माझा पहिला परदेश प्रवास : १६ (वास्तवाची चपराक.)

Submitted by ललिता-प्रीति on 20 October, 2008 - 00:47

वास्तवाची चपराक.

दोन वाजत आले होते. म्हणजे पुढचा दिवस सुरू झाला होता. पण ते शरीराला कळणार कसं झोप काढल्याशिवाय !!

हवाई सुंदरीची प्रात्यक्षिकं वगैरे सुरू झाली. चेहेऱ्यावर तेच ते मुद्दामून आणलेले स्वागतोत्सुक भाव; कसलं ते काळ, वेळ, झोप, जागरण सगळ्याच्या पलिकडे गेलेलं त्यांचं आयुष्य!! ... माझं डोकं आता अजिबात चालत नव्हतं. एकीकडे लंच किंवा डिनर यापैकी काहीही नसणाऱ्या अश्या खाण्याच्या तिसऱ्या प्रकाराचं वाटप सुरू झालेलं होतं. काट्या-चमच्यांचे, पाण्याच्या ग्लासेसचे आवाज कानावर पडत होते पण मेंदूपर्यंत काहीही पोचत नव्हतं. मी सीटवर ठेवलेलं पांघरूण पूर्ण डोक्यावरून ओढून घेतलं आणि झोपायचा माझा मनसुबा जाहीर केला. बघता बघता माझा डोळा लागला सुध्दा ...
जराशी डुलकी लागणार इतक्यात एका हवाई सुंदरीनं मला अक्षरशः हलवून जागं केलं आणि 'काही खायला नको का?' अशी अगदी प्रेमानं चौकशी केली! आता तिला काय सांगायचं की अगं बाई तुझी सकाळ, संध्याकाळ, रात्र काय चालू आहे माहीत नाही पण माझी मध्यरात्र झाली आहे, झोपेची वेळ टळून सुध्दा २-३ तास झालेत...खाण्यापेक्षा जरा झोप काढू दिलीस तर अनंत उपकार होतील!! पण तिचीही चूक नव्हती. ती यांत्रिकपणे, इमाने-इतबारे तिचं काम करत होती. शक्य तेवढा सौम्य चेहेरा ठेवून मी तिला नकार दिला. आदित्यकडे एक नजर टाकली तर तो केव्हाच गाढ झोपी गेलेला होता. म्हणजे त्यादिवशी त्यालाही ऍपल ज्यूस प्यावसं वाटलं नव्हतं ...

... अर्धवट झोपेत अर्धा-एक तास गेला असेल. सगळे दिवे पुन्हा सुरू झाले, वैमानिकाच्या सूचनेनं जाग आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी!! दहा-पंधरा मिनिटांत विमानानं भारतभूमीवर टायर्स टेकवले होते.
पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा 'आयुबोवान' कानी पडलं, आम्ही एकएक करून बाहेर पडायला लागलो. विमानातून बाहेर पाऊल ठेवल्याक्षणी एक अत्यंत कुबट वास नाकात शिरला. तो खास आपल्या देशाचा वास होता - मुंबईचा म्हणता ये‍ईल फारफार तर! त्या 'खास' वासाबद्दल पूर्वी अजयकडून ऐकलं होतं. तेव्हा मनातल्या मनात त्याला 'अतिशयोक्ती' म्हणून नावं देखील ठेवली होती. पण ते खरं होतं. तो वास आल्याआल्या त्याचे ते उद्गार मला आठवले. 'जावे त्याच्या वंशा...' दुसरं काय!!

सामान घेऊन थोड्याच वेळात आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो होतो. सामानाची तपासणी वगैरे काहीच झालं नाही. चार वेगवेगळ्या विमानतळांवरच्या अनुभवानंतर ही गोष्ट चांगलीच खटकली! अगदी थोड्याश्या अवधीत सुरक्षाव्यवस्थेतल्या खंडीभर तृटी आढळल्या! जाताना जे-जे भव्य-दिव्य, जगावेगळं वाटलं होतं ते-ते सगळं आता दुय्यम, निकृष्ट दर्जाचं वाटायला लागलं - अगदी सामानाच्या ट्रॉलीज पासून पायाखालच्या फरश्यांपर्यंत सगळं!
बाहेर तर अक्षरशः भाजीबाजाराची अवकळा आलेली होती. पाण्याची डबकी, कचरा, धूळ आणि त्या कुप्रसिध्द पानाच्या पिचकाऱ्या!!! हातातली बॅग खाली फ़ूटपाथवर टेकवताना क्षणभर हात अडखळला - इथे आपली बॅग ठेवायची? या घाणीत?? पेंगुळलेले डोळे खाडकन उघडले होते, सार्वजनिक स्वच्छतेसारख्या साध्या गोष्टींत आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचाय या जाणीवेची जोरदार चपराक पुन्हा एकदा बसली होती! त्याच फ़ूटपाथवर पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीहून येणाऱ्या बसची वाट पाहत आम्ही मजेत गप्पा मारत 'बसलो होतो' हे आता खरं वाटेना!! पण हेच वास्तव होतं, ते स्वप्न होतं ज्यानं आम्हाला गेल्या पंधरा दिवसांत अनोख्या जगाची सफर घडवून आणली होती. चकली-चिवडा खायचा तर हे वास्तव स्वीकारणं भाग होतं!!
पुण्याला जाणाऱ्या मंडळींनी बसची व्यवस्था केली. कल्याण-डोंबिवलीला जायलाही बस होतीच. आम्ही टॅक्सी ठरवली. साडेसहाला जे तिथून सुटलो ते दोन तासांत वापीच्या घरी पोचलो सुध्दा.

दूधवाले, पेपरवाले सकाळच्या लगबगीत होते, ऑफ़िसला जाणारे आपापल्या घाईत होते, दिवाळीची सुट्टी संपायला एक दिवस अवकाश होता त्यामुळे शाळकरी मुलं साखरझोपेत होती ... इथे काहीही बदललेलं नव्हतं ... बदललं होतं ते आमचं अनुभवविश्व!

दुपारी मस्त गरमागरम वरण भात खाल्ला आणि आडवी झाले. संध्याकाळी सहा वाजता झोप पूर्ण झाली. डोळे उघडल्यावर थोडा वेळ काही कळेचना - आपण कुठे आहोत, ही खोली कुठली - काही उलगडेना ........ (समाप्त)

गुलमोहर: 

मी ही वाचून काढलं एका फटक्यात. मागे कधीतरी मधेच एखादा भाग वाचल्याचं आठवलं.
मस्त लिहिलं आहेस.

आई ग्गं! या लेखनावर नवीन प्रतिसाद पाहून जरा धक्काच (सुखद ;)) बसला.
धन्यवाद मंडळी. Happy

लले, मी पहिल्यांदा वाचलं आज एका दमात. ओघवते आणि सुंदर लिहिलं आहेस. आताशा सगळी एअर्पोर्टस अगदी मुंबई डोमेस्टिक सुद्धा चांगली झाली आहेत. दिल्ली टर्मिनल थ्री तर अजुनच मस्त झालय.

तुझी लिखाणाची शैली नेहमीप्रमाणे अप्रतिम. तुझ्याबरोबर आमचाही प्रवास झाला Happy

अप्रतिम लेखमालीका. काल पासून सर्व भाग वाचून काढले. अतिशय तपशीलवार माहिती आणि ती माहिती वाचकांपर्यंत छान रंगतदार पद्धतीने पोहोचाविणे या दोन्ही गोष्टी फारच उत्तम जमल्या आहेत.

Pages