ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमेधाव्ही, सर्व प्रथम एका महत्त्वाच्या विषयावर धागा काढ्ल्याबद्दल धन्यवाद.

श्वानप्रेमी मंडळींच्या विचित्र वागण्यांचे असंख्य किस्से निघतील. मला स्वत:ला रस्त्यावरच्या कुत्र्यांची भिती वाटत नाही. पण लाडावलेल्या पाळीव कुत्र्यांची आणि आपल्या कुत्र्यांवर अतिप्रेम असल्याने माणुसकी विसरलेल्या त्यांच्या मालक-मालकिणींची भिती वाटते.

आपली मुलं ही सगळ्यांना कंपलसरी आवडलीच पाहिजेत असा आग्रह धरणारे आईबाप मी आतापर्यंत कधिही पाहिलेले नाहीत. पण आपलं कुत्रं सगळ्यांना आवडलंच पाहिजे असं अनेक कुत्रे-प्रेमींना का वाटतं हे अनाकलनीय आहे.

प्राणीमात्रांबद्दल भूतदया दाखवताना आपण आपल्या शेजार्‍यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत आहोत हा साधा विचारही यांच्या मनात येत नाही. भली दांडगी दोन्-दोन कुत्री एकाचवेळी भरलेल्या लिफ्टमधून घेऊन जाणे, लोकांना पाहताच अंगावर येणार्‍या कुत्र्यांना कॉरीडॉरमध्ये खेळायला मोकाट सोडणे, आपण घरी नसताना आख्खा दिवस कुत्र्यांना घरात कोंडून ठेऊन त्यांचे मधूर स्वरातील शास्त्रीय संगित आजूबाजूच्या लोकांना कंपलसरी ऐकायला लावणे, लहान मुलं खेळत असतात त्याच ठिकाणी कुत्री फिरवणे आणि कुत्र्यांनी रस्त्यावर केलेले विधी साफ न करणे असे अनेक नमुने माझ्या पाहण्यात आहेत.

'कुत्री म्हणजे आमची मुलंच' असे भर मिटिंगमध्ये ठासून सांगणारी बाई कुत्रा आजारी पडला असताना त्याला केनेलमध्ये सोडून परदेशी रवाना झाली. आपलं मूल आजारी असताना तिला/त्याला हॉस्पिटलात अ‍ॅडमिट करून गेली असती का ही? मग?

कुत्रा हा चांगला मित्रं होऊ शकतो. तुम्हाला कुत्र्याची आवड आहे, जरूर पाळा पण इतरांना त्याचा उपद्रव होता कामा नये.

आमच्या ऑफिसात या श्वानप्रेमींनी उच्छाद आणला आहे.

काल म्हणे ऑफिसच्या गच्चीवर कुत्रा पाळू का? मायला ह्यांच्या.

कुत्र्यांनी रस्त्यावर केलेले विधी साफ न करणे असे अनेक नमुने माझ्या पाहण्यात आहेत.>>
आमच्या इथे ह्या मुद्द्यावरुन गुद्देबाजी झाली, तक्रार पोलिसांपर्यंत गेली होती.

ह्यांच्या श्वानाला कुत्रं म्हटलेलेही त्यांना खपत नाही. पाळीव कुत्र्यांचे लायसन्स असते असे माहीत आहे. त्यामधे सार्वजनिक ठिकाणी वावराचे काही नियम वगैरे असतात का? पाळीव कुत्र्याचा पत्ता शोधणे अवघड आहे. कुत्रा एकीकडे आणि एकीकडे मालक निवांत फिरत असतो. बर त्याला शोधून सांगावे तर कुत्रे किती प्रेमळ आहे व कसा कुणास चावत नाही वगैरे ऐकावे लागते. प्रेमळ माणसाचा भरोसा नसतो तेव्हा कुत्र्याच्या प्रेमळपणाचा किती भरोसा देणार? बर.. गाडीवर असते तशी नं प्लेटही नसते नंतर तक्रार करण्यासाठी. माहितगारांनी कृपया मार्गदर्शन करावे.

