"पोल स्टार ऑफ द स्टेज अ‍ॅन्ड सिनेमा...."

Submitted by अशोक. on 19 March, 2013 - 03:55

श्री.विक्रम चंद्रकांत गोखले

Avikram.jpg

असे एक नाव की जे उच्चारताना वा लिहिताना वा ऐकताना अशी भावना होते की जणू काही आपण काहीतरी विलक्षण आणि हवेहवेसे चित्र नजरेसमोर आणीत आहोत. आजच्या तारखेला जवळपास चाळीस वर्षे पूर्ण होतील विक्रमजींच्या नाट्य आणि सिनेप्रवासाला. इतक्या प्रदीर्घ प्रवासाने साकारलेले ते व्यक्तिमत्व किती अनुभवसंपन्न असेल याची सहजी कल्पना या राज्यातील प्रत्येक मराठी माणूस करू शकेल. "लोकप्रिय अभिनेता, अभिनेत्री" हे बिरुद मिरविणारी डझनांनी आढळतात....आणि कालौघात लोपही पावतात, पण या क्षेत्रात ज्याला सर्वार्थाने 'आदरणीय' म्हटले जाईल अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे समोर येतील. पैकी प्रामुख्याने घेतले जाईल ते विक्रम गोखले यांचेच यात दुमत नाही. केवळ 'लिजंडरी अ‍ॅक्टर' अशी त्यांची ओळख करून देणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल, कारण रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातील 'नॉलेजेबल पर्सन' असा त्यांचा उचित उल्लेख केला जातो ते सार्थच आहे. "हिंदू" या दक्षिणेकडील प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या एका अंकात विक्रम गोखले यांची "पोल स्टार ऑफ द स्टेज अ‍ॅन्ड सिनेमा" असा समर्पक उल्लेख झाला होता.... [मराठीतील कोणत्याच माध्यमाने त्याना अशारितीने गौरविले नसेल....इतकी दरिद्रता आमच्याकडे निश्चित्तच आहे म्हणा.]

कै.चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याच्या घरी जन्माला आलेल्या विक्रमजींनी जशी वडिलांच्या कारकिर्दीची स्फूर्ती घेतली तद्वतच विजया मेहता यांचेही त्यानी शिष्यत्व पत्करले होते. या लेखात विक्रम गोखले यांच्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील वाटचालीचा किंवा रंगभूमीवरील भूमिकांचा उल्लेख करण्याची आवश्यकता बिलकूल नाही, कारण इथल्या प्रत्येक सदस्याला 'विक्रम गोखले' यांची ती वाटचाल नक्कीच माहीत आहे, इतके हे नाव "घरचे" झाले आहे.

"मी भला आणि माझे काम भले...." ही भूमिका कधीच विक्रमजीनी घेतलेली नाही. रंगभूमी असो वा चित्रपट वा टेलिव्हिजनचे विश्व....नवख्या मुलामुलींना तसेच या क्षेत्रात पडद्यामागे धडपड करणार्‍या तंत्रज्ञांसाठी विक्रम गोखले म्हणजे एक इन्स्टिट्यूटच बनले आहे. या सर्व उदयोन्मुख कलाकारांसाठी ते 'सर' झाले आहेत. मार्गदर्शनाचा हा वारसा विक्रमजींना जसा कै.चंद्रकांत गोखले यांच्याकडून मिळाला तसाच 'गोखले' घराण्याचे चित्रपट माध्यमाशी असलेल्या अजोड नात्याकडूनही. विक्रमजी यांच्या आजी कमलाबाई गोखले तर चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालकलाकार या नात्याने चित्रपट इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत. दादासाहेब फाळके यानी ते कार्य केले होते....तोच वारसा चंद्रकांत गोखले आणि त्यानंतर विक्रमजीना लाभला आहे हे नक्की.

चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील 'संसार' सांभाळून विक्रमजी सामाजिक कार्यापासूनही कधीच दूर राहिलेले नाहीत. वडिलांनी अपंग सैनिकांसाठी चालविलेल्या मदतनिधीचे कार्य असो वा कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी तसेच अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असो.... गोखले कुटुंबियांनी स्थापन केलेल्या घरगुती निधीतून गेली २५ वर्षे मदत जात आहे, अन् तेही कसलाही गाजाविजा न करता.

आज या लेखाचे प्रयोजन म्हणजे काल जाहीर झालेल्या ६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात श्री.विक्रम गोखले याना 'अनुमती' या गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटातील भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्या' चा पुरस्कार प्राप्त झाला आहे.....

मनःपूर्वक अभिनंदन विक्रमजी.

