माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ४

Submitted by कविता१९७८ on 2 June, 2014 - 10:48

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - १
http://www.maayboli.com/node/49174

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - २
http://www.maayboli.com/node/49191

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ३
http://www.maayboli.com/node/49208

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ४

सकाळी २.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. सर्वजण प्रातःविधी उरकुन , बॅग्ज पॅक करुन, चहा नाश्ता करुन रोडवर गर्दी केली. मी निशाणीवालाच्या बाजुला राहुन चालायला सुरुवात केली. आज जास्त घाट लागणार होते. डोंगर पार करुन जव्हारला पोहोचायचे होते. माझ्या बरोबरच्या लोकांनी सागितले कि ताई आज तुम्हाला हाताला धरुनच खेचावे लागेल कारण घाटावर तुम्ही खुप थकाल. नेहमी प्रमाणे पाय आणी अंग दुखत होतं घाट लागले मी गमछाला एका बाजुने पकडलं आणि एक एक जण थोडा थोडा वेळ बदलुन गमछयाच्या दुस-या बाजुला पकडुन ओढु लागला. मला वाटलं मला एकटीलाच ओढतायत पण ब-याच मुलींना ज्या अंगाने बारीक असुन सुद्धा त्यांचे त्यांचे नातेवाईक ओढत होते. त्याही थकल्या होत्या. माझ्या जोडीला बरेचजण नवीन पदयात्री पहिल्यांदाच पदयात्रेत सामील झाले होते. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं मुलाची खुप ईच्छा होती की जोड्यानं चालत जावं , मुलीची ईच्छा नसतानाही तो तिला जबरदस्ती चालत घेउन जात होता. ती अंगाने खुपच बारीक होती माझ्या सारखी थकली होती. पुढे ती माझ्याही मागे पडु लागली. एक घाट कसबसा पार केला. चालतानाच पायातल्या फोडात पुन्हा पाणी भरुन फोड फुटत होते पण स्लिपर्स , सॉक्स काढुन पहायला वेळ नव्हता. जीव थकला , कावला. मी खुप स्लो चालत होते पण कुठेही थांबत नव्हते. सकाळच्या चहाच्या थांब्याला
पोहोचेपर्यंत बाकीची मंडळी नाश्ता करुन जायला निघाली होती. मंडळाच्या अध्यक्षांचा मुलगा सर्वांची पुरुषांच्या पायांची मालीश करत असे, मुख्यतः तो पायाच्या पंजाला हाताने जोरात पंच मारुन ठोकुन ठोकुन मालीश करायचा त्याने चालुन चालुन पायाच्या पंजामधे जे रक्त गोठतं ते रीलीज होतं असं म्हणायचा. मी हि त्याला सांगितलं पायाच्या पंजाचे तुकडे पडलेत तर पंजाला प्लीज हाताने कींवा काठीने पंच मार. तसं केल्यावर थोडं बरं वाटलं. बाकीचे पुढे गेले, मीही नाश्ता करुन पुढे निघाले, पुन्हा घाट आणी तो पण रस्ता एकदम उभा दिसत होता. पुन्हा मला गमछ्याने ओढायला सुरुवात झाली. हा जव्हारचा शेवटचा घाट होता हा संपला कि जव्हारला पोहोचणार होतो. पायाचे तुकडे तर आधीच पडले होते. उनही बरंच होतं. खुप वेळाने घाट पार केला तरीही जव्हारला पोहोचायला अवकाश होता. कसंबसं जव्हारला १२.३० वाजता पोहोचलो. जव्हारच्या शेवटी वॉटरपंपच्या ईथे जेवणाचा थांबा होता. आम्ही पोहोचलो तेव्हा जेवण चालु झाले होते. मी जेवण केले , आंघोळीला सुट्टी दिली आणि सरळ झोपुन गेले.

संध्याकाळी ५ की.मी. इतके कमीच चालायचे असल्याने उन्हाचा त्रास वाचवण्याकरता आरामात ४ वाजता निघायचे ठरले होते. ३ वाजता सर्वांनी आवरायला सुरुवात केली. बायका स्वछ तोंड धुवुन , पावडर वगैरे लावुन केस विंचरत होत्या. मी हातपाय आणि तोंड धुवुन घेतले. बाकी पुर्ण प्रवासात मी दुपारच्या आंघोळीच्या वेळेसच केस विंचरत असे. टोपी घातल्याने तसंही केस खराब होत आणी इतकं थकल्यावर माझी केस विंचरणे, पावडर लावणे असं करण्यासाठी ताकदच उरत नसे. सर्वजण अगदी तयारी करण्यात मश्गुल होते. ४ वाजता हळुहळु सुरुवात केली. अंतर कमी असल्याने लवकर पोहोचलो पण माझी अवस्था तर आणखी खराब होत चाललेली. थांब्यावर पोहोचलो. अध्यक्षांच्या बायकोने आणी मुलीने झोपण्यासाठी जागा पकडुन ठेवलेली. शौचाला गेले तर चालता येईना अध्यक्षांच्या मुलीनेच पाण्याची बादली पकडली आणि हाताला पकडुन नेले. आतापासुन मला जेवणासाठी रांग लावायची गरज नव्हती माझी हालत पाहुनच कुणी न कुणी मला बसल्या जागी नाश्ता , जेवण , पाणी आणुन देत असे. आरती, जेवण करुन झोपुन गेलो. ईथेही भरपुर थंडी. रोज राउत त्याच्या नातेवाईकाला फोने करुन माझी खुशाली कळवायचा. मला घरची अजिबात आठवण येत नव्हती. कधी थकल्याने तर कधी रेंज नसल्याने मी घरी जास्त फोन करत नसे.

४ था दिवस उजाडला. आज सुद्धा घाट होते. रात्री १.३० वाजता उठुन नेहमीप्रमाणे सर्व आवरुन रस्त्याला लागलो. गमछा सोयीस्कर वाटु लागला होता. आता राउतचे मामा जे मंडळाचे सभासद देखिल होते ते सुद्धा माझ्याबरोबर चालु लागले. त्यांना रस्त्याची चांगली माहीती होती. अंधारात ही घाट चढताना ते बाकीच्यांना सुचना देत होते की आता खड्डा आलाय हिला ईथनं आणा वगैरे. त्यांना मंडळाकडुन फोन आला कि ताईला चालता येत नसेल तर गाडीत बसवा गाडी पाठवतो पण मामांनी सांगितले कि हि हळुहळु चालते पण कुठेही थांबायला , बसायला , आराम करायला सांगत नाहीये त्यामुळे ही चालेल आम्ही हीला घेउन येतो. थोड्यावेळाने उजाडले , स्लो चालत असल्याने मला थोडे बरे वाटत होते. मी एकटी आरामात चालत होते. उतरण होती तेव्हा तर मी माझ्या बरोबरच्यांना मागे टाकुन खुप पुढे आले होते. उतरण आणी उतरते वळण असल्याने लांब असुन
सुद्धा मी त्यांना व ते मला पाहु शकत होते. खाली थोड्या अंतरावर पोशेरा या गावाच्या बसस्टॉप वर चहाचा
आणी नाश्त्याचा थांबा होता. चहा नाश्ता झाला, अध्यक्षांनी येउन सांगितले की तुमच्या घरच्यांनी सांगितले होते कि तुम्ही २ की.मी ही चालु शकणार नाहीत पण तुमच्यावर साईबाबांची क्रुपा आहे, चांगल्या चालत आहात तर ४ माणसं जोडीला देतो आरामात चाला , काळजी करु नका. हे ऐकुन खुपच बरे वाटले. पुन्हा चालु लागलो. साधारण १० वाजता मोखाडा पार करुन निळमाती च्या आधी मंदीराच्या ईथे आंघोळीच्या थांब्याजवळ पोहोचलो. हा एकच थांबा असा आहे की जेवणाचा थांबा ईथुन ३ की.मी. पुढे आहे. आंघोळीची बॅग ईथे ठेवुन सर्व गाड्या पुढे जातात आणी आंघोळीनंतर हे ओझे पाठीवर घेउन ३ की.मी. उन्हात चालावे लागते. थोडा घाट लागतो. मला बायकांच्या
आंघोळीची दिशा दाखवुन आणी नंतर पुन्हा मंदीराजवळ ये असे सांगुन जोडीची माणसं पुरुषांच्या आंघोळीच्या ठिकाणी निघुन गेली. ईथे नदी आहे. थोडंसं पुढे गेल्यावर एका टेकडीच्या खाली पायथ्याशी बायका आंघोळ करताना आढळल्या. खाली उतरायचा रस्ता म्हणजे एकावेळी एकच माणूस उतरेल इतका अरुंद होता. लागुनच
खाली गोल कूंडासारखा पाण्याचा भाग तयार झाला होता. खाली तोल जाउन पाण्यात पडण्याच्या भीतीने मी बसुन बसुन साईबाबांचे नाव घेत खाली उतरले. थंडगार पाणी होते. १५ मिनिटे पाय बुडवुन ठेवल्यावर खुपच बरे वाटु लागले, सगळा शीण गेला. बर्‍याच दिवसांनी आंघोळीला पुरेसे पाणी मिळाले होते. छान आंघोळ केली, केस धुतले , १-२ कपडे धुतले आणी कसेबसे परत वर चढुन मंदीराजवळ आले. थोड्या वेळाने बाकीची मंडळी आली आणी आम्ही चालु लागलो. उन्हामुळे चालण्याचा वेग मंदावला. बर्‍याच वेळाने आम्ही जेवणाच्या थांब्याजवळ म्हणजेच निळ्माती गावाच्या बस स्टॉपजवळ पोहोचलो. ईथे सावली नाही की थांब्याजवळ मोठे ठीकाणही नाही. जेवण झाले आता मोरचोंडी हा सगळ्यात मोठा घाट लागणार होता जो जवळजवळ १० कीमी लांब आहे. ७-८ कीमी चढल्यावर चहाचा थांबा आहे. सर्व म्हणायला लागले की हा घाट चढायला खुप कठीण आहे हा घाट चढलीस तर शेवटपर्यंत चालत जाशील हे नक्की. जोडीदारांनी सांगितले कि घाबरु नकोस चालायला सुरुवात कर दमलीस की
आम्ही आहोतच न्यायला. मी मनातल्या मनात साईबाबांचा धावा करु लागले की "बाबा आता भक्ताची लाज राखा हा घाट तरी मला कुणाच्याही मदतीशिवाय पार पाडु द्या". आतुन खुपच घाबरले होते.

साधारण ३ वाजता २ बायकांबरोबर हळुहळु चालायला सुरुवात केली. मोठा घाट असल्याने आणी वाहनांची थोडी वर्दळ असल्याने सर्व सावकाश चालत होते. माझ्या जोडीचे अगदी माझ्या मागेच चालत होते. जवळ २ तासांनी अर्धा घाट पार केला. एका ठीकाणी खुपच उकडायला लागले म्हणुन डोक्यावरची टोपी काढली तोच मागुन राउतचा भाउ अमोल म्हणाला "चढलीस घाट कुणाच्या मदतीशिवाय" , ऐकुन खुपच आनंद झाला, एक पदयात्री (उमेश दादा) म्हणाले "बाय तु आरामात घाट पार केलायस आता तु शेवटपर्यंत चालत जाशील, मला माहीत होतं तु हा घाट चढशील". आताही हा प्रसंग आठवुन माझ्या डोळ्यात पाणी आले आहे. ह्यावारीला निलेशने सांगितले की उमेश दादांच्या पहिल्या वारीला त्यांची अवस्था माझ्याहुन बिकट होती. त्यांनाही कसेबसे चालत नेले होते एके ठीकाणी तर ते रडायला लागले होते , मी आता मरुन जाईन, पुढे जाउ शकाणार नाही, मला घरी घेउन चला असे विनवणी करत होते पण माझ्यासारखीच समजुत घालुन त्यांनी कसेबसे उमेशदादाला शेवटपर्यंत नेले. माझ्या बाबतीत ईतकाच फरक होता की माझी ईच्छाशक्ती प्रबळ होती. मला ३-४ वेळा गाडीत बसायचंय का असे विचारण्यात आले पण कूठल्याही वेळी मी दुर्बल होउन गाडीत बसायला तयार झाले नाही. अर्ध्या तासाने चहाचा थांबा आला. चहा झाला अजुन एका तासाने रात्रीच्या जेवणाच्या ठीकाणी पोहोचलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो पण ७ वा दिवस तर खुपच कठीण होता , अगदी परिक्षेचाच दिवस होता. आयुष्यभर विसरु शकणार नाही ७ वा दिवस. पण तरीही ५-६ वर्षे झाल्याने आता २००९ चा पहिला प्रवास संपुर्ण आठवत नाही , ५ आणी ६ व्या दिवसाचं जास्त आठवत नाहीये.

कविता, प्रत्येक भागाच्या सुरुवातीला आधीच्या सर्व भागांची लिंक दे. म्हणजे कुणी मधुनच वाचायला सुरुवात नाही करणार.

चांगल चाललय वर्णन. फक्त एक गोष्ट खटकली - सनस्क्रिन रंग शाबुत ठेवण्यासाठीच नाही लावत. ते हानिकारक सूर्यकिरणांपासुन सुरक्षेसाठी असत. कॅन्सर वगैरे आजार होउ नयेत म्हणून. तेवढ काढलत तर बर होईल.

मराठी कुडी , अमा :

<<<सनस्क्रिन रंग शाबुत ठेवण्यासाठीच नाही लावत. ते हानिकारक सूर्यकिरणांपासुन सुरक्षेसाठी असत. कॅन्सर वगैरे आजार होउ नयेत म्हणून>>>

हे आपण जाणतो पण याबाबात काहीही माहीती या लोकांना नाही. पुर्ण गावातील लोकं जवळ जवळ अशिक्षीत आहेत आणी लोकंएकमेकांना हेच म्हणत होती की क्रिम आणलाय याने उन्हात माणुस काळं पडत नाही , ही लावुन घ्या, अगदी मलाही म्हणत होते ताई अशी क्रीम मिळते ती आणायची. त्या क्रीमला सनस्क्रीन म्हणतात हे ही त्यांना माहीत नव्हतं, आणी त्यावेळी एकाकडेही ब्रँडेड क्रीम नव्हती , नाव विचारलं तर त्यांनी सरळ डबीच पुढे केली कारण त्यावर ईंग्लीश नाव होतं आणी कुणालाही ईंग्लिश वाचता येत नव्हतं, तसं वर लिहीते म्हणजे वाचताना उलगडा होईल पदयात्रीने चालताना कुणाकडुन पाय चेपुन घेतले कि पदयात्रीचे पुण्य पाय चेपणार्‍याला मिळतं , जो पापी असतो तो सगळ्यात उशिरा येतो अश्या यांच्या भ्रामक समजुती. पांढ-या कपडयात उन कमी लागतं म्हणुन मी नेहमी शक्यतो पांढरे कपडे घातले तर मला सर्व म्हणतात कि ताई तु पांढरे कपडे का घातलेस पांढर्‍यात उन लागतं.

कविता, तुमच्या जिद्दीला सलाम.
जबरदस्त इच्छा शक्ती आणि साईबाबांची कृपा या दोन्ही शिवाय शक्य नाही हे.
लिहीण्याची शैली ही सुन्दर.

कविता१९७८, स्पष्टीकरणाबद्द्ल धन्यवाद. राग मानुन घेऊ नका पण कुणाच्या रंगावरुन हसणं तरीही असंवेदनशील वाटत. बाकी तुमचा लेख आहे, तुम्ही ठरवा काय योग्य वाटत ते.
ही एक गोष्ट सोडली तर संपूर्ण लेखमाल छान आहे आणि वाचतिये पण.

हाही भाग मस्त झालाय. ओघवती लेखन शैली.

वाचताना असं वाटतं जणू आपणच चालतो आहोत आणि पायाचे तुकडे पडलेत चालुन चालुन.

आपल्या साईभक्तीला व जबरदस्त इच्छाशक्तीला सलाम !!

Marathi Kudi + 1. The whole Saibaba philosophy is one of acceptance.

ओ.के., त्यावेळी मला त्या प्रसंगाची गंमत वाटली होती म्हणुन लिहिलाय , पण काढुन टाकते. माफी असावी. आता इतकी वर्षे उन्हात जाउन मी ही काळवंडलीये.

कविता१९७८, एवढ्या मोकळेपणाने प्रतिक्रिया घेतल्याबद्दल आणि बदल केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद. पुढच्या लेखनाच्या प्रतिक्षेत.

मराठी कुडी :

मी लेखनाच्या बाबतीत नवखी आहे हो. मला लेखनाचा काहीच अनुभव नाहीये, चुकले कि तुम्ही सर्व आहातच मदतीला ह्या आशेने पहिल्या वारीचं जे जे जसं जसं आठवत आहे तसं तसं लिहुन काढतीये.

छान चाललीये मालिका. Happy ही कठीण पदयात्रा इच्छा शक्तीच्या जोरावर अन जिद्दीने पूर्ण केली आहेत असे वाटते.

होय.

कविता मस्तच ग, खूप खूप कौतूक तुझे. जिद्दीने तू ही कठीण पदयात्रा पार पाडलीस. शिरडी ला जाताना वाटेत ग्रूप चालता ना पाहून मनात यायचे की हे लोक कधी पोचतील, उन्हात कसे चालत असतील? नेहेमीच कौतूक वाटत आले आहे. ग्रेट.