नाचणीची आंबील ( रागी सूप)

Submitted by मनीमोहोर on 3 May, 2014 - 09:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

होळी झाली की " उन्हं तापायला लागली गो ss. आता, आंबीलीच पीठ भिजवायला सुरवात करायला हवी, म्हणजे पोरांच्या अंगावर घामोळं, गळवं काही उठणार नाही " असं मनाशी म्हणत आंबील करण्याची तयारी केली जाते त्या आंबीलीची रेसिपी मी सांगणार आहे. नाचणीची आंबील हे आदिवासी लोकांचे प्रमुख अन्न आहे आणि असं ही वाचलेलं स्मरतयं की त्यांना मीठाचा वापर माहित नसल्यामुळे ते चवीसाठी आपल्याच हाताचा अंगठा चोखतात. घाबरू नका आपण मीठ वापरणार आहोत या रेसिपीत. नाचणी सारख्या पौष्टिक पदार्थापासून बनलेली, आंबवल्यामुळे पचायला अधिकच हलकी झालेली, न्यूनतम उष्मांक आणि मसाले असूनही चवीष्ट असलेली, उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देणारी अशी ही नाचणीची गरम गरम आंबील. एक शिक्रेट सांगते आंबील म्हणाल तर तरुण पिढी आणि लहान मुलं बोट लावणार नाहीत पण "रागी सूप" असे नाव दिलेत तर मिटक्या मारत खातील.
साहित्य

अर्थातच नाचणीचं पीठ ( बाजारात तयार मिळते. सत्व नाही पीठ. ) , मीठ, हिंग आणि पाणी

क्रमवार पाककृती: 

आम्बील करण्यासाठी आधी कल्चर करणे आवश्यक आहे, त्याची कृती अशी.

एका काचेच्या छोट्या बोल मध्ये चार चहाचे चमचे नाचणीचे पीठ घेऊन ते भ़ज्यांच्या पीठा इतपत सरबरीत भि़जवून चोवीस तास ठेवून द्यावे. चोवीस तासांनंतर त्यात आणखी चार चमचे पीठ घालून परत भज्यांच्या पिठाइतपतच सरसरित भिजवून आणखी चोवीस तास ठेवून द्यावे. चोवीस तासांनंतर म्हणजे प्रोसेस सुरु केल्यापासून अठ्ठेचाळीस तासानी ( दोन दिवसानी) ते पीठ फुगून वर आलेले दिसेल. हे झाले कल्चर तयार. लगेच वापरायचे नसेल तर हे फ्रीज मध्ये ठेवू शकता. दह्याच्या विरजणासारखे ५-६ दिवस आरामात रहाते. ते असे दिसते.
From mayboli
प्रत्यक्ष आंबील करताना
एका पातेल्यात साडेतीन कप पाणी उकळावयास ठेवावे. त्यात चवीप्रमणे मीठ आणि चिमटीभर हिंग घालावा. अर्धा कप पाण्यात वरील कल्चर पैकी साधारण निम्मे कल्चर चांगले मिक्स करावे आणि ते उकळी आलेल्या पाण्यात गॅस मंद करून घालावे व सतत ढवळत रहावे नाहीतर गुठळ्या होतात. दोन उकळ्या आल्या की पिठाचा रंग बदललेला दिसेल. म्हणजे आंबील तयार झाली. पातळ पिठल्या इतपत कन्सीटंसी ठेवावी. घट्ट वाटली तर पाणी घालता येते पण पात्तळ झाली तर काही करता येत नाही म्हणून पाणी बेतानेच घालावे. तयार झालेली आंबील
From mayboli

वाढणी/प्रमाण: 
माणशी अंदाजे एक कप
अधिक टिपा: 

