनाने लोकांना काय समाधान मिळत असेल असा विचार करतच मंदिराबाहेर आलो आणि एका वल्लीची गाठ पडली.
याचे नाव आता विसरलो पण कृष्णाचेच काहीतरी होते. या माणसाने काश्मिर ते केरळ असा एकट्याने सायकलप्रवास केला होता. आणि कहर म्हणजे केरळात आल्या आल्या त्याची सायकल आणि सामान चोरीला गेले. त्याची ही कथा सुरुवातीला मला जरा बनवाबनवीची वाटली आणि असे वाटले आमच्या सायकली बघुन त्याने ही गोष्ट रचली असावी आणि आता घरी जायला पैसे मागणार बहुदा. पण जग काय फक्त बिलंदर माणसांनीच भरलेले नाही, काही प्रामाणिक माणसेही असतात हा अनुभव मला लगोलग आला. त्याने पैसे वगैरे काही मागितले नाहीच उलट केरळात जाताना खबरदारी बाळगा, सायकल दुर्लक्षीत ठेऊ नका, मला फटका बसला तसा तुम्हाला बसु नये हिच इच्छा असे कळकळीने सांगितले आणि मग सुरुवातीला त्याच्यावर आपण विनाकारणच बनेलपणाचा शिक्का मारला याबद्दल स्वतचा रागही आला. आणि मग पत्रकारितेच्या भूमिकेत जात त्याला बोलते करायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आले एकेक करून माझे साथिदार पुढे निघून गेलेत आणि मीच एकटा मागे राहीलोय.
हायला, असे कसे झाले म्हणत मी पटकन त्या बाबांना रामराम ठोकून मंदिराबाहेर पडलो आणि आल्या मार्गाने हायवेला लागलो. पण इथेही आमच्या मंडळींचा काही पत्ता नाही. मग फोनाफोनी. असे कळले की ते अजून हायवेला लागलेच नाहीयेत. म्हणलं बहुदा वाटेत कुठेतरी भलताच रस्ता पकडला असावा म्हणत वाट पाहत थांबलो. पण बराच वेळ झाला तरी दिसेनात आणि त्यांचाच फोन आला आम्ही हायवेला आलोय, तु कुठेयस. आणि त्यांच्या रस्त्यावरच्या खाणाखुणा आणि मला दिसणाऱ्या यात काही ताळमेळच बसेना. बर ते माझ्या मागे आहेत का पुढे आहेत हे ही कळेना. शेवटी फोन तसाच चालू ठेवत तु्म्हाला ही पाटी दिसली का,हा ब्रिज लागला का असे विचारत निघालो. पण त्यातले त्यांना काहीच लागले नव्हते. परत संशय आला बहुदा मीच पुढे असणार कदाचित. पण सुमारे ५-१० मिनिटे वेगाने सायकल हाणल्यावर एका झाडाच्या सावलीत थांबलेले दिसले. अपेक्षेप्रमाणेच ते भलत्याच मार्गाने आले होते.
उडपी म्हणजे दाक्षिणात्य भोजनासाठी प्रसिद्ध. त्यामुळे बाबांनीही मला उडपीला जेवण घ्याच असे सांगितले होते. सुदैवाने जेवणाच्या वेळेतच आम्ही उडपीला आल्यामुळे खास साउथ इंडियन भोजन घ्यावे असा विचार केला आणि त्याप्रमाणे एका रस्त्यालगतच्या हॉटेलात घुसलो. तिथे मिळालेले जेवण हे इतके अत्यंतिक भिकार होते की कुठुन इथे आलो असे झाले. त्यामुळे मग आमची टकळी सुरु झाली. बहुदा सगळे चांगले उडपी रेस्टारंटवाले पुणे, मुंबईला निघून गेल्यामुळे सगळा गाळ इथे राहीला असावा बहुदा.
(अर्थात ही सर्व मज्जाच होती. चांगले जेवण अजूनही मिळत असणार, पण आम्हाला जे मिळाले ते मात्र कल्पनातीत भिकार होते)
असो, भूक कडकडून लागलीच होती आणि रस्सम भात होता तो घशाखाली घातला आणि बाहेर पडलो.