मामी, प्रचंड अनुमोदन.
एखाद्याला कुत्र्याची भिती वाटत असेल हे कुत्रेप्रेमींच्यासाठी अनाकलनीय असतं.
काय तर म्हणे काही नाही करत फक्त चाटणार प्रेमाने.... अरे तो प्रचंड कुत्रा माझ्या खांद्यावर आपले पुढचे पाय रोवून जबडा वासून माझ्याकडे येतोय एवढ्यातच हार्ट अ‍ॅटॅकने मी स्वर्गात जाईन मग त्या कुत्र्याने प्रेमाने चाटायला जबडा वासला असो की चावायला...

पार्ल्यामधे सकाळी ७ वाजता इयत्ता दुसरीतली चिमुरडी घराच्या गेटमधे उभी होती. तिचे आजोबा मागे दरवाजा बंद करून येत होते तिला शाळेत सोडायला. तेवढ्यात रस्त्यातल्या भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. ती मुलगी हॉस्पिटलमधे होती बरेच दिवस. आणि अश्या हल्ल्याने झालेला मानसिक ट्रॉमा किती तो विचारच करता येणार नाही. पण तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा विचार जरी कुणी बोलून दाखवला की तो बोलणारा माणूस कसा जगायलाच लायक नाही इथपर्यंत बोलतात श्वानप्रेमी मंडळी! Happy

टीचभर फ्लॅटमध्ये कुत्री बाळगून, त्यांना आपलं जेवण जेवायला लावून उलट आपण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत आहोत हे या श्वानप्रेमींच्या लक्षात येत नाही.

आपली मानसिक गरज भागवण्यासाठी आणि आपण भूतदया करत आहोत हे स्वतःच्याच मनावर ठसवण्यासाठी कुत्रेप्रेमी कुत्री बाळगत असतात. एखाद्या भल्या मोठ्या फार्म हाऊसवर कुत्रा पाळणे आणि टीचभर राहत्या जागेत कुत्रा पाळणे यात फरक आहे.

आपल्या मुलं ही सगळ्यांना कंपलसरी आवडलीच पाहिजेत असा आग्रह धरणारे आईबाप मी आतापर्यंत कधिही पाहिलेले नाहीत. पण आपलं कुत्रं सगळ्यांना आवडलंच पाहिजे असं अनेक कुत्रे-प्रेमींना का वाटतं हे अनाकलनीय आहे.+१११११११११

मला स्वत:ला रस्त्यावरच्या कुत्र्यांची भिती वाटत नाही. पण लाडावलेल्या पाळीव कुत्र्यांची आणि आपल्या कुत्र्यांवर अतिप्रेम असल्याने माणसुकी विसरलेल्या त्यांच्या मालक-मालकिणींची भिती वाटते. >>>अगदी अगदी.

परवा मुलासोबत सकाळी साडेसहा वाजता सायकल चालवण्यास जात असता, एक पाळीव कुत्रा धावत आला आणि मुलाच्या छातीवर पुढ्चे दोन पाय रोखून भुंकू लागला. मी भयंकर घाबरले की हा आता चावणार मुलाला, मालकिण बाईनी त्याला शांत केले आणि मलाच कुत्र्याचे कौतुक ऐकवले की "अहो, तो तुमच्या मुलाला चांगला ओळखतो म्हणून उडी मारून आला पण तुम्हाला नाही ना ओळखत म्हणून नापसंतीदर्शक ओरडू लागला". आता याला मी आवडले नाही म्हणून मी माझ्या मुलासोबतही जाऊ नये की काय?.

चायनात आताशी कुत्रं पाळायचं खूप फॅड आलंय..पण ते लोकं सोसायटी च्या बागेतून हिंडवताना आठवणीने बरब्बर प्लॅस्टिक ची पिशवी , वर्तमान कागद घेऊन फिरतात. कुत्र्याने विधी केला कि लगेच उचलून ठिकठिकाणी ठेवलेल्या बिन्स मधे टाकतात..

हे काम आपलं नाहीच अशी अ‍ॅटिट्यूड असणार्‍या भारतीयांना आणी त्यांच्या बच्च्यांना वेळोवेळी झापण्याचं काम मी करत असे.. एकदा एका चांगल्या १४,१५ वर्षाच्या ( भारतीयच)मुलीला मी तिच्या डोक्यावर बसून तिच्या लाडक्याने केलेली घाण माझ्या देखत उचलायला लावली होती..
ही गोष्ट कळल्यावर तिच्या .' गोड, मवाळ, गरीब' दिसणार्‍या आईने आणी सत्संगी बापाने माझ्याशी बोलणे टाकले होते..

