पंचम (२): 'पंचमयुग'- कारकीर्द (२.१-२.३)

Submitted by योग on 4 February, 2013 - 02:55

पंचम (२): पंचमयुग (१९५०- १९९४)

२.१ पंचमोदय

(१९५०-५१) "काय रे तुला गाणे शिकायचे आहे? कधीपासून वाजवतोस.."?
होय! गेले सहा आठ महिने वाजवतोय... आणि मला तुमच्यापेक्षा चांगला संगीतकार व्हायचे आहे!".
दादा बर्मन म्हणजेच सचिन देव बर्मन ऊर्फ सदे यांच्या प्रश्णावर अवघ्या ११-१२ वर्षे वयाच्या राहुल बर्मन म्हणजेच पंचम चे हे ऊत्तर हि पुढील पंचम 'युगाची' चाहूलच! एरवी, या ऊत्तरावर एखाद्या बापाने मुलाकडे अधिक कौतूकाने पाहिले असते बस्स. पण पंचम ने शाळेत वाजवलेली वाद्ये, पंचम ला शाळेत संगीत वादन, ई. मध्ये मिळालेले पुरस्कार हे सर्व पाहून व त्याचा 'हुनर' ओळखून सचिनदांनी पिता-पुत्र हे नाजूक नाते क्षणभर दुर्लक्षित करून एखाद्या गुरू शिष्याच्या भुमिकेतून विचार केला आणि पंचम ला घडविण्यासाठी प्रथम तबला मास्टर ब्रजेन बिश्वास आणि मग अतीशय ख्यातनाम व गीत संगीतातील परमोच्च स्थान असलेले ऊस्ताद अलि अकबर खान यांचेकडे सरोद शिकण्यासाठी पाठवले.

"मला संपूर्ण स्वराज्य हवे आहे!" असे म्हणणार्‍या बाल शिवबांना मां साहेबांनी दादोजींसारख्या गुरूंकडे पाठवण्याईतकीच ही वरील घटना मला अतीशय महत्वाची वाटते. पंचमच्या पुढील वाटचालीत हा निर्णय व हा काळ अत्यंत मोलाचा आहे, त्यासाठी सचिनदांमधल्या "सच्च्या" कलाकाराला कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहेत.

बिश्वास यांचेकडे तालाचे धडे अन अली अकबर यांचेकडे राग, भारतीय संगीत, परंपरा, वादन, ई. सर्वाचे धडे घेताना "ऊत्तम संगीतकार होण्यासाठी सर्व वाद्ये व त्यांचा वापर यावर तुझी हुकूमत हवी" या वडीलांच्या शब्दांवरील पंचम चा विश्वास दृढ होत गेला. जवळ जवळ ४ वर्षे या दोन्ही दिग्गजांकडे घेतलेल्या शिकवणूकीचा फायदा प्रत्त्येक शास्त्रीय वा राग आधारीत संगीत देताना झाला हे पंचमदा मान्य करतात.

१९५०-१९६० चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विशेषतः सुवर्णयुगच होते. कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार या सर्व क्षेत्रात अक्षरशः दादा लोक काम करत होते. नौशाद, मदन मोहन, सलिल चौधरी, अनिल विश्वास, शंकर जयकीशन यांसराखे संगीतकार; बिमल रॉय, ह्रिषी मुखर्जी, गुरूदत, मेहबूब, कपूर कंपनी असे महान निर्माते/दिग्दर्शक; लता, तलत, रफी, मुकेश, किशोर, आशा, असे एकसे बढकर एक गायक मंडळी; बक्षी, मजरूह, शैलेन्द्र, अशी महान गीतकार मडळी; आणि अक्षरशः एकहाती चित्रप्ट गर्दी खेचणारे दिलीप, राज, दत्त, नर्गिस, मीनाकुमारी, मधुबाला, वै. माला, ई. चित्रपट 'तारे'. या अश्या युगात स्वताचे स्थान स्थापन करणे दूरच ऊलट एखाद्या नव्या कलाकाराला 'आत प्रवेश' घेणे देखिल किती अवघड असू शकेल याची कल्पनाच केलेली बरी. त्यातही स्वतःचे वडील अतीशय नावाजलेले संगीतकार असताना दडपण व अपेक्षांचे ओझे पंचम सारख्या मुलावर अक्षरशः एखाद्या पर्वताएव्हडेच होते. पण त्या किशोर वयात देखिल आजूबाजूला एव्हडी धामधूम सुरू असताना स्वताच्या कलागुणांवर, मेहेनत आणि कामावर पंचम चा ठाम विश्वास होता हे वरील संवादातून दिसून येते.
परंतू, निव्वळ हुनर, अंगीभूत कला याच्या जोरावर आपल्या चित्रपटसृष्टीतील वाटचाल बिकट आहे याला ईतीहास साक्ष आहे. तो एक 'हीट', ती एक 'संधी', तो एक 'ब्रेक' याला वरील पैकी कुठलीच मंडळी अपवाद नाहीत.. त्या अर्थी पंचम सारख्या कलाकाराला व त्याच्या कलेला देखिल यश, प्रसिध्धी, मान, हे टॉनिक त्याच्या पुढील विश्वासक, आश्वासक, आणि प्रयोगशील कारकिर्दीसाठी गरजेचे होते.

