रातांब्याचे पन्हे

Submitted by माधव on 22 May, 2013 - 05:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१२-१५ मोठे रातांबे
आवडीनुसार गुळ
३-३ १/२ मध्यम ग्लास माठातले पाणी
१/२ च. चमचा जीरे
चवीनुसार मीठ
१/२ पोपटी (तिखट नसलेली) मिरची

क्रमवार पाककृती: 

१. रातांब्यांचे कापून दोन अर्धे भाग करून घ्यावेत
२. साली बाजूला ठेऊन द्याव्यात व आतला गर (बियांसकट) एका पातेल्यात घ्यावा
३. सगळा गर बुडेल एवढे पाणी त्या बियांवर घालून १० मिनीटे ठेवावे
४. मग बिया कोळून गर काढून घ्यावा
५. गराचे पाणी गाळून घ्यावे व गाळण्यात राहिलेल्या गरात पुन्हा एकदा पाणी घालून ते पण गाळून घ्यावे
६. दोन्ही पाणी एकत्र करून त्यात आवश्यकतेनुसार गार पाणी घालावे
७. मग त्यात आवडीनुसार गुळ व मिठ घालून विरघळून घ्यावे
८.जीरे (कच्चेच) लाटण्याने खरंगटून घ्यावे व ते वरील मिश्रणात घालावे

पन्हे तयार आहे.

९. मिरचीचे हातानेच तुकडे करून किंचीत मिठ घालून चुरडून घ्यावे व ते पन्ह्यात घालावे.

वाढणी/प्रमाण: 
४ मध्यम ग्लास
अधिक टिपा: 

बिया कोळताना हातावर चिकट राप बसतो. पण दोन दिवसात तो जातो.
ह्या पन्ह्याची मजा माठाएवढ्या गार पाण्यातच येते. उगाच आईसकोल्ड वगैरे करू नये. फ्रिजचे पाणी वापरायचे झाल्यास त्यात थोडे साधे पाणी मिसळावे.
मिरची कमी तिखटच असावी. तिचा फक्त स्वाद आणायचा आहे, तिखटपणा नाही.

गूळ अत्यावश्यक आहे. साखर, शुगर्फ्री वगैरे घालून केलेल्या पेयाला पन्हे म्हणत नाहीत. Happy

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, मस्त प्रकार आहे. मी कधीच चाखला नाहीय्ये.
रातांबे खाऊन खाऊन हात / दात पिवळे मात्र बर्‍याच वेळा करुन घेतलेत.
आणि ती पोपटी मिरची गोव्याला मिळत असे.. अगदी माझ्या योग्यतेची तिखट असायची ती.

माधव.. धन्यवाद.. मी पण असे पन्ह चाखले नव्हते.. आता नक्कीच करुन बघेन.. बघुया गावाकरुन कोणी रतांबे आणून देतय का ते..

@आश...
रातांबे म्हणजे काय?...>>>... रातांबा म्हणजे 'कोकम'फळ. आपण बाजारातुन जे कोकम/ आमसुल आणतो, ते या फळा पासुन बनवलेले असते. 'कोकम/ आमसुल' हे रातांब्याचे बाह्य-आवरण असते, जे फळ पिकल्यावर, बर्‍यापैकि 'जाड' असते. रातांबा फोडून त्याचे हे बाह्य आवरण कडक उन्हात वाळवून, त्याची एकदम पातळ अशी 'कोकम/ आमसुलं' बनवतात... आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आणि बहु-उपयोगी फळ आहे...
Happy

बघुया गावाकरुन कोणी रतांबे आणून देतय का ते..>>>>>>>>.आमच्याकडे कालच आले. आज हेच पन्हे करायचे आहे. ये प्यायला. Happy

रातांबे खाऊन खाऊन हात / दात पिवळे मात्र बर्‍याच वेळा करुन घेतलेत.>>>>>>>>>>>हो ना. काल तेच करणार होते. पण घरी गेले तर रतांबे , सरबताच्या वाटेवर होते. Uhoh

मस्तच आहे रेसिपी .

गुळ घालून आणि थोडा हि. मिरचीचा स्वाद ..मस्तच लागेल चव.

Btw इथं लिहिलेले फोटो ही बघून आले. मस्तच आहेत.

बरोबर माधव हेच ते पन्हं, मी मनीमोहोरांच्या धाग्यावर उल्लेख केला ते. आणि हो सरबत नाही पन्हेच म्हणतात, मला नक्की आठवत नव्हते.
मी गुगलवर शोधत होते रेसीपी, मायबोलीवरच आहे माहीत नव्हते.

मस्त रेसिपी!
आरती., मस्त फोटो.नाजुकशी बाटली आवडली.

फोटो कसला भारी आहे. मस्त रंग!
हि असली पेये हॉटेलमधे कधी नसायची प्यायला, आताही नसतीलच. असायला हवेत पण जेथे तेथे फसफसणारी पेये दिसतात. Sad
आमच्या कॉलेज जवळ जास्तीत जास्त लिंबू, कोकम सरबत मिळायचे. तसेच उन्हाळ्यात नीरा.

देवकी, ती बाटली, फ्लेवर्ड मिल्क ची आहे. प्रवासात कधी हे मिल्क घेतल तर मला ह्या काचेच्या बाटल्या फेकायला नाही आवडत. घरी वापरता ही येतात.

सोनाली, कोकण फळां पासून बरीच ओरिजन सरबत विकता येतील पण हे कोणीच का करत नाही समजत नाही. कुठे कोकम सरबत किंवा कैरी पन्ह मिळाले तर त्या packed ग्लास वर लिहिले असते used Type II preservative and फूड कलर त्यात चव ही अजिबात नसते. हेच can मध्ये मिळणाऱ्या सरबतवर लिहीलेल असत. खरतर ती ओरिजनल चवीची ही नसतात.