खांडवीच्या वड्या

Submitted by पूनम on 12 August, 2013 - 02:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) तांदळाचा रवा*- २ वाट्या
२) गूळ- सव्वादोन वाट्या
३) ओले खोबरे- अर्धी वाटी
४) वेलदोड्याची पूड- १ टेबलस्पून
५) साजूक तूप- ३ टेबलस्पून
६) पाणी- ४ वाट्या

क्रमवार पाककृती: 

खांडवी म्हटले, की गुजराथी तिखट पदार्थच आहे असे वाटायला लागले आहे. पण खांडवी किंवा खांडवीच्या वड्या हा एक अस्सल मराठी, कोकणात केला जाणारा पारंपारिक पदार्थ आहे. रुढ अर्थाने हे एक पक्वान्न नाही. त्यामुळे नेहेमीच्या श्रीखंड, गुलाबजाम, जिलबीसारख्या तुलनेने ग्लॅमरस पक्वान्नांच्या मानाने मागे पडलेला हा पदार्थ आहे. पण आहे साधा, सोपा आणि 'आपला'!

*तांदळाचा रवा काढायची पद्धत- रोजच्या जेवणातले तांदूळ धुवून, निथळवून सावलीत सुकवायचे. सुकले, की मिक्सरवर भरड रवा काढायचा. या रव्याला तांदळाची कणी असेही म्हटले जाते. सहसा लहान मुलांना सॉलिड फूड सुरू करताना अशा रव्याची पेज शिजवून देतात. हा भरड रवा बाजारात विकत मिळतो का, याची कल्पना नाही.

१) तांदळाचा रवा २ टेस्पू तूपावर तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावा.
२) पाणी कढईत उकळायला ठेवावे.
३) पाणी उकळले की त्यात गूळ घालावा.
४) गूळ विरघळला, की त्यात रवा घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे.
५) वेलदोड्याची पूड घालून एक वाफ द्यावी.
६) एका मोठ्या ताटाला तूपाचा हात लावून हे शिजलेले मिश्रण त्यावर पसरून थापावे.
७) वरून ओले खोबरे पेरून वड्या पाडाव्या.

khandavi.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ वाट्या रव्याच्या ताटभर वड्या होतील.
अधिक टिपा: 

गूळाऐवजी साखर घालता येईल.
रवा मात्र तांदळाचाच हवा. त्या ऐवजी साधा रवा वापरला तर तयार होणार्‍या पदार्थाला 'सांजा' म्हणतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक, आई, आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्या! मंजू, मी तुझी कृती पाहिलीच नव्हती. नाहीतर ही नसती टाकली. प्रमाणही २ वाट्या रव्याचंच आहे! Lol

पण असूदे, बारकाव्याने वाचले, तर आपल्या कृतीत जरा जरा फरक आहे, तेव्हा ही राहूदेत. शिवाय, मी फोटोही काढलाय Wink

मस्त कृती. आमच्याकडे गिरणीत तांदळाचा रवा काढून देतात म्हणाले होते, तसा रवा काढून आणला की ही कृती नक्की करणर.

नाहीतर ही नसती टाकली.>> अय्.... मी त्यासाठी नाही लिंक दिली.

कृतीत जरा जरा फरक आहे>> आणि प्रमाणातही चांगलाच फरक आहे Wink

मस्त! Happy तुझ्या वड्या वरकरणी सोप्या पण वेशांतर केलेल्या साधूंप्रमाणे परीक्शा बघणार्या असतात. करेंगे. हारेंगे नहीं जी. Happy

आशू Lol नाही, ही खरंच सोपी आहे. शिवाय आजी-आईकडून चालत आलेली आहे. त्यामुळे करायला सेफ आहे Wink
अंजीर बर्फीचा लीगच वेगळा आहे Biggrin

हो तर! बर्फी शब्दाला आता जरी ग्लॆमर मिळालं असलं तरी मायबोलीवर केव्हाच वलयांकित आहे. Proud रिवाईज्ड सिलॆबस मध्ये सुगरण लेवल 3 वर टाकायची शिफारस केली आहे.

फोटो आवडला. खांडव्या आवडतात. माझी आई करायची. नंतर खाल्ल्याच नाहीत कधी. दुकानात वगैरे मिळतात की नाही ते माहीत नाही.

पाकृसाठी धन्यवाद,

मस्तच.

अव्वा! हा पदार्थ मला माहितच नव्हता. धन्यवाद पौर्णिमा.
वड्यांचे आणि माझे फारसे बरे नाही. चवीला छान होतात, पण सुबक होत नाहीत मनासारख्या. तरीही करुन पाहीन.

खांडवी म्हटले, की गुजराथी तिखट पदार्थच आहे असे वाटायला लागले आहे. >>>> कोणाला? Happy मला तर गुजराथीत सुरळीच्य वड्यांना खांडवी म्हणतात हे हल्लीच कळलं.. नाहितर खांडवी म्हंटलं की हेच.
ह्यात थोडंsssसं आलं अगदी लगदा करून (म्हणजे तोंडात वेगळं कळणार नाही इतकं बारीक करून) घालायचं.. मस्त लागतो स्वाद.

रैना +१

खांडवी नावाचा मराठी गोड पदार्थ असतो इतकंच ऐकून माहित होतं. कधी खाल्ला /बघितला नाहीये. आणि या वड्या असल्याने करायची हिम्मत पण होत नाही लगेच. Happy

मस्त. हा पदार्थ माहीतच नव्हता. याला तयार मिळतो तो इडली रवा वापरला तर चालेल का.

छानच.
कोकणात खांडवी असतेच. खास करुन श्रावणात.
नेहमीचेच घटक म्हणजे तांदूळ, ओले खोबरे आणि गूळ वापरून किती वेगवेगळे पदार्थ करता येतात ते कोकणात बघता येते.

रुनी, मंजूडीने रिक्षा आणली आहे. त्या कृतीत इडली रवा वापरायची पद्धत आहे. ती बघ.

दक्षिणे, हो, सांगली-कोल्हापूरकडे खांतोळी म्हणतात. मी शब्दखुणात तो शब्द टाकला आहे बघ Happy

मस्त! माझी आई करते या वड्या. मला कधी करुन बघायचा धीर झाला नाही. पण हा फोटो बघून आता धाडस करीन. धन्यवाद पौर्णिमा. Happy

मस्त पदार्थ पोर्णिमा! आमची काकु करायची आणि आम्ही 'खांतोळ्या' म्हणायचो या वड्यांना. खुप आवडायच्या आम्हाला. ती गेल्यानंतर पुन्हा खायला मिळालेल्या नाहीत आणि कशा करत होती तेही माहिती नसल्यामुळे करताही आल्या नाहीत. आता तुझ्यामुळे करता येतील, जमेलसं वाटतंय. थँक्स गं!

मी हा पदार्थ पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाच्या वेळी खाल्ला होता. अगदी पाची दिवस त्यांनी तिथे ठेवला होता.

पूनम, फारच छान कृती. तू लिहितेसही छान.

मस्तच आहेत पौर्णिमा. मी वरीच्या तांदुळाच्या थोड्या वेगळ्या प्रकारे उपासाच्या खांडवी करते, वरी तुपावर तांबूस भाजल्यानंतर गरम पाणी आणि थोडे दुध घालून शिजवते आणि मग चिरलेला गूळ घालते, आणि ओले खोबरे आणि सुका मेवा, वेलची पूड घालते. त्यापण छान होतात.

आता ह्या पद्धतीने करून बघेन.

Pages