सांडगे (भेंडी + गवार)

Submitted by सायु on 26 May, 2014 - 02:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गवार शेंगा : एक कीलो
भेंडी : १/२ कीलो
हिरव्या मिरच्या : ५ -६
जिरे : २ चमचे (चहाचा)
धणे पुड : ४ चमचे (चहाचा)
मिठ : अंदाजे

क्रमवार पाककृती: 

गवार, भेंडी स्वच्छ धुवुन, पुसुन घ्या... गवारी च्या शेंगाचे देठ खुडुन एका शेंगेचे दोन तुकडे असे प्रतेकी करुन (वीळीने चिरल्या तरी चालतील) मिक्सर मधुन भगराळ गिरवुन घ्या... प्रत्येक घाण्यात थोडया शेंगा दिसल्या पाहिजेत...
आता भेंडी जशी भाजीला चिरतो तशीच चिरायची.. पहीला घाणा गिरवतांनाच ५, ६ मिरच्या घालुन भेडी
बारिक गिरवुन घ्या. चांगला लगदा तयार झाला पाहिजे.. उरलेली भेंडी मात्र जाडसर गिरवायची...

सगळे गिरवलेले जिन्नस परातीत काढुन घ्या... त्यात जीरं, धणे पुड, मिठ घालुन व्यवस्थीत कालवुन घ्या.
ताटाला तेल लावुन त्यावर मोठे वडे टाकावेत, ताटावरच त्याला आकार दयावा,(पातळ/ चपटे नको, मोठे फुगीर हवेत+ हातावर सांडगा घालु नये)३,४ तासानी सराटयानी उलथवुन दुसर्‍या बाजुने उन दाखवावे... दुसर्‍या दिवशी सांडगे बर्‍यापैकी वाळ्लेले असतात ते परातीत काढुन दिवस भर उन दाखवावे... चांगले वाळले की बंद डब्यात ठेवावे..

तळतांना मात्र तेल चांगले गरम झाले की गॅस बंद करुन द्यावा आणि मग एक एक सांडगा तळुन काढावा... (सांडगा नाजुक असतो म्हणुन लवकर जळायची भीती असते)

वाढणी/प्रमाण: 
काय सांगु
अधिक टिपा: 

या सांडग्यांसाठी शेंगा/ भेंडी कोवळीच पाहिजे असे नाही... जरड किंवा आठवडी बाजारातुन भाजी आणली आणि
करायला झाली नाही... तर विल्हेवाट लावायची एक उत्तम तर्‍हा आहे... नेहमीच्या गाजर, पानकोबी, पपई,टोमाटो
पेक्षा हा प्रकार कमी कष्टाचा आणि रुचकर आहे....

माहितीचा स्रोत: 
ऑफीस मधली मैत्रिण सौ.माधुरी गेडाम
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वेगळाच प्रकार.
पुर्वी कोल्हापूरात कोहळ्याचे सांडगे करत असत त्यात पण भेंडी गवारी वगैरे घालत असत.