मासिक भविष्य सप्टेंबर २०१४

Submitted by पशुपति on 31 August, 2014 - 22:49

राशिभविष्य
सप्टेंबर २०१४
(के.पी.पद्धतीप्रमाणे)

(टीप : सर्व भविष्य चंद्र राशीप्रमाणे दिली आहेत, पण ज्यांना लग्न रास माहीत आहे त्यांनी जन्म रास व लग्न रास अशी दोन्ही भविष्य वाचावीत.
समजा...चंद्र राशी मिथुन आहे आणि लग्न राशी मीन आहे, तर अशांनी मिथुन आणि मीन अशी दोन्ही राशींची भविष्ये पहावीत आणि समन्वय साधावा. )

मेष : मेषेचा स्वामी मंगळ सप्तमात आणि गुरु चतुर्थात ह्यामुळे मेष राशीच्या मंडळींना घरगुती बाबतीत बऱ्याच प्रमाणात लक्ष घालावे लागेल. विशेषत: मुलांच्या बाबतीत जरा जास्त लक्ष द्यावे लागेल. द्वितीय स्थानातील शुक्र पंचमात आणि गुरु चतुर्थात त्यामुळे आर्थिकदृष्ट्या परिस्थिती ठीक राहील आणि त्याबाबत समाधान पण राहील. तृतीय भावातील बुध षष्ठ स्थानी, गुरु चतुर्थ स्थानी त्यामुळे ज्यांचा पुस्तक प्रकाशन, एजन्सी अथवा कमिशन एजंट अश्या व्यक्तींना हा महिना चांगला आहे. गुरु चतुर्थ स्थानी असल्याने विद्यार्थ्यांना देखील हा महिना चांगला जाईल, अभ्यासात अपेक्षित प्रगती होईल. पहिल्या पंधरवड्यात रवि पंचमात व दुसऱ्या पंधरवड्यात रवि षष्ठात ही स्थिती आर्थिकदृष्ट्या अधिक चांगली राहील, त्याचबरोबर षष्ठातील ग्रहाधिक्यामुळे प्रकृतीचे किरकोळ त्रास जाणवतील. घरगुती बाबतीत हा महिना उत्तम राहील. घरातील वातावरण सलोख्याचे राहील. नोकरी अगर व्यवसाय करणाऱ्यांना हा महिना उत्तम राहील. मेष राशीला एकुणात हा महिना चांगलाच जाईल.

वृषभ : वृषभेचा राशीस्वामी शुक्र चतुर्थात आणि केतू लाभात, गुरु तृतीयात ही परिस्थिती आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. विशेषत: नवीन घर घेणाऱ्यांना मनासारखे घर लाभेल. पंचम स्थानातील बुध आणि चतुर्थातील रवि आर्थिक बाबतीत फारशी उलाढाल होऊ देणार नाही, व्यवहार थोडे जपून करण्याची आवश्यकता आहे. तृतीयातील उच्चीचा गुरु देखील हाच संदेश देत आहे, पण तो लाभेश असल्याने ज्यांचा शिक्षणाशी संबंध आहे अश्या लोकांना तो बऱ्यापैकी फळे देईल. चतुर्थातील रवि-शुक्र घरगुती वातावरण आनंदी ठेवतील. ज्या लोकांचा शेअरचा व्यवसाय आहे अश्या लोकांना दुसऱ्या पंधरवड्यात उत्तम आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पंचमातील ग्रह मुलाबाळांच्या शिक्षणासंबंधी समाधान देतील. षष्ठातील शनि-मंगळ किरकोळ आजारास कारणीभूत होतील, त्यामुळे त्याची फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. दशमेश शनि षष्ठात आणि गुरु तृतीयात नोकरी करणाऱ्यांना उत्तम योग आहेत. कामानिमित्ताने थोडाफार प्रवास होण्याची पण शक्यता आहे. एकुणात वृषभ राशीला हा महिना उत्तम जाईल.
मिथुन : मिथुनेचा स्वामी बुध चतुर्थ स्थानी असून सिंह राशीचा रवि तृतीयात आहे. दोन्ही ग्रह स्वत:च्या राशीत असल्याने योग उत्तम आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या कामात वेगवेगळे प्रयोग केल्यास सफल होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे लागेल. द्वितीयात गुरु आणि चतुर्थात बुध ही परिस्थिती शिक्षकी पेशाच्या लोकांना चांगली आहे. तृतीय स्थानातील रवि-शुक्र, द्वितीय स्थानातील गुरु आणि दशमातील केतू हा योग लेखक तसेच प्रोफेसर्स, बुकसेलर्स, कमिशन एजंट इ. लोकांना उत्तम आहे. विशेषत: ज्या लोकांची वक्तृत्त्व कला चांगली आहे, अश्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. सप्तमेश गुरु द्वितीयात, केतू दशमात कौटुंबिक वातावरण चांगले ठेवील. दशमेश गुरु आणि दशमात केतू ह्यामुळे नोकरी अगर व्यवसायात उत्तम लाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. काही लोकांना कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. एकंदरीत हा महिना सर्व दृष्टीने चांगला आहे, असे दिसते.

