कवठाची जेली.

Submitted by मानुषी on 17 April, 2013 - 00:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साधारणपणे शिवरात्रीच्या आसपास बाजारात कवठं मिळायला लागतात. थोडासा आंबट तुरट चवीचा हा रानमेवा अत्यंत पाचक आहे. याची आणि चटणी सरबतही चविष्ट होते.
कवठाची बर्फ़ी नरसोबावाडीचा प्रसाद म्हणूनच ओळखला जातो. साहित्य:
२ कवठे, साखर, पाणी.
बाजारातून आणताना मधुर वासाचं कवठ बघून आणावं. म्हणजे ते पूर्ण पिकलेले असेल. आणि त्यामधे योग्य त्याप्रमाणात पेक्टिन तयार असेल....ज्याच्यामुळे जेली तयार होते. कच्च्या कवठात तुरटपणा खूप जास्त असतो.

क्रमवार पाककृती: 

कवठे फ़ोडून त्यातला गर काढून घ्या.
हा गर बुडेल इतकं पाणी घालून कुकरमधे शिजवा. १ शिट्टी झाल्यावर २ मिनिटांनी गॅस बंद करा.
प्रेशर गेल्यावर कुकर उघडून हा शिजलेला गर एका मलमलच्या कपड्यात टांगून ठेवा. व याच्या खाली एक भांडे ठेवा. म्हणजे जेली होण्यासाठी लागणारा रस खालच्या भांड्यात जमा होईल.
१ तासभर हे असंच टांगून ठेवा.
मग भांड्यातल्या रसापेक्षा थोडी जास्त साखर या रसात मिक्स करा. म्हणजे समजा एक वाटी रस निघाला तर एक वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घ्या. एकद साखर पूर्णपणे विरघळली की चव घेऊन बघू शकतो. गोडी कमी वाटली तर एखादा चमचा ऍड करायला हरकत नाही. गॅसवर ठेवल्यावर सतत ढवळत रहा ७ ते ८ मिनिटात हा रस आटायला लागेल. मोठे मोत्यासारखे बुडबुडे यायला लागतील. आणि डाव फ़िरवतानाही लक्षात येईल. थोडं जड यायला लागलं की गॅस बंद करा. आणि प्रचि. मधे दाखवल्याप्रमाणे रस खाली पडताना डावाला चिकटून राहायला लागेल.
मग या रसाचं थोडं टेम्परेचर कमी झालं की काचेच्या बरणीत ओता. नंतर तो इतका आळेल की त्याची जेली झालेली दिसेल. बऱ्यापैकी जेली जमल्याची एक खूण म्हणजे प्लेट हलवली तर ही जेली मुळापासून थरथरते.
आता ही जेली आंबट गोड चवीवी जेली ब्रेडला लावून, पोळीशी किंवा गोड खाण्याची कपॅसिटी असल्यास थोडी नुसतीही खाऊ शकता. फ़ळांच्या फोडींबरोबर या जेलीचे तुकडेही अप्रतीम लागतात.

अधिक टिपा: 

बरणीत सेट झालेल्या जेलीच्या कडेकडेने सुरीचं टोक घालून आधी जेली मोकळी करून घ्या . सेट झालेली जेली अलगद निघून प्लेटमधे (थरथरत!!!!!!) स्थिरावेल.........हो ...... जी थरथरणार नाही, ती जेली कसली? मग धारदार सुरीने त्याचे तुकडे करा.
आणखी एक टीप..........जर जेली थरथरली नाही, म्हणजेच तिला जर जेलीचा जन्म मिळाला नाही तर हाच पदार्थ गेला बाजार "जाम" म्हणून सर्व्ह करायचा! हाकानाका....
(माझी सुरी धारदार नव्हती त्यामुळे तुकडे सुबक नाही झाले.)

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतिये जेली!! गूळ, मीठ आणि जिरं घालून केलेली चटणी खाल्लीये पण ही जेली नाही कधी खाल्ली. मला मात्र जेली बरोबरच 'अधिक टीपा'सुद्धा खूप आवडल्या.

सृष्टी शांकली रैना
धन्यवाद!
हं.......... शांकली कधी कधी बिघडलेला ढोकळा पिठलं म्हणून सर्व्ह केला तरी बिघडत नाही!

थोडस पिकायला आलेल कवठ फोडून त्यात गुळ,मिठ घालुन खायला खूप आवडत. पण गेल्या कित्येक वर्षात कवठ खायच लांबच बघितल सुद्धा नाहिये...>>>+१

झाड नसेल पण कवठ माहिती नाही कोकणात हे मला नवीनच आहे. असो.

आई चटणी करायची पूर्वी शिवरात्रीच्या उपासाला. आवडायची मला. पण स्वयंपाकाळसामुळे मी एकूणच तिच्या हाताखाली असूनही काहीही शिकले नाही! Wink

गूळ, मीठ घालून व्यवस्थित पिकलेलं कवठ कसलं भारी लागतं. बियां सकटच भारी.
आंबट गोड.

जेली पण भारी लागेल.. सध्या स्कोप नाही मात्र..

मानु>> आज तूने मेरी आई की याद दिलाई..........

आमच्या घरी हमखास होणारा प्रकार.. Happy कवठाची, पेरू ची जेली... Happy

सुंदर रंग आलाय..मस्त सेट झालीये...

धन्यवाद गं मुलींनो!
सोनाली कवठ न पाहिलेले खूपजण असतील इथे.
सिंडी.....आपल्या भागात कवठं खूपच मिळतात.
वर्षू ... शो श्वीट!

श्री
या स्टेप्स बघताना किचकट वाटतात. पण कुकरमधून काढायला ५ मिनिटं. आणि शिजलेला गर टांगला की तेवढा १ तासात बाकीची कामं होतातच ना! मग गळलेला रस गॅसवर आटवायला १०/ १५ मि.
मग बरणीत सेट करायला काय वेळ लागेल तेवढा.
नाहीच जमली जेली तर आपला "जाम" आवडता जाम आहेच!

वरती मी लिहिल्याप्रमाणे आई वडी बनवायची. अतिशय सुंदर लागते. तोंडाला चव येते एकदम.
आईशी काल बोलले तेव्हा तिने मी घाईत एकली ती रेसीपी अशी, आले खिसून, कवठाचा गर, गूळ, खिसलेला चव, लिंबूरस(मिश्रण आळायला बहुतेक), आरारूट का कणीक जरासे घालून ढवळून मस्त वड्या पाडायच्या.
इतक्या सुंदर लागतात.

मानुषि ताई, आज करुन बघीतली ही जेली..
तु पा. कृ. ईतकी छान ,सोप्प करुन लिहीलयस की कुठे ही न अडखडता मी सहज करु शकले..
रेसिपी साठी खुप खुप धन्यवाद..

माझ्या आईला पण खुप आवडली..
जेली मस्त पारदर्शक आणि चकचकीत झालीये .. Happy

मानुषी, रेसिपी मस्तच आहे आणि सायु तुला ही छान जमली आहे . दोघींचेही फोटो मस्त आलेत . म्हणजे तुम्ही केलेल्या जेलीचे .

हेमा ताई आणि अन्जु ताई धन्स..:)
अन्जु ताई सोप्पी आहे अगदी १० मी. होते करुन तर बघ एकदा..

Pages