आमच्या शेजारच्यांचं कुत्र्याने आमच्या समोरच्या बंगल्याच्या एंट्रन्स गेटच्या मधेच घाण केली. २-३ दा झाल्यावर बंगल्याची मालकीण कुत्र्याच्या मालकीणीला बोलु लागली तर कुत्र्याची मालकीण तिच्याशी अरेरावी करत म्हणते कशी," अहो, कुत्र्यांच्या जागा ठरलेल्या असतात, ते आधी ज्या ठिकाणी घाण करतील तिथेच परत परत करतात...तुम्हाला समजते तरी का कुत्र्यांची सायकॉलॉजी? एखादी कुत्रं पाळुन बघा..मग समजेल"

आम्ही डोक्याला हात मारुन घेतला! ह्याच कुत्र्याने तो लहान असतांना (त्याला नविन आणले असेल तेव्हा) ५-६ दिवसरात्र कुई कुई करत आमची झोप घालवुन इरीटेट केलं होतं. Sad

मला हा धागा फार आवडलेला आहे.
आणि प्रत्येक प्रतिसादाला एक एक भला मोठ्ठा मोदक!

आय हेट डॉग्स! सध्यापुर्तं एवढंच बास !

Sumedha,
Tavleen singh ani dog asa google kara. Niyam sapadteel. Devnagarit lihita ala ki savistar lihito.

खरंतर आपल्या कुत्र्याने केलेली घाण आपणच उचलली पाहिजे हा नियम असायला हवा. (आहे की नाही माहित नाही!) पण आपण केलेल्या घाणीवर आपण पाणी टाकावे हे सुद्धा भारतीय लोकांपैकी खूप मोठ्या टक्केवारीला माहित/समजत/करायचे नसते तेव्हा आपल्या कुत्र्याची घाण आपण उचलणे हे फार म्हणजे फारच दूर राह्यले.

<<पण आपण केलेल्या घाणीवर आपण पाणी टाकावे हे सुद्धा भारतीय लोकांपैकी खूप मोठ्या टक्केवारीला माहित/समजत/करायचे नसते तेव्हा आपल्या कुत्र्याची घाण आपण उचलणे हे फार म्हणजे फारच दूर राह्यले.<< नी +१००००००

कुत्री (किंबहुना एकुणच सर्व पाळीव प्राणी) पाळण्याबाबत नेटवर सर्च केले असता बरेच मटेरियल सापडते. बरेचदा, जे प्रश्न विचारले आहेत ते कुत्र्यांना अथवा कुत्रेप्रेमींना त्रास होतोय या दृष्टिकोनातून विचारले आहेत. कारण पेटासारख्या संस्था कुत्र्यांवर अन्याय होता कामा नये हे एक बेसिक गृहितक मानून त्याभोवती फेर धरतात. नाण्याची दुसरी बाजू अजून अंधारात आहे.

काही उपयोगी लिंक्स :

http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/
http://india.angloinfo.com/family/pets/
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Cannot-ban-pets-in-societ...

पण प्रत्येक सोसायटी थोडेफार रुल्स करू शकते.

परवा दुपारी मी एका नवीन एरीयात गेले होते. दुपारची वेळ असल्याने एकदम शांतता होती. एक कुत्रा लांबून भुंकत भुंकत आला आणि माझ्या ऑलमोस्ट अंगावर चढेल इतक्या जवळ येऊन थांबला.

हा कुत्रा आता नक्की मला चावणार या कल्पनेने माझा श्वासच थांबला. मी कशीबशी तिथुन सटकले. पण त्या क्षणी आणि त्याच्यानंतरही मी काय फील करत होते हे शब्दात सांगणे अशक्य आहे.

अश्या वेळी जगातले सर्व कुत्रे मरुन जावेत असा (कितीही क्रुर वाटला तरी त्या क्षणी तो प्रामाणिक विचार होता. उगाच खोटं कश्याला लिहु?) विचार मनात आला जो अजुनतरी कायम आहे.