[यंदा मराठी कलाकारांनी पुरस्कारात आघाडी मारलेली दिसत्ये हादेखील एक आगळा आनंद आहेच..... सुदैव म्हणावे लागेल आमचे की हे चित्रपट आम्हाला पाहायला मिळतील.]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅन्क्स उदयन....

~ हे 'सार्वजनिक' प्रकरण डोक्यात आलेच नाही....तुम्ही सांगितले नसते तर राहूनच गेले असते हे नक्की.

अशोक पाटील

कॉलेजमध्ये असताना मॅगझिनसाठी विक्रम गोखलेंची मुलाखत घेतली होती, तो प्रसंग आठवला..

लेख अजून मोठा हवा होता, अशोकमामा Happy

विक्रम गोखले यांचे अभिनंदन तर आहेच पण त्यांच्या योग्यतेच्या भुमिका त्यांना मिळाल्या नाहीत हि खंतही आहे. नाटकेही मोजकीच केली त्यांनी.

दिनेशदा,

स्वभावामुळे असेल कदाचित. तडजोड न करण्याची वृती सगळ्यांचाच लौकीकार्थाने फायदा करून देत नाही.

बाकी लेख लिहीताना हात आखडता घेतल्यासारखा वाटला श्री. अशोक.

आनंदयात्री आणि विजयराव....

~ मान्यच.... हात आखडता घेण्याचे कारण म्हणजे मुख्य हेतू विक्रमजींना जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यासंदर्भात लिहिणेच मनी होते.... शिवाय इथे घडू शकणार्‍या चर्चेद्वारेही त्यात भर पडत जाईल हीदेखील एक भावना आहेच... म्हणून लेखाला काहीसा त्रोटकपणा आल्याचे दिसत्ये.

वर दिनेशदा म्हणतात तेच खरे.....विक्रमजींच्या क्षमतेच्या भूमिका त्याना कमीच मिळाल्या. त्या मानाने डॉ.श्रीराम लागू जास्त नशिबवान ठरले असे म्हणावे लागेल.

अशोक पाटील

छान लिहीलयं अशोकजी. विक्रम गोखलेंचे तर अभिनंदन आणी कौतुक देखील. मला ही वाटते की त्यांनी तडजोड केली नसावी. कारण इतरांशी प्रामाणीक असणारा माणुस स्वतःशी देखील प्रामाणीक असावाच लागतो. तसे विक्रम गोखले आहेत.

विक्रम गोखलेंबाबत मला माहीत असलेली एक गोष्ट म्हणजे, ते महानायक अमिताभ बच्चनचे आवडते अभिनेते आहेत.

मस्त आणि समयोचित लेख अशोकजी.

बॅरीस्टर म्हणजे विक्रम गोखले हे समीकरण, (विजयाबाईंचेच दिग्दर्शन असून देखील) रावसाहेब मधला अनुपम खेर, नाही बदलू शकला.
मी त्यांना "दुसरा सामना" या नाटकात पण बघितले. सोबत विनय आपटे, इला भाटे, सयाजी शिंदे असे कलाकार होते. हे नाटक म्हणजे "सामना" या चित्रपटाच्या पुढचे कथानक होते.

लेख समयोचित अन माहितीपूर्ण, पण आनंदयात्री अन विदिपांशी सहमत.
हात आखडता घेतलात लिहिताना अशोकजी.
विक्रम गोखलेंचे मनःपूर्वक अभिनंदन.एक उमदा,समर्पित अभिनेता.

>>विक्रमजींच्या क्षमतेच्या भूमिका त्याना कमीच मिळाल्या. त्या मानाने डॉ.श्रीराम लागू जास्त नशिबवान ठरले असे म्हणावे लागेल>>

या पुरस्कारामुळे त्यांना मिळालेलं नशिबाच्या थोड्या डाव्या दानाची अंशतः भरपाई झाली असे वाटले..

त्यांनी भुमिका केलेल्या चित्रपटांची आणि नाटकांची यादी करायला हवी.
अगदी सुरवातीला काही मराठी चित्रपटात त्यांनी नायकाच्या भुमिका केल्या. वर्‍हाडी आणि वाजंत्री ( सोबत इंदुमती पैंगणकर ) आठवतोय. सावध हरीणी सावध गं, हे गाणे पण त्यांच्याच तोंडी होते. पण नंतर का केल्या नाहीत कळत नाही.
जास्वंदी आणि बॅरिस्टर ( दोन्ही विजया बाईंच्या दिग्दर्शनात ) नंतर दुसरा सामना. हि नाटके आठवताहेत. अधे मधे बरेच पॉझेस होते.

अश्विनी भावे सोबतचा, "वजीर" चित्रपट मात्र अगदीच सुमार होता.

कळत नकळत पण चांगला आहे.
अजुन एक जुने गाणे - निळे गगन निळी धरा, निळे निळे पाणी... ही आगळी कहाणी.... पिक्चरचे नाव नाही आठवत.