कर्क : ह्या महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीचा स्वामी चंद्र षष्ठात आणि गुरु प्रथम स्थानी तुमच्याच राशीत असल्याने आर्थिक स्थिती भक्कम राहील असे दिसते. ह्या नंतरचे चंद्रभ्रमण देखील कौटुंबिक व व्यावसायिक दृष्ट्या उत्तम राहील. पहिल्या पंधरवड्यात रवि सिंह राशीत असून शुक्र देखील तिथेच आहे. त्यामुळे उत्तम आर्थिक लाभाचे योग आहेत. मंगळ भूमिकारक असून चतुर्थात असल्याने बऱ्याच लोकांना घर व जमीन ह्या मार्गातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शनि-मंगळ चतुर्थातच असल्याने प्रकृतीस थोडाफार त्रास संभवतो. पंचमेश मंगळ चतुर्थात व नवमेश गुरु प्रथम स्थानी ही परिस्थिती शेअर वा तत्सम गुंतवणुकीमध्ये नुकसान दर्शवत आहे, त्यामुळे व्यवहार सावधगिरीने करावेत. ह्या महिन्यात काही लोकांना लांबच्या प्रवासाचे योग पण दिसत आहेत. एकंदरीत हा महिना सर्वसाधारणपणे ठीक जाईल.

सिंह : सिंह राशीचा स्वामी रवि पहिल्या पंधरवड्यात तुमच्याच राशीत आहे, तसेच दशमेश शुक्र देखील सिंह राशीतच आहे. त्यामुळे तुमच्या हातून एखादे कार्य असे घडेल, की ज्याची सरकार दरबारी दखल घेतली जाईल. थोडक्यात, समाजसेवी लोकांना त्यांच्या कार्यात उत्तम यश मिळेल असे दिसते. द्वितीय स्थानातील बुध व राहू आर्थिक परिस्थिती उत्तम ठेवील असे दिसते. तृतीयातील शनि-मंगळ व बाराव्या स्थानातील गुरु लांबच्या प्रवासाचे योग दाखवत आहेत. प्रथमात रवि-शुक्र व पंचमेश गुरु बाराव्या स्थानी ध्यानधारणेसाठी काळ उत्तम दाखवत आहे. कौटुंबिक स्थिती थोडीफार नाजूक असण्याची शक्यता दिसते. ज्यांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे व बरेच कर्ज आहे अश्या लोकांना देखील बँकेच्या कर्जफेडीची उत्तम संधी मिळेल. लाभेश बुध द्वितीय स्थानात व रवि प्रथम स्थानात, त्यामुळे बऱ्याचश्या गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे दिसते. ह्याचा योग्य तो फायदा करून घ्यावा. एकंदरीत सिंह राशीच्या लोकांना हा महिना उत्तम आहे.