मधेय तर एका माणसाने एका भटक्या कुत्र्यावर ३ दिवस घरात डांबून अत्याचार केलेला होता

>> आधी नक्की त्याला एखादा भटका कुत्रा विनाकारण चावला वै. असणार.

पहाटेच्या वेळी फिरायला येणार्‍यांमध्ये अत्यंत संतापजनक वर्तन कोण करत असतील तर हे कुत्रेवाले...याना श्वानप्रेमी न म्हणता मग्रुरीने माजलेले लोक म्हटले पाहिजेत. हे मान्य की शहराबाहेरील टेकडी वा अशाच देवळाकडे जाणारा रस्ता फिरायला जाणार्‍यांच्या दृष्टीने आल्हाददायी असतो. पण मी समोर पाहात चालत असताना...अगदी डावीकडील रस्ता पकडून....तर गुर्मीत त्याच रस्त्याने समोरून दोन कुत्र्यांना घेऊन येणारा किंवा येणारी महाकाय वा महाकाया येत असते. एक कुत्रे उजव्या हातात तर दुसरे डाव्या...त्यांच्या गळ्यात किमान ८ फुटी चेन....ती ताणवता येईल तितकी ताणवून ती दोन्ही कुत्री हा सारा रस्ता मालकाच्या तीर्थरुपांच्या ७/१२ उतार्‍यावरील असल्याने मिजासीने फूटफूट जीभ बाहेर काढीत सिकंदराप्रमाणे चालत असतात. मग या रस्त्यावर अजूनही कुणी माणूस नामक प्राणी येत असेल, तो आपल्याला पाहून दचकेल....आपण भुंकलो तर पहाटेच्या अंधुक प्रकाशात त्याला चालता येणार नाही....असल्या कोणत्याही गोष्टी कुत्र्याच्या लक्षात तर येत नाहीत, पण त्या गब्बरसिंग सारख्या मालकाची बेपर्वाई तितकीच संतापजनक असते.

दोनतीन वेळा तर चक्क मारामारीपर्यंत प्रकरण झाले...कोल्हापुरी शिव्यांचा वर्षाव झाला...पण त्यातून निष्पण्ण काय होते ? तर आपले त्या पहाटेच्या फिरण्याचा सारा बोर्‍या वाजलेला असतो.

भटकी कुत्रीही असतातच फिरायला जाण्याच्या मार्गावर....ती दिसतात तशी थोराड पण मुद्दाम अंगावर येत नाहीत किंवा भुंकतही नाहीत...शिवाय तसे वाटलेच तर केवळ एक दगड उचलण्याचा आविर्भावदेखील त्याना दूर हाकलण्यासाठी पुरेसा असतो. सर्वात बेकार जात कुठली असेल तर ही पाळीव कुत्र्यांची.

नुकताच कटींगला गेलो असताना ऐकलेला किस्सा. आमच्या भागात गस्त घालणारे पोलीस दाढी करत होते. त्यात कुठुन्तरी भटक्या कुत्र्ञांचा विषय निघाला. तर ते सांगत होते रात्री साध्या वेषात गस्त घालताना या कुत्र्ञांनी त्यांना भंडावुन सोडले म्हणुन त्यांनी दगड मारुन पळवले तर आमच्या इथल्या कुणा कुर्ताप्रेमीने १०० ला फोन केला इथे कुत्र्ञांनी दगड मारत आहेत म्हणुन. हे सगळे वायरलेस वर ऐकणारे ते पोलीस डोक्याला हात लावुन शिव्यांची लाखोली वहात होते. Proud

भटकी कुत्रीही असतातच फिरायला जाण्याच्या मार्गावर....ती दिसतात तशी थोराड पण मुद्दाम अंगावर येत नाहीत किंवा भुंकतही नाहीत...शिवाय तसे वाटलेच तर केवळ एक दगड उचलण्याचा आविर्भावदेखील त्याना दूर हाकलण्यासाठी पुरेसा असतो.

