रसाच्या पोळ्या

Submitted by मनीमोहोर on 21 March, 2015 - 08:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

नाव बुचकळ्यात पाडणारे आहे खरे. पण कोकणात आमच्याकडे हेच नाव आहे ह्या पोळ्यांचे, म्हणून मी ही हेच दिले आहे. वाचा पुढे म्हणजे उलगडा होईल.

जनरली पाडव्याचं पक्वान्न म्हणजे श्रीखंड. पण आमच्या़कडे पाडव्याला आमरस करायची प्रथा आहे. पहिला आमरस पाडव्याला होतो. आंबे घरचे असल्यामुळेच हे शक्य होतं. एखाद वर्षी आंबा मागास असला, म्हणजे पाडव्याला आमरस करण्याएवढे आंबे नसतील, तर मग आम्रखंड करायचं आणि तेवढे ही नसतील आंबे एखाद्या वर्षी तर ह्या रसाच्या पोळ्या करायच्या पाडव्याला. पण आंब्याचचं काहीतरी करायचं पाडव्याला.

हा रस म्हणजे आंब्याचा आटवलेला रस. मे महिन्यात हा रस केला जातो आणि पुढे वर्षभर खाल्ला जातो. बाजारात हल्ली आंब्याचा मावा म्हणून एक प्रकार मिळतो तो हाच असावा असं वाटतं. कारण मी तो अ़जून बघितलेला नाहीये.

आंब्याचा रस काढुन त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि एका भल्या मोठ्या परातीत तो चुलीवर ठेऊन आटवायला घ्यायचा. हा मी नेहमी मोठ्या प्रमाणावरच केलेला पाहिला आहे. रस चुलीवर ठेवला आणि उकळायला लागला की तो फार उडतो सगळीकडे आणि त्यात असलेल्या साखरेमुळे हातावर उडला तर चांगलचं भाजतं म्हणुन चुलीपासून लांब उभं रहायचं आणि लांब दांड्याचा कालथा वापरायचा ढवळण्यासाठी. तसेच हा सारखा ढवळत रहावा लागतो नाहीतर खालुन लागतो. भरपूर कष्टाचं काम आहे हे पण कामवाल्या बायका असतात हाताशी म्हणूनच जमतं. मोठी परातभर रस आटायला चांगले दोन तीन तास लागतात. रस साधारण आटत आला की त्यात थोडी साखर घालायची प्रिझर्वेटिव म्हणून आणि पुन्हा थोडा आटवायचा. साधारण मऊ गूळाएवढी कंसिस्टंसी असते ह्याची. अगदी गार झाला की मोठया मोठ्या चीनी मातीच्या बरणीत भरायचा. वर परत टिकण्यासाठी म्हणून थोडी पिठीसाखर भुरभुरवायची आणि दादरा बांधुन बरणी ठेऊन द्यायची. ह्याचा रंग फार सुंदर येतो आणि चवीलाही छानच लागतो. असा तयार रस मुलाना खाऊ म्हणून कधीही देता येतो. उपासाच्या दिवशी हा रस खाऊन वर दूध प्यायले तर पोट मस्त भरतं. हा रस आणि भाजलेले शेंगदाणे हा आजच्या काळातही आवडता खाऊ आहे आमच्या घरातल्या लहान मुलांचा. तसचं ह्यापासून आंब्याच्या वड्या आणि आता मी सांगणार आहे त्या पोळ्या सुद्धा छान होतात.

नमनाला चांगलं लिटर भर तेल घालुन झालं आहे आता प्रत्यक्ष कृतीकडे वळू या .

साहित्य:
सारणासाठी
एक वाटी आटवलेला रस
एक वाटी साखर ( मिक्सर मध्ये दळून )
एक चमचा तूप आणि थोडी वेलची पावडर.

कव्हर साठी

दोन वाट्या कणीक
दोन चमचे डाळीचं पीठ ( पोळ्या खुसखुशीत होतात या मूळे)
दोन चमचे गरम तेलाचं मोहन आणि किंचित मीठ.

पोळ्या लाटण्यासाठी तांदळाची पीठी. ( कणीक शक्यतो घेऊ नये. पीठीच घ्यावी. )

क्रमवार पाककृती: 

प्रथम कणकेमधे बेसन, तेल आणि मीठ घालुन आपण नेहमी पोळ्यांना भिजवतो त्या पेक्षा थोडी घट्ट भिजवून मुरण्यासाठी झाकून ठेवावी.

रस किसणीवर किसून घ्यावा आणि पिठीसाखर त्यात मिसळून नीट एकत्र करावे. नंतर हे मिश्रण मिक्सर मधुन फिरवून घ्यावे म्हणजे रस आणि साखर चांगल मिक्स होईल. आता ह्यात एक चमचा साजुक तूप, वेलची पावडर घालावी आणि दुधाचा हात लावून लावून मळून मळून त्याचा गोळा करावा. एकदम दूध घालु नये. साधारण आपण गूळ पोळीचा गूळ करतो तसा रसाचा गोळा तयार करावा.

कणीक आणि रस असे दिसेल

From mayboli

मग कणकेच्या दोन छोट्या लाट्यांमध्ये एक रसाची लाटी ठेऊन कडा बंद कराव्यात आणि आपण गूळाची पोळी लाटतो तशी ही पोळी लाटावी आणि मंद गॅसवर दोन्ही बाजुनी खरपूस भाजावी. ही अगदी ट्म्म फुगते आणि हलकी होते.

ही घ्या तयार पोळी

From mayboli

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे पण ह्या पुपो प्रमाणे जड होत नाहीत.
अधिक टिपा: 

मंद गॅस वरच भाजावी.
लाटताना रस कडेपर्यंत जाईल हे पहावे.
अगदी हलक्या आणि खुसखुशीत होतात. मुलांना हातात धरून खाता येतात.
खाताना साधारण पातळ केलेले तूप यावर घातले तर ह्यांची चव अजून खुलते.
पाडव्यासाठी म्हणून दारची पांढर्‍या चाफ्याची फुलं आणि कडुनिंबाची पानं यांनी सजावट केली आहे.

माहितीचा स्रोत: 
कोकणातील पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सर्वांना.

दिनेश, आमच्याकडे हात कापडाने न झाकता लांब दांड्याचा कालथा वापरतात. त्यासाठी सुताराकडून खास कलथे बनवून घेतले आहेत आम्ही.

पूनम, हो तो रस दूध लावून खूप मळुन मऊ करावा लागतो.

मस्त रेसिपी. मी पण करणार आता. Happy
वेल, घरी बनवायचा असेल रस तर निर्लेपचं फ्राय पॅन घ्यावं. पण मी सांगीन की तुम्ही शहरात रहात असाल तर नका ह्या भानगडीत पडू. खूप खटाटोप आहे त्याचा. ओट्यावर , गॅसवर, मागच्या टाईल्सवर खूप उडतो. वेळ ही खूप लागतो. आम्ही ही गावाला बाहेर चुलीवरच आटवतो रस म्हणून कळत नाही>
हेमाताई, ओवन मधे रस आटवता येतो, अजिबात उडत नाही. मी गेल्यावर्षी केला होता.

आईगं! काय भन्नाट दिसतायत पोळ्या. उचलुन खावशी वाटतेय लगेच. नेमक्या जेवताना बघितल्यात आता डब्यातली गवारीची भाजी नको वाटतेय. Sad

रच्याकने, मला ना खुप हेवा वाटतो कोकणातील लोकांचा, प्रत्येकाच्या दारात आंबा. मौसमात तर भरपुर खातातच वरुन वर्षभरासाठी अशा प्रकारे साठवण पण करतात आणि आम्ही मात्र आंबानाम जपत मौसमाची वाट बघतोय. आम्हाला आंबा नुसताच खायला पुरत नाही तर असले विविध पदार्थ कधी करुन बघणार?
रस चुलीवर ठेवला आणि उकळायला लागला की तो फार उडतो सगळीकडे >>>> इथे मी आंबा खाताना हातावर ओघळलेला रस पण चाटुन पुसुन घेते Wink माझ्याने तर अजिबात बघविणार नाही रस असा वाया गेलेला Sad

मनीमोहोर, नववर्षाची भेट आवडली!

