रविवारी वर्तमानपत्राबरोबर एक जाहीरात आली होती जेवण/डबे पुरवण्याची सुविधा, नाव होते " द्रौपदीची थाळी". या नावाशी जरा थबकले आणि विचारचक्र सुरू झाले.
द्रौपदी पांडवांसह वनवासात असतांना एकदा अचानक श्रीकृष्ण त्यांना भेटण्यास येतो आणि द्रौपदीस लवकर जेवायला वाढण्यास सांगतो. अन्न शिल्लकच नसते, फक्त उष्टी-खरकटी भांडी तेवढी राहिली असतात. त्यातीलच भाताची काही शीते उरलेल्या एका भांड्यात द्रौपदी भक्तिभावाने एक तुलसिपत्र अर्पण करते व तेच श्रीकृष्णाला देते. ती शीते खाऊन तो परमात्मा तृप्त होतो व द्रौपदीला तुझ्या थाळीतले अन्न कितीही जणांची क्षुधा तुप्ती करू शकेल व त्यातील अन्न कधीच संपणार नाही असा वरही देतो.
तर अशी ही द्रौपदीच्या थाळीची कथा. वास्तविक श्रीकृष्णाला त्या अन्नाच्या क्वांटिटीशी नाही तर क्वालिटीशी कर्तव्य होते. तिचा भाव परिपूर्ण होता, त्यात जराही खोट नव्हती की कसला स्वार्थ नव्हता. होते ते फक्त नि:स्वार्थी प्रेम, ज्यापुढे तो परमात्मा हरला, त्या प्रेमाला भुलून त्याला तृप्तीचा ढेकर आला.
हे घडले जिच्या बाबतीत तीही द्रौपदी होती. कृष्णाची सखी, रुपा-वर्णाने त्याच्यासारखी आणि म्हणून त्याचेच नामाभिधान ल्यालेली "कृष्णा". 'देव म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणाजेच देव' हे समीकरण मनांत व आचरणात पूर्णपणे भिनलेली. कैक प्रसंगी कृष्णाच्या सगुण-साकार रुपाचा सहवास, मार्गदर्शन लाभलेली आणि म्हणूनच कदाचित त्याच्या आवडी-निवडीशी पूर्णतया परिचित अशी. ती हे निश्चितच जाणत होती की या माझ्या सख्याला मी वनवासांत असतांना माझ्याकडून कोणत्याही पंचपक्वान्नांची अपेक्षा नाही तर फक्त माझ्या निर्मळ प्रेमाची अपेक्षा आहे आणि असं शुद्ध, सात्विक प्रेमाचं प्रतिक असलेलं 'तुलसीदल' त्याला मोहवून गेलं.
मात्र विदूरपत्नी पारसवीचं काय? तिला तर द्रौपदीसारखा श्रीकृष्णाचा सहवास नक्कीच लाभला नव्हता. हस्तिनापुरात शांतिदूत म्हणून आलेल्या श्रीकृष्णाचे कोणतेच बोलणे कौरवांनी मान्य केले नाही आणि संतापून श्रीकृष्णाने त्याच्यासाठी आयोजित केलेले शाही भोजन नाकारून विदुरांच्या पर्णकुटीत भोजन घेण्याची इच्छा प्रदर्शित केली. राजवाड्यावरच श्रीकृष्णासाठी आयोजित केलेल्या भोजन समारंभास उपस्थित राहणार असलेले आचार्य विदूर मधेच अचानक घरी परत येतात काय आणि त्यांसह साक्षात भगवान श्रीकृष्ण !! ज्याला आजपर्यंत फक्त देवघरात आणि मनातच भजले - पूजले होते तो तिचा साक्षात 'सावळा हरी' तिच्यासमोर असा ध्यानी-मनी-स्वप्नी नसतांना उभा ठाकतोय आणि तिला सांगतोय, " आई, फार भूक लागलीय जे असेल घरात ते वाढ". काय त्या माऊलीच्या जीवाची घालमेल झाली असेल? एक तर घरात पाकसिद्धी नाही आणि हा माझा देव म्हणतोय जे असेल ते वाढ. "भगवान, फक्त केळी आहेत" पारसवी म्हणाली. "हो,हो केळीच दे अन तुझ्या हाताने भरव बरं का" इतकं भरुन आलं वेडीला. आपल्या देवाला आपल्या गरीबाच्या पर्णकुटीत स्वतःहून अन्नग्रहण करण्यासाठी आलेलं पाहून. अगदी भारावून गेली पारसवी. मन म्हणत होतं, "डोळे भरुन बघू दे माझ्या भगवंताला एकदा". एकटक त्याच्यावर खिळलेली नजर आणि नेत्री अश्रूंची संततधार.... पुढ्यात केळ्यांचे तबक आणि हात केळी सोलण्यात गर्क. सोलता सोलता एक-एक घास भरवतेय त्या श्रीहरीला आणि तोही तसाच तिच्याकडे एकटक बघत तिच्या निर्मळ प्रेमाला प्रतिसाद देत केळी खाऊन तृप्त होतोय. बघता बघता सगळी केळी संपली आणि पारसवीची समाधीही भंगली. पहाते तर काय, खुळीने केळ्याचा गर फेकून दिला होता आणि साले भरवली होती कृष्णाला. पण त्याने मात्र तिला काहीच वावगे भासू न देता आवडीने साले खाल्ली, तृप्त होत. कसलाही फरक केला नाही, द्रौपदीत आणि तिच्यात !
