नायलॉन खमण.

Submitted by सुलेखा on 23 March, 2013 - 08:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप बेसन.
२ टेबलस्पून रवा.
१ टेबलस्पून साखर.
[गोड स्वाद न आवडणार्‍यांनी वगळली तरी चालेल]
१ टेबलस्पून तेल,
२/३ हिरव्या मिरच्या व १ इंच आले बारीक चिरुन ,पाव कप पाण्यात मिक्सरमधे बारीक वाटुन एका गाळण्यातुन गाळुन ते पाणी.उरलेला चोथा टाकुन द्यायचा.
१/२ टी स्पून सायट्रीक अ‍ॅसिड किंवा १ /२ लिंबाचा रस.
१ टी स्पून मीठ,[चवीनुसार]
१/२ टी स्पून हळद,
३/४ कप पाणी,
२ टी स्पून/१ सॅशे इनो फ्रुट सॉल्ट.
फोडणीसाठी :--
१ १/२ टेबलस्पून तेल,[यातलेच थोडेसे तेल थाळीला आतुन लावायला व १ टीस्पून [फोडणी] मिरच्यांसाठी घ्यायचे आहे.
प्रत्येकी १ टी स्पून मोहोरी-जिरे-तीळ,
१/२ टीस्पून हिंग,
४-५ कढीपत्ता पाने .
बारीक चिरलेली कोथिंबीर.
अर्धा कप पाणी.
मिरच्या :--
कमी तिखट अशा पोपटी ,लांब मिरच्या,
चवीपुरते मीठ.

क्रमवार पाककृती: 

एका मोठ्या पसरट बाऊल मध्ये बेसन,रवा,मीठ,साखर,हळद,तेल,आले-मिरचीच्या वाटणाचे गाळलेले पाणी ,सायट्रीक अ‍ॅसिड व ३/४ कप पाणी एकत्र करुन चमच्याने एकाच दिशेने खूप फेटा.मिश्रण पांढरट रंगाचे थोडेसे लेसदार [चिकट] व हलके झालेले दिसेल.
कूकरमधे थोडे पाणी व एक लहान रिंग ठेवुन गॅसवर गरम करायला ठेवा.
एका लहान थाळीला तेलाचा हात लावुन ठेवा.
खमण मिश्रणात इनो घालुन चमच्याने पुन्हा एकदा हे मिश्रण छान फेटा.मिश्रणाचे आकारमान वाढुन हलके झालेले जाणवेल्.लगेचच हे मिश्रण तेल लावलेल्या ठाळीत ओता्.व थाळी कूकर्मधील रिंगवर ठेवा.कूकरच्या झाकणाला रिंग व शीटी न लावता झाकण तसेच कूकर वर झाकुन ठेवा.गॅस मध्यम आचेवर ठेवा.१५ मिनिटे वाफवल्यावर कूकरचे झाकण काढुन थाळीत मध्यावर एक सुरी उभी खोवुन लगेच बाहेर काढुन पहा.सुरीला मिश्रण चिकटलेले नसेल तर खमण छान वाफवला गेला आहे.आता थाळी कूकर्बाहेर काढुन ठेवा.
111111111_0.JPG
५ मिनिटांनी सुरीने थाळीतल्या तयार खमणला चौकोनी वड्यांचा आकार कापा.
फोडणी:--
लहानशा फोडणीच्या कढईत तेल ताप्वुन त्यात मोहोरी-जिरे-हिंग घाला गॅस बंद करा.आता त्यात तीळ्,कढीपत्याची पाने हाताने तुकडे करुन टाका्.-१ चमचा फोडणी बाजुला ठेवुन बाकीची फोडणी अर्धा कप पाण्यात ओता .चमच्याने पाणी ढवळा..
हे पाणी थाळीतल्या चौकोनी आकाराच्या वड्या कापलेल्या खमणवर ओता.खमण गरम असल्याने सर्व पाणी त्यात शोषले जावुन खमण अलवार होईल.अतिशय हलका,छान फुगलेला व हलका असा नायलॉन खमण तयार आहे.
22222222222.JPG
मिरच्या:---
एका पातेलीत थोडे पाणी घेवुन गॅसवर गरम करा.उकळले कि त्यात मिरच्या टाका.५ मिनिटे झाकण ठेवुन उकळवा.मिरच्यांचा मूळ हिरवा रंग कमी होवुन फिक्कट पिवळा झालेला दिसेल.आता या मिरच्या गाळण्यावर गाळुन घ्या.त्यातील पाणी टिपले कि त्यात थोडेसे मीठ व फोडणीतुन वगळलेले तेल घाला. चमच्याने हलवुन घ्या.
प्लेट मधे तयार नायलॉन खमण त्यावर कोथिंबीर व मिरची ,चवीसाठी टोमॅटो सॉस घ्या.वरुन बारीक शेव घालुन लज्जत वाढवता येईल.