हलकी खरपूस, मधुर खुसखुशित, आमरसाची पोळी ।
तबकात सुबक ती, सजवली सुंदर, चंपकपुष्पे रचली ॥
मनीमोहोर खरोखर, पाककृतीवर, लट्टूच रसना झाली ।
नववर्षाची भेट अलौकिक, अवचित आज मिळाली ॥

सुरेख!!

फारच सुंदर!!

आम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्यांसाठी रसाच्या पोळ्या हे प्रकरण थोडे वेगळे आहे. कणिक भिजवताना पाण्याऐवजी उसाच्या रसात भिजवून केलेल्या पोळ्या त्या रसाच्या पोळ्या. >> हे काय असतं? ही पण पाककृती टाका कुणीतरी!!

मस्त मस्त पाककृती आणि तेवढच सुंदर लेखन. कोकणातलं घर उभं राहिलं डोळ्यासमोर. आताच्या आत्ता खाव्याशा वाटत आहेत या पोळ्या.

धन्यवाद सर्वांना. आमच्या फार आवडत्या असलेल्या, आमच्या मनात विराजमान झालेल्या, ह्या पोळ्या तुम्हाला ही आवडल्या म्हणून. आमच्या घरातल्या सर्वांना हे प्रतिसाद वाचून खूप आनंद होईल.

सामी. रस मावेत आटतो हे नव्यानेच कळले. आता शहरात ही रस आटवता येईल विनासायास. कसं ते नीट सांग म्हणजे करुन बघता येईल.

निल्सन, प्रतिसाद आवडला. पण तू एकदा तो रस आटवताना किती थडाथडा उडतो ते बघितलसं ना की तुला पटेल. (स्मित)

नरेंद्रजी, तुमचा काव्यात्मक प्रतिसाद सुंदर. खरं तर हा प्रतिसाद माझ्या एकटीसाठीच नाही तर आमच्या सर्व कुटुंबासाठी फार आनंददायी आहे. ( आमचं कोकणात सहा पिढ्यांचं एकत्र कुटूंब आहे त्या सगळ्यांसाठी ) . मी निव्वळ निमित्तमात्र आहे. ह्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल खूप खुप धन्यवाद.

>>>मृण्मयी, तुमच्या कल्पना शक्तीला सलाम.
बाप रे! सलाम नका हो करू. मानुषीताईंनी एक्झॅक्टली असंच केलंय. अनेकांना उरलेले पेढे, बर्फ्या साटोर्‍यांमध्ये घालताना बघितलं म्हणून आंबाबर्फीचा सदूपयोग केला, एवढंच. Happy

>>>त्या बर्फीत आणखी काही घातलं का? लाटताना सारण पोळीच्याकडेपर्यंत नीट गेलं का ? कारण बर्फी थो़डी चिकट असेत ना म्हणून शंका आली.
काही अ‍ॅडिशनल घातलं नाही. आधी २-३ बर्फ्या १५ सेकंद हाय पावरवर मायक्रोवेव करून बघितल्या. पण त्यांचं तुपकट थारोळं झालं. म्हणून पोटॅटो मॅशरनं मॅश करून तश्याच मळल्या. मऊ गोळा झाला आणि सारण व्यवस्थित पसरलं. पण आच वाढवलली तेव्हा पोळीतलं सारण लागलीच पातळ होऊन पोळ्या फुटत होत्या. मंद आचेवर पेशंटली भाजाव्या लागल्या.

आता टिन्ड मँगोपल्प आटवून बघते. म्हणजे तुमची पाककृती वापरून रसपोळ्या करता येतील.

खतरा दिसतायत पोळ्या! अगदी तोंपासू! Happy

आंबा-आमरस-आम्रखंड-रसपोळ्या-आटवलेला रस-आईस्क्रीम-बर्फी-आंब्याची साटं..... कितीही खाल्लं तरी अजून अजून हवं असतं! Happy

आमच्या घरातली आवडती रेसीपी आहे.

कोकणात प्रत्येकाच्या घरात बनतेच असे नाही अश्या रेसीपी मधली हि एक आहे.

घरी गावाहूनच आटीव रस(मावा) येतो.

