किन्वा बिर्याणी

Submitted by मीपुणेकर on 30 April, 2014 - 21:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१>किन्वा - ३ वाट्या
२>खडा मसाला : तमालपत्र -१, जीरे- फोडणीचा चमचा भरुन, दालचीनी- पेरभर २ तुकडे, मसाला वेलची -१ मोठी, काळीमिरी - ४,५ दाणे भरडून
३>जीरे धणे पावडर - प्रत्येकी एक चमचा, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला - १ चमचा
४>आलं, लसुण, मिरची वाटून किंवा अगदी बारीक चिरून - प्रत्येकी एक चमचा
५>भाज्या - १ लहान कांदा, १ टोमॅटो + बीन्स, गाजर, लाल/हिरवी सिमला मिरची, फ्लॉवर चे तुरे, बटाटा, मटार, मक्याचे दाणे (या पैकी सर्व किंवा आवडतील त्या भाज्या एकूण ३ वाट्या)
६>फोडणीसाठी तेल - २ चमचे,
७>लिंबाचा रस - २ चमचे, पाणी - ५ वाट्या
८>हळद - अंदाजाने,मीठ - अंदाजाने
बारीक चिरलेली भरपूर कोथींबीर बिर्याणीवर घालायला

क्रमवार पाककृती: 

१>सर्वप्रथम किन्वा पाण्यात स्वच्छ धुवून मग त्यात किन्वा बुडेल ईतके पाणी घालून भिजत ठेवावा (१५ मि.) तोपर्यंत बाकीची तयारी करुन घ्यावी.
२> कांदा उभा बारीक चिरुन घ्यावा, ईतर सर्व भाज्या चिरुन घ्याव्या.
३>फोडणीचे तेल तापत ठेवावे, तेल तापले कि जीरे व ईतर खड्या मसाल्याचे साहित्य एकेक करुन घालून किंचीत परतून घ्यावे.
४>मग बारीक पातळ चिरलेला कांदा फोडणीत टाकून परतून घ्यावा.
५>आलं लसूण्,मिरचीचा ठेचा फोडणीत घालून परतून घ्यावा.
६>कांदा सोनेरी ब्राऊन झाला कि भिजवलेला किन्वा घालून २ मि. परतावा ( त्या आधी किन्वा छान निथळून घ्यावा, किन्वा भिजवलेले पाणी बागेत झाडाला घालावे Wink )
७>त्यात सिमला मिरची व टोमॅटो सोडून बाकी भाज्या घालून हळद, जीरे धणे पावडर घालून २ मि. परतावे.
८> आता पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे, बिर्याणी मसाला/गरम मसाला व लिंबाचा रस घालावा.
९> पाण्याला उकळी आली की मिश्रण नीट हलवून झाकण लावून मंद गॅसवर १५ मि. ठेवावे.
१०>१५ मि. ने झाकण काढून त्यात सिमला मिरची, टोमॅटो घालावे. एव्हाना बिर्याणी शिजत आली असेल . अजून थोडा वेळ ~१० मि. मंद गॅस वर शिजवावी.
११>तयार बिर्याणी चिरलेली बारीक कोथींबीर घालून ताक /दही /रायता /पापड /लोणचं बरोबर सर्व करावी.

वाढणी/प्रमाण: 
जर हाच पदार्थ मुख्य जेवण म्हणून असेल तर ३,४ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. बिर्याणीमध्ये मऊसर पडलेली सिमला मिरची मला आवडत नाही, जरा क्रंची छान लागते. टोमॅटो पण रस न होता अखंड तुकडा दिसेल ईतपतच वाफवलेले आवडतात, त्यामुळे ते खूप वेळ शिजवलेले नाहीत. पण तशी काही अट नसेल तर ईतर भाज्यांबरोबर या घालता येतील Happy
२. बिर्याणी मुरल्यावर दुसर्‍या दिवशी जास्त छान लागते.
३. ही बिर्याणी नेहेमीच्या साग्रसंगीत बिर्याणीपेक्षा खूप कमी वेळात होते, चवीला अतीमसालेदार होत नाही.
४. यामधे बाकी ऐच्छीक मालमसाला (पुदीना, तळलेला कांदा, काजू ई) वगैरे आवडीनुसार वापरुन बघता येइल.
५. शेवटी भाताची बिर्याणी ती भाताची बिर्याणीच, ही किन्वा बिर्याणी काही चवीत त्याची १००% रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. Happy पण किन्वा पोटात जाण्यासाठी आत्तापर्यंत केलेल्या पदार्थात हा प्रकार आवडीने खाल्ला गेला.

माहितीचा स्रोत: 
खरतर सुरवातीला नेहेमीची भाताची बिर्याणी करतो त्याप्रमाणे तांदुळाऐवजी किन्वा वापरला. मग दरवेळी किरकोळ फेरफार करत जसे की मसाल्याचे प्रमाण, किन्वा पूर्ण शिजून पण मोकळा रहाण्यासाठी पाण्याचे प्रमाण, पदार्थ शिजण्याचा वेळ ई आता या प्रमाणे करते.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच, करुन बघेन या आठवड्यात.
किन्वा पांढराच वापरला आहे ना? इथे ट्रेडरजोज मध्ये काळा आणि लाल पण बघितला आहे म्हणुन विचारले.

करुन बघितली, आवडला हा प्रकार. केला जाईल आता अधेमधे. एकदम हेल्दी पण टेस्टी.
मी ट्रे जो चा ट्रायकलर किन्वा वापरला, किन्वा आधी भिजवून ठेवत असल्याने पाण्याचं प्रमाण एकास दोन पेक्षा किंचीत कमी केलं तरी चालेल असं वाटलं.

भगवती,Quinoa नावाने गुगल करा. सर्व माहिती मिळेल. Happy
मीपू मस्त दिसत आहे ताट. किन्वाच आणि माझ तंत्र अजून जमलेल नाही. तरी पुढच्या वेळी किन्वाच काही केल तर करून बघेन .