१) एक चमचा पीठाची साधारण एक कप आंबील तयार होते.
२) आयडियली ही उन्हाळ्यात आमरसाच्या जेवणात सर्वात शेवटी घेतात कारण हिची नैसर्गिक आंबट चव इतकी मस्त असते की त्या नंतर काहीही दुसरे खाऊ नये असे वाटते. पण आपण न्याहारीला किवा दुपारी चार वाजता ही घेऊ शकता. थोडी मोठी छोटी मुले कल्चर तयार असेल तर आपली आपण ही करुन घेऊ शकतात. मॅगी सारखी पण मॅगी पेक्षा कितीतरी पट पौष्टिक आणि चवदार ही
३) ह्या कल्च्ररचा आंबटपणा ते जसं जुनं होतं तसा वाढत जातो म्हणून आपल्या आवडीप्रमाणे कल्चरची मात्रा आणि आंबवण्याचा वेळ कमी जास्त करावा. जस आपण दह्याच्या बाबतीत करतो तसं. हे काही कठीण नाही अजिबात. एक दोन दिवसात ते आपल्याला सहज जमेल.
४) अगदी थोडा आंब्याच्या लोणच्याचा खार किंवा अगदी दोन चमचे ताक घातले तर हिची चव अजून खुलते. काहीही न घालून सुध्दा छान लागते.
५) ही गरम गरमच खावी.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई, कोकणातील पारंपारिक रेसिपी आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! ही कृती माझ्यासाठी नविनच आहे. नाचणीच्या साध्या पीठ पाण्यात हिंग, मीठ घालून खाल्लं आहे. ते फारच आवडीचं ही आहे. पण हे भारीच. धन्यवाद.

आमच्या घरी उन्हाळा सुरु झाला की लगेच आंबील लागतं.. आई ठेचलेला लसुन घालते..
पण आम्ही हे सुप गार करुन त्यात ताक मिक्स करुन घेतो ... Happy

माझ्यासाठी पण नवीन आहे ही कृती. मी तूप, जिरे, हिंग, लसूण अशी फोडणी करून त्यात थोडे पीठ भाजते आणि मग पाणी, ताक आणि थोडं तिखट, आणि आले घालून ढवळून शिजवते.

ममो....ब्येष्ट!
पुरातन कालात माझे आजोबा ही आंबील प्यायचे/खायचे. ते उन्हाळी वातावरण तो आंबिलीचा आंबूस वास, आणि सोप्यावरच्या सतरंजीवर शिसवी खांबाला टेकून ठेवलेल्या तक्याला टेकलेले आजोबा डोळ्यासमोर आहेत. पण तेव्हा कल्चरची व्हायची की कशाची माहिती नाही.
मी उन्हाळ्यात हमखास करते. पण अन्जूच्या रेसिपीने.

छान प्रकार.. आणि मस्त सविस्तर लिहिलाय.
अगदी एकनाथांच्या काळाच्या आधीपासून आपल्याकडे प्रचलित आहे.

( त्यांच्या भारुडातल्या ओळी..
बाई मी भोळी, बाई मी भोळी
आपण खाते पुरणपोळी
नवर्‍याला देते आंबिल शिळी ... )

आंबिल प्यायल्यावर बराच वेळ तहान लागत नाही.

दूर्गाबाई भागवतांनी लिहिल्याप्रमाणे गिरीजन मातीच्या घड्यात थोडी आंबिल शिल्लक ठेवतात आणि त्यातच दुसर्‍या दिवशीची आंबिल शिजवतात. काही अशुभ घटना घडली तरच तो घडा फोडतात. )

आफ्रिकेतही असा प्रकार खाल्ला जातो. हे पेय बाटलीबंद मिळते. मादक नसते.

दिनेशदा, मस्त आहे भारुड. इथे अवांतर आहे (sorry) पण तुम्ही भारुडावर लेख लिहाना, जर तुम्हाला माहिती असेल तर किंवा लिहिला असेल तर लिंक दया माझ्या विपुत.