>> अशी भटकी कुत्री कुठे असतात? मला तर त्यांचाही वाईट अनुभव आहे खुप Sad

कुंपणावरची अवस्था ना धड इथली ना धड तिथली -

भटके वयाने मोठे कुत्रे जेव्हा पाळले जातात आणि तेही अनेकांकडून म्हणजे दोन तीन कुत्रे एका सोसायटीतील काही मुलांनी पाळलेले तेव्हा त्या सोसायटीतल्या इतरांना राग ना दाखवता येत ना त्या कुत्र्यांना अ‍ॅक्सेप्ट करता येत.

आमच्या सोसायतीत चुकुन रात्री विंगचे दार उघडे राहिले की हे कुत्रे प्रत्येक मजल्यावर जाऊन बाहेर ठेवलेले कचर्‍याचे डबे ते पालथे करतात आणि सगलीकडे कचरा पसरवतात. हाकलून द्यावसं वाटतं त्या कुत्र्यांना सोसायटीच्या बाहेर.
त्या कुत्र्यांना सोसायटीच्या आवारात कुठेही खायला घातले जाते तेव्हा संताप येतो तसे करणार्‍यांचा. आणि ती कुत्री जेव्हा मागे मागे येतात अगदी पायाला चाटण्याइतके जवळ येतात तेव्हा त्यांच्या पेकाटात लाथ घालून हाकलावेसे वाटते. इइइइइइइ होते अगदी ते कुत्रे जवळ आले की.

सरमिसळ नको हे बरोबर, पण भटक्या कुत्र्यांना अगदी सोयिस्करपणे पाळीव कुत्र्यांसारखे खायला प्यायला घालून त्यांच्या घाण करण्याकडे किंवा सर्वसाधारण स्वच्छतेकडे तितक्याच सोयिस्करपणे दुर्लक्ष करणारे लोक अधिक चीड आणतात.

पाळीव कुत्र्यांच्या मालकांना घाण केली तर वगैरे जबाबदार धरता तरी येतं, या convenient dog-lovers चं काय करायचं? कारण ते म्हणणार आमचा कुत्रा नाही मग आम्ही का साफ करायची घाण.

पियू....

मी कोल्हापूरविषयी बोलू शकतो. शहराबाहेर पूर्व दिशेला प्रसिद्ध असे 'खडीचा गणपती देऊळ' आहे. माझ्या घरापासून साधारणपणे ४ किलोमीटर अंतर आहे....म्हणजेच शिवाजी पेठे ते गणपती देऊळ येताजाता ८ किलोमीटर अंतर मॉर्निंग वॉक म्हणून बरे होते. शहराबाहेरील शांत जागा यासाठीही तिकडे जाणारे भरपूर दिसतात. आता देऊळ हे असे एक ठिकाण आहे की त्या परिसरात भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य अगदी ठरलेले असते. त्याना खायाला घालणार्‍यामध्येही फिरायला आलेले जेष्ठ असतात....त्याना कोण अडविणार ? या खाण्याची चटक या कुत्र्यांना झाली आहे. १ ब्रेड आणि १० कुत्री...हे गणित चुकतेही....मग यांचा कोलाहल किंकाळ्या सुरू होतात, त्या ऐकत ऐकतच पुढचा रस्ता धरायचा....ही जमात तशी कुणाच्या अंगावर येत नाही हे खरे....पण त्यांच्या भुंकण्याची क्षमता पाहून आश्चर्य वाटते हे खरे.

एप्रिल २०१४ च्या अनुभवच्या अंकात डॉ समीर कुलकर्णी यांचा धर्मांतर हा ललित लेख आहे. त्यात त्यांनी स्वत:च्या कमालीच्या श्वानद्वेष्ट्या व्यक्तिमत्वाचे 'धर्मांतर' श्वानप्रेमात कसे झाले याचा उत्तम विवेचन आहे. एक आत्मचिंतनच म्हणा ना! अशोकरावांना नक्की आवडेल.
असो
एका उद्दाम श्वानप्रेमीचे वर्तनामुळे लोकांचा श्वान द्वेष कसा उफाळुन आला हे धाग्यात दिसले. मला तर वाटते श्वान द्वेष वा प्रेम हा भाग जैविक असावा इतका उपजत असतो. श्वानभीतीचे रुपांतर श्वानद्वेषात होताना काहींच्या बाबत दिसते.
समर्थाच्या घरचे श्वान त्यासही सर्व देती मान! असे काही से व्यंकटेश स्त्रोत्रात आहे.

Pages