मिक्स वेजी पराठा

Submitted by सायो on 17 October, 2008 - 09:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बारीक चिरलेला अर्धा कांदा, गाजर-बारीक किसून अर्धी वाटी, फरसबी- बारीक चिरुन अर्धी वाटी, उकडलेला बटाटा-किसून अर्धी ते एक वाटी. पनीर- बारीक किसून अर्धी वाटी.(वाटीचं माप-मध्यम आकाराची आमटीची वाटी), बारीक चिरलेली कोथिंबीर-अर्धी वाटी, आलं-लसूण पेस्ट- १ टीस्पून प्रत्येकी, धणे-जिरे पूड-एक टीस्पून, लाल तिखट चवीप्रमाणे,फोडणीकरता १ ते दीड टीस्पून तेल, जिरं,हळद,मीठ चवीप्रमाणे.

क्रमवार पाककृती: 

नॉन स्टीक पॅनमध्ये १ ते दीड टीस्पून तेल घ्यावं. तेल गरम झालं की त्यात जिरं, हळद घालावी. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून परतावं. कांदा शिजला की त्यावर आलं,लसूण पेस्ट्,लाल तिखट, धणे-जिरे पूड घालून ढवळावं. व झाकण घालून एक वाफ काढावी. त्यावर बारिक चिरलेली फरसबी, किसलेलं गाजर घालून, ढवळून पुन्हा एकदा झाकण घालून शिजू द्यावं. सगळ्यात शेवटी किसलेला बटाटा, पनीर घालून नीट मिक्स करुन वरुन मीठ, कोथंबीर घालावी. मिश्रण गार झालं की ह्यात मावेल एवढी कणिक घालून घट्टसर पिठ भिजवावं. १०,१५ मिनिटं झाकून ठेवून मुरु द्यावं आणि मग जाडसर पराठे लाटावेत. वरुन बटर सोडून खमंग भाजावेत.

वाढणी/प्रमाण: 
साधारण ३/४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यात आवडीप्रमाणे किसलेला फ्लॉवर,मटार, बारीक चिरलेला पालकही घालता येईल. आणि कणकेबरोबर बाजरीचं पिठ घातल्यास चवही छान येईल.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो
कणीक - बाजरीच्या पिठाचं प्रमाण काय घ्यावं ? या रविवारी करून पहाते. मुलं भाज्या खायला फार रडवतात. पराठे मात्र आवडीने खातात . असे पराठे खाल्ले तर मजाच मजा.

दोन वाट्या कणीक घेतलीस तर अर्धी पाऊण वाटी बाजरीचं पिठ घे.

माझाही मुलगा खायचं नाव काढत नाही म्हणून हे असले उपद्व्याप करावे लागतात. निदान गिल्टी तरी वाटत नाही भरपूर भाज्या घातल्याने. आणि खरंच छान लागतात चवीला. मी हल्ली सारण भरुन पराठे करण्यापेक्षा हेच करते.

छान आहे प्रकार हा. आमच्या घरी उरलेल्या भाज्या व आमट्या मिक्सरमधून काढून त्यात कणीक भिजवून असे पराठे करतात. कु़णाला कळतही नाहीत कसले पराठे आहेत ते.
अलिकडे बाजारात टोमॅटोची पावडर मिळाली. ती घालून असे पराठे आणखीनच छान लागले.

दिनेश, मी ही ऐकलंय बर्‍याच जणांना असे पराठे करताना. वाईट कशाला लागतील? आमटी नी भाजीतही सगळा मसाला असतोच की. मी वर लिहिलेल्या मिश्रणात कधी कधी 'एम.डी.एच'चा पराठा मसाला तर कधी सब्जी मसाला तर कधी धनशाक मसलाही घालते वेगळ्या चवीकरता.

मी असे नेहमी करते, कुठलीही भाजी किंवा आमटी उरली तर मिक्सर मधुन काढुन त्यात कणीक भिजवुन त्याचे पराठे करते. एकदम मस्त लागतात आणि भाजी संपवल्याचे पण समाधान.

वरील सर्व साहित्य घेऊन फक्त एक बदल करायचा, म्हणजे हे मिश्रण फारसे शिजवायचे नाही. जरा कच्चेच ठेवायचे.
पराठा करताना, कणकेची पातळ पोळी लाटायची. त्याच्या अर्धगोलावर हे मिश्रण पसरायचे. उरलेली अर्धी पोळी त्यावर
दुमडून कडा बोटांनी चिकटवायच्या. मग जरा हलकेच लाटणे फिरवायचे. या पराठ्याचा आकार अर्धगोल होतो. कलिंगडाच्या
फोडीप्रमाणे. मग हा तेल किंवा तूप, बटर सोडून खरपूस भाजायचा. एकावेळी तव्यावर दोन पराठेही भाजता येतात.
या पद्धतीने कुठलेही सारण भरून पराठा करता येतो. पराठा लाटताना फुटून सारण बाहेर येण्याची भिती नाही.

विशेषतः बारीक कांदा, कोथींबीर, ओवा, मीठ घालून कांदा पराठा फारच मस्त होतो.

आमच्याकडे हे सारण भरलेले पराठे आवडत नाहीत. जर सारणातच पीठ भिजवलं तर कुणालाच पत्ता लागत नाही. म्हणून हा सगळा खटाटोप.

ह्म्म सायोचा मुलगा हुशार आहे Happy माझा मुलगा फक्त पिझ्यावर टॉपिंग म्हणुन ज्या भाज्या येतील तेवढ्याच खातो. बाकी असेच काहीतरी ट्रिक करुन पोटात ढकलाव्या लागतात.

त्याच्या डे केअरमधे एक मुलगी आहे. तीची आई नेहेमी मुलगी काही खात नाही अशा तक्रारी करते. ही आई सगळ्यांना रेसिप्या विचारुन विचारुन वेगवेगळे पदार्थ करुन बघते पण मुलगी खात नाही. आणि मी त्या मुलीला १००० वेळा नाक गळत असले की नाकाला जीभ लावण्याची पराकाष्ठा करुन चाटताना बघितले आहे. लहान मुलांचे काय कळतच नाही Wink

अगं बाई हुशार बिशार काही नाही. त्याला अजिबात काही खायलाच नको असतं. एवढे उपद्व्याप करुनही तो खाईल असं मी गृहित धरत नाही.

>>>त्या मुलीला १००० वेळा नाक गळत असले की नाकाला जीभ लावण्याची पराकाष्ठा करुन चाटताना बघितले आहे.

Lol बिचार्‍या आईला काय माहित मुलीला काय खायला आवडतंय ते!!!

ह्याच सारणाच्या 'पॅटॅ' बनवून, बनपावात भरून बर्गर म्हणुन दिलं तर खातीलही! Happy
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

हो ग मृ. खातील. पण कोण? जी मुलं व्हेजीटेरियन आहेत ती. जे नॉन व्हेज खातात ते व्हेज पॅटी कशाला खातील?