शबरीची उष्टी बोरेही रामरायाला अशीच तर मोहवून गेली.
असा हा भावाचा भुकेला 'संभवामि युगे युगे' या स्वतःच्या ब्रीदाला जागत अवतार घेतो काही हेतूने, खल निर्दालनासाठी, पण सुष्टांचं काय? त्यांना असंच स्वतःचे सखे-सवंगडी, भक्त, भोळे जन बनवून त्यांच्या पदरात असे सुखाचे क्षण घालत असतो, स्वतःजवळचं नवनीत लुटवत....
नजीकच्या काळात अनेक संत होऊन गेले. त्यांपैकी शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तगणातील एकाचा अनुभव असाच, द्रौपदी-पारसवीशी साधर्म्य सांगणारा.
हा साईभक्त शिर्डीत साईनाथ देहधारी असताना मुंबईतील वांद्र्यात आपल्या घरी साईनाथांच्या फोटोची नियमितपणे पूजा करून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवत असे. आईही साईभक्त. एकदा आईच्या इच्छेसाठी आईसह शिर्डीला निघाला साईदर्शनाला. जातांना आपला साईपूजन व नैवेद्याचा नेम वडिलांकडे सोपवला. वडिलही नेमाने पूजा, नैवेद्य करू लागले. पण एक दिवस नैवेद्य दाखवण्यास विसरले. त्याच दिवशी शिरडीत साईंनी या मुलाला सांगितले की "आज मी नेहमीसारखा दुपारच्या वेळेला वान्द्र्याला गेलो असतांना मला घरी काही खायला मिळाले नाही व भुकेल्या पोटी माघारी फिरावे लागले". वास्तविक साईनाथ शिरडी सोडून कधीच बाहेर जात नसत. मुलगा लगेच समजला की आपले वडील बहुधा नैवेद्य विसरले असावेत व त्याने साईनाथांकडे याबद्दल क्षमायाचना केली.
हे वाचून असे वाटू शकते की स्वतः शिर्डीत साईंसमक्ष असतांना या सार्या खटाटोपाची गरजच काय होती?नैवेद्य इथेच दाखवता आला असता. तसेच साईबाबा अगदी टपून बसले होते की काय चुका दाखवायला?
मात्र साईंचा हेतू त्याची वा वडीलांची चूक लक्षात आणून देऊन त्यांना दुखवणे असा नसून त्यांच्या भक्तीचे दृढीकरण करणे हा होता. मुंबईतील घरात केल्या जाणार्या पूजा व नैवेद्याची मी शिरडीत असूनही दखल घेतो. तुझ्या पूजेचा व नैवेद्याचा नेम मी जाणतो हे त्याच्या निदर्शनास आणून देणे हा हेतू होता. ज्या एका शीतामुळे श्रीकृष्णाला तृप्तीचे ढेकर आले, तो एक खडीसाखरेचा कण, एक दिवस मिळाला नाही म्हणून साईनाथ भुकेने कासावीस झाले. या मुलाचा भावही द्रौपदीसारखाच पवित्र होता म्हणून त्याला अशी प्रचिती आली.