गुरूदत च्या मदतीने पंचम ने मुंबई मध्ये प्रवेश घेतला आणि वडीलांच्या कामात मदतनीस म्हणून काम करू लागला. या काळातही गाणे बनवतानाचा, संगीत फुलवतानाचा 'थेट' अनुभव त्याला याची देही याची डोळा मिळत होता. त्यातून अनेक बारकावे त्याला टिपता येत होते- जसे एखादा प्रसंग चित्रपटात असेल त्या अनुशंगाने दादा बर्मन गाण्यात कसे अनुरूप बदल सुचवत असत, प्रयोग करत असत. "छोड दो आचल जमा क्या कहेगा" गाण्याच्या आधी असेच "आह!" असे ऊद्गार आशाच्या तोंडी घालून संपूर्ण गाण्याला एक अवखळ आणि लज्जायुक्त प्रेम्/शृंगाराची अभिव्यक्ती दादांनी बहाल केली होती. एखाद्या पक्षाच्या किलबिलाटावरून पुढील सुरावट सजवण्याची दादांची कला, गाण्यामागील पार्श्वभूमी, प्रसंग ऐकल्यावर त्यावर अभिनय करणे, नाच करणे, अशा दादांच्या हरकती, हे सर्व बारकावे पंचम टिपत होता. एखाद्या कुशल मूर्तीकाराला मूर्ती घडवताना, त्या दगडाचे सुबक मूर्तीत रूपांतर होताना, त्या प्रत्त्येक स्थित्यंतराबरोबरच त्या मूर्तीकारात होणारे बदल, हे सर्व बघणे याचा पंचमच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे. एखाद्या वटवृक्षाखाली दुसरा वृक्ष वाढत नाही हे सत्य आहे आणि त्या अर्थाने सचिनदा नावाच्या वटवृक्षाखाली पंचम चे रोपटे रुजत होते, मूळे खोल धरत होती, रोपटे वाढत होते हे खरे असले तरी या रोपट्याला मोठे होण्यासाठी स्वताची 'जमिन' आवश्यक होती.

आणि अपघातानेच तशी संधी चालून आली. १९६१ मध्ये सचिनदांना हृदयविकाराचा झटका आल्यावर सर्व मंडळी काम देईनाशी झाली. गुरूदत ने देखिल दादांची साथ सोडली..( 'बहारे फिर भी आयेगी' चित्रपटाची पाच गाणी पूर्ण होती व ती सर्व व ऊर्वरीत पूरी करण्यास पंचम 'सक्षम' आहे असे सचिनदांनी सांगूनही गुरूदत ने पाठ फिरवली.) देवानंद तेव्हा मदतीला धाऊन आला व सचिन दा बरे होईपर्यंत 'गाईड' चित्रपटाचे काम लांबवले.. नंतर अक्षरशः पाच दिवसात गाईड चित्रपटाची सर्व गाणी संपूर्ण झाली.. शैलेंद्र ने बसल्या बसल्या "दिन ढल जाये रात ना जाये", "आज फिरे जिने की तमन्ना है', "तेरे मेरे सपने' ही गीते लिहीली. गाईड च्या संगीत प्रक्रीयेत तेव्हा पंचम ने संगीत दिग्दर्शकाईतकेच काम केले होते पण अर्थातच अधिकृत नाव सचिनदांचे होते. पण पंचम चे 'काम' देव आनंद व ईतर मंडळी, खुद्द दादा बर्मन यांच्याही लक्षात आलेच होते त्यासाठी दादांनी पंचमला शाबासकी दिली व आता तू खर्‍या अर्थाने तयार झाला आहेस अशी पावती दिली.

pancham2.JPG
('दादांची शाळा'... स्त्रोतः फिल्मफेयर मासिक जून १९८४)

