विपुतल्या रेसिप्या २ - बाळ बटाट्यांची भाजी - अर्थात् अलकामावशीची भाजी

Submitted by मंजूडी on 31 March, 2013 - 08:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बाळ बटाटे - पाव किलो
कांदे - २ मोठे
तमालपत्र - १
वाटलेली हिरवी मिरची - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
किसलेलं आलं - साधारण चमचाभर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)
जिर्‍याची पूड - १ चमचा
चिंचेचा कोळ - एक चमचा
हळद, तेल, मीठ, साखर(मी घालते)
साजूक तूप - दोन चमचे
लाल तिखट - अर्धा चमचा (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त)

क्रमवार पाककृती: 

या आयडीला कोणाकोणाच्या विपुतच रेसिप्या लिहिण्याची खोड आहे, निषेध करूनही काऽही उपयोग नाही. या आयडीची विचारपूस करताना त्या रेसिप्यांवरचे प्रश्न आमच्या नजरेस पडतात मग कितीही नाही म्हटलं तरी मूळ रेसिपी आणि उत्तरे शोधण्यासाठी विपौड्या मारण्याचा मोह आवरत नाही. विपौड्या मारण्याची खोड आम्हांला याच आयडीमुळे लागली असे मानायला हरकत नाही.

आता ह्या रेसिपीची प्रमाणं काही त्या विपूमधे लिहिलेली नव्हती, सगळं आम्ही आमच्या अंदाजानेच घेतलं, पण भाजी मात्र त्या आयडीने लिहिल्याप्रमाणे अफाट चवीची झाली. मग त्या आयडीचे आणि रेसिपीच्या मूळ स्रोताचे आम्ही जाहिर आभार मानले, तर बाकी लोकं आम्हाला योग्य विपूचा पत्ता विचारू राहिली. आता ती विपुतली रेसिपी तशी मागे पडली आहे. विपुची पानं उलटता उलटता लोकांचा भाजी करण्याचा उत्साह सरायचा, त्यापेक्षा म्हटलं की ही भाजी लिहूनच टाकूया. ही भाजी लिहिण्यासाठी परवानगी मागण्याचे पुण्यकर्म एका प्रिय मैतरणीने केले आहे, तिचे आभार! तसेच ही भाजी विपूत ठेवणारीचे आभार! तसेच ही भाजी (कुठेतरी का होईना) लिहिण्याचे काम करणारीचे अनंत आभार!

तिच्याच शब्दांत आता पुढे भाजीची रेसिपी:

बारके बटाटे उकडून. (त्यांची सालं काढावी लागत नाहीत.)
किसलेला कांदा, तेजपान, किसलेलं आलं, वाटलेली हिरवीमिरची, हळद तेलात घालून परतायचं. यात उकडलेले बटाटे घालायचे. अगदी जरासा चिंचेचा कोळ आणि मीठ घालायचं. व्यवस्थीत परतून भाजलेल्या जिर्‍याची पूड वरून घालायची. जितका पातळ रस्सा हवा तितकं पाणी घालायचं. उकळू द्यायचं. आता सगळ्यात मस्त भागः चमचाभर (किंवा भाजीच्या क्वांटिटीनुसार) साजुक तूप कडकडीत गरम करून त्यात तिखट घालायचं आणि पोळलेलं हे तिखट्+तूप लागलीच उकळत्या भाजीत ओतायचं. अफाट चविची भाजी होते!

आभार: अलकामावशी

वाढणी/प्रमाण: 
तीन माणसांसाठी एका वेळेला.
अधिक टिपा: 

रबडी-पुरीबरोबर ही अशी भाजी झकास लागते.

alakamavashi bhaji 3 edited.jpg
माहितीचा स्रोत: 
मृण्मयी. विपौड्या. सायो
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या आठवड्यात बाळ बटाटे केले होते. मसाला खुपच आवडला. मस्त झाली होती भाजी.
मला थोडा गुळ घालायचा मोह होत होता, पण आवरला.

लेखीकेला आणि त्या 'अज्ञात' आयडीला धन्यवाद Happy

वॉव आरती, मस्त!!

आज बर्‍याच दिवसांनी (वर्षांनी) इथले प्रतिसाद वाचले. मस्त मज्जा आली.
सशलचा हा प्रतिसाद << (मृणने अजून पर्यंत दोघींनां मावशीची भाजी अशीच दिसते असं सांगितलेलं आहे .. हाहा)>> Lol
आणि पूनमची <<उल्कामावशी>> कोटी Biggrin

आज मी इतक्या सोप्प्या भाजीची पण वाट लावली.
चव अफाट पण अलका मावशीच्या रेसिपीने मॅश्ड पटेटोज झाले.
बटाट्यांनी घात केला. गाळ शिजले.

शूम्पी, तुझा आधी ह्याच बीबी वर भाजी यशस्वी झाली असा एक मेसेज आहे फोटो सहीत. (त्यातही तसे बटाटे मॅश्ड दिसत आहेतच. मग घात कुठे कसा कोणी केला?? ;))

मंजूडी ने "विपूतल्या रेसिप्या" सिरीज् थांबवली की विपौड्या बंद केल्या की विपूत रेसिपीज् लिहीणं संपुष्टात आलं आता?

अमित, आर्च Happy

काही दिवसांपूर्वी डोशांसोबत ही भाजी केली. खरंच "अफाट" चव आहे. कुणी केली नसल्यास करून पाहा हे सांगण्यासाठी ही प्रतिक्रिया. मी जिरेपूड घालायला विसरले मग फोडणीत जिरं/तिखट घातल. यम्म.......:)

ही रेसिपी मला मायबोलीच्याॲपमध्ये दिसली नाही. ॲडमीन हे पाहाल का?

Pages