या सार्या कथा, पोथ्या-पुराणांत देवापेक्षाही त्याच्या भक्तांची वर्तणूक मला जास्त भावते.आपल्या सारखेच सामान्य भोळे-भाळे आयुष्य जगत असतांना त्यानी केलेले आपल्या देवावरील प्रेम.... हो प्रेमच! भक्ती, साधना, उपासना वगैरे सारे वरच्या पातळीवरचे. तेथपर्यंत काय माहित केव्हा पोहोचू? पोहोचू तरी की नाही, पण माझ्यासाठी भक्तीची व्याख्या आहे देवावर असलेले आपले प्रेम व ते व्यक्त करायची आपल्याला आवडेल ती पद्धत. कुणाला पूजा-अर्चा आवडते, कुणाला नामस्मरण तर कुणी आपल्या कामालाच देव मानून त्यावर नितांत प्रेम करतात. तर अशा भक्तांचे आपल्या देवाप्रति असलेले प्रेम अशा कथांतून वाचतांना, न्याहाळतांना आपणही ते प्रेम अनुभवू लागतो आणि हा प्रेमांकुर आपल्या मनीही रुजू लागतो. अशा भक्तांचे वागणे, बोलणे पाहून, त्यांनी त्यांच्या देवावर केलेले असे निरपेक्ष प्रेम पाहून त्या तृप्तीच्या ढेकराची अनुभूती घेऊ शकतो आणि अशा नि:स्वर्थी, निर्मोही प्रेमाची अनुभूती ही आपणांस मिळणारी काही शांत, तृप्त क्षणांची शीतल संजीवनीच आहे या धकाधकीच्या, स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त जीवनात. नाही का?
आवडल
आवडल
खूप भावलं. विशेषतः शेवटी
खूप भावलं. विशेषतः शेवटी केलेलं विश्लेषण.
मस्तं!
मस्तं!
सुंदर लिहिलं आहेस आशिका
सुंदर लिहिलं आहेस आशिका
साईसच्चरितात सुतक्याच्या हातचा पेढा साईनाथ मागमागून घेतात आणि खातात ती कथा पण आठवली. खरंच देव भावाचा भुकेला.
आवडल. माझ्या मते, जर आपण दोन
आवडल.
माझ्या मते, जर आपण दोन घास एखाद्या भुकेल्याला देउ शकलो, तर ते देवाला नक्की पोहोचतात.
माझ्या मते, जर आपण दोन घास
माझ्या मते, जर आपण दोन घास एखाद्या भुकेल्याला देउ शकलो, तर ते देवाला नक्की पोहोचतात.>>> नक्कीच
छान!
छान!
स्वस्ति, मनीमोहोर, सुप्रिय१९,
स्वस्ति, मनीमोहोर, सुप्रिय१९, अश्विनी के, संकुल, मंजुडी धन्यवाद.
@ सन्कुल - माझ्या मते, जर आपण दोन घास एखाद्या भुकेल्याला देउ शकलो, तर ते देवाला नक्की पोहोचतात.>> पोहोचतातच आणि आवडतातही.
@ आश्विनी:- सुतक्याची कथा आठवली. साईसच्चरित म्हणजे तर खाण आहे अशा कथांची, कुठली सांगू व कुठली नको असे व्हावे. खिचडी भोजन, वांग्याचे भरीत आणि काचर्या, वालपापडीच्या शेंगा, पेरु किती गोष्टी गं...एकसे एक सरस
शेवटचा परिच्छेद अप्रतिमच
शेवटचा परिच्छेद अप्रतिमच ....
लोग कहते हैं भगवान खाते नही |
भिल्लीनीकी तरह हम खिलाते नही |
शाकप्रेमी विदुर सब जिमाते चले | कृष्ण गोविंद गोपाल गाते चले....
सुंदर लिहिलं आहे. खुप आवडलं
सुंदर लिहिलं आहे. खुप आवडलं
सुरेख लिहिलंय
सुरेख लिहिलंय
नारद भक्तिसूत्रांतील 'अथातो
नारद भक्तिसूत्रांतील 'अथातो भक्ति व्याख्यास्याम: - सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा | अमृतस्वरूपा च | यल्लब्ध्वा पुमान् सिध्दो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति ||' हे आठवले. छान लिहिले आहे.
छान ! नास्तिक आहे मी स्वता,
छान !
नास्तिक आहे मी स्वता, त्यामुळे यातील देव बाजूला सारला तरी भावार्थ आवडला
आवडले
आवडले
स्वतःजवळचं नवनीत लुटवत...>>
स्वतःजवळचं नवनीत लुटवत...>> इथपर्यंत आवडली! मस्त..