कन्या : कन्या राशीच्या लोकांना राहू लग्नी आणि शनि-मंगळ द्वितीय स्थानी, हे ग्रहयोग आर्थिकदृष्ट्या बरेच फलदायी होतील असे दिसते. राहू लग्नी आणि शनि द्वितीयात असल्यामुळे प्रकृतीची थोडी काळजी घेणे योग्य ठरेल. तृतीयेश मंगळ व दशमात गुरु-शुक्र तुमची व्यावसायिक वाटचाल खूप वेगाने घडेल असे दर्शवतात. मुलाबाळांच्या संबंधात काळजी राहणार नाही. त्यांची प्रगती समाधानकारक राहील. षष्ठेश शनि द्वितीयात असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. घरगुती वातावरण सलोख्याचे राहील. काही लोकांना लांबच्या प्रवासाचे योग येण्याची शक्यता आहे. दशमेश बुध लग्नी स्वराशीत असल्याने तुमच्याकडून काहीतरी भरीव कार्य होण्याची पण शक्यता खूप आहे. निदान त्याचा पाया तरी रचला जाईल. एकंदरीत कन्या राशीला हा महिना संमिश्र स्वरूपाचा जाईल असे दिसते.

तूळ : तूळ राशीचा स्वामी शुक्र लाभात असून केतू षष्ठात आणि रवि लाभात आहे. त्यामुळे ह्या महिन्यात बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे दिसते. लग्नी शनि-मंगळ आणि गुरु दशमात, प्रकृती व्यवस्थित ठेवेल. ज्या व्यक्तींचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे अश्या व्यक्तींना परदेशातील व्यवहार फायद्यात पडतील. ज्यांचा व्यवसाय शेअरसंबंधी आहे त्यांना देखील हा महिना चांगला जाईल. सप्तमेश मंगळ लग्नी आणि गुरु दशमात त्यामुळे कौटुंबिक वातावरण थोडे नरम-गरम राहील. नवमेश बुध बाराव्या स्थानी व रवि-शुक्र लाभ स्थानी त्यामुळे परदेशात जाण्याची शक्यता कमी, मात्र परदेशाशी सातत्याने संपर्क राहील. व्यावसायिक दृष्ट्या देखील हा महिना चांगला राहील. तूळ राशीला एकंदरीत हा महिना उत्तम आहे.

वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ द्वादश स्थानी आणि गुरु नवम स्थानी असल्याने बऱ्याच लोकांना परदेशगमनाची संधी प्राप्त होणार आहे. शरीर प्रकृती देखील उत्तम राहील असे दिसते. चतुर्थेश शनि बाराव्या स्थानी व गुरु नवम स्थानी असल्याने घरासंबंधीचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत. मुलाबाळांच्या प्रगतीविषयी विशेष चिंता नसावी, समाधानकारक परिस्थिती राहील. सप्तमेश शुक्र दशमात, केतू पंचमात व गुरु नवमात ह्या ग्रहस्थितीमुळे कौटुंबिक वातावरण चांगले राहील. ह्याशिवाय कुटुंबासह धार्मिक स्थळी प्रवास देखील होतील. दशमातील रवि-शुक्र व्यवसायात उत्तम प्रगती दाखवत आहेत. नोकरी करणाऱ्यांना देखील प्रमोशनचे चांगले चान्सेस आहेत. लाभातील राहू काही बाबतीत आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती दाखवत आहे, त्यामुळे शेअर व तत्सम उलाढालीपासून जरा अंतर ठेवल्यास उत्तम! काही गोष्टी वगळता, हा महिना वृश्चिक राशीला बराच चांगला जाईल.

धनु : ह्या महिन्याच्या सुरुवातीलाच चंद्र धनु राशीतच असून पुढच्या पंधरवड्यात तो सप्तम स्थानापर्यंत प्रवास करेल. ह्याचा परिणाम म्हणजे आर्थिकदृष्ट्या तसेच मुलाबाळांच्या दृष्टीने आणि कौटुंबिक दृष्टीने हे भ्रमण उत्तम राहील असे दिसते. तृतीयातील शनि लाभात असून गुरु अष्टमात आणि बुध दशमात आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू, करारमदार, अॅग्रीमेंट इ. गोष्टी फारसा त्रास न होता सुरळीत पार पडतील. पंचमेश मंगळ दशमात मुलाबाळांच्या दृष्टीने समाधानकारक राहील. तसेच ज्यांचा शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय आहे, त्यांना लाभ व नुकसान ह्या दोन्ही परिस्थितींना तोंड द्यावे लागेल असे दिसते. अष्टमातील गुरु आणि दशमातील बुध नोकरी अगर व्यवसायात कामाचा ताण बराच वाढवतील, पण त्यातून चांगलेच निष्पन्न होईल असे दिसते. १५ सप्टेंबरच्या पुढे रवि नवमातून दशमात जाईल त्यावेळी कामानिमित्त प्रवासाची संधी मिळू शकेल. लाभातील शनि-मंगळ कष्टातून लाभ मिळवून देतील. धनु राशीला एकुणात हा महिना उत्तम फलदायी जाईल.