मामा लेख सुरू झाल्या झाल्या संपला.. या अभिनेत्याबद्दल अजून बरंच काही लिहिता येईल.
मला एक प्रसंग आठवतोय२००१ ते २००३ मधला कुठला तरी . एकदा विक्रम गोखले कर्वे रोडच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आले होते.. आणि बराच वेळ बँकेच्या बाहेरच उभे होते.. बहुतेक त्यांचं काम करायला त्यांचा माणूस आत गेला होता. मी रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला उभी राहून ते जाईपर्यंत त्यांच्याच कडे पहात बसले होते. निदान अर्धा तास तरी होतेच ते तिथे, पांढरा झब्बा पायजमा आणि गॉगल... आणि गाडी पण चांगली हायफायच होती. पण ते असताना त्यांच्या गाडीकडे कोण पाहिल? हुं!
अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व.

मोनालिप....

१९७९ मध्ये आलेल्या "मामाभाचे" या चित्रपटातील ते सुरेख गाणे. जगदिश खेबुडकरांचे आणि एन.दत्ता यांचे..... हे गाणे ऐकताना मला खेबुडकरांच्या

माती ही मायमाऊली, गंधाने चिंब नाहली
वारसा तिचा, खरा दास मी तिचा
नाती ही आमुची पुराणी !

ह्या ओळी खूप भावतात. विशेषतः सुट्टीत गावी जात असताना....नाक्यावर एस.टी. तून उतरल्यावर घरापर्यंतचा अजून दोनेक किलोमीटरचा शेतातून जाणारा तो कच्चा रस्ता तुडविताना....ह्या ओळी गुणगुणाव्यात असेच वाटत असे.... इतक्या त्या बोलक्या आहेत.... विक्रम गोखलेनी अगदी तसाच अभिनय केला आहे या प्रसंगात.

"मधुमती" मधील "सुहाना सफर और ये मौसम हसी..." यापासून आपणास ह्या गीताची स्फूर्ती मिळाली असे जगदीश खेबुडकरांनी एका मुलाखतीत सांगितले होते....अगदी तसे चित्रितही करण्यात आले आहे मराठीमध्ये.

अशोक पाटील

@अशोक
विक्रम गोखले यांचे अभिनंदन !
विक्रम गोखले यांचे अभिनंदन करण्याच्या या उपक्रमात आम्हालाही सहभागी होण्याची संधी दिलीत याबद्दल धन्यवाद!
पण विजय दिनकर पाटील यांच्या 'बाकी लेख लिहीताना हात आखडता घेतल्यासारखा वाटला श्री. अशोक.'
याशी सहमत.
या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू आपण हळुहळु प्रतिसादांचे रूपात मांडालच. पण आपल्या लेखातच ते एकत्र वाचण्याचा आनंद विखुरलेले प्रतिसाद देऊ शकत नाहीत. वेळीच अभिनंदन करण्याचे औचित्य साधायच्या सद हेतूमुळे असे झाले असावे. आता जे पैलू आपण प्रतिसादात मांडाल तेच मूळ लेखातही समाविष्ट करता येणे शक्य असल्यास पहावे. त्यामुळे आपला कोणताही लेख जसा परिपूर्ण असतो तसाच लेख वाचल्याचे समाधान आम्हा वाचकांना मिळेल.
सिनेमा, नाटक, समाज वा शासन यातील कोणत्याही गैर वाटणार्‍या गोष्टींबाबत परिणामांची क्षिती न बाळगता परखडपणे आवाज उठवणे हे कलाकारांमध्ये सहसा न आढळणारे साहस विक्रम गोखले यांच्याजवळ आहे असे मला जाणवते.

@ दक्षिणा तसेच
मी-भास्कर....

"...वेळीच अभिनंदन करण्याचे औचित्य साधायच्या सद हेतूमुळे असे झाले असावे....."

~ परफेक्ट. नेमके हेच औचित्याचे भान माझ्या मनी होते आणि त्यामुळेच श्री.विक्रम गोखले यांच्या अभिनंदनाचा आजचा दिवस चुकवू नये याच एका हेतूने लेख त्रोटक का असेना पण देऊ या असे वाटत राहिले.

आलेले प्रतिसाद वाचल्यावर तसेच काही मित्रसदस्यांनी फोनवरूनही ही बाब आवर्जून सांगितल्यामुळे एकूणच श्री.विक्रम गोखले यांच्या नाट्य आणि चित्रपट कारकिर्दीवर स्वतंत्रपणे लिहिणे गरजेचे वाटू लागले आहे.

तसे लिहितोही.... अर्थातच काही अभ्यासानंतर.

अशोक पाटील