तरिही "अधिकृत रीत्या" संगीतकार म्हणून पंचम नावारूपाला यायला अजून एक अपघात घडायचा होता-गुरूदत च्या 'राज' चित्रपटासाठी पंचम ने संगीतकार म्हणून दोन गाणी बनवली आणि काही कारणाने पुन्हा चित्रपट बंद पडला तो कायमचाच. पण त्यातील काही गीते 'रेकॉर्ड' केली गेली नव्हती. पंचम चा दोस्त मेहेमूद ('पडोसन' वाला) याने त्यातील "घर आजा घिर आये बदरा सावरीया.." हे गीत त्याच्या 'छोटे नवाब' (१९६१) चित्रपटासाठी घेतले आणि पंचम ने संगीतकार म्हणून हे पहिले वहिले गीत तेही लताबाईंच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केले. पंचम च्या नावामागे 'संगीतकार' शिक्का बसला होता.
एव्हडे करूनही, १९६३-६४ पर्यंत पंचमला संगीतकार म्हणून काम मिळाले नव्हते. 'भूत बंगला', 'तिसरा कौन' अशा न गाजलेल्या चित्रपटात संगीत देऊन देखिल पंचम च्या कलेवर व पंचमकडे लक्ष वेधून घ्यायला १९६६ ऊजाडावे लागले. चित्रपट- 'तिसरी मंझिल'. त्यातही "शम्मी" हा त्याकाळचा राजा होता.. त्याच्या मर्जीशिवाय चित्रपट सबंधी गोष्टींचे पानही हलत नसे, कोण गाणार, गीतकार कोण, संगीतकार कोण हे शम्मी ठरवत असे. शम्मी आणि शंकर जयकीशन हे समिकरण घट्ट असताना निवळ पंचम च्या हुनर, कला, व कामावर विश्वास असलेल्या खुद्द शंकर जयकिशन यांनी व गीतकार मजरूह यांनी या चित्रपटासाठी पंचम हा योग्य संगीतकार आहे असे शम्मी ला पटवले. पंचम कडून सर्व गाणी एकल्यावर शम्मी ने 'तूम पास हो गये' असे प्रशस्तीपत्रक दिले, आणि नासीर हुसैन ला "पंचम कडे जवळपास १०० अधिक ट्यून्स तयार आहेत, त्या ऐक आणि त्यातील आवडतील त्या घे" असे फर्मान सोडून शम्मी निघून गेला आणि पंचम ची गाडी सुरू झाली. आणि अक्षरशः एखाद्या 'तूफान मेल' प्रमाणे पंचम च्या कारकिर्दी ने जो वेग घेतला तो घेतलाच.. तिसरी मंझिल चित्रपटातील सर्वच गाणी आजही तब्बल ५० वर्षांनंतर तितकीच लोकप्रीय आहेत! पैकी , "आजा आजा मै हू प्यार तेरा...","ओ हसीना जुल्फोवाली'.." ही गाणी तर अजूनही लोकांच्या मनावर गारूड करून आहेत.. त्यातील आशाजींचे ते धृवपदाशेवटी म्हणणे "आहाहा आजा आ आ आ.." हा त्यांच्याही कारकिर्दीसाठी एक 'ट्रेंड्सेटींग' ठरले आणि एव्हाना रसगुल्ल्याप्रमाणे मृदू व मिठ्ठास गाणारे रफी साहेब याच गाण्यामूळे देखिल एका वेगळ्याच गायकीच्या प्रांतात विश्वासाने शिरले. त्या अर्थी हा चित्रपट आणि त्यातील गीते ही अनेकांच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. त्याकाळी गाणी हीट - तर चित्रपट हीट असे घट्ट समीकरण होते. गाणी हा त्याकाळी चित्रपटांचा आत्मा होता, प्रत्त्येक गाणे अक्षरशः चित्रपटाचे मुलभूत अंग असल्यासारखेच होते. 'आयटम' नंबर किंवा 'पॉपकॉर्न ब्रेक' साठी गाण्यांचा वापर हे 'डिफॉर्मेशन' २००० शतकासाठी राखीव होते.