पण मी अवन मध्ये केलाय भारताबाहेर असताना. १० इन्च ट्रे ला जरासा तूपाचा हात लावून, वरून फॉइल लावून(जरासे टोचे मारून वाफ जायला) लावून २ तास २२० फारेन्हाईट ठेवावे. मधून मधून ढवळावे.

फणसाच्या रसाची बर्फी हा सुद्धा असाच एक खास प्रकार आहे कोकणातला जो प्रत्येकालाच माहित असेल असे नाही.

धन्यवाद परत एकदा सर्वांना.
मृण्मयी, मला वाटत की बर्फी मध्ये जास्त प्रमाणात असलेल्या माव्यामुळे पोळ्या फुटत असतील .
देवीका , मावेत रस कसा आटवायचा ते सांगितल्यबद्दल धन्यवाद.
फणसाच्या रसाची बर्फी मलाही माहित नाहीये. पाकृ लिहा ना माहित असेल तर.

ममो, देवीका नी मावेत कसा आटवायचा ते नाही लिहिलंय. अवनमध्ये करायची कृती आहे ती. मावेत अ‍ॅल्युमिनीअम फॉईल चालणार नाही...

आंबा पिकतो रस गळतो...ममो;कोकणच्या। राणीने कोकणच्या राजाचा झिम्मा मस्त सुरू केलाआणि माबोकरानी हा आंब्याचा झिम्मा उत्तम प्रतिक्रिया देऊन झक्कास रंगवला.तझ्या रेसिपी बरोबर रेसपि टाकण्याच्या टायमिंगला। सलाम!!वसंताची सुरवात रसाळ ;रंगीत व खुसखुशित झाली.खूप मजा आली

मनीमोहर तुझा प्रत्येक बाफ खासच माहिती देणारा असतो, म्हणून आधी तुझे कौतुक कसे करावे तेच कळेना. सो, प्रतिक्रिया उशिरा देतेय. खरे तर तो आम्ब्याचा गोळाच मटकावासा वाटतोय.:स्मित:

पोळ्या अप्रतीम दिसतायत. यन्दा आम्ब्याला उशिर आहे, तेव्हा देसाई बन्धुचा आधार घ्यायचा विचार आहे.

ममो, मस्तच आहेत पोळ्या.
साधी पोळी किंवा पुपो पण येत नाही मला त्यामूळे हे करून बघायच धाडस नाही. Proud
एक गटग ठरवा खास रस पोळ्यांसाठी. Wink

योकु, बरोबर आहे तुमचं . देवीकानी मावेत नाही अवन मध्ये रस कसा आट्वायचा ते लिहीलं आहे.

मीरा, प्रतिसाद खूप आवडला. खरच आंब्याचा हा झिम्मा मस्त प्रतिसादांमुळे चांगलाच रंगला. ह्या कोकणच्या राजाशी आमचं तर भावनिक नातं जोडलं गेलं आहे. आजे सासर्‍यांनी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी स्वतःच्या हाताने लावलेली कलमं , हंडे डोक्यावरुन वाहुन नेऊन त्यांना घातलेले पाणी, स्वतःच्या अपत्यांप्रमाणे त्यांची घेतलेली काळजी. सासर्‍यांनी जिवाचं रान करुन वाढविलेल्या बागा आणि आता पुढची पिढी ही त्याच प्रेमाने ह्या बागा जोपासतेय म्हणून वाटणारा अभिमान ह्या सगळ्या गोष्टींमुळे आंब्याबद्दल मनात नेहमीच प्रेम आणि ममत्व असतं. अशा आंब्याच्या रसापासून बनविलेली आमची खास रेसीपी माबोकरांना ही आवडली म्हणून खूप खूप धन्यवाद सर्वांना.

खरचं या वर्षी मे महिन्यात कोकणात गटग करु या. आंब्याच लोणचं, फणसाची भाजी, रसाच्या पोळ्या, कुळथाचं पिठलं, भात असा फक्क्ड बेत करु या. जाताना प्रत्येकाला आंब्याची एकेक पेटी आमच्या तर्फे भेट. सर्वांना आग्रहाचं आमंत्रण. लागा तयारीला.

Pages