अधिक टिपा: 

बाऊल मधे कालवलेले व फेटुन तयार झालेले मिश्रण सहज ओतण्याच्या स्वरुपाचे असावे.मिश्रण घट्टसर असले तर फुगणार नाही.त्यामुळे फेटुन झाल्यावर कन्सिस्टन्सी पहावी.वाटल्यास १-१ चमचाभर पाणी घालावे.
बाऊल मधील मिश्रणात घातलेल्या तेलामुळे खमण मऊसर होते व खाताना घशात तोठरा बसत नाही.
वरुन घातलेल्या पाणीमिश्रीत फोडणीमुळे खमण अलवार्,ओलसर्,मऊ रहातो .
मिरच्या गरम पाण्यात उकळवल्यावर गाळलेले मिरचीच्या स्वादाचे तिखट पाणी बेसन कालवण्यासाठी घेता येईल.

माहितीचा स्रोत: 
मारु रंग रंगिलु गुजरात.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अष्विनी.त्यामागचे शास्त्रीय कारण मलाही नेमके सांगता येणार नाही.कदाचित बेसन भिजवल्यावर फार स्मूद्/गुळगुळीत होते चांगला फुलुन यावा म्हणुन ही कन्सिस्टन्सी तोडण्यासाठी घालत असावे.जाणकार जास्त विस्तृत सांगतीलच.

मस्त, मस्त! Happy

>> पण माझा लालसर झाला.हळद आणो सोड्याची रिअ‍ॅक्शन झाली

ह्याचीच भिते वाटते आणि सोड्याच्या चवीचीही .. त्यामुळे ढोकळा करायचं अजिबात धाडस नाही ..

सुलेखा, सोज्जी के फुल हा लिंबाला पर्याय आहे की पापडखाराला? म्हणजे दोन्ही घालायचे की एकच ? माझा नवरा म्हणतो (अर्थातच उपहासाने) की धुण्याचा सोडा घातलास तरी चालेल पण बाजारसारखा ढोकळा बनवलास तर खरी. Happy

सशल, इनो (निळं पाकिट) घालून लाल रंग येत नाही आणि सोडा टाईप चवही येत नाही. साधारण १ वाटी शिगोशिग भरुन बेसनाला १ सॅशे इनो आणि लहान मोठ्या लिंबाच्या साईजप्रमाणे अर्धं किंवा एक लिंबू.

सुमेधा ,सोजी के फुल आणि पापडखार हे दोन्ही एकच वस्तु आहे.या दोनही नांवाने नावाजला जातो.खा.सोडा किंवा बेकिंग सोडा वापरण्याऐवजी हा पापड खार वापरायचा.जसे खा.सोडा वापरला आणि त्याबरोबर पदार्थात हळद घातली तर वाफवल्यावर्/बेक केल्यावर त्याची रिअ‍ॅक्शन होवुन गुलाबी/लाल रंग येतो.त्यामुळे हळद अगदी कमी संभाळुन टाकावी किंवा अजिबात टाकु नये.त्याअवजी पिवळा रंग वापरला तर चालेल.
लिंबुरस किंवा सायट्रीक अ‍ॅसिड वापरावेच लागेल.
खा.सोडा जरासाही जास्त झाला तर पदार्थ फसतो त्याशिवाय घशाला लागतो.पण जर इनो वापरला तर हा प्रकार होत नाही.तसेच चुकुन थोडा जास्त वापरला तरी पदार्थ "बिघडत" नक्कीच नाही.हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.

पापडखाराला सज्जीखार असा शब्द आहे. त्यातला कार्बन डाय ऑक्साईड उच्च तपमानाला वेगळा होतो म्हणून पापडात घालतात. तो जरा जास्त पॉवरफूल असतो त्यामूळे पापडातील सुक्या उडदाच्या पिठालाही हलका करु शकतो.

खायचा सोडा मात्र नेहमीच्या तपमानाला पण आम्लाशी प्रक्रिया झाल्यास, कार्बन डाय ऑक्साईड सोडतो. त्यामूळे लिंबू रस आणि खायचा सोडा वापरतात. पण या क्रियेसाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी नसेल ( म्हणजे कोरड्या रुपात जर हे एकत्र केले. ) तर हि प्रक्रिया होत नाही. इनो म्हणजे असेच कोरडे मिश्रण असते.

मी केला आज ढोकळा. पण माझा खालच्या भागात घट्ट वडी आणि वर अर्ध्या इंचाचा थर स्पॉन्जी झाला.
प्रमाण वर दिल्याप्रमाणे काटेकोर घेतले तरीही काही तरी चुकलेच..:(
नक्की कुठे चुक झाली माझी?? Uhoh

सारीका,
इनो घालण्याआधी व इनो घातल्यावर मिश्रण छान ढवळुन्/मिक्स घ्यायचे आहे.कदाचित वर वर चेच ढवळले गेले असेल किंवा पाणी थोडे कमी पडले असेल.मिश्रण सहज ओतण्यासारखे सरसरीत हवे.तसे म्हटले तर ३-४ वेळा चुकत-चुकतच परफेक्ट ढोकळा बनवता येतो.कारण आपण घेतलेल्या प्रमाणाचा [वाटी/कप व इतर जिन्नस]आपला अंदाज आपल्यालाच बांधता आला पाहिजे. मी ही याला अपवाद नाही.

Pages