अखेरीस होणार होणार म्हणत गाजलेली पुणेकरांची पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम यशस्वीरित्या पार पडली. २१ फेब्रुवारी रोजी निघालेली ही मोहीम महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात या सायकलस्वारांनी हे अंतर केवळ १३ दिवसांमध्ये पार केले.
आधी विचार होता की मोहीमेचा वृत्तांत टाकून मग तयारी कशी केली तो भाग टाकावा पण विचारविनिमयानंतर तोच भाग आधी टाकला म्हणजे शंकानिरसन व्हायला मदत होईल असे वाटले. त्यामुळे या भागात मोहीमेच्या तयारीबद्दल लिहीले आहे.
तसे म्हणले तर मी या मोहीमेत केवळ योगायोगाने सामील झालो. त्याआधी बराच काळ माबोकर हेम आणि मी लांबचा सायकलप्रवास करावा असे ठरवत होतो पण त्याला पूर्णत्व येत नव्हते. दरम्यान, सायकल चालवणे सुरुच होते. आणि माबोवरचा सायकल स्टार केदारने व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मला घेतले. त्यातल्या एकाने मी आज रात्री नेकलेस राईडला जाणार आहे कुणी येणार का असे विचारले. मला वेळ होताच त्यामुळे मी येतो असे सांगून ठरलेल्या जागी गेलो.
मला भेटलेला म्हणजे ओंकार ब्रम्हे..हा माणूस म्हणजे एक भारीच व्यक्तीमत्व आहे. त्याबद्दल लिहीनच पुढे. तर आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो आणि सायकल चालवता चालवता त्याने मला सांगतले की तो आणि त्यांचा ग्रुप पुणे ते कन्याकुमारी असे सायकल चालवत जाणार आहेत.
आयला, भारीच की असे म्हणत मी त्याला तपशील विचारला आणि त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरवलेच.
कन्याकुमारी सायकल प्रवास हे माझे खूप वर्षांचे स्वप्न होते. अगदी लहान असल्यापासून. माझ्या वडीलांनी ते कॉलेजमध्ये असताना कोल्हापूर ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास केला होता. तेव्हाचा त्यांचा फोटो पाहून मलाही कायम सुरुसुरी यायची की च्यायला आपण पण असे काहीतरी केले पाहिजे. पण तो काही योग येत नव्हता आणि आता ती संधी आपणहून चालून आली होती.
बस्स म्हणले, आता नाही तर कधीच नाही आणि सगळे पत्ते पिसायला सुरुवात केली. घरून तर काहीच अडचण नव्हती उलट जोरदार पाठींबाच मिळाला. अॉफिसमध्येही सायकलनी एवढ्या लांब जाणार याचेच कौतुक वाटले आणि थोड्या वाटाघाटींनीतर रजा मिळाली.
तेव्हा आणि आत्ता
अर्थात माझ्या मोहीमेत आणि बाबांच्यावेळच्या मोहीमेत जमिनआस्मानाचा फरक होता. ४४ वर्षांपूर्वी त्यांच्याकडे साधी जेन्टस सायकलही नव्हती आणि त्यांच्या वहिनीची म्हणजे माझ्या काकूची लेडीज सायकल घेऊन त्यांनी ही मोहीम केली. पुरेसे नकाशे नव्हते, कुणाला त्याकाळी असे काही करायची कल्पनीही शिवली नव्हती त्यामुळे बहुतांश लोकांनी वेड्यातच काढले. कहर म्हणजे बरोबर यायला साथीदार मिळेना म्हणून त्यांनी चक्क वृत्तपत्रात जाहीरात दिली आणि त्याला प्रतिसाद देऊन सांगलीचा एक जण बरोबर आला. दोघांनीच मिळून ती मोहीम पूर्ण केली आणि तो जसा अचानक आला तसाच नंतर अचानक गायब झाला आणि इतक्या वर्षात त्याने कसलाही संपर्क ठेवला नाही.
साधी सायकल असूनही त्यांचा वेग चांगलाच असायचा आणि दिवसाकाठी ९०-१०० किमी अंतर पार करायचेच. रहायला हॉटेल अस्तिवातच नव्हती. त्यामुळे मुक्काम धर्मशाळेत नाहीतर देवळाच्या ओसरीवर. कमीत कमी पैशात त्यांनी ही मोहीम केली. त्यामुळे माझी परदेशी बनावटीची हलकी सायकल, आमच्या खास बनवून घेतलेल्या बॅगा, सायक्लोकॉप्युटर, दिवे आदी सगळे बघून त्यांना अचंबाच वाटत होता.
तरीपण त्यांनी एकदा मला विचारलेच की अरे मी जायच्या आधी सराव म्हणून रोज दीडशे जोर आणि अडीचशे बैठका मारायचो. तु काहीच व्यायाम करताना दिसत नाहीस...
आता काय बोलणार यावर.....
प्रॅक्टीस राईड्स
तरीही म्हणता म्हणता त्यात १०-१२ दिवस मोडले आणि जानेवारी येऊन ठेपला. आम्ही निघणार होतो २१ फेब्रुवारीला. म्हणजे जेमतेम दीड महिनाच हातात होता तयारीसाठी. बाकीच्यांची मोहीम आधीच ठरल्यामुळे त्यांनी केव्हाच जोरदार तयारी करायला सुरुवात केली होती.
मीपण मग त्यांच्या बरोबर राईडला जायला सुरुवात केली. माझ्यासाठी हाच सगळ्यात त्रासदायक भाग होता. थंडीचे भल्या पहाटे उठून जाणे इतके जीवावर यायचे की बास. पहिलीच राईड केली ती पुणे-आळंदी-देहू आणि मग इतरही छोट्या छोट्या राईड्स केल्या.
खऱ्या अर्धाने कस बघणारी पहिली राईड ठरली ती महाबळेश्वरची. बॅकअप व्हेईकल न्यायचे नाही हे आधीच ठरल्यामुळे सगळे सामान आम्ही बरोबरच नेणार होतो. त्यादृष्टीने सराव व्हावा म्हणून मूळ मोहीमेला जेवढे सामान लागेल तेवढे घेऊन मगच या प्रॅक्टीस राईड करायचे ठरले.
दरम्यानच्या काळात खास अॉर्डर देऊन शिऊन घेतलेल्या पॅनिअर्स आणि हँडलबार बॅग्स मिळाल्या आणि त्यात सगळे सामान भरून महाबळेश्वरच्या दिशेने सुटलो. वाटेत खंबाटकी घाट आणि पसरणी घाटानी चांगलाच जीव काढला पण मजल दरमजल करत पोहोचते झालो.
येताना मस्त स्ट्रॉबेरी आस्वाद घेत येत असाताना सायकलने दगा दिला. पसरणी घाट संपताच पंक्चर. ठिकाय होते असे कधी कधी म्हणत जवळच असलेल्या सायकलवाल्याकडून काढून घेतले पण पुढे जाताच पु्न्हा एकदा. आणि मग ठराविक अंतरानी पंक्चर व्हायला सुरुवातच झाली. एकापाठोपाठ एक पाच पंक्चर झाल्यावर मात्र माझा संयम सुटला आणि एका टेंपोला हात दाखवून त्यावर सायकल चढवून पुणे गाठले.
पहिल्याच रंगीत तालमीला असे झाल्यामुळे आत्यंतिक निराशा झाली पण ती झटकून टाकत तातडीने नवे टायर्स आणि ट्युब टाकून घेतले. नवे टायर्स हे आधीच्यापेक्षा स्लीक होते त्यामुळे सायकल पळवायला मज्जा येत होती. पण कुठले घ्यावेत, किती जाडीचे, इ.इ. चिकित्सा करत बसल्याने प्रॅक्टीसचे महत्वाचे दिवस बुडले.
आणि फारशी तयारी न करताच अंतिम रंगीत तालमीला निघालो. २५-२६-२७ जानेवारीला ठरलेली ही राईड होती पुणे कराड बेळगाव आणि वळून कोल्हापूर आणि तिथून टेंपोने पुणे. मूळ मोहीमेतले दोन टप्पे या राईडमध्ये पार पडत असल्याने याला खासच महत्व होते.
पण दरम्यानच्या काळात मला गुढग्याने दगा द्यायला सुरुवात केली होती. आळंदी राईडच्या वेळीच थोडा दुखावला होता पण फारसे लक्ष दिले नव्हते आणि विशेषता चढावर दुखायचा म्हणून तेवढ्यापुरती निकॅप लाऊन चालवायचो. पण त्याकडे एकदा गांभिर्याने बघण्याची गरज होती. ही राईड झाली की बघू असे समजाऊन मी तयारीला लागलो.
निकॅप घालण्यावरून आठवले. या राईडदरम्यान खंबाटकी पुन्हा एकदा पार करावा लागणार होता आणि त्यापूर्वी निकॅप आवश्यक होती. आणि उन्हाच्या आत घाट पार करावा या घाईत होतो. सकाळी थंडीसाठी घातलेले गरम कपडे पण आता नकोसे वाटत होते. घाटाच्या अलिकडेच एक मस्त डेरेदार झाड होते तिथे थांबलो. त्याच सावलीत दोन ट्रॅफिकमामा गिर्हाईक पकडत होते. मी गेल्यागेल्या जॅकेट काढले, स्वेटशर्ट काढला, कानपट्टी काढली आणि नीकॅप घालायची म्हणून ट्रॅकपँटपण काढत होतो तेवढ्यात मामांकडे लक्ष गेले.
ते इतक्या अचंब्याने माझ्याकडे बघत होते. सकाळी सकाळी एक सायकलवाला येऊन थांबतो काय आणि आग लागल्यासारखा भराभर सगळे कपडे काय काढायला लागतो याची काय टोटलच त्यांना लागत नव्हती. त्यांचे तेव्हाचे चेहरे आठवून मला अजूनही हसायला येते आहे.
पुणे कराड हे अंतर सगळे वजन घेऊन पार करणे ही एक टास्कच होती पण एकमेकांच्या मदतीने पार करत पहाटे निघालेलो ते संघ्याकाळी अंधार पडता पडता कराड गाठते झालो.
त्यात माझा मूर्खपणा असा की आदले दिवशीच जीममध्ये घाम गाळून कार्डीयो सेशन केले होते. त्याचा फटीग चांगलाच भोवला. दरम्यान, २५-२६ ची सुट्टी आणि लग्नाचा मौसम असल्याने आख्ख्या कराडमध्ये एक चांगले हॉेटेल मिळेना आणि कसेबसे एका गलिच्छ लॉजमध्ये अंग टाकले. दुसरे दिवशी करा़ड ते बेळगाव असा १७५ किमी टप्पा पार करायचा होता. करा़डला येतानाच चांगली दमणूक झाली होती आणि आता पुन्हा १७५किमी अंतर पार करण्याच्या कल्पनेने कसेतरी होत होते पण नाईलाज होता.
पण पहाटे भल्या अंधारात निघालोही. कोल्हापूर गाठले आणि नंतर माझा गुढगा दुखायला सुरुवात झाली. पुरेश्या तयारीविना एवढे अंतर (पुणे कराड) त्याला मानवले नाही बहुदा आणि कोल्हापूरनंतर त्याने निषेधाचा सुर लावायला सुरुवात केली. नीकॅप लाऊनपण एकेना आणि मला एक एक पॅ़डल मारणे हे भयानक त्रासदायक व्हायला लागले. स्पी़डपण चांगलाच मंदावला होता आणि बाकीचे बरेच पुढे निघून गेले होते.
शेव़़टी अगदीच असह्य झाले तेव्हा मग थांबून त्यांना फोन केला तर त्यांनी निप्पाणी गाठले होते आणि माझी वाट बघत थांबले होते. मी मग धीराने पुढे जायला सुरुवात केली. कसेबसे तेवढे अंतर पार करून मी त्यांना गाठले.
त्यांचीही अवस्था फार चांगली नव्हतीच. उन्हाच्या त़डाख्याने सगळेच हैराण झाले होते. मी तर अगदीच कामातून गेलो होतो आणि बेळगावसाठी अजून ७०किमी गाठणे मा्झ्याच्याने शक्यच नव्हते. त्यामुळे सर्वानुमते बेळगाव रद्द करण्यात आले निप्पाणीला मुक्काम करून इथून दुसरेदिवशी कोल्हापूर गाठण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला.
पुण्याला पोहोचताक्षणी डॉक्टर गाठला आणि त्याने गुढगा दुखत असानाही एवढी सायकल चालवल्याबद्दल कानउघडणी केली. सुदैवाने गंभीर दुखापत अशी काही नव्हती आणि त्यानी काही आर्युवैदिक तेले दऊन आठवडाभर मसाज करायला सांगितले. आणि हो सायकल, जीम सगळे बंद करून पूर्ण आराम सुद्धा.
एक आठवडा सायकल टायर्स बदलण्यात, एक गु़ढग्यासाठी आणि इतक्यानेच भागले नाही म्हणून काय की मला त्यापाठोपाठ दाढदुखीने ग्रासले. असह्य दाढदुखी, त्यानंतर रूट कॅनालचा अयशस्वी प्रयत्न आणि त्यापाठोपाठ दाढ उपटून काढणे या सगळ्यात मी लिक्वीड डायटवरच होतो आणि बर्यापैकी अशक्तपणा आला होता.
आता आपली मोहीम बारगाळणार या विचाराने अपार खिन्नता आली होती. इतके की रडायच्या बेतात आलो होतो. शेवटी घरच्यांनी जरा मोटीव्हेशनल टॉक देऊन मनाला उभारी आणण्याचा प्रयत्न केला पण मला जाणवत होते की पुरेसा सराव न करता १५००-१६०० किमी अंतर सायकलनी जाण्याचा प्रयत्न करणे हा केवळ मूर्खपणा आहे.
त्यातच बाकीच्या मंडळींनी एकाच दिवसात पुणे - महाबळेश्वर - पुणे अशी २०० किमी ची राईड केल्यामुळे मला तर भयानकच कॉम्प्लेक्स आला. ही जर कन्याकुमारी सोडून अन्य कुठली असती तर त्याच वेळी खात्रीने मी माघार घेतली असती. पण मला कुठल्याही परिस्थितीत ही संधी सोडायची नव्हती आणि २०-२२ किमीच्या छोट्या राईड करायला सुरुवात केली. गुढग्याला सोसेल असे हलके पण मांडीला आणि पिंढऱ्याना व्यायाम होईल असे व्यायामप्रकार केले. मग धीर चेपला आणि पुणे - लोणावळा -पुणे असे १४०किमी अंतर पार केले. गुढगा शाबूत होता आणि फारसा दुखलाही नाही.
पुन्हा एकदा मनाने उभारी घेतली आणि जोमाने प्रॅक्टीस सुरु केली. दरम्यान, कराड बेळगाव अंतर गाठणे फारच त्रासदायक ठरणार होते याची खात्री पटल्याने मूळ प्लॅनमध्ये बदल करण्यात आला आणि दुसरा मुक्काम निप्पाणीलाच करण्याचे ठरले. पण त्यामुळे तिसरे दिवशीचे अंतर बरेच वाढले आणि त्याचा चांगलाच फटका बसला. असो, त्याचे वृत्त येईलच पुढे.
आता थो़डक्यात आमच्या गँगविषयी माहीती देतो.
१. उपेंद्र शेवडे उर्फ अध्यक्ष उर्फ मामा - मामांचे व्यक्तिमत्व धीरगंभीर आणि नवखा माणूस एकदम बिचकून जाईल अशी भेदक नजर. पहिल्या एकदोन भेटीतच ते आणि बहुतांश सगळेच कट्टर शाकाहारी आहेत आणि बर्यापैकी देवाचे करतात अशी माहीती कळाली आणि धास्तावलो. एकतर केरळात जाऊन मासे खायचे नाहीत म्हणजे काय. त्यातून मी कट्टर नास्तिक नसलो तर सहसा माझे आणि देवभोळ्या लोकांचे जमत नाही. त्यामुळे कसे काय आपले या लोकांबरोबर जमायचे अशी चिंता मला लागून राहीली होती. पण मामा दिसतात त्यापेक्षा खूपच प्रेमळ आहेत अशी प्रचिती लवकरच आली. माझा वाह्यातपणा, टिंगल टवाळी त्यांची चालवून घेतलीच पण मला गुढग्याचा त्रास झाल्यानंतरही घरच्यांईतकीच काळजीने चौकशी करणारेही तेच.
मामांनी गेल्यावर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती आणि त्याचा दांडगा अनुभव पाठीशी असल्यामुळे त्यांचा अंतिम शब्द होता.
२. वेदांग शेवडे उर्फ गट्टू - मामांचा मुलगा आणि हादेखील नर्मदा परिक्रमा मोहीमेत होता. त्याच्याकडे बघीतल्यानंतर कुणालाही वाटणार नाही की तो इतकी सायकल चालवतो ते. पण सुसाट सायकल चालवण्यात कुणीही त्याची बरोबरी करू शकणार नाही. त्याचे आणि माझे देव-देव, धार्मिक व्रत वैकल्ये आदी विषयांवर अनेकदा घनघोर चर्चा झाली.
३. ओंकार ब्रम्हे उर्फ बाबुभाई - मामांचा खराखुरा भाचा. याच्यामुळेच मी या मोहीमेत सहभागी झालो. एक अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व. आम्ही दोघांनी मिळून जी काय धमाल केली त्याला तोड नाही. विशेषता टायमिंगनी जोक्स टाकणे किंवा अशी काहीतरी कॉमेंट करणे की फुर्कन चहा कॉफी सांडलीच पाहीजे. प्रॅक्टीसला दांड्या मारण्यात हातखंडा असला तरी रोजच्या रोज दीड तास बँडमिंटन खेळत असल्याने फिटनेस कमालीचा होता. हादेखील वेदांगच्या जोडीने सुसाट जायचा.
४. अद्वैत जोशी उर्फ लान्स - हा माणूस जन्मपासून सायकल चालवत असावा इतक्या सहजतेने सायकल हाणायचा. विशेषता त्याचा सायकलचा स्टान्स आणि चालवण्याची पद्धत ही अगदी प्रोफेशनल सायकलपटूंसारखी होती. त्याचे सायकल चालवणे बघूनच त्याला लान्स पदवी बहाल करण्यात आली. थोडेसे धीरगंभीर व्यक्तिमत्व पण त्याची कितीही चेष्टा केली तरी खिलाडूपणे घेण्याची वृत्ती. सुसाट ग्रुपमध्ये प्रमुख भूमिका.
५. आनंद घाटपांडे उर्फ काका - यांनीही मामांबरोबर नर्मदा परिक्रमा केली होती. हे आमचे टेक्निकल एक्पर्ट होते. सायकलला कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे, घाटपांडे काका ते दुरुस्त करणारच. विशेषत पंक्चर काढणे यात तर त्यांचा चांगलाच हातखंडा होता. दुर्दैवाने त्यांच्या सायकलनेच त्यांना सर्वाधिक हैराण केले. पण त्याचा कसलाही परिणाम न होऊ देता त्यांनी मोहीम पूर्ण केलीच. कहर म्हणजे मुक्कामाच्या जागी पोचल्यावर आम्ही थकून पडलेलो असताना आमच्यापेक्षा वयाने कितीतरी जास्त असलेले काका बाकीच्या तयारीला लागायचे. प्रत्येक सदस्याची काळजी घेऊन काय हवे नको ते बघण्याची जबाबदारी त्यांनी स्वखुशीने घेतली होती.
६. सुहुद घाटपांडे उर्फ वात - काकांचा मुलगा. सर्वात लहान सदस्य. लान्सच्या खालोखाल याची सर्वात जास्त चेष्टा आम्ही केली पण त्यानेही ती एन्जॉय केली. चढावर सायकल चालवताना एकदम फॉर्मात असायचा. चढ आला रे आला की अंगात आल्यासरखे दणादणा पॅडल मारत तो जे काही सुटायचा की पार दिसेनासा व्हायचा. त्याच्या या सवयीमुळे त्याला वात हे टोपणनाव बहाल करण्यात आले होते. वात कशी सरसरत जाते आणि नंतर थंड होते तसे काहीसे करायचा म्हणून. पण याचाही फिटनेस दांडगा होता.
७. नंदू आपटे - एक अतिशय उत्साही व्यक्तिमत्व. याचांही फिटनेस कमालीचा होता. आणि कसोशीने प्रॅक्टीस करण्यात सगळ्यात पुढे. एकदा मुंबईचे पाहुणे आले होते त्यांना सिंहगड दाखवायला घेऊन चाललो होतो. अर्थातच त्यांच्या गाडीने. वाटेत घाटात नंदू काका एकटेच सायकल मारताना दिसले. मी त्यांना म्हणले एकटेच का हो. तर म्हणे आत्ता वेळ होता म्हणून आलो. मी केवळ दंडवतच घालायचे बाकी ठेवले होते त्यांना.
८. उमेश पवार उर्फ युडी - हे, घाटपांडे, आपटे आणि शेवडे एकाच वयोगटातील. पण स्लो बट स्टेडी म्हण यांना जेवढी लागू पडते तेवढी कुणालाही नाही. प्रॅक्टीस राईडमध्ये त्यांचा वेग पाहून मला चिंता वाटत होती की हे मोहीम पूर्ण करू शकतील का नाही. याचे कारण त्यांच्यात आणि आमच्यात तब्बल तास दोन तासाचे अंतर पडायचे. पण कितीही मागे पडले तर न कंटाळता, न जिद्द सोडता ते सायकल मारतच रहायचे. कहर म्हणजे त्यांना चढावर श्वास घेताना त्रास व्हायचा तेव्हा तेवढे अंतर चालत पार करत पु्न्हा ते चालू पडायचे. एवढे करून चेष्टा विनोद मस्करीमध्य सामील असायचेच.
डावीकडून - उपेंद्र मामा, वेदांग, लान्स, आशुचँप, ओंकार, नंदू आपटे, युडी, घाटपांडे काका आणि सुह्द
मस्त लिहितो आहेस. तुझ्या
मस्त लिहितो आहेस. तुझ्या वडिलांचा तेव्हाचा आणि तुझा आजचा फोटो हे खास आकर्षण आहे. पुस्तक लिहिलेस तर हा फोटो मुखपृष्ठावर टाक!!
वा! मस्त लिहिलंय! टण्या+१
वा! मस्त लिहिलंय!
टण्या+१
भारी लिहीलंय. तुझ्या वडिलांचा
भारी लिहीलंय.
तुझ्या वडिलांचा आणि तुझा फोटो मस्तच.
एकच अफाट स्वप्नं तुम्ही दोघांनीही वेगवेगळ्या काळात साकार केलंत हे ही आश्चर्यच.
अभिनंदन.आणि तुमच्या वडिलांना सा. न.
काय भारी! फार छान..पहिला फोटो
काय भारी! फार छान..पहिला फोटो मस्त आहे! पुभाप्र
सुरुवात तर झाली लेखमालेला.
सुरुवात तर झाली लेखमालेला. आता पुढे कशी जाते आहे ते बघायचे..
अरे तू कस्ला सेम टू सेम
अरे तू कस्ला सेम टू सेम तुझ्या बाबांसारखा दिसतो आहेस... बाबा ग्रेट तुझे... त्यांना नमस्कार कळव माझा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिलय. अगदी डोळ्यासमोर
छान लिहिलय. अगदी डोळ्यासमोर उभे रहाते.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अन तुला गृपही छानच मिळाला रे... एकदा भेटले पाहिजे - प्रत्यक्ष बघितले पाहिजे या वल्लींना
>>>> तरीपण त्यांनी एकदा मला
>>>> तरीपण त्यांनी एकदा मला विचारलेच की अरे मी जायच्या आधी सराव म्हणून रोज दीडशे जोर आणि अडीचशे बैठका मारायचो. तु काहीच व्यायाम करताना दिसत नाहीस...
आता काय बोलणार यावर..... <<<<
हे लई भारी.....
मी अजुनही हुक्की आली की जोरबैठका मारतो बर का.... फार उत्कृष्ट सर्वांगसुंदर करणारा व्यायाम !
वाह!!! वाट बघतोय ते लेखन
वाह!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाट बघतोय ते लेखन सुरवात झाली.
तुझ्या वडलांचा फोटो खास आहे अगदी.
खूप छान लिखाण. पिताजी अगदी
खूप छान लिखाण.
पिताजी अगदी मुलासारखे दिसतात. :स्मितः
__/\__ सगळ्यांनाच.. तुमच्या
__/\__ सगळ्यांनाच.. तुमच्या वडिलांना साष्टांग नमस्कार...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
चॅम्पा, सादर प्रणाम सुरुवात
चॅम्पा, सादर प्रणाम
सुरुवात झकास
तपशील्वार लेखनाच्या प्रतिक्षेत
मस्त सुरुवात.. चवालिस साल
मस्त सुरुवात.. चवालिस साल पहले, चवालिस साल बाद, भारीच एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच रे चँप.
मस्तच रे चँप.
तरीपण त्यांनी एकदा मला
तरीपण त्यांनी एकदा मला विचारलेच की अरे मी जायच्या आधी सराव म्हणून रोज दीडशे जोर आणि अडीचशे बैठका मारायचो. तु काहीच व्यायाम करताना दिसत नाहीस... >>
तुझे गुडघादुखीचे कारण कदाचित सीटची उंची आणि पेडलचा अँगल असावा असे वाटते.
>>> तुझे गुडघादुखीचे कारण
>>> तुझे गुडघादुखीचे कारण कदाचित सीटची उंची आणि पेडलचा अँगल असावा असे वाटते. <<<<
येस्स... फोटोत बघितल्यावर सीटची उंची खूपच कमी वाटते, त्यामुळे पाय गुढग्यातुन पुरेसा ताठ होत नसणार अन जोर देताना गुढग्यावर विनाकारण जास्तीचा ताण येत असणार शिवाय शरिराच्या वजनाचा पुरेपुर वापर होत नसणार.
अन एक बघितलेस का? या सगळ्यांच्या सायकली सरळ हॅन्डलच्या आहेत. खाली वाकवलेली नाहित. चढावर सरळ मुठीने जोर कसा घेता येणार? मग एकवेळ आपल्या जुन्या सायकलिंची हँडलची पकड परवडते (असे माझे मत).
ग्रुपमधील सर्वांचे अभिनंदन
ग्रुपमधील सर्वांचे अभिनंदन ,छान लिहीले आहे.
"तेंव्हा आणि आता फोटोसह " खूपच आवडले
नाही सीटची उंची व्यवस्थित
नाही सीटची उंची व्यवस्थित आहे. दोन तीन जणांकडून तपासून घेतली आहे. पाय व्यवस्थित गुढग्यातून ताठ होतो पॅडल मारताना. मला हा त्रास सायकलिंगमुळे नाही होत याची खात्री आहे. भटकंतीदरम्यानही अधून मधून मला त्रास होतो.
सध्या तरी लोअर गियर्सवर टाकून सायकल चालवणे सुरु आहे. पण याचा कायमस्वरुपी बिमोड करावा लागणार आहे. अन्यथा अजून एखादी लांब पल्ल्याची मोहीम करणे अवघड होऊन जाईल.
सरळ हँडल असले तरी जवळपास सगळ्यांनी हँडलला छोटी शिंगे लावलेली होती. चढावर त्याचाच आधार व्हायचा.
बाकी,
मी अजुनही हुक्की आली की जोरबैठका मारतो बर का.... फार उत्कृष्ट सर्वांगसुंदर करणारा व्यायाम !
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याबाबतीत अगदी सहमत. पण मी काय फार श्रम घेतले नाहीत.
सर्वांना खूप धन्यवाद....
मस्त सुरुवात! तुझ्या बाबांचा
मस्त सुरुवात!
तुझ्या बाबांचा नि तुझा फोटो अगदी भारीयं हं..
अन तुला गृपही छानच मिळाला
अन तुला गृपही छानच मिळाला रे... एकदा भेटले पाहिजे - प्रत्यक्ष बघितले पाहिजे या वल्लींना
नक्की या...आम्हालाही आवडेलच भेटायला
ओके, मग तू एक काम कर,
ओके, मग तू एक काम कर, महानारायण तेल बैद्यनाथचे आण, अन रोज रात्री झोपायच्या आधी त्याने गुढग्याला मागुनपुढुन मालिश कर. जमल्यास पोटरी व मांडीलाही लाव. अतिशय उपयोगी आहे ते. तुझा गुढगेदुखीचा त्रास जाईल.
लहानपणि कधी मार बसला होता का गुढग्याला? बावीस एक वर्षांपूर्वी मला जबरदस्त लागलेले आहे गुढग्याला, त्यामुळे आजही मी गड चढू शकतो, पण उतरू नै शकत, सक्तिने काठी घ्यावीच लागते व एकेक पाउल हळूहळू उतरावे लागते.
मस्तच रे!! आणि तुला शि सा न
मस्तच रे!! आणि तुला शि सा न _____/\_____
मस्त वर्णन..!! जर्सीचे रंग
मस्त वर्णन..!!
जर्सीचे रंग वेगवेगळे का होते..? कांही खास कारण..?
बैद्यनाथचे नाही पण आमच्या
बैद्यनाथचे नाही पण आमच्या डॉक्टरनी मला सहोदर, विषधर आणि अजून असेच काहीतरी नावाचे अजून एक अशी तीन तेले दिली आहेत. ती समप्रमाणात मिश्रण करून लावायला सांगितली होती. त्यानी बराच आराम मिळाला. पण आता राईडवरून आल्यानंतर बंद केले आहे.
दुखत नसेल तरी लावायची का ती तेले??
मनोज - मुद्दाम दोन वेगळ्या रंगाच्या जर्सी घेतल्या होत्या. आणि पहिला आणि शेव़टचा दिवस सोडून बाकी ज्याला जी वाटेल तो ती जर्सी घालत होता. त्यात विशेष असे काही कारण नव्हते.
छान सुरवात! फोटो आणि माहीती
छान सुरवात!
फोटो आणि माहीती आवडली.
मस्त सुरुवात. अभिनंदन!
मस्त सुरुवात. अभिनंदन!
मस्त सुरूवात आशु ! तुम्ही
मस्त सुरूवात आशु !
तुम्ही सगळे आता मनाली - लेह राईडला जा.
ग्रेट.. सगळ्यांनाच दंडवत..
ग्रेट.. सगळ्यांनाच दंडवत..
मस्त लेखमाला. पुढचे भाग पटापट
मस्त लेखमाला. पुढचे भाग पटापट टाका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारी!
भारी!
Pages