‘व्हिसल् ब्लोअर’चे हौतात्म्य - श्री. आनंद आगाशे

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल सर्वांना माहिती मिळावी, त्यांचं कार्य पुढे सुरू राहावं, या हेतूनं सुरू केलेल्या मालिकेतला दुसरा लेख लिहिला आहे ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्री. आनंद आगाशे यांनी.

साक्षेपी संपादक व पत्रकार म्हणून श्री. आनंद आगाशे यांचा देशभर लौकिक आहे. भारतातल्या आणि परदेशातल्या असंख्य वृत्तपत्रसमूहांशी ते निगडित असून भारतातल्या अग्रगण्य इंग्रजी व मराठी वृत्तपत्रांमध्ये गेली तीन दशकांहूनही अधिक काळ पत्रकारितेचा त्यांचा अनुभव आहे. पुण्याच्या ’द इण्डिपेण्डंट’ आणि दिल्लीच्या ’द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांचे ते विशेष प्रतिनिधी होते. पुण्याच्या ’द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये त्यांनी मुख्य वार्ताहर म्हणूनही काम केलं आहे, तसंच पुण्याच्या ’द टाईम्स ऑफ इंडिया’चे ते ब्यूरो प्रमुख होते. 'गोमांतक' समूह, गोवा यांचं मुख्य संपादकपद, मुंबई 'लोकसत्ते'चं साहाय्यक संपादकपद आणि पुणे 'लोकसत्ते'चं निवासी संपादकपद त्यांनी भूषवलं आहे. ’सकाळ मीडिया ग्रूप’चे ते संचालक-संपादक होते. श्री. आगाशे सध्या मीडियानेक्स्ट प्रा. लि. या मल्टिमीडिया कंटेंट क्षेत्रामध्ये काम करणार्‍या कंपनीचे अध्यक्ष असून 'मेनका प्रकाशना'चे संपादक आणि प्रकाशक आहेत.

***

‘व्हिसल् ब्लोअर’चे हौतात्म्य - श्री. आनंद आगाशे

अपप्रवृत्ती आणि भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आवाज उठवू पाहणार्‍या ‘व्हिसल् ब्लोअर्स’चा खातमा करून टाकण्याची एक भयावह प्रथा गेल्या काही वर्षांत आपल्या देशामध्ये वेगाने मूळ धरत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवारी (२० ऑगस्ट) सकाळी पुण्यात भररस्त्यात झालेली हत्या हा अशाच एका ‘व्हिसल् ब्लोअर’चा घडवून आणला गेलेला अंत होता.

अंधश्रद्धा आणि जादूटोण्याविरोधात दाभोलकरांनी फुंकलेल्या रणशिंगामुळे सनातन्यांची, अतिरेक्यांची झोप उडाली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून डॉक्टरांनी धर्माच्या नावाखाली शतकानुशतके चालू असलेल्या अनिष्ट प्रथांना पद्धतशीरपणे विरोध सुरू केला त्याला दोन दशकांहून अधिक काळ लोटला. कित्येक प्रसंगी दोन हात करण्याची वेळ आली, शिव्यांची लाखोली वाहिली गेली, धमक्यांची बरसात झाली, पण हा उमदा, निडर गडी दबला नाही. महाराष्ट्रभर प्रचंड संख्येने चाहत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सक्रीय संच असूनही या विचारशील नेत्याने सदनशीर मार्गाची कास सोडली नाही. थेट जनतेमधे जाऊन बुवाबाजी आणि अनिष्ट रुढींविरोधात जागृती करणे, ‘साधना’ साप्ताहिकातून बुद्धिप्रामाण्यवादी आचार-विचार शैलीचा पुरस्कार करणे, आणि राजकीय क्षेत्रातील विविध छटांच्या पुढार्‍यांशी संवाद राखत चळवळीला कायद्याचे पाठबळ मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, ही त्रिसुत्री दाभोलकरांनी प्राणपणाने निभावली, प्राण जाईपर्यंत जपली.

ध्येयाने झपाटून जाऊन दीर्घकाळ काम करणार्‍या अनेकांमधे काळाच्या ओघात एक अस्थायी आक्रमकता डोकावू लागते. यशापेक्षा अपयशाचे प्रसंग वाढायला लागतात तसतशी त्यांच्या स्वभावाला असहिष्णुतेची झालरही घट्टपणे चिकटते. दाभोलकर याला सन्मान्य अपवाद होते. विद्यार्थीदशेत ते अव्वल दर्जाचे कबड्डीपटू होते. त्या खेळाच्या मैदानावर आत्मसात केलेली खिलाडूवृत्ती हा त्यांच्या एकूण वागण्याचाच स्थायीभाव होता. त्यामुळेच उच्च कोटीची बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि जनमान्यता असूनही प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा हा माणूस कायम विनयशील राहिला. सर्वच बाबतीत अत्यंत ‘खुजी’ माणसे त्यांच्याशी आडदांडपणा करू पाहत, तेव्हासुद्धा दाभोलकरांचा आग्रह मात्र संवादाचाच असे. अशा प्रकारची तत्त्वनिष्ठ ऋजुता आपल्या सार्वजनिक जीवनातून सध्या जवळपास लोप पावली आहे.

संवादाला कधीच नकार न देणार्‍या आणि संवादातून कायमच समाजहितकारक बुद्धिवादी भूमिका पटवून देण्याची असामान्य क्षमता बाळगणार्‍या माणसाला कसे थोपवायचे? स्वतःपलीकडचे फारसे पाहू न इच्छिणार्‍या राजकीय मंडळींनी दाभोलकरांना थोपविण्यासाठी कालहरणाचे अस्त्र वापरले, तर जादूटोणाविरोधी कायद्याने ज्यांची ‘दुकाने’ बंद होणार होती, त्या तमाम डँबिसांनी कर्कश गोंगाट करून दाभोलकरांचा आवाज बुडवून टाकण्याचा पवित्रा घेतला. दाभोलकर या दोघांनाही पुरून उरले.

समाजातील अंधश्रद्धांचा सातत्याने पर्दाफाश करणार्‍या या ‘व्हिसल् ब्लोअर’चा अंत घडवून आणला गेला, त्या क्षणापासून महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय क्षेत्रांत धुरळा उडायला सुरुवात झाली. राजकीय वातावरण सध्या तापत आहे आणि निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहे. अशा परिस्थितीत हा धुरळा लवकर खाली बसण्याची शक्यता नाही. दाभोलकरांच्या हत्येची दुर्घटना या वावटळीत सापडू नये ही अपेक्षा अशा दुषित वातावरणात कशी फलद्रुप होणार?

समाजातील सर्व सत्प्रवृत्त माणसांना चटका लावून दाभोळकर कायमचे गेले. समाजमनाला झालेली ही जखम लवकर भरून येता कामा नये. ती भळभळत राहिली तरच खर्‍याखुर्‍या पुरोगामी मार्गाने जाण्याची समाजाची प्रेरणा जागती राहील. कालपरवापर्यंत या मार्गक्रमणात दाभोलकर पुढे होते. आता त्यांची सुस्मित, निश्‍चयी आठवण सोबत असेल.

***
विषय: 

सिरीज लिहीतोयस ते फार चांगले.

समाजमनाला झालेली ही जखम लवकर भरून येता कामा नये. ती भळभळत राहिली तरच खर्‍याखुर्‍या पुरोगामी मार्गाने जाण्याची समाजाची प्रेरणा जागती राहील. >> अगदी पटले.

>>समाजमनाला झालेली ही जखम लवकर भरून येता कामा नये. ती भळभळत राहिली तरच खर्‍याखुर्‍या पुरोगामी मार्गाने जाण्याची समाजाची प्रेरणा जागती राहील. >> हे फार महत्वाचे!

सर्वच बाबतीत अत्यंत ‘खुजी’ माणसे त्यांच्याशी आडदांडपणा करू पाहत, तेव्हासुद्धा दाभोलकरांचा आग्रह मात्र संवादाचाच असे. अशा प्रकारची तत्त्वनिष्ठ ऋजुता आपल्या सार्वजनिक जीवनातून सध्या जवळपास लोप पावली आहे.>> किती महत्वाचे आहे हे... मुळात 'ऋजुता' हाच गुण हल्ली दुर्मिळ झालेला दिसतो, तिथे तत्वनिष्ठ ऋजुता तर नामुमकीन. डॉक्टरांनी आपल्या सहज जगण्या-वागण्यातून कितीतरी लोभस गुणांना आपल्यासमोर मांडले आहे. मुद्दाम घेण्यासारखं आहे हे आणि ते ल़क्षात आणून दिल्याबद्दल श्री. आगाशेंना धन्यवाद. चिनूक्स, तुझे पुनश्च आभार.

अनुमोदन आगाशे सर.
आणि ही जखम भळभळती राहण्यात अशा लेखांनी, लेखमालांनी खारीचा वाटा उचलला तरी हेतू साध्य झाला असे म्हणू या. Happy

आज दोन महिने उलटले तरी तपास लागत नाही. आयबीएन लोकमत वर झालेल्या चर्चेत निवृत्त पो.महासंचालक श्री जयंत उमराणीकर यांनी मांडलेली भुमिका अतिशय विवेकी व वास्तव आहे. ज्यांचे हितसंबंध दुखावले आहेत अशा लोकांपैकी कुणीतरी हे कृत्य केले आहे. बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणारे देखील त्यात मोडतात. ही बातमी पहा http://abpmajha.newsbullet.in/pune/110-more/35976-2013-10-19-13-40-21

> ती भळभळत राहिली तरच खर्‍याखुर्‍या पुरोगामी मार्गाने जाण्याची समाजाची प्रेरणा जागती राहील.
ती तशी ठेवण्यासाठी काय व्हायला हवे (असे त्यांना वाटते) हे ही त्यांनी सांगीतले असते तर बरे झाले असते.

लोकांनी आपापल्या परीने विचार आणि कृती करायला(च) हवी, पण कधीकधी विचारवंतांनी दिशा दाखवली तर त्याचा ही फायदा होतो.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानं ओळखलं आहे. दाभोळकरांच्या खुनाचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखलं आहे. अंदुरे आणि कळस्कर या दोघांनी दाभोळकरांवर गोळीबार केला आणि ते पळून गेल्याचं या साक्षीदाराने सांगितलं आहे

https://www.loksatta.com/maharashtra/witness-identified-2-murderers-of-n...