इलेक्ट्रॉनिक्स तिरस्कार मंडळ

Submitted by सुशांत खुरसाले on 12 March, 2013 - 12:05

नुकताच बारावी या त्रिखंडात बदनाम ठरणार्‍या इयत्तेचा इलेक्ट्रॉनिक्स या भौतिकधार्जिण्या विषयाचा पेपर पार पडला. पेपरचे तडाखे खाऊन लालबूंद झालेल्या समस्त उपेक्षित वर्गाच्या पुढाकाराने 'इलेक्ट्रॉनिक्स तिरस्कार मंडळा'ची स्थापना करण्यात आली.या मंडळाचे अनुयायी हे कुठ्ल्याही एका विचारसरणीचे मांडलिक नसून त्यांचे समाजमनात तीव्र खळबळ निर्माण करणारे तत्वज्ञान आहे आणि आजवर त्यांनी आगलाव्या कामांचीच शिकस्त केली असल्याचे स्पष्ट होत आले आहे.
मंडळाच्या स्थापनामुहुर्तावरच काही प्रक्षोभक ठराव मंजूर करण्यात आले..
ते खालीलप्रमाणे--

१)'इलेक्ट्रॉनिक्स' हा शब्दही निघाल्यास जळजळीत अग्रलेख लिहून उच्चारणार्यासहीत त्याच्या ४२ पिढ्यांचा उद्धार केला जाईल.

२)भौतिकवादी माणसांचा मंडळाच्या सभासदांकडून तीव्र धिक्कार केला जाईल.तसेच पदोपदी त्यांना अवहेलनेचे धनी व्हावे लागेल..

३)चिमुकाल्या कार्ट्यांना सॄजनात्मक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या तोडफोडीचे प्रशिक्षण दिले जाईल.

४)मंडळाच्या कुठल्याही कार्यक्रमात विजेचे दिवे वर्ज्य असल्याने इलेक्ट्रॉनिक्स
चे पेपर ,पुस्तके आणि वस्तुंची होळी करून रोषणाई केली जाईल.

५)बिल गेट्सच्या घरी पाणी भरणार्‍या ,त्याचे गुळचट अन्न खाणार्‍या अणि महाराष्ट्रप्रांतात येऊन केवळ सुधारणावादाचे ढेकर देणार्‍या परबुद्धी माणसांचे वैयक्तिक अथवा सामुदायिक पद्धतीने नुकसान करण्याचा अधिकार मंडळाच्या कार्यकर्त्यांना बहाल करण्यात येत आहे.

६)मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये सुधारणावादी ,इलेक्ट्रॉनिक्स पूजक मंडळींना प्रवेश निषिब्ध ठरवण्यात आला असून या मंडळींनी घरीच विजेचे दिवे चालू -बंद करत बसावे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

कार्यकर्त्यांसाठी छोटीशी नियमावली----

१)संगणक ,भ्रमणध्वनी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचा वापर सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विरोधी प्रचारासाठीच करावा.या वस्तुंचा वापर इलेक्ट्रॉनिक्स
विरोधासाठी करतो आहोत ,हे मात्र तिळमात्रही जाणवू देऊ नये .

२)प्रियकर्/प्रेयसी यांची इलेक्ट्रॉनिक्स विरोधी मते जागॄत करण्याच्या पूर्वअटीवरच सदस्यांनी प्रेमात पडावे. प्रियकर्/प्रेयसी यांनी 'मला मोबाईल / लॅपटॉप / टॅब्लेट / आयपॅड इत्यादींविना जगणे अशक्य आहे' अशी हतबल ,अगतिक विधाने केल्यास 'मग माझ्याविना जगणे शक्य आहे वाटतं' असे भावनिकतेत गुरफटलेले तिरसट शब्दखेळ करावेत.
इतक्या उपरही मते बदलण्यास संबंधित सदस्य अपात्र ठरल्यास इलेक्ट्रॉनिक्स विरोधी यज्ञात प्रेमाची आहुती द्यावी.

३) एखादा चुकून हुकून प्रेमात पडल्यास भर रात्री एसएमएस -चॅटिंग करून
इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे महत्त्व सदस्यांनी वाढ्वू नये ,ही नम्र विनंती ..
सदस्याने अतिरेक केल्याचे आढळल्यास या विनंतीतील नम्रता बोथट करून त्याचा भ्रमणध्वनी अनिश्चित कालखंडासाठी जप्त केला जाईल..

४)कार्यकर्त्याच्या कुळातील अस्तित्वात असलेल्या सर्व सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक्स
उद्योगांशी संबंधित सर्व नोकर्‍या तात्काळ सोडून द्याव्यात्..त्यापेक्षा घरगुती उद्योग टाकावेत्.पण पापड, शेवया इ. उद्योग टाकण्याची अवदसा सुचल्यास इलेक्ट्रॉनिक्स यंत्रे वापरू नयेत्.त्यासाठी मंडळाकडून अनुदान मिळणार नाही..
(पानटपरीसाठी अनुदान उपलब्ध -दामदुप्पट व्याजदरासहीत परतफेडीच्या अटीवर)

५)दॄढनिश्चय आणि दॄढ्संयम हे गुण अंगी पुरेपुर बाणवल्याशिवाय सदस्य होऊ इच्छिणार्‍या व्यक्तीने सदस्यप्रवेशाच्या १५ पानी फॉर्मला शिवू सुद्धा नये.कारण तिरस्कार मोहिमेअंतर्गत खालील घटक पाळणे आवश्यक--
(१) भर उन्हाळ्यातही पंखा ,कुलर ,एसी अशा थंड हवा शिंपडणार्‍या
साधनांपासून दूर राहून आपल्या तिरस्काराचा अग्नी धगधगत ठेवणे .

(२)वाचलेल्या लाइटबिलातून कँडल लाइट डिनरसारखे प्रकार करता येतील .परंतु त्यातील काही रक्कम मंडळाच्या कार्यालयात (सेवा निधी या कलमाखाली)जमा करावा लागेल.

६) आपल्या लहान मुलांना खेळवण्यासाठी सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक्स बाहुल्या ,विमाने इ.चा उपयोग करू नये .त्यापेक्षा देशी छापाचे खुळखुळे वापरून पोरांचे मनोरंजन करावे. इलेक्ट्रॉनिक्स बाहुल्या ,विमाने असल्यास ती तोडफोड प्रशिक्षण वर्गात विल्हेवाट लावण्यासाठी पाठवून द्यावीत.

७)दर महिन्याला मंडळाची महाअधिवेशने होणार असून त्यासाठी लागणारा पैसा सदस्यांच्या घरचे दूरदर्शन संच तसेच छत्र्या विकून उभा केला जाईल.
पैसा उभारण्याला विरोध करणार्‍याला आडवा केला जाईल.

८)इलेक्ट्रॉनिक्स विरोधी वातावरण तापवण्याची शपथ घेतलेल्या परंतु वारंवार
शपथभंग करणार्‍या कार्यकर्त्यास जालीम दंड केला जाईल.
त्याच्या पूर्वकार्याची कुठ्लीही दखल न घेता किमान निर्दयतेने त्याच्या घरचे वीज - कनेक्शन कापून टाकले जाईल.

९)मंडळाची प्रतिष्ठा देशाच्या अथवा खानदानच्या प्रतिष्ठेप्रमाणे जपावी.मंडळाच्या कार्यक्रमांत सक्रीय सहभाग नोंदवणे ,आत्यंतिक धावपळ दाखवून 'मंड्ळाचे प्रस्थ किती मोठे आहे' हे भासवणे ,हे उद्योग नित्यनेमाने केल्यास कार्यकर्त्यांना वाढीव अधिकार मिळ्तील.

१०)वरीलपैकी कुठ्ल्याही कलमास तुच्छ लेखणे ,त्यास जाचक संबोधणे ,त्यांची टवाळी वा पायमल्ली करण्याचा प्रयत्न करणे ,हे दखलपात्र दंडनीय गुन्हे समजले जातील्.असे गुन्हे करणार्‍यांना थेट ई-कचरा डेपोत नेऊन टाकले जाईल...
-----------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा अतिशोयक्ती वाटत असली तरी प्रयत्न उत्तम...
मी सुद्धा बारावीला असून आपल्या ईले.तिरस्कार मंडळाचा 15पानी सदस्यता फार्म पाठवून द्यावा...
आपल्या मंडळाचा नावलौकिक वाढत जावो हीच अपेक्षा..

बारावीचा 'भौतिकशास्त्राच्या'पेपर बद्दल ऐकायला खूप आवडेल...

सुशांत,

इलेक्ट्रॉनिक्स या शब्दाचं मूळ इलेक्ट्रॉनमध्ये आहे. तिथेच सगळा अनर्थ झालाय. त्यामुळे पॉझिट्रॉन शोधणारा पॉल डिराक हे तुमचं दैवत असू द्या. मग बघा तुमचा मस्तपैकी कल्ट जमतो की नाही ते!

या सूचनेबद्दल मला तुमच्या संघटनेचं मानद सदस्यत्व देऊ शकता. Lol मी दर महिन्याला येऊन पॉझिट्रिसिटी, पॉझिट्रोडायनॅमिक्स, पॉझिट्रोमॅग्नेटिक फील्ड, वगैरेंवर व्याख्यान देईन. गेलाबाजार पॉझिटिव्ह थिंकिंग तर कुठेच जात नाही! Proud अर्थात, भरभक्कम मानधन घेऊनच! Wink

आ.न.,
-गा.पै.

गामाभाऊंना मी सांगू इच्छिको की,
मंडळाचे फाटके देणगीदार पाहता 2diode मधून 3IC चे पैसे वजा केल्यावर येणारी निव्वळ रक्कम व्याख्यात्यांना मानधन म्हणून दिली जाईल ..1diode=3Rs. & 1IC =5Rs.

आपली पॉझिटीव्ह थिंकींग आवडली...
फॉर्म सगळ्या माबोकरांना आम्हीच वाटणार आहोत..
विञानाचाही दांडगा अभ्यास दिसतो आपला (पॉल डिरँक)..........................................................

एवढे जहरी कायदे पाळून सदस्य होण्याची आकांक्षा बाळगणार्यांच्या धैर्याचे मी कौतुक करतो.
त्यांनी आधी स्वतःच्या डोक्यावरचे पंखे बंद करून व्रतास प्रारंभ करावा.....

बारावीला १०० मार्काची थेअरी आणि १०० मार्काच प्रॅक्टिकल होतं एलेक्ट्रॉनिक्सला.
सगळ्यात जास्त मार्क त्यालाच पडले. Lol
पी सी एम ला बोंबाबोंब नुसतीच.

अरे... ते
<< सदस्यांच्या घरचे दूरदर्शन संच तसेच छत्र्या विकून उभा केला जाईल.?? >>
समजायला जरा वेळ च लागला!! Happy

सुशांत, अहो डोंबलाचा अभ्यास माझा! विकिवर जाऊन positron टाकलं की सगळं मिळतं! Proud पण तुमचं मानधनाविषयीचं 'इलेक्ट्रॉनिक थिंकिंग' पाहून मन खट्टू झालं. त्यामुळे माझा सहभाग सक्रिय पातळीवरून घसरून केवळ नैतिक पातळीपर्यंत आणून ठेवला जाईल, अशी मी जाहीर धमकी देत आहे. Lol हां पण 'पॉझिटिव्ह थिंकिंग' सुरू केल्यास माझा सहभाग पूर्ववत होईल याची हमी घेतो. Biggrin
आ.न.,
-गा.पै.

गामाभाऊ,
एवढं लावून घेऊ नका मनाला..
अहो , positron नावाचा कण असतो, हेसुद्धा माहित असावं लागतं.. म्हणून म्हटलं मी....
बाकी सदस्यसंख्या भरभक्कम वाढल्याने तुमचं पैलवानी प्रकाराचं मानधन देण्याची सोय करेन हा पामर..!

पैलवानांशी पंगा घ्यायची आमची काय बिशाद ..
तुम्ही मंडळात सक्रीयच राहा..
तुमचं पॉझिटीव्ह थिंकींग अँक्टिवेट करण्यासाठी खुराक सांगा फक्त..!

सुंदर.
सभासदांनी मायबोली (इलेक्ट्रोनिक) ऐवजी पाट्या-वह्यांवर किंवा कबुतरे (एकमेकांकडे) पाठवून पुढील msgs पाठवावेत.

सर्व प्रतिसाद दात्यांचे मनापासून आभार !!

शिवमभौ, आपल्या आग्रहास मान देऊन 'भौतिक भक्त प्रल्हाद ' हा बारावीच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे चुथडे करणारा अग्रलेख मायबोलीवर लवकरच प्रकाशित करण्यात येईल..

(पार्श्वभूमी-- भक्त प्रल्हाद हा औंदा बारावीला आहे. भौतिकशास्त्राचा पेपर देऊन झाल्यावर तो राजमहालात येतो.तेव्हा त्याच्या मोबाईलवर श्री विष्णु देवांचा फोन येतो................त्यानंतर झालेले संभाषण .............) वाचा लवकरच फक्त मायबोलीवर .

झकास. हे तर खासच:
एखादा चुकून हुकून प्रेमात पडल्यास भर रात्री एसएमएस -चॅटिंग करून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे महत्त्व सदस्यांनी वाढ्वू नये ,ही नम्र विनंती ..

पण पंखा, कूलर वगैरे इलेक्ट्रॉनिक उपकरणं कशी काय हो? ही इलेक्ट्रीकल उपकरणं आहेत.

मलाही विद्यार्थीदशेत इलेक्ट्रॉनिक्सचा प्रचंड राग होता. टेबलाच्या विरूद्ध दिशेला आल्यावर लगेच इलेक्ट्रॉनिक्सवर प्रेम जडलं.

हुश्श !!!!!!!!!!!
इलेक्र्टॉनिक्स इतका डेंजर विषय असेल तर बरे झाले मला बारावीला तो नव्हता !!!!!!

_________________________________-

मस्त लेखन खुरसाले
येवूद्यात अजून

धन्यवाद वैवकु आणि भारतीताई...
आपण आवर्जुन वाचलंत त्याबद्दल...

:हहगलो::हाहा:
तुमच्या लिखाणाची जातकुळी अगदी बेफिकीर यांच्याशी जुळणारी आहे. एक लेख वाचला होता. तो ही विनोदीच होता. प्रवासवर्णनं आणि आयडी का काय. तसाच वाटतो हा पण. विनोद चांगले आहेत. पंचेस पण चांगले आलेत. अजून लिहा खुरसाले.

माझ्या निवडक दहात.

>> भौतिकभक्त प्रल्हाद कधी प्रकट होणार
आहेत??>>>आम्हाला तथाकथित स्वयंघोषित आत्मस्फुर्तीचे उमाळे आले की ते अवतरतील...

धन्यवाद सन्नाटा...
आपले म्हणणे खरे आहे.बेफिकीर यांचे 'पत्नीशी वाद कसा काढावा -एक डझन उपाय' हे लेखन वाचल्यानंतर मला असे काहीसे लिहावे वाटू लागले होते. त्यात माझ्या बारावीच्या परीक्षेचे पेपर सुरू झाले.तेव्हा लिहिलं हे...

तुमच्या बारावीचे म्हणजे ? हल्लीच्या बारावीच्या मुलांच्या लिखाणात आणि या लिखाणात कमीत कमी २५ एक वर्षांचा फरक वाटतोय. मानायला पाहीजे हं तुम्हाला.