मकर : मकर राशीचा स्वामी शनि दशमात आणि गुरु सप्तमात, बुध नवमात ह्या ग्रहस्थितीमुळे शरीर प्रकृती धडधाकट राहील. ज्यांना समाजसेवेची आवड आहे अश्या लोकांच्या हातून काहीतरी सामाजिक कार्य घडण्याची शक्यता आहे. द्वितीय स्थानातील कुंभ राशीचा स्वामी शनिच असल्याने आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. चतुर्थेश मंगळ दशमात आणि गुरु सप्तमात असल्याने ज्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असेल त्यांना हा महिना फायदेशीर ठरेल. मुलाबाळांच्या अभ्यासाच्या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे लागेल असे दिसते. सप्तमातील गुरु कौटुंबिक वातावरण समाधानकारक ठेवेल. पहिल्या पंधरवड्यात अष्टमातील रवि-शुक्र मानसिक ताण वाढवण्यास कारणीभूत ठरतील. नवमातील राहू आणि बुध काही लोकांना छोटेमोठे धार्मिक प्रवास घडवून आणतील. दशमातील शनि-मंगळ व्यवसाय अगर नोकरीच्या दृष्टीने उत्तम आहेत. एकंदरीत मकर राशीला हा महिना संमिश्र राहिल असे दिसते.

कुंभ : कुंभ राशीचा स्वामी शनि नवम स्थानी, गुरु षष्ठ स्थानी आणि बुध अष्टम स्थानी ही ग्रहस्थिती प्रकृतीच्या दृष्टीने काळजी करायला लावणारी दिसते. तसेच षष्ठातील गुरुमुळे आर्थिक बाबतीत नुकसान संभवण्याची शक्यता वाटते, तरी पैशाबाबत सावधगिरी बाळगावी. तृतीयेश मंगळामुळे छोटेमोठे प्रवास होण्याची शक्यता दिसते. चतुर्थेश शुक्र सप्तमात, रवि सप्तमात त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलाबाळांच्याबाबत परिस्थिती ठीक आहे. शेअर अगर तत्सम गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगावी. अष्टमातील राहू, बुध मानसिक ताण देण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांना ह्या महिन्यात व्यावसायिक किंवा नोकरीत कामाचा व्याप जास्त जाणवेल. लाभेश गुरु षष्ठात असल्यामुळे आर्थिक आवक बऱ्यापैकी राहील. एकंदरीत हा महिना संमिश्र स्वरूपाचा राहील असे दिसते.

मीन : मीन राशीचा स्वामी गुरु पंचमात, केतू मीन राशीत असल्यामुळे अध्यात्मिक आवड असणाऱ्यांना हा महिना धार्मिक कार्यासाठी उत्तम आहे. द्वितीयेश मंगळ अष्टमात आणि गुरु पंचमात असल्याने आर्थिक बाबतीत नुकसान संभवण्याची शक्यता आहे, व्यवहार जपून करावेत. कदाचित हे योग कलाकारांसाठी मात्र चांगले ठरण्याची शक्यता आहे. तृतीयेश शुक्र षष्ठ स्थानी असल्याने ज्या होतकरू तरुणांनी नोकरीसाठी अर्ज केले असतील त्यांना नोकरी मिळण्याची बरीच शक्यता आहे, कारण रवि देखील षष्ठ स्थानी असल्याने हाच योग दाखवत आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूची तयारी जोरदार करावी. वाहन जपून चालवण्याची आवश्यकता आहे, असे योग आहेत. कौटुंबिक आघाडीवर राहू-बुध असल्याने थोडीफार कुरबुर होण्याची शक्यता आहे. अष्टमातील शनि-मंगळ इंजिनिअर्सना कामाचा ताण जास्त जाणवून देईल, त्याचबरोबर आर्थिक आवक पण घडवून आणेल. एकंदरीत हा महिना संमिश्र राहील असे दिसते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users