आता म्हणजे उकाडा असह्य होत चालला होता. घामाच्या धारा नव्हे शॉवरबाथच. मी त्यावेळी बाबुभाईला म्हणालो देखील, म्हणलं पुण्याला जाऊन आपण या परिस्थितीचे वर्णन करू तेव्हा कितीही अतिशयोक्ती केली तरी ती पुरेशी ठरणार नाही बहुदा.
उन्हापासून वाचण्यासाठी फुल जर्सी, फुल ट्रॅकपँट, शूज, ग्लोव्ज, आणि कान,मान वाचवण्यासाठी स्कार्फ असा सगळा जामजिमा अंगावर चढवल्याखेरीज गत्यंतर नव्हते. घाटपांडे काकांनी थ्रीफोर्थ वापरून पाहीली तर त्यांना पायाला चक्क सनबर्न झाले. त्यामुळे त्यापासून धडा घेत आम्ही गपगुमान नखनिखांत कव्हर करून घेत होतो आणि त्यामुळे येणाऱ्या घामाला तोड नव्हती. (वरचे फोटो पाहून मनात शंका येणे स्वाभाविक आहे म्हणून आधीच खुलासा..उन्ह तापेपर्यंत आणि संध्याकाळचा काही वेळ नुसत्या शॉर्ट्सवर चालून जायचे. पण १० ते संध्याकाळी ४ पर्यंत कंपल्सरी फुल पँट) आणि चढउताराच्या रस्त्यावर तर पारावार उरायचा नाही. मला तर असे वाटत होते की सगळा घाम ओघळून बुटात साचत चाललाय आणि उतरलो की चबाक चबाक आवाज येणार. मामांनी तर उन्हाचा तडाखा कमी व्हावा म्हणून कलिंगड खाऊन झाल्यावर उरलेली साल डोक्यावर ठेऊन त्यावर हेल्मेट चढवले. पण त्याने डोक्याला खाज सुटली तर काय घ्या म्हणून मी तसला काही प्रयोग करायचे टाळले.
पण विशेष म्हणजे त्यावेळी एकदाही वाटले नाही की झक मारली आणि इथे आलो. उलट सगळ्यांचा एकत्रित प्रवास सुरु होता आणि अंतर कमी असल्याने आरामात जाऊनही चालत होते. खऱ्या अर्थाने रोडट्रीप आम्ही एन्जॉय करत होतो. मी असाही फोटो काढायाला मधून मधून थांबायचो त्यामुळे शेवटच्या नंबरात असायचो. तेव्हा सगळ्या सायकली एकापाठोपाठ एक अशा वळणावरून उतरताना जे काही दृष्य दिसायचे त्याला तोड नव्हती. दुर्दैवाने मला ते एकदाही कॅमेरात धडपणे टिपता आले नाही. आता रस्ताही चांगला होता त्यामुळे झामझूम करत जायला धमाल येत होती.
मोहीमेतला अखेरचा एकत्रित प्रवास
आणि असेच धमाल करत चारच्या सुमारास मँगलोर (मंगळुरु) मध्य प्रवेशते झालो. पण इथेही मिळालेले हॉटेल हे इतके गावात होते की ते शोधता शोधता पार पुरेवाट झाली. एकतर गावातले रस्ते असूनही इतके तीव्र चढउतार होते की घाटात आल्यासारखे वाटायचे, त्यातून एकेरी मार्ग, दुहेरी मार्ग असा प्रचंड गोंधळ. अशक्य वेळ शोधाशोध करून एकदाचे ते मेधा रेसिडन्सी सापडले तेव्हा हायसे वाटले.
जीपीएसवर पत्ता शोधताना सुह्द
रुम होत्या मात्र एकदम प्रशस्त. एका खोलीत तीन तीन बेड आणि विशेष म्हणजे चार्जिंग पॉइंटही मुबलक. त्यामुळे चैनच चैन झाली. रात्री मग जेवणानंतर छोेटेखानी निरोप समारंभ झाला. सगळ्यांनीच आपापले अनुभव शेअर केले आणि एकंदरच व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. आपटे काकांना आणि मामांना सोडून पुढे जाताना वाईट वाटतच होते पण कारणच तसे असल्यामुळे काही इलाजही नव्हता.
आजचा प्रवास...तसा हलकाफुलकाच झाला...उकाडा कमी असता तर जास्त एन्जॉय करू शकलो असतो..पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी....
दिसताना हे छोेटे छोटे चढ दिसतात पण प्रत्यक्षात खूप वैताग आणतात
अरे वा! आला की नवीन भाग. पण
अरे वा! आला की नवीन भाग. पण जरा जास्त वाट पहावी लागली
उन्हाचा कडाका, खड्ड्यानी भरलेले रस्ते इ. नाना अडथळ्यातून वाट काढत जिगरबाज प्रवास चालू आहे़़़़.
छान लिहित आहात.
अरे वा चैंप नवीन भाग घेऊन आला
अरे वा चैंप नवीन भाग घेऊन आला शेवटी. मस्त जमला आहे हा पण. तुम्ही रस्त्याला सरावलात ते दिसते आहे.
उडपी गावात १२ वर्षांपूर्वी मला पण कुठेही चांगले खायला मिळाले नव्हते
हं.....आला नवीन भाग. छान
हं.....आला नवीन भाग. छान इन्टरेस्टिन्ग!
मस्त वर्णन. वाचायला मजा येतेय
मस्त वर्णन. वाचायला मजा येतेय पण उकाड्याने काय झाले असेल त्याची कल्पनाही करवत नाही... या भागात मी कधी गेलोच नाही आजवर.. जायला पाहिजेच असे वाटायला लागलेय.
धन्यवाद चंद्रा, टण्या, मानुषी
धन्यवाद चंद्रा, टण्या, मानुषी आणि दिनेशदा...
उडपी गावात १२ वर्षांपूर्वी मला पण कुठेही चांगले खायला मिळाले नव्हते
>>>>
अच्छा म्हणजे खराब क्वालिटी कालातीत आहे होय. मला वाटले आमची हॉटेलची निवड चुकली
उकाड्याने काय झाले असेल त्याची कल्पनाही करवत नाही...
>>>>
अॅक्चुअली आता आम्हालाही कल्पना करवत नाही. पुण्यात गाडीवरून फिरताना हैराण झालो की वाटते कसे काय असल्या उकाड्यात आपण सायकल चालवली. तेपण १३ दिवस....काहीतरी अविश्वसनिय वाटते.
खरच खुप मस्त वर्णेन केले
खरच खुप मस्त वर्णेन केले आहेस आशिश. अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आहे.
सुन्दर
चॅम्पा पुढचा भाग वेळेत टाक
चॅम्पा पुढचा भाग वेळेत टाक रे.. किती तो उशीर..
masatach !
masatach !
मस्त चॅम्पाशु ..
मस्त चॅम्पाशु ..
मस्त वर्णन ....
मस्त वर्णन ....
आता एकदम हाच भाग वाचायला
आता एकदम हाच भाग वाचायला घेतला आणि आवडला.नंतर सर्व सलग वाचेनच.एवढा उकाडा कसा ?कोणता महिना होता?फोटो आणि वर्णन आवडले.
लिहलास बाबा शेवटीच एकदा हा
लिहलास बाबा शेवटीच एकदा हा भाग
लवकर लवकर लिहत जा रे उगाच वाट पाहत बसाव लागतं..
पु.भा.ल.लि.
(पुढचा भाग लवकर लिही.....)
धन्यवाद सर्वांना.... एवढा
धन्यवाद सर्वांना....
एवढा उकाडा कसा ?कोणता महिना होता? >>>>>
फेब्रुवारी-मार्च...आणि असाही किनारपट्टीला थंडीचे एखाद-दुसरे महिने सोडले तर बारामाही उका़डाच असतो.
हिम्स, किश्या - टाकतो बाबांनो
आशु भारी रे.. मस्त
आशु भारी रे.. मस्त जमलाय...फोटो पण जबरदस्त...
