प्रत्येकाला स्वप्ने पडतात. त्यात त्याला फारसं काहीच करावं लागत नाही. त्याबद्दल आधी एका धाग्यात http://www.maayboli.com/node/44262 लिहिलं होतं.
पण जी स्वप्ने जागेपणी बघितल्या जातात, मग ती पूर्ण करणे स्वतःच्या हातात असो किंवा दुसर्याच्या, त्या स्वप्नांना एक विशेष अर्थही असतो, असं मला वाटतं. त्यातलीच काही स्वप्ने. कधी ती अचानक कोणीतरी पुर्ण करतो, तर काही अजुनही अधुरीच.
स्पर्धा परिक्षा - मग ती साधी स्कॉलरशीपची असो किंवा अगदी लोकसेवा आयोगाची, वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याची कला आत्मसात असणे खुप गरजेचे आहे. अश्या वस्तुनिष्ठ परिक्षांसाठी बरिचशी पुस्तके उपलब्ध आहेत. पण केवळ त्या पुस्तकातुन प्रॅक्टिस करणे बरेचदा कंटाळवाणे वाटू शकते (किमान मला तरी वाटते). कारण आधी ते प्रश्न सोडवायचे, मग ते उत्तर चुक की बरोबर ते शोधायचे/ किंवा ताडुन बघायचे. यात वेळेचा अपव्यय जास्त वाटतो. त्यापेक्षा संगणकिय प्रोग्राम असेल तर.... पण हा असा प्रोग्राम केवळ त्याच लोकांच्या कामाचा असेल, ज्यांच्या घरी संगणक आहे. पण त्या कित्येक मुलामुलींचे काय, ज्यांना पुस्तके घेणेही आर्थिकदृष्ट्या थोडेसे कठीण आहे, तर संगणक तर दुरचीच गोष्ट. मग कमीतकमी खर्चात स्पर्धापरिक्षेची तयारी कशी होईल, जेणेकरुन आर्थिकदृष्ट्या सर्वांना परवडेल, हा विचार सतत मनात घोळतो.
८ दिवसांपुर्वी एक टॅब घेतला. अन हे स्वप्न पुर्ण होवु शकेल, असं वाटुन गेलं. अजुनही कुठे शांतपणे बसलो की डोळ्यासमोर येते ती एक प्रशस्त वास्तू, ज्यात अनेक असे टॅब्ज/ स्क्रीन्स असतील, ज्यावर स्पर्धा परिक्षेची तयारी करणारी मुलंमुली वेगवेगळ्या परिक्षांसाठी तयारी करत असतील. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर की चुक लगेच कळेल, ते तसच का, याच्या स्पष्टिकरणासह. एका विद्यार्थ्याला एक टॅब म्हणजे अंदाजे रु.५००० पेक्षा कमी खर्च. संगणकाच्या मानाने खुपच कमी. MCQ बनवायची सॉफ्टवेअर्स मोफतही उपलब्ध आहेत, बस गरज आहे आता एका कृतीची........लाखो वेगवेगळी प्रश्न आणि त्यांची अनेक उत्तरं, आणि थोडसं प्रोग्रामिंग...
लौकरच हे स्वप्न पुर्ण होईल अशी आशा आहे. बघुया नविन वर्ष काय घेउन येतं ते.