मी भारत सोडला आणि सर्वप्रथम एक वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये राहिले. त्यानंतर स्कॉटलंडला आले आणि येथलीच झाले. ह्या दोन्ही देशांत विद्यापीठांमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून काम केले आणि मोठा अलिबाबाचा खजिना असल्यासारखे संशोधनाचे विश्व माझ्यापुढे खुले झाले. आयुष्यात करण्यासारखे आणि शिकण्यासारखे कितीतरी आहे हे कळले. आपले ज्ञान किती खुजे आहे आणि नवीन ज्ञान मिळविण्यात आणि संशोधन करण्यामध्ये कितीतरी आत्मिक आनंद आहे हे जाणवले . हा आत्मिक आनंद अधिकाधिक मिळविता यावा म्हणून संशोधनात पदवी (डॉक्टरेट) घेण्याचे ठरविले. शिष्यवृत्तीसकट मला पीएच. डी. ला प्रवेश मिळाला आणि माझा एक सुंदर प्रवास सुरु झाला. पीएच. डी.च्या पाच वर्षाच्या प्रवासात मी अनेक गोष्टी शिकले. पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स हा त्यातीलच एक भाग. आपले संशोधन सामान्य नागरिकांस समजावून सांगणे आणि आपल्या संशोधनामुळे त्यांच्या आयुष्यात कसा फरक पडणार आहे हे सोप्या भाषेत त्यांना विशद करून सांगणे म्हणजेच पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स.
ब्रिटनमध्ये पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स अतिशय महत्वाचे आणि अतिशय लोकप्रियसुद्धा आहे. ब्रिटीश सरकार संशोधनावर लाखो पौंड खर्च करीत असते. हा पैसा करदात्यांमुळे उभा राहतो. आपला पैसा संशोधक कसा वापरतात हे जाणून घेण्याचा करदात्यांना अधिकार असतो. संशोधकांना आपल्या जबाबदारीची जाणीव राहावी म्हणून, त्याचप्रमाणे संशोधकांशी संवाद साधल्याने सामान्य नागरिकांस उच्चशिक्षणाचे आणि संशोधनाचे महत्व कळेल ह्या विचारातून पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्सची संकल्पना पुढे आली. सामान्य नागरिकांशी संवाद साधल्यामुळे आपले संशोधन, संशोधनाच्या पद्धती शास्त्रज्ञांना तपासून घेता येतात. सामान्य नागरिकांना काय हवे आहे ते कळते आणि त्याप्रमाणे आपल्या संशोधनाची दिशा ठरविता येते. परंतु ह्या प्रक्रियेमध्ये केवळ शास्त्रज्ञांनाच फायदा होत नाही. तर सामान्य जनतेमध्ये विज्ञानाविषयी आवड आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी असे उपक्रम खूप उपयुक्त ठरतात.
पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स हा ब्रिटीश संस्कृतीचा एक भागच आहे असे म्हटले तरीही अजिबात गैर ठरणार नाही. दर वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ब्रिटनमधील कोणत्या तरी एका शहरात साजरा होणारा ब्रिटीश सायन्स फेस्टिव्हल हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. ब्रिटनमध्ये साजरा केला जाणारा असाच आणखी एक उत्सव म्हणजे नॅशनल सायन्स अँड इंजिनीयरिंग वीक. हा विज्ञानोत्सव सर्व शहरांमध्ये मार्च महिन्यात साजरा केला जातो. विज्ञानप्रेमींसाठी खूप मोठी पर्वणी असणारे हे उपक्रम ब्रिटीश सायन्स असोसिएशन तर्फे राबविले जातात. आठवडाभर चालणाऱ्या ह्या विज्ञानोत्सवांचे कार्यक्रम अतिशय भरगच्च, माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि रंजक असतात. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित हे विषय घेऊन विविध भाषणे, प्रदर्शने, कार्यशाळा ह्यांचे आयोजन ह्या विज्ञानोत्सवांत केले जाते. स्थानिक विद्यापीठे आणि शाळा ह्या आयोजनात उत्साहाने भाग घेतात. स्थानिक सरकार, तसेच अनेक उत्साही स्वयंसेवक ह्या विज्ञानोत्सवांस भरभक्कम पाठींबा देतात. भरगच्च अशा ह्या उत्सवांमध्ये सर्व वयोगटांच्या लोकांसाठी काही ना काहीतरी कार्यक्रम असतात. माहिती, मनोरंजन, वादविवाद आणि नवीन संशोधन असे विषय घेऊन विज्ञानप्रेमींना आकर्षित केले जाते. ह्यातील बहुतांशी कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असतो. असेच अनेक स्थानिक विज्ञानोत्सव ब्रिटनमध्ये विविध ठिकाणी, विविध वेळेला साजरे होत असतात. त्यामुळे विविध शहरातील विद्यापीठे आणि वैज्ञानिक संस्थांना ह्या उपक्रमांत भाग घेण्याची संधी मिळते.
ब्रिटनमधील जनतासुद्धा अत्यंत उत्साहाने हे विज्ञानोत्सव साजरे करते. मला तर कित्येक असे उत्साही लोक भेटलेले आहेत कि जे दर वर्षी वेळात वेळ काढून, सुट्ट्या घेऊन ह्या उत्सवांत सहभागी होतातच. अशा काही विज्ञानोत्सवांस हजेरी लावण्याची संधी मला मिळाली. ह्या दोन्ही विज्ञानोत्सवांत मी विविध विषयावरील भाषणांना, प्रदर्शनांना आणि कार्यशाळांना उपस्थिती लावली. एका विज्ञानोत्सवात मला स्वयंसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. उत्सवासाठी येणाऱ्या लोकांना मदत करणे, विविध कार्यक्रमांचे संयोजन करण्यास मदत करणे अशा पद्धतीची कामे मला करता आली. ह्या विज्ञानोत्सवांमुळे शिकण्यासारखे आणि जाणून घेण्यासारखे कितीतरी ज्ञान ह्या जगात आहे ह्याची मला जाणीव झाली. त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर आपण लोककल्याणासाठी कसा करू शकतो ह्याची एक छोटीशी झलक मला मिळाली. सर्व संशोधक अगदी उत्साहाने अशा विज्ञानोत्सवांत भाग घेऊन त्यांच्या संशोधनाची झलक आपल्याला द्यायला उत्सुक असतात. विज्ञानोत्सवांत भाग घेऊन मीसुद्धा माझे संशोधन देखील जनतेपुढे मांडले आहे. आपल्या संशोधनास मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पहिला की संशोधकांचा हुरूप दुणावतो असा माझा अनुभव आहे.
दोन तीन वर्षापूर्वी अशाच एक स्थानिक विज्ञानोत्सवांत मी आमच्या लॅबमधील काही लोकांबरोबर भाग घेतला होता. आम्ही आमच्यातच एक स्पर्धा आयोजित केली होती. सगळ्यांनी छोट्या छोट्या गटांमध्ये आपले संशोधनाचे केवळ नव्वद सेकंदात वर्णन करायचे. त्यानंतर प्रेक्षकांकडून मतदान घेऊन ज्याचे वर्णन सर्वात अधिक रंजक असेल त्याला पंधरावीस मिनिटे आपल्या संशोधनाबद्दल माहिती देण्यास वेळ दिला जाणार होता. ही स्पर्धा आम्ही एकदा एका शाळेत, एकदा आमच्या विद्यापीठात आणि एकदा तर चक्क एका स्थानिक पबमध्ये आयोजित केली होती. सर्व ठिकाणी अतिशय एकाग्रतेने आमचे म्हणणे ऐकले गेले आम्हाला निरनिराळे प्रश्न विचारले गेले. खूपच समृद्ध करणारा हा अनुभव होता. आपले काम अगदी साध्यासोप्या भाषेत पण रंजक पद्धतीने केवळ नव्वद सेकंदात सांगणे फारच कठीण होते. त्या नव्वद सेकंदासाठी आम्हाला एका आठवड्याची मेहनत घ्यावी लागली होती. हा झाला एक अनुभव पण अशा अनेक कार्यशाळा, सर्वेक्षण, सेमिनार, पोस्टर प्रदर्शने ह्यातून भाग घेतल्यामुळे आमच्या संशोधनाचे विविध पैलू आम्हालाच नव्याने कळत गेले. त्याचप्रमाणे आपल्या श्रोत्यांचा वयोगट आणि अनुभव बघून सार्वजनिकरित्या आपल्या अभ्यासाबद्दल बोलायला आम्ही शिकलो.
शास्त्रज्ञ आणि सामान्य जनता ह्यांना एकत्र आणणाऱ्या, त्यांच्यात संवाद निर्माण करणारऱ्या आणि दोन्ही बाजूंना अतिशय समृद्ध करणाऱ्या पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्सची संकल्पना इतर कोणत्या देशात अस्तित्वात आहे की नाही ह्याची माहिती मला नाही. परंतु भारतात जर अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात नसेल तर ते निश्चित करायला हवे असे वाटते. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये विज्ञानाविषयी आवड आणि जागरूकता निर्माण होईल. आपण आजवर जे काही सार्वजनिक उत्सव साजरे करत आलो आहोत त्या व्यासपीठांचासुद्धा वापर विज्ञानोत्सव घडविण्यासाठी झाला तर खूप चांगला पायंडा पडायला मदत होईल. शाळांमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन केले तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, गणित विषयांमधील संशोधनात स्वारस्य निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्याचप्रमाणे उच्चशिक्षण आणि संशोधनाचे महत्व त्यांना लहानपणापासूनच कळेल. अनेक विद्यार्थी नुसत्या पदव्या घेऊन थांबणार नाहीत तर उच्चाशिक्षणाचे ध्येयसुद्धा ठेवतील. असे चांगले उपक्रम आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये अंतर्भूत केल्यास विद्यार्थ्यांसाठी ते निश्चितच फायदेशीर ठरतील.
=====
लोकसत्ता रविवार पुरवणीमध्ये पूर्वप्रकाशित (लोकरंग ८ मार्च २०१५).
http://www.loksatta.com/lokrang-news/public-engagement-with-science-1078...
अतिशय उत्तम विचार आहे
अतिशय उत्तम विचार आहे सुमुक्ता.
मस्त लेख आहे ! ब्रिटीश
मस्त लेख आहे !
ब्रिटीश सायन्स फेस्टिव्हल बद्दल आधी ऐकलं नव्हतं. ९० सेकंदांची स्पर्धा मस्त आहे!
तुमच्या पीएच. डी. बद्दल अजून माहिती ह्या ग्रुपमध्ये लिहा.
मस्त लेख, लोकसत्तातही वाचला
मस्त लेख, लोकसत्तातही वाचला होता.
९० सेकंदाची स्पर्धा ही कल्पना फारच छान आहे. विल ट्राय विथ माय स्टूडंट्स.
विज्ञानाचा लोकप्रसार हा फारच इंटरेस्टींग विषय आहे. तो अत्यंत प्रभावीपणे झाल्याशिवाय विज्ञान हे केवळ आईनस्टाईन टाइप्स सुपरहुशार लोकांचे काम आहे हा गैरसमज दूर होणार नाही.
अतिशय सुंदर लेख! फार
अतिशय सुंदर लेख! फार आवडला.
विज्ञान/शास्त्र जनसामान्यांपर्यंत पोचवायला केले जाणारे प्रयत्न एंगेजिंग आणि इफेक्टिव्ह वाटले.
कृपया पीएचडी, थिसिसबद्दल सविस्तर लिहा.
भारी आहे लेख! विज्ञानाचे
भारी आहे लेख!
विज्ञानाचे आपल्या जीवनातील स्थान काय हे प्रत्येकालाच कळायला हवे.
आपल्या शाळासुद्धा आणि आपले अभ्यासक्रमसुद्धा असे आहेत की विज्ञान म्हणजे एक मार्क्स मिळवण्याची गोष्टं वाटते फक्तं.
त्यामुळे लोकांचा माईंडसेटच बदलत नाही.
एकच गोष्टं विज्ञानजत्रेत केली की प्रयोग, जादूगाराने स्टेजवर केली तर जादू आणि कुठल्या बाबाबुवाने केली तर चमत्कार असे मानणारे अगदी शिक्षक, प्रोफेसरही मला माहित्येयत.
केवळ अप्लाईड सायन्सच नव्हे तर बेसिक सायन्स सुद्धा आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे कळणे महत्वाचे आहे.
नाहीतर आजकाल सायन्स म्हणजे सामान्यांना फक्तं कंप्यूटर, स्पेस सायन्स , इलेक्ट्रॉनिक्स किंवा फार म्हणजे नविन मेडिसीन्स असेच वाटते. रोजच्या जगण्यातले सायन्स किती मनोरंजक आहे हे शिकवणारे सदगुरु प्राथमिक आयुष्यात मिळाले तर खूप चांगलं होईल.
मस्त लेख, सुमुक्ता.!
मस्त लेख, सुमुक्ता.!
मस्त माहितीपूर्ण लेख. आपल्या
मस्त माहितीपूर्ण लेख. आपल्या थिसीस बद्दल वाचायला नक्कीच आवडेल.
सुंदर लिहिलंय. नव्वद
सुंदर लिहिलंय.
नव्वद सेकंदांची स्पर्धा फार आवडली. तुमच्या संशोधनाबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
छान लेख. भारतातही छोट्या
छान लेख. भारतातही छोट्या प्रमाणात का होईना असे प्रयत्न होत असतात. ( जानेवारीच्या साप्ताहिक सकाळ मधे लेख वाचला होता. ) भारतातले संशोधक अजून आपले संशोधन लोकांपर्यंत नेण्यात उत्साह दाखवत नाहीत का ?
डॉ. कमला सोहोनी यांनी स्वतःच अशी कबुली दिली होती. त्यांचे संशोधनही अजून लोकांपर्यंत पोहोचल्याचे दिसत नाही ( गवारगम, नीरा, बीट, गाजर वगैरे भाज्यांचा पाला, तूसासकट दळलेले तांदुळ वगैरे )
खूपच छान लेख. आपल्या इथे असे
खूपच छान लेख. आपल्या इथे असे उपक्रम खूपच कमी होतात..
इंग्लंडमधे सर्व संशोधन
इंग्लंडमधे सर्व संशोधन केंद्रांमधे वर्षातून एकदा ओपन डे असतात. त्या दिवशी त्या केंद्रामधे चालणार्या संशोधनांची माहिती देतात आणि केंद्राची टूर करवितात. आपल्याकडेही आयुका (पुणे) मधे असा ओपन डे असतो.
वा! छान माहितीपूर्ण लेख,
वा! छान माहितीपूर्ण लेख, सुमुक्ता!
विज्ञान/शास्त्र जनसामान्यांपर्यंत पोचवायला केले जाणारे प्रयत्न एंगेजिंग आणि इफेक्टिव्ह वाटले. स्मित >> +१
छान लेख, सुमुक्ता.
छान लेख, सुमुक्ता.
मस्त! छान वाटलं वाचून!
मस्त! छान वाटलं वाचून! तुमच्या संशोधनाविषयी वाचायला आवडेल!
सुमुक्ता खुप मस्त...
सुमुक्ता खुप मस्त...
छान लेख आणि माहिती....
छान लेख आणि माहिती....
मस्त लेख सुमुक्ता! चतुरंग मधे
मस्त लेख सुमुक्ता! चतुरंग मधे वाचला होताच इथेही पब्लिक युनिव्हर्सिटीज मध्ये ओपन डेज असतात.
भारतात २८ फेब्रुवारीला (विज्ञान दिन) एनसीएलचा ओपन डे असतो! मी तो दोन्हीकडून अनुभवला आहे. म्हणजे शाळेत असताना विद्यार्थीनी म्हणून आणि एनसीएलमध्ये काम करत असताना. दोन्ही वेळा खूप मज्जा आली होती!
आपल्याकडे देखिल अशा धर्तीवर भरपूर उपक्रम चालतात. ठाण्यात जिज्ञासा नावाची संस्था उपक्रम चालवते. मराठी विज्ञान परिषदेची प्रदर्शनं/कार्यशाळा असतात. मध्यंतरी मुक्ता०९ (बहुतेक) हिने तिच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याविषयी लिहिले होते ती देखिल विज्ञान कार्यशाळाच होती!
मला वाटतं मोदी सरकारने आल्या आल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी वर्षातून एकदा तरी शाळेत.कॉलेजात जाऊन शिकवावं अशी काहीतरी योजना आणायची घोषणा केली होती. ती प्रत्यक्षात आली तर फार छान होईल!
हो आपल्याकडेही काही
हो आपल्याकडेही काही संस्थांमध्ये ओपन डे असतो . मुंबईत HBCSE ( होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र ), BARC तसंच NCRA , NCL आयुका , शिवाय CSIR च्या बर्याच labs , IISc ह्या सगळ्या संस्था वर्षातून किमान एकदा तरी सगळ्यांसाठी खुल्या असतात आणि तिथे होणार्या संशोधनाची , उपकरणाची माहिती वगरे घेत येते. शक्यतो विज्ञान दिनाच्या आसपास असे उपक्रम होतात . पण तरीही अजूनही भरपूर प्रयत्नांची गरज आहे .
आणि जिज्ञासा म्हणते तसाच दोन्ही बाजूनी अनुभव घेण्यात जास्त मजा असते !
वा.. मस्त माहिती. खुप
वा.. मस्त माहिती. खुप धन्यवाद.
सध्या मायबोलीवर एका कारणास्तव
सध्या मायबोलीवर एका कारणास्तव निर्माण झालेले अतिशय उदासवाणे वातावरण तसेच त्यामुळे मनी खिन्नताही दाटून आली असताना अचानकच वाळवंटी गोड पाण्याचा खळाळता झरा समोर यावा आणि पाठोपाठ मन शरीर तृषार्त होऊन पुन्हा ती प्रसन्नता यावी....असेच जादूमय झाले...सुमुक्ता यांचा हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा तितकाच सुंदर लेख वाचल्यामुळे.
"...ब्रिटनमध्ये पब्लिक एंगेजमेंट विथ सायन्स अतिशय महत्वाचे आणि अतिशय लोकप्रियसुद्धा आहे. ब्रिटीश सरकार संशोधनावर लाखो पौंड खर्च करीत असते..." ~ हे जितके महत्त्वाचे तितकेच कर देणारा सर्वसामान्य ब्रिटिश नागरिक (तो सायन्सचा अभ्यासक नसला तरीही...) अशा संशोधनाची अगदी हक्काने माहिती घेत असतो आणि संबंधित संस्था ती माहिती अग्रक्रमाने त्याना पुरवित असतात. विविध मॅगेझिन्स आणि सेमिनार्स यांच्याद्वारे पब्लिक एंगेजमेन्ट विथ सायन्स प्रकाशित करत असतातच....
मला वाटते पब्लिक एंगेजमेन्ट विथ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी अशा नावानेसुद्धा काही प्रकल्प अमेरिका आणि युरोपमध्ये चालू असतात. "नासा" यात "फॅमिली सायन्स डेज" या प्रकल्पाद्वारे अग्रक्रमाने विद्यार्थीवर्ग आणि शिक्षक याना प्रोत्साहन देत आहे. सुमुक्ता आपली पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी पाच वर्षे या क्षेत्रात अगदी अभ्यासू वृत्तीने तसेच आनंदाने राहिल्या आहेत हे त्यांच्या लेखातील भाषेवरून समजून येते. त्याना आलेल्या अनुभवाचा लाभ त्यानी येथील विद्यार्थ्यांसाठीही करून द्यावा असे आग्रहाने म्हणावे वाटते. पब्लिक एंगेजमेन्ट विथ सायन्स ही कल्पना खूप रम्य आहे.
छान माहितीपूर्ण लेख!
छान माहितीपूर्ण लेख!
सर्व प्रतिसादांबद्दल
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!
भारतातले संशोधक अजून आपले संशोधन लोकांपर्यंत नेण्यात उत्साह दाखवत नाहीत का ? >> निदान मला तरी तसे वाटत नाही. संशोधनाचे मह्त्व अजून भारतात नीटसे कळलेलेच नाही मला कधीकधी वाटते. त्यामुळे संशोधकांनी उत्साह दाखविला तरी जनतेला किती उत्साह वाटतो ही शंका आहे.
विज्ञानाचा लोकप्रसार हा फारच इंटरेस्टींग विषय आहे. तो अत्यंत प्रभावीपणे झाल्याशिवाय विज्ञान हे केवळ आईनस्टाईन टाइप्स सुपरहुशार लोकांचे काम आहे हा गैरसमज दूर होणार नाही. >> "विज्ञानाचा लोकप्रसार" -- पब्लिक एंगेजमेंटसाठी मराठी शब्द सुचविल्याबद्दल धन्यवाद!! आणि विज्ञानाचा लोकप्रसार खरोखरच प्रभावीपणे व्हायला हवा त्याशिवाय विज्ञान किती रंजक आहे ते कळणार नाही.
नाहीतर आजकाल सायन्स म्हणजे सामान्यांना फक्तं कंप्यूटर, स्पेस सायन्स , इलेक्ट्रॉनिक्स किंवा फार म्हणजे नविन मेडिसीन्स असेच वाटते. रोजच्या जगण्यातले सायन्स किती मनोरंजक आहे हे शिकवणारे सदगुरु प्राथमिक आयुष्यात मिळाले तर खूप चांगलं होईल. >>> खरेच. रोजच्या जगण्याले सायन्स किती मनोरंजक आहे हे कळल्याशिवाय विज्ञानाची गोडी लागणार नाही.
जिज्ञासा तुम्ही सांगता त्या उपक्रमांची माहिती मला नव्हती. कदाचित अजून खूप प्रयत्न आणि स्पष्ट बोलायचे झाले तर जाहिरातीची गरज आहे.
मला वाटतं मोदी सरकारने आल्या आल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी वर्षातून एकदा तरी शाळेत.कॉलेजात जाऊन शिकवावं अशी काहीतरी योजना आणायची घोषणा केली होती. ती प्रत्यक्षात आली तर फार छान होईल! >>> खरेच ही योजना सरकारने लवकरात लवकर प्रत्यक्षात आणायला हवी.
आणि जिज्ञासा म्हणते तसाच दोन्ही बाजूनी अनुभव घेण्यात जास्त मजा असते ! >> +१
सध्या मायबोलीवर एका कारणास्तव निर्माण झालेले अतिशय उदासवाणे वातावरण तसेच त्यामुळे मनी खिन्नताही दाटून आली असताना अचानकच वाळवंटी गोड पाण्याचा खळाळता झरा समोर यावा आणि पाठोपाठ मन शरीर तृषार्त होऊन पुन्हा ती प्रसन्नता यावी....असेच जादूमय झाले...सुमुक्ता यांचा हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा तितकाच सुंदर लेख वाचल्यामुळे. >> धन्यवाद अशोकजी
हे जितके महत्त्वाचे तितकेच कर देणारा सर्वसामान्य ब्रिटिश नागरिक (तो सायन्सचा अभ्यासक नसला तरीही...) अशा संशोधनाची अगदी हक्काने माहिती घेत असतो आणि संबंधित संस्था ती माहिती अग्रक्रमाने त्याना पुरवित असतात. विविध मॅगेझिन्स आणि सेमिनार्स यांच्याद्वारे पब्लिक एंगेजमेन्ट विथ सायन्स प्रकाशित करत असतातच.... >>> जनतेला उत्साह असतो म्ह्णून संशोधकांना उत्साह येतो.
सुमुक्ता आपली पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी पाच वर्षे या क्षेत्रात अगदी अभ्यासू वृत्तीने तसेच आनंदाने राहिल्या आहेत हे त्यांच्या लेखातील भाषेवरून समजून येते. >>> खरेच. पीएच.डी. च्या पाच वर्षात जो आनंद मी मिळविला तसा आनंद माझ्या प्रोफेशनल लाइफ मध्ये कधीच मिळविला नव्हता.
येथील विद्यापीठांध्ये पब्लिक एंगेजमेन्ट युनिट्स सुरु झाले आहेत. तिथे बरेचसे डॉक्टरेट केलेले लोक विज्ञानाच्या लोकप्रसाराचे काम करतात. म्हणजे डॉक्टरेट झालेल्या अनेक लोकांना फॅकल्टी व्यतिरिक्त करियर ऑप्शन निर्माण झाला आहे. संशोधन करित नसाल तरी नविन संशोधनाची माहिती सतत मिळत रहाते.
माझ्या पीएच.डी विषयी लिहायला नक्की आवडेल पण कंप्यूटर सायन्स सारखा विषय रंजकपणे लिहायला थोडा वेळ लागेल. पण लिहिन नक्की!!!
मस्त! छान वाटलं वाचून!
मस्त! छान वाटलं वाचून! तुमच्या संशोधनाविषयी वाचायला आवडेल! >>>+१००
आमच्याकडे पण आईरिश पब मध्ये
आमच्याकडे पण आईरिश पब मध्ये प्रत्येक महिन्यात एकदा Science Slam event असतो. आणि ईकदकडल्या युनिव्हर्सिटितले p.h.d. किंवा पोस्ट्डोक करणारे तसेच इथल्या एका मोलीक्युलर बायलोजीच्या insitute मधले reasearch करणारे लोक त्यांच्या research वर / कामाबद्दल एका १०-१५ मिनिटांचे presentation देतात. खूप मस्त असतो तो event .
वेगवेगळ्या प्रकारच्या
वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांत / ठिकाणी सादरीकरणाची कल्पना खूपच आवडली. यंग जनरेशनचा जिथे भरपूर वावर आहे तिथे सादरीकरण म्हणजे आव्हानच! पबमध्ये सादरीकरण हेही आवडले.
लेख मस्तच आहे.
http://www.cafescientifique.i
http://www.cafescientifique.in/about/
मला अजून जाता नाही आलेलं पण माझा एक मित्र जाऊन आलाय . खूपच चान उपक्रम आहे हा .
नविन प्रतिक्रियांबद्दल
नविन प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आमच्या कडे कॅफे सायंटिफिक, कॅफे मेड, कॅफे फिलॉसॉफिक, कॅफे कॉन्ट्रव्हर्शियल असे अनेक कार्यक्रम अगदी नियमित चालू असतात. इथे पहिल्यांदा आले तेव्हा हे सगळं नविन होतं माझ्यासाठी. खूप छान माहिती मिळते ह्या सर्व कार्यक्रमांमधून.
सुरेख लेख ! कल्पना फारच
सुरेख लेख ! कल्पना फारच चांगली आहे.
आमच्या कॉलेजमध्ये Buddy System या नावानी ही योजना चालते. दर आठवड्यात एक तास यासाठी ठेवलेला आहे. आपल्या क्षेत्रातली इन्टरेस्टिंग माहिती द्यायची. प्रोफेसरपासून झाडूवाल्यापर्यंत सगळे हजर असतात. त्यांना समजेल अशा भाषेतच सांगायचं.
त्यावरून अलबर्ट आईनस्टाइनचं एक वाक्य आठवलं.
If you cannot explain a concept to a ten year old, it means you have not understood it yourself.
आहा... इकडे वर्षातून
आहा... इकडे वर्षातून एखादेवेळी विज्ञान प्रदर्शनी भरते.. विद्यार्थांनी त्यांच्या त्यांच्या लेव्हल वर केलेले असे ते प्रयोग ज्यात मुख्यतः वीजेच्या कमीत कमी वापरासाठी तयार केलेले यंत्र असले प्रयोग असतात .. पण यात मुख्यत्वे करुन विद्यार्थी कमी आणि शिक्षक / शाळा च जास्त हिरीरिन उतरतात.. म्हणजे स्वतः प्रयोग करुन किंवा विकत घेऊन ते विद्यार्थाच्या नावाने प्रेझेन्ट करण आणि बक्षिस घेणं .. हे लक्षात तेव्हा येत जेव्हा हे विद्यार्थी अगदी पोपटपंची करुन सादरीकरण करतात आणि जरा वेगळा प्रश्न आला कि शिक्षक मदतीला येतात अथवा सरळसोट दुर्लक्ष करतात .. तिथ होणारे सर्वच उपक्रम स्तुत्य दिसताहेत.. इथ पण जरा सिरियस होऊन असले पाऊल उचलायची आवश्यक्ता आहे .. आणि हो, लेखन सुंदर आहे ..