मस्त भाग हा पण. कधी काळी
मस्त भाग हा पण.
कधी काळी दरवर्षी न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत या भागात जाणं व्हायचं, त्यामुळे इथल्या उकाड्याचा चांगलाच अनुभव आहे.
हा पण भाग नहमीप्रमाणेच
हा पण भाग नहमीप्रमाणेच वाचनीय.
माझा साधारण अवतार असा होता, >>>>> चालता फिरता आकाशकंदिल वाटतोयस तु आशु. नो वंडर, त्या मुली तुझ्याकडे पाहुन खुसखुसत होत्या.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. कन्याकुमारी केंद्राचे वर्णन वाचायची उत्सुकता लागुन लागली आहे.
हा भाग लईच चिकचिकीत झालाय.
हा भाग लईच चिकचिकीत झालाय.
व्वा... छान लिहीलय... फोटोही
व्वा... छान लिहीलय... फोटोही सुंदर
इथे दिसतील असे दिल्याबद्दल धन्यवाद (बहुधा माझ्याइथे पिकासावेब आपोआप दिसू लागले असावे.. आधी ब्यान होते)
मस्तं जमलाय रे हा पण भाग आशु!
मस्तं जमलाय रे हा पण भाग आशु! पुढचा भाग मात्र जरा आणखीन लवकर येउ दे...
मस्तं जमलाय रे हा पण भाग आशु!
मस्तं जमलाय रे हा पण भाग आशु! पुढचा भाग मात्र जरा आणखीन लवकर येउ दे...
धन्यवाद सर्वांना.... धागा
धन्यवाद सर्वांना....
धागा टाकल्यानंतर खूपच कमी प्रतिसाद पाहून वाटले की हा भाग काही जमला नाही बहुदा. पण नंतर लक्षात आले की सगळी मंडळी सुट्टीवर गेलेली दिसतायत.
चालता फिरता आकाशकंदिल वाटतोयस तु आशु. नो वंडर, त्या मुली तुझ्याकडे पाहुन खुसखुसत होत्या >>>>
हाहाहाहा
देवांच्या प्रतिमांचेही आयुष्य
देवांच्या प्रतिमांचेही आयुष्य क्षणभंगुर...आपले काय घेऊन बसलात म्हणतो मी >> क्या बात है , मस्त लिहितो आहेस. पुलेशु.
खूपच कमी प्रतिक्रियाकडे
खूपच कमी प्रतिक्रियाकडे दुर्लक्ष करणे ,
हो आणखी एक तु़झी सायकल सफर
हो आणखी एक तु़झी सायकल सफर वाचुन मी सायकल घेण्याचा विचार करतोय.
( गेली तब्बल १२ वर्ष मी सायकलिंग नाही केलय)
लांब सफारीच माहीत नाही निदान दररोज व्यायामासाठी वापरेनच.
>>> आकाशकंदिल ???? <<<<
>>> आकाशकंदिल ???? <<<<
फोटोत त्याच्या मागे एक बोर्ड आहे ना, अगदी तस्साच "इस्टमनकलर" दिस्तोय.....
त्या बोर्डावर सर्व सप्तरंग अन त्याच्या छटा आल्याच पाहिजेतचा अट्टाहास दिसतो, तसेच याचेही झालय....
मज्जा....
हो आणखी एक तु़झी सायकल सफर
हो आणखी एक तु़झी सायकल सफर वाचुन मी सायकल घेण्याचा विचार करतोय.
( गेली तब्बल १२ वर्ष मी सायकलिंग नाही केलय)
लांब सफारीच माहीत नाही निदान दररोज व्यायामासाठी वापरेनच. >>>>
मस्त रे..शुभेच्छा
फोटोत त्याच्या मागे एक बोर्ड आहे ना, अगदी तस्साच "इस्टमनकलर" दिस्तोय.....
त्या बोर्डावर सर्व सप्तरंग अन त्याच्या छटा आल्याच पाहिजेतचा अट्टाहास दिसतो, तसेच याचेही झालय.... >>>>
हाहाहाहा