नाही अन्जू, तेवढा अभ्यास नाही पण माझ्या डोक्यातलं लिंकिंग पक्क आहे. एकावरून दुसरे आठवत जाते, एवढेच.

न्यूनतम उष्मांक आणि मसाले असूनही चवीष्ट असलेली, >> नसूनही हवे का Uhoh

पदार्थ छान वाटतओय. करुन पहाण्यात येइल Happy

वर्षा-म, मला वाटत , असूनही हेच बरोबर आहे कारण न्यूनतम म्हणजे कमीत कमी. ह्यात कमीत कमी उष्मांक आहेत.नसूनही वापरले तर अर्थ उलटा होईल.

मस्त रेसीपी. Happy
आई नेहमी करते. पण फक्त रात्रभर भिजविते. दोन दिवस नाही.
ऐनवेळी शिजल्यावर लसूण घालते. आणि पिताना आवडीप्रमाणे थंड ताक मिक्स करते. त्याने आणखी थंड वाटते.

मला नाचणीचं सत्त्व शिजवून त्यात ताक + जिरं + मीठ + (ऐच्छिक)मिरची - अशी आंबिल माहिती होती.
नाहीतरी इथे तयार सत्त्व मिळत नाही, पण पीठ मिळतं - तेव्हा अशी करून बघेन.

तांदळाच्या पापड्या, गव्हाचा चीक आवडतो त्यामुळे हेही आवडेल असं वाटतंय.

हा असा काही पदार्थ अस्तित्वात आहे हेच मला माहिती नव्हतं.

गव्हाचा चीक अजिबात आवडत नाही त्यामुळे आणि स्वाती आंबोळेंनी त्यांना हा प्रकार आवडेल असं लिहिल्याने मला आवडणार नाही अशी खात्री आहे Proud

देशावर ज्वारीची आंबील करतात असं ऐकून आहे पण माहित नाही कशी करतात ते. आमच्याकडे कोकणात नाचणीचीच करत्तात. घरची असते ना म्हणुन असेल कदाचित.

रागि अम्बिल मस्त जमलय. आता पावसाळा सुरु आहे ना. तर पावसाळ्यात हमखास केला जाणारा कोकणातला एखादा पदार्थ द्या ना. अर्थात बेबिला सम्भाळून जमल तरच !:)

हेमाताई, हे वाचून मी एकदा कल्चर करायचा प्रयत्न केला होता. पण त्याला वाईट प्रकारचा आंबूस वास यायला लागला. मग त्यापासून आंबिल करायचा धीर झाला नाही. स्वयंपाकघर व्यापून राहणारा आंबूस वास येतो का या कल्चरला? मी पिठाऐवजी सत्व वापरले होते त्यामुळे फरक पडला असावा का?

दीपा, धन्यवाद.
आता पावसाळा सुरु आहे ना. तर पावसाळ्यात हमखास केला जाणारा कोकणातला एखादा पदार्थ द्या ना. >>>> देईन एखादी कोकणातली पावसाळ्यातच केली जाणारी रेसिपी.

माधव, असा आंबुस वास जराही येत नाही मी सांगितलेली प्रोसिजर परत तंतोतंत फॉलो करुन बघा आणि नाचणीचे पीठच घ्या सत्व नाही. सत्वामध्ये त्यातली फायबर काढुन टाकतात म्हणुन झाल असेल तस एखाद वेळेस. अगदी करताना ही आंबूस वास सुटत नाही. चव मात्र नैसर्गिक आंबट असते.

तुम्हाला नवल वाटेल कदाचित पण आमच्या घरी कोकणात ती एवढी पॉप्युलर आहे की आमरसाच्या पेक्षा दुप्पट लागते. ( स्मित )

आमच्यात आधल्या दिवशी किंवा सकाळी भिजवुन लगेच करतात. तांदूळ , ज्वारीची पीठेही घालतात व ताक घालुन उन्हाळ्यात पितात.

Pages