हे सगळे एव्हडे बारकाव्यात लिहीण्याचा ऊद्देश एव्हडाच की "तो एक ब्रेक', 'ते एक अधिकृत स्थान' 'ती एक पहिली लोकमान्यता' मिळवण्यासाठी पंचम सारख्या संगीतकारालाही खूप झगडावे लागले, वाट पहावी लागली, घाम गाळावाच लागला. पण हे सर्व बहुदा जरूरीचेच होते असे म्हणावे लागेल. त्यामूळे एका रात्रीत मिळालेले यश, प्रसिध्दी अशी धोकादायक सुरूवात व बहुतांशी अल्पायुषी वाटचाल न होता, एका खडतर तपश्चर्येसाठी पंचम तयार झाला होता, घडत होता.
In Today's world people would have said Pancham has arrived! Back then people said Pancham has "started"! तीच प्रतिभा, तीच मेहेनत, तोच दर्जा, पण त्याच्या मूल्यमापनाची परिमाणे व तराजू यातील फरक केव्हडा मोठा आहे, त्याकाळी व आता.
pancham7.jpg
(पंचमचे संगीत सेशन म्हणजे मजा, मस्ती, नशा... ओळखा पाहू कोण..? स्त्रोतः 'पंचम स्ट्रींग्स ऑफ ईटरनिटी', संकलन, २००९)

२.२ पंचम संस्कार, विस्तार, व प्रयोग

एकीकडे पंचमची वडीलांकडील शाळा चालूच होती.. निवळ गाण्याचे मुखडे बनवून ऊर्वरीत गाणे पंचमला वा ईतर असिस्टंट ना बनवायला देणे, त्याच्या अतीऊत्साहाला लगाम घालणे, घरातल्या नोकर चाकरांना ऐकवून गाण्याच्या 'साधेपणा, लोकप्रियता, मास अपिल' ई. बाबत निर्णय घेणे, पंचम ला ज्या ट्यून्स अक्षरशः स्वप्नात दिसत असत, कानात ऐकू येत असत त्या त्याला रेकॉर्ड करायला लावणे' या अशा बारीक सारीक गोष्टींतून सचिनदा पंचम या हिर्‍याला पैलू पाडत होते. या शाळेतील कामातूनच पंचम ला दुसरी महत्वाची असाईंनमेंट मिळाली.

आराधना (१९६९) चित्रपटामधील गीते पूर्ण करण्यात सचिनदांना पंचम ने सहाय्य केले हे आता जगजाहीर आहे. किंबहुना 'कोरा कागझ था ये मन मेरा' हे संपूर्ण गीत पंचमनेच केले आहे. ते पाहूनच पंचम ला शक्ती सामंता यांनी कटीपतंग (१९७०) चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवली. आराधना या चित्रपटामूळे किशोरदांच्या पार्श्वगायनाच्या लाँग इनींग ला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली हे मान्य केले तरी कटीपतंग च्या प्रदर्शनानंतर पंचम-किशोर या जोडगोळीच्या कारकिर्दीला देखिल एक 'लोकमान्य' सुरुवात झाली असेच म्हणावे लागेल. त्या आधी पडोसन (१९६८) चित्रपटात किशोर कुमार व मेहेमूद बरोबर ' एक चतुर नार', 'केहेना है' अशी लोकप्रिय गाणी, प्यार का मौसम (१९६९) मधिल 'तुम बीन जाऊं कहा' हे गीत अशी गाणी पंचम ने केली असली तरी फक्त व फक्त किशोर आणि पंचम हे समीकरण 'कटी पतंग' मुळे घट्ट झाले. अर्थातच यात पडद्यावरील राजेश खन्ना चा वाटा देखिल तितकाच महत्वाचा. पैकी, "ये शाम मस्तानी", "खेलेंगे हम होली", या गीतांनी बिनाका गितमालिका, रेडीयो सिलोन ई. सर्व रेडीयो चॅनल्स वर पुढील अनेक काळ आपले स्थान सर्वोच्च ठेवले. आजही होळीच्या दिवसात "खेलेंगे हम होली.." हे गाणे सर्वत्र वाजवले जाते.
pancham3.JPG
('कटीपतंग' साठी संगीत देताना: मुकेश, रजेश खन्ना, पंचम. स्त्रोतः फिल्मफेयर मासिक जून १९८४)

पडद्यावर 'कका' ऊर्फ राजेश खन्ना, गायक किशोर कुमार, आणि संगीतकार पंचम या त्रिकूटाने नंतर चित्रपट'संगीत' सृष्टीवर अक्षरशः कब्जा केला. पैकी अमर प्रेम (१९७१), अपना देश (१९७१), मेरे जीवन साथी (१९७२), नमक हराम (१९७३), आपकी कसम (१९७४), अजनबी (१९७४), मेहबूबा (१९७६) या चित्रपटांची गाणी, काकाच्या भूमिका ई. सर्व गाजले पण सर्वच चित्रपट मात्र व्यावसायिक दृष्ट्या तितकेसे चालले नाहीत. या सर्वच चित्रप्टातