मंगळयान मोहीम: इस्रोच्या शास्त्रज्ञांचे व सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन

Submitted by कोकणस्थ on 24 September, 2014 - 00:40

भारताचे मंगळ यान मंगळा ग्रहाच्या कक्षेत आज स्थापित करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना पहिल्याच प्रयत्नात यश आले. त्याबद्दल या धाग्यावर त्यांचे अभिनंदन करुया. मंगळ ग्रहाच्या बाबतीत अधिक माहिती इथे देता येईल.

कोणतेही तंत्रज्ञान परिपूर्ण असूच शकत नाही, अन्यथा अमेरिका आणि रशियाच्या सगळ्या अवकाश मोहीमा कोणताही अपघात न होता यशस्वी झाल्या असत्या. पण विशेष असे की पहिल्याच प्रयत्नात मंगळमोहीम यशस्वी करणारा भारत हा आत्तापर्यंतचा एकमेव देश ठरला आहे. या आधी चांद्रयान-१ मोहीम अशाच रितीने पहिल्याच फटक्यात यशस्वी झाली होती. Get it right the first time हे व्यवस्थापन तत्व आपण अंमलात आणू शकलेलो आहोत, ते ही दुसर्‍यांदा. याचाच अर्थ असा की भारताकडे असलेले तंत्रज्ञान हे अत्यंत परिपक्व झालेले आहे. तसेच, हे तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय आहे आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या तूलनेत एक दशांश खर्चात ही मोहीम पार पाडण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत.

या मोहीमेबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि कौतुक करताना आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी म्हणाले की देशवासियांना शास्त्रज्ञांबद्दल गर्व वाटावा अशीच ही घटना आहे. या कार्यक्रमासाठी इस्रोने मॉम (मार्स ऑर्बिटर मिशन) हे संक्षिप्त रूप वापरले होते. तोच धागा पकडून मोदी यांनी आपल्या भाषणात मंगळाला आज 'मॉम' मिळाल्याचे सांगितले. मॉम कधीही कोणाला निराश करीत नाही, अशी सार्थ कोटीही त्यांनी आपल्या भाषणावेळी केली.

भारत अवकाश मोहीमांत अशीच प्रगती करत राहो ही इश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे व सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages