विषय क्र. २ -- सेवाग्राम ते शोधग्राम व्हाया जॉन्स हॉपकिन्स - डॉ. अभय व राणी बंग आणि सर्च

Submitted by शुगोल on 22 August, 2013 - 15:53

नव्वदीचं दशक संपता संपता, आशेचा किरण वाटावे असे, डॉ.अनिल अवचटांचे “कार्यरत” हे पुस्तक हातात पडले. सर्वस्व झोकून, झोताबाहेर राहून, समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी माणसं इथे भेटली. वंचित स्थानिक लोकांना आरोग्यसेवा पुरवताना केलेल्या संशोधनातून WHO (World Health Organization) सारख्या संस्थेला त्यांच्या पॉलिसीज बदलायला लावणारं, "डॉ. अभय बंग" हे आदर्श, ऋषीतुल्य व्यक्तिमत्व इथेच प्रथम भेटलं “शोध आरोग्याचा” या लेखात. लवकरच त्यांच्या दर्शनाचा योग आला बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात. “आज मी तुम्हाला माझी कथा सांगणार आहें. पण ती तुमच्या प्रत्येकाची असू शकते, तेव्हा त्यातला मी गाळून टाकायचा व फक्त प्रवास अनुभवायचा.” अशी श्रोत्यांशी बरोबरी साधत, सुरु झाला ज्ञानसंपन्न वक्तृत्वाचा ओघ. सुमारे पावणेदोन तास, दोन हजारांच्या समुदायाला मंत्रमुग्ध करत.

स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले परंतु स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधींच्या व सर्वोदयवादी विनोबांच्या संस्कारात वाढलेले डॉ.बंग. आरोग्यसेवेची प्रगल्भ जाणीव घेऊनच वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेले अभय बंग तसे तिथले आउटसायडरच होते. पगारवाढीसाठी MARD (Maharashtra Association of Resident Doctors)ने घडवलेल्या संपकाळात हॉस्पिटलात काम करणारे ते एकमेव डॉक्टर होते. जयप्रकाशजींच्या आंदोलनात सामील असताना त्यांच्या “Political Accountability” च्या आवाहनानी प्रेरित झालेल्या डॉ. बंगाना वैद्यकीयक्षेत्रातदेखील “Social and Medical Accountability” असायला हवी असं वाटे. PGI (Post Graduate Institute of Medical Research - चंदिगड) सारख्या संस्थांमध्ये चालणार्‍या पैशाच्या अपव्ययाचा सोशल रेलेव्हंस काय? हा प्रश्न त्यांना छळत असे. तेथील प्रवेश परिक्षेत पहिले येऊन देखील त्यांनी संस्था सोडायचं ठरवलं. प्रोफेसरांना आश्चर्य तर वाटलंच पण या तरूणाच्या पद्धतशीर विचारसरणीचं कौतुक देखील वाटून त्यांचं म्हणणं ऐकलं. परिणामस्वरूपी PGI च्या विद्यार्थ्यांना तीन महिन्याची ग्रामीण वैद्यकीय सेवा सक्तीची केली गेली.

आरोग्यसेवेचा नेमकेपणा समजण्यासाठी डॉक्टरांनी खूप भटकंती केली. बनवासी सेवा आश्रमात कुपोषणाचं दर्शन घडलं. "बेअर फूट डॉक्टर्स" मधे काम केलं. NIN (National Institute of Nutrition) मधे आहारशास्त्राचा कोर्स केला. मेडिसीनमधे MD केलं. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासातच त्यांना डॉ. राणी बंग भेटल्या. याला डॉक्टर त्यांच्या आयुष्यातला एक सुंदर अपघात असं म्हणतात. त्या स्त्रीरोग तज्ञ. हे उभयता खूप हुशार. एम बी बी एस व एम डी दोन्हीमधे सुवर्णपदक विजेते. डॉक्टरांचे गुरू डॉ. कार्ल टेलर यांची "तुमच्या डोक्यातले प्रश्न शोधत न हिंडता जाल तिथे कुठले प्रश्न आहेत ते शोधा" ही शिकवण उभयतांना दिशादर्शक वाटली. जिथे आरोग्यसेवेची नितांत गरज आहे अशा गडचिरोलिसारख्या अत्यंत मागास, सरकारकडून दुर्लक्षित भागात सेवेचा श्रीगणेशा केला.

कान्हापूरला, गावच्या मजूराला न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात, दोन वर्षे वैद्यकीय सेवा उपभोगलेल्या गावातील लोकांनीच दगडफेक केली. तेव्हा आरोग्यसेवेनी गावाचे प्रश्न सोडवता येणार नाहीत हा धडा मिळाला. या भटकंतीतच त्यांना मजूरांचे प्रश्न दिसले. अल्प मजूरी व त्यामुळे कुपोषण. हिशेब सुधारणे, ग्रेनबँक काढणे हे उपायही दगडावर डोकं आपटण्याएवढे फोल ठरल्यावर, प्रश्नाच्या मूळाशी जाऊन संशोधन केलं. मजूरांच्या श्रमांच्या "कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन" मधील सरकारी घोटाळ्यावर नेमकं बोट ठेवणारा निबंध लिहीला. अनेक संघटनांनी तो उचलून धरला. परिणामी सरकारला मजूरीचा दर ४रू.वरुन १२रु. करावा लागला. एक शिस्तबद्ध संशोधन केवढा फरक करू शकतं याचा प्रत्यय येऊन रिसर्चमधली ताकद समजली. पब्लिक हेल्थ व त्यातील संशोधन यात लास्ट वर्ड मानल्या जाणार्‍या अमेरिकेतील "जॉन्स हॉपकिन्स इन्स्टिट्यूट" मधे उच्च शिक्षणासाठी उभयता दाखल झाले. तिथे पब्लिक हेल्थ मधे मास्टर्स डिग्री मिळवून दोघेही भारतात, गडचिरोलित परतले व तेथे आरोग्याचा शोध सुरु केला. गावकर्‍यांनी दिलेल्या तेंदूपत्त्याच्या गुदामात SEARCH (Society for Education, Action and Research in Community Health) कार्यरत झाली.

तुमचे प्रश्न तुम्हीच सांगा. ते मुंबई, दिल्लीच काय पण डॉ. बंग देखील ठरवणार नाहीत हा दिलासा दिल्यामुळे गावकरी बोलते झाले. दवाखान्याच्या स्थापत्यापासून नावापर्यंत सगळं गावकर्‍यांच्या सल्ल्यानुसार झालं. रोजच्या प्रॅक्टिसमध्ये तेथील बायांना मोठ्या प्रमाणात स्त्रीरोग आहेत हे डॉ. राणीताईंच्या नजरेस पडलं. यावर उपाय शोधताना हेही लक्षात आलं की यावर जगात कुठेही संशोधन झालेलं नाही. प्रयोगासाठी दोन गावं निवडून स्त्रीआरोग्याचं संशोधन सुरु झालं. आजवर स्त्रियांच्या आरोग्याचा फक्त बाळंतपणाशीच संबंध लावला जात होता. त्याव्यतिरिक्तही त्यांना प्रश्न असतात यावर झालेलं हे जगभरातलं पहिलं संशोधन. 'पब्लिक हेल्थ पॉलिसी'मेकर्सच्या डोळ्यांत अंजन घालणारं. हे संशोधन 'लॅन्सेट' (Lancet) या जगप्रसिद्ध वैद्यकीय जर्नल मधे प्रसिद्ध झाले. नंतर या संशोधनाचा "स्टडी ऑफ डेकेड" असा गौरव झाला. दोन खेड्यातल्या इवल्याशा संशोधनाने जागतिक पॉलिसी बदलायला लावली. अंधश्रद्ध व निरक्षर अशा गावात या प्रश्नांवरची उपाय योजना करणं मात्र आव्हान ठरलं. पोस्टर्स, पथनाट्य असं काय काय करावं लागलं.

दरम्यान अशी एक घटना घडली की जी पुढील काही संशोधनांना जन्म देऊन गेली. एक आदिवासी बाई, तिच्या आजारी बाळाला घेऊन डॉ. बंगांच्या घरी आली. त्याला तपासून उपचार करण्याआधीच ते बाळ मेलं. त्याच्या मृत्युचं कारण वरवर पहाता न्युमोनिया, कुपोषण हे होतं. पण डॉ. बंगांना अवैद्यकीय कारणंही बरीच दिसली. सगळी मिळून १८. एवढ्यांचं निवारण करणं शक्यच नव्हतं. यातील एक-दोन जरी कमी करता आली तरी ही साखळी तुटून बालमृत्यूदर कमी होईल या आशावादावर १०० गावं प्रयोगासाठी निवडून संशोधन सुरू झालं. दोन वर्षांनी न्यूमोनिया हे बालमृत्यूचं नं. १ कारण आहे हे असा निष्कर्ष निघाला. आता डॉ. बंगांचं शोधचक्र यावरच्या उपाययोजनेच्या दिशेनी फिरु लागलं. रोगी हॉस्पिटलपर्यंत पोचू शकत नसतील तर हॉस्पिटल त्यांच्या दारापर्यंत जायला हवं, असं वाटून, चीन मधील "बेअर फूट डॉक्टर" कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन गावातील निरक्षर अशा सूइणींना प्रशिक्षित करायचं ठरवलं. त्यांना डझनापर्यंत मोजता येतं याचा फायदा घेऊन "Breath Counter" नावाचं खेळण्यासारखं दिसणारं उपकरण स्वतः बनवलं. सूइणींच्या निदानात सुरवातीलाच ८२% अचूकता आली. डॉक्टर गंमतीत म्हणतात की यांना लिहीता-वाचता येत नाही, पण न्यूमोनियाचं अचूक निदान करता येतं. एक सुरक्षित असे अँटीबायोटीक निवडून घरपोच उपचार सुरू झाले. न्यूमोनियामुळेचा बालमृत्यूदर, डॉक्टरांच्या संशोधनानी ७४%नी खाली आला. डॉक्टरांचे हे संशोधनही लॅन्सेटनी १९९०मध्ये प्रसिद्ध केले. एव्हढेच नाही तर "Breath Counter" या उपकरणावरही एक लेख छापला. या संशोधनाला लॅन्सेटनी "जगातील सर्वोत्कृष्ट अध्ययन" असा सन्मान दिला. WHO नी आपल्या पॉलिसीज बदलल्या. न्यूमोनिया नियंत्रणाची ही पद्धत २००१ पर्यत भारताबरोबरच ७७ देशात वापरायला सुरूवात झाली.

या संशोधनातून डॉक्टर बंगांना असंही दिसलं की नवजात अर्भकांचा मृत्यूदर फार जास्त आहे. याला न्यूमोनियाच नव्हे तर आईचे गर्भारपण, बाळंतपणही तितकेच जबाबदार आहे हेही त्यांच्या लक्षात आले. आता नव्या प्रश्नाचा उत्तरशोध पुन्हा जारी. नवजात बाळाला घराबाहेर काढायला लागू नये म्हणून साक्षर सूइणींना बाळंतपणातील स्वच्छता, अर्भकाची काळजी, अगदी इंजेक्शन देण्यापर्यंत प्रशिक्षित करून "आरोग्यदूत" तयार केले. भारतातील प्रथितयश बालरोगतज्ज्ञांकडून या आरोग्यदूतांची परिक्षा करवली. त्यांनी दिलेलं प्रशस्तिपत्रः "These village health workers know neonatal care more than the medical graduates of AIIMS (All India Institute of Medical Sciences). हे संशोधनही लॅन्सेटमधे प्रसिद्ध झाले. WHO ला "New born needs to be hospitalized" ही पॉलिसी बदलावी लागली. भारतातील ICMR (Indian Council of Medical Research)नी देखील हे अध्ययन इतर राज्यात कसं नेता येईल यावर प्लॅन बनवला. भारताबरोबरच ९ देशांमधे हे गडचिरोलि मॉडेल"आशा" नावाने वापरले जाते. १९८८ ते २००१ या काळातली बंग दांपत्यानी केलेली ही संशोधनं. कुठे केली तर ८०% गरीबी असलेल्या, सरकारकडून कायम दुर्लक्षित अशा मागास भागात. या यशाचं श्रेय विविध लोकांत वाटताना डॉक्टर म्हणतात -- गांधीजींनी खेड्यात जायला शिकवलं, कान्हापूरच्या लोकांनी दगडफेक करून शिकवलं, अमेरिकन लोकांनी संशोधन करायला शिकवलं आणि गडचिरोलिच्या लोकांनी समस्या सुचवून त्या सोडवण्याची शक्ति दिली. एका छोट्या जागी केलेल्या अध्ययनाचा केवढा हा ग्लोबल परिणाम. "Think Globally, Act Locally" या वचनावर डॉ़क्टर अभय बंगांची अपार श्रद्धा. त्याचंच हे गोमटं फळ.

सेवाग्राममधून सुरु झालेला हा प्रवास आरोग्याचा शोध घेत खड्तर मार्गक्रमण करत शोधग्रामपर्यंत आला. दगडफेकीपासून चारित्र्यहननापर्यंत सगळं विष पचवलं. विदेशी पैशाची मदत मिळायला लागल्यावर भ्रष्ट सरकारी यंत्रणेला पोटदुखी सुरु झाली. मग त्यांना सीआयएचे एजंट ठरवलं गेलं. नक्षल चळवळीचं केंद्र असलेल्या भागात निर्भयतेनी काम करतात म्हणून त्यांचे हस्तक असल्याचा आरोप झाला. गांधीजींच्या प्रभावाखाली वाढलेल्या आदर्शवादी मातापित्यांचे व विनोबाजींच्या "नयी तालीम"चे संस्कार, राणीताईंची अजोड साथसंगत, स्वच्छ व पारदर्शक व्यवहार आणि या सगळ्याला मिळालेली वैज्ञानिक शिक्षणाची अलौकिक जोड याच्या बळावर डॉ. बंग पाय रोवून मानानी उभे राहू शकले. वैज्ञानिक शिक्षणावर डॉक्टरांची अपार श्रद्धा. ते म्हणतात--"कल्पना आणि वास्तव यातील फरक उघड झाल्यावर होणार्‍या स्वप्नभंगावर मात करायला कुठलाही बायस नसलेलं विज्ञान उपयोगी पडतं." वैज्ञानिक संशोधनासंबंधी वाचलेलं एक उद्बोधक वाक्य ते सांगतात -- One accurate measurement is infinitely superior than thousand intelligent opinions.

जनतेच्या आरोग्याचा शोध घेताना डॉक्टर स्वतःच्याच आरोग्याची गुरुकिल्ली हरवून बसले आणि आयुष्याच्या एका वळणावर त्यांना हृदयरोग भेटला. या कालखंडात त्यांनी हृदयरोगाबरोबर स्वतःचा देखील शोध घेतला. लहानपणी सार्वजनिक कामांमधून भेटलेल्या विनोबांची अध्यात्मिक गुरुंच्या नात्याने पुन्हा एकदा भेट झाली. मृत्यूच्या जवळून दर्शनाने काय वाटले? हृदयरोगावर उपचार करताना हृदयरोगानेच त्यांचा कसा उपचार केला ही कहाणीच नव्हे तर ती हरवलेली गुरुकिल्ली डॉक्टरांनी सापडवली व ते भांडार त्यांनी "अनंत काणेकर पुरस्कार" विजेत्या लेखाने लक्षावधी लोकांना खुलं केलं. यातुनंच निर्मिती झाली "माझा साक्षात्कारी हृदयरोग" या पुस्तकाची. डॉक्टरांना हृदयरोगापलिकडे घेऊन जाणार्‍या या शोधाचा शोध अजूनही सतत चालूच असतो.

गावकर्‍यांचे प्रश्न सोडवताना एक बिकट प्रश्न गावातील बायांनी डॉक्टरांसमोर आणला. नवरे दारू पिऊन छळ करतात तर त्यांना दारु मिळणार नाही असं बघा. रास्त व गरजेचा पण पाहू जाता आरोग्याच्या कक्षेबाहेरचा प्रश्न. डॉक्टरांनी, मुक्तांगणच्या मार्गदर्शनाने व्यसनमुक्ति योजना राबवायला सुरुवात केली. पण प्रश्नांच्या मुळाशी गेल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. त्यांनी महाराष्ट्रातील "दारूनीति" वर शोध घ्यायला सुरवात केली. दारुचं अर्थशास्त्र तपासल्यावर धक्कादायक आकडे बाहेर आले. १९८८ मधे महाराष्ट्र सरकारचं दारुपासूनचं उत्पन्न १०० कोटिरु. २०१० मधलं ६००० कोटि आणि २०११ मधलं ८००० कोटि. म्हणजेच १९८८ ते २०११ पर्यंत हे उत्पन्न ८० पटीनी वाढलं. या "मद्य"राष्ट्राचे राजकीय विद्यापीठ बारामतीत असल्याचं प्रतिपादन केलं. एवढी ग्रोथ रेट असलेला दुसरा उद्योगधंदा नसल्याने राजकीय नेत्यांनी त्यांच्या नातेवाईकांना भरमसाठ लायसन्सेस वाटून, सबसिडी देऊन समाजाचं शोषण करणारी साम्राज्यशाही निर्माण केली. दारुची उपलब्धी कमी करावी म्हणून WHO नी एक प्रस्ताव आणला. भारताने त्यावर सही केली, पण त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही यावर डॉक्टर बंगांचा आक्षेप आहे. लहान मुलं आणि बायका यांच्या आरोग्याच्या प्रश्नावरही सरकार हेच करत आहे. हे दोन्ही समाजातील दुर्बल घटक. म्हणजेच राजकीय दृष्ट्या "न्यूसन्स व्हॅल्यू" नसलेले. त्यामुळे राजकारण्यांकडून प्रचंड दुर्लक्षिले गेलेले. डॉक्टरांचा आंतरराष्ट्रीय आरोग्यक्षेत्रात ठसा उमटू लागला तसा महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा आदर करायला सुरवात केली. म्हणजे कसा? तर त्यांची संशोधनं उचलून धरुन पॉलिसीज बदलायच्या पण अंमलात मात्र आणायच्या नाहीत. डॉक्टरांना राजकारणात पडण्यात रस नाही ते म्हणतात, "वेगळ्या मार्गानी प्रश्न सोडवून राजकीय सत्ता मजबूत न करता लोक मजबूत करणे यात मला रस आहे."

शोधग्रामच्या यशस्वी प्रयोगानंतर ते कार्य सर्वदूर पसरायला पाहिजे असं डॉक्टरांना वाटलं. त्याच्या शाखा काढण्यापेक्षा, दिव्यानी दिवा पेटतो, पण नंतर तो स्वतंत्रपणे जळतो या तत्वाप्रमाणे सर्चचं काम हे एकाकडून दुसर्‍याकडे जावं व तेही ताज्या दमाच्या युवा पिढीकडूनच असं डॉक्टरांना वाटत होतं. यामागेही अर्थातच एक शोध होता. त्यांच्या या सगळ्या प्रवासात त्यांना जाणवलं होतं की ही युवा पिढी सक्षम आहे, वैज्ञानिक शोधांमुळे बहुश्रुत आहे, अनंत सामाजिक समस्या पाहून अस्वस्थ होते आहे, आयुष्याच्या आयोजनाचा प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात ताकद आहे मात्र आयुष्याचं प्रयोजन ते हरवून बसले आहेत. तर अशा अस्वस्थ तरुणांना दिशा दाखवणं, तरुणांना अस्वस्थ करणं आणि त्यातून त्यांना त्यांच्या आयुष्याच्या सार्थकतेचा शोध घ्यायला लावणं यासाठी डॉक्टरांनी "निर्माण"ची निर्मिती केली, २००६ मध्ये.

गेल्या ७ वर्षांत निर्माणचं कार्य चांगलंच मूळ धरु लागलं आहे. डॉक्टरांचे धाकटे चिरंजीव, जे कॉम्प्युटर इंजिनीअर आहेत, ते या कामाचा बराचसा भार सांभाळतात. थोरले चिरंजीव डॉक्टर आहेत. आईवडलांप्रमाणेच तेही अमेरिकेतील "जॉन्स हॉपकिन्स" संस्थेमधून पब्लिक हेल्थ मधील मास्टर्स डिग्री घेऊन गडचिरोलित काम करत आहेत. राणीताईंच्या कामाचा वेगळा आढावा न घेण्याचं कारणही पुन्हा डॉक्टर अभयच आहेत. मी सुरवातीला ज्या भाषणाचा उल्लेख केला आहे त्यात, डॉक्टर अत्यंत हळवे होत सांगतात," आज मी इथे आहे कारण राणी तिकडे गडचिरोलिची आघाडी सांभाळते आहे. मी इथे एकटा बोलत असलो, तरी आम्ही दोघंही बोलतोय बरं का!" "माझे मन तुझे झाले" या त्यांच्या भावना आपण वेगळ्या कशा करणार? तरीही सांगतेच. गेली काही वर्षं त्या तरुणांच्या लैंगिक शिक्षणाविषयी महाराष्ट्राच्या गावोगाव जाऊन "तारूण्यभान" नावाचं अद्वितीय शिबीर घेतात. वन्य झाडाझुडपांविषयी आदिवासीं बायकांना असलेली अमाप माहिती त्यांनी "गोईण"(मैत्रीण) या पुस्तकात एकत्रित केली आहे. तसंच लैंगिक व प्रजनन याविषयीचे आदिवासी बायकांचे विचार, त्यांच्या प्रथा, त्यांच्या भाषेतले शब्द या सगळ्याचं संकलन राणीताईंनी "कानोसा" ह्या पुस्तकात केलं आहे. सर्च मधे वेळोवेळी कामासाठी येणार्‍या युवांची ते दोघे आईवडिलांच्या मायेने काळजी घेतात.दोघांचेही अंतःकरण कंपॅशनने ओतप्रोत भरले आहे. आरोग्यदूतांना कॉन्फरन्सेससाठी नेताना ते स्वतःबरोबर विमानाने नेतात, भारतात सुद्धा.

आजवर डॉक्टरांना व राणीताईंना वैयक्तिक व मिळून असे खूप पुरस्कार मिळाले आहेत. सर्च ला मिळालेला "MacArthur Award" हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राणीताईंना मिळालेला भारत सरकारचा "स्त्रीशक्ति पुरस्कार", डॉक्टर अभय बंगांना मिळालेला "महाराष्ट्र-भूषण" पुरस्कार. हे काही ठळक. तसंच टाइम मॅगॅझीननी २००५ साली उभयतांना "Global Health Heroes" म्हणून गौरवलं.

भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात, केवळ भारतातीलच नाही तर जगातील बालकं व स्त्रिया या समाजातील दुर्बल घटकांसाठी आरोग्यक्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवणारे, भारतातील युवाशक्तिला सामाजिक कार्यात त्यांच्या आयुष्याचं प्रयोजन शोधायचं आवाहन करणारे व भारतातील बालकं व स्त्रीशक्ति हेच भारताच्या उज्वल भविष्याचे शिल्पकार असणार आहेत असा ठाम विश्वास असणारे डॉक्टर अभय व राणी बंग हे मला माझेही हीरोज् वाटतात.

ऋणनिर्देशः

१. कार्यरत(पुस्तक) - लेखक - डॉ. अनिल अवचट
२. माझा साक्षात्कारी हृदयरोग(पुस्तक) - लेखक - डॉ. अभय बंग
३. एकता(त्रैमासिक, कॅनडा) - अंक ऑक्टोबर २००१ ( हे मासिक, रोहिणी, एक न-मायबोलीकर मैत्रिणीने उपलब्ध करुन दिले)
४. ब्रेथ कांउटर या उपकरणाविषयी माहिती बघा- http://www.youtube.com/watch?v=zflJEv7qmKo
५. निर्माणविषयी माहिती - http://www.youtube.com/watch?v=fpmyRum-Yns
याचे ७ भाग आहेत.
६. यु-ट्यूब वरील अनेक भाषणं व मुलाखती
७. दारु आणि बारामती - http://www.searchgadchiroli.org/Media%20stories/daru2.pdf
८. माझी मुलगी मुग्धा. ही २०१२ ला, शोधग्राममधे १ महिना राहून सर्चच्या कामात आपला खारीचा वाटा देऊन व "नायना"(डॉ. अभय बंग) आणि राणीमावशींकडून कौतुकाचा ठेवा घेऊन आली. तिचे अनुभव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलं आहेस शुगोल. आवडलं.

>>माझी मुलगी मुग्धा. ही २०१२ ला, शोधग्राममधे १ महिना राहून सर्चच्या कामात आपला खारीचा वाटा देऊन व "नायना"(डॉ. अभय बंग) आणि राणीमावशींकडून कौतुकाचा ठेवा घेऊन आली. तिचे अनुभव. >> अरे वा! अभिनंदन आणि मुग्धाचं खूप कौतुक. Happy

चिनूक्स, मी फक्त शुद्धलेखनाच्या दोन चुका दुरुस्त केल्या. कोणत्या ते सांगते संयोजकांना.

स्पर्धेच्या निमित्ताने एकेका रत्नाची इथे मायबोलीवर सविस्तर ओळख होत आहे, हे जितके प्रशंसनीय तितकेच त्या संदर्भातील विविध ठिकाणाची माहिती एकत्रित करून, तीवर संस्कार करून शब्दमर्यादेत लेख बसविणे हे खरेच फार कौशल्याचे काम असते आणि ते शुगोल यानी "डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग" यांच्या वाटचालीबाबत करून दाखविले आहे. खूपच प्रेरणादायी प्रवास आहे त्या जोडीचा.

माझ्याकडे 'कार्यरत' आणि 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' ही दोन्ही पुस्तके आहेत. पैकी शुगोल यानी अवचटांचे 'कार्यरत' लेखासाठी प्रमुख स्थानी घेतले असले तरी '.....हृदयरोग' ही तर एका जिद्दी पेशंटची कहाणी असल्याने हे पुस्तक जर इथल्या कुणी वाचले नसेल तर जरूर मिळवून वाचावे.

लेखात एके ठिकाणी 'लॅन्सेट' मॅगेझिनच्या रास्त उल्लेख आला आहे. मेडिकल रीसर्च या विषयाला वाहिलेले हे मॅगेझिन खर्‍या अर्थाने जगप्रसिद्ध आहे. अवचट स्वतःच लिहितात की कुणीतरी "लॅन्सेट' वाचत आहे हे समजल्यावर ते सारे विद्यार्थी त्यांच्याकडे आदराने पाहात असत. 'लॅन्सेट' मध्ये एखादी ओळ छापून येणे ही बहुमानाची गोष्ट. डॉ. बंग यांचा पेपर जरी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाला असला तरी त्याची 'समरी' केवळ दहापंधरा ओळीत देणे डॉक्टरावर बंधनकारक असते. मग केवळ हीच समरी जगातील सर्व मेडिकल रीसर्च लॅबोरेटरीत, मेडिकल कॉलेजीसमध्ये रवाना होते आणि त्याच्या आधारे मूळ निबंध शोधला जातो. आता इतक्या दोन वर्षे केलेल्या प्रदीर्घ संशोधनाची समरी केवळ दहापंधरा ओळीत कशी बसवायची ? हेही एक चॅलेंज. डॉ.बंग म्हणतात की त्यानी एकदोनदा नव्हे तर चक्क वीस वेळा ती समरी तयार केली होती.

फार जबरदस्त कार्यपटल असलेले बंग दांपत्य आहे. शुगोल यांचे अभिनंदन.

अशोक पाटील

नवीन भारताच्या जडणघडणीचे खरे शिल्पकार म्हणता येईल अशी ही माणसे, सुंदर लिहिलेत शुगोल, अभ्यासाला आत्मीयतेची जोड मुग्धामुळे मिळाली आहे.

लेख खुप आवडला. बंग पतिपत्नींचे नाव उच्चारताच मनात आदरभावना दाटते.

मस्त! आवडला Happy ह्या दांपत्याबद्दल असाही अत्यंत आदर मनात आहेच.

किती सुंदर लिहीलाय लेख!! खूप आवडला. आणि मुग्धाचं खूप कौतुक..
अभय बंगचे पुस्तक तर प्रचंड आवडते आहे माझे.

सुंदर माहितीपूर्ण लेख. ह्यापूर्वी डॉ.बंग, शोधग्राम ही नावे ऐकलेली होती, पण त्यांचे संशोधन आणि समाजकार्य किती विस्तृत आणि नि:स्वार्थ आहे हे तुमच्या लेखामुळे समजले.

लेख खुप छान झाला आहे!

बंग दांपत्याबद्दल अतोनात आदर आहे. नतमस्तक व्हावं असं दांपत्य आहे हे!
मुग्धाचे खूप कौतुक वाटले. तिला तिच्या तिथल्या अनुभवांवर आधारीत लेख लिहीता येइल का? वाचायला आवडेल!
अवांतर, नाशिकला असताना एकदा श्री अभय बंग यांच्याशी अनौपचारिक गप्पा झाल्या होत्या त्याची परत एकदा आठवण झाली.

स्वाती२, चनस, अशोकजी धन्यवाद!

तोषवी, धन्यवाद. मुग्धाचं कौतुक प्रत्यक्षच पोचव.
BMM मधील त्यांच्या भाषणाची क्लिप आहे का कुठे? कोणाकडे? >>> नीलम ऑडीयो-व्हीडीयो, फिलाडेल्फिया यांच्या कडे शक्यता आहे. त्या भाषणाची लिखीत प्रत २००१च्या ऑक्टोबरच्या एकता मासिकात आहे. ते मासिक मैत्रिणीला परत करायच्या आधी कॉपीज काढून ठेवणार आहे. एक सेट तुझ्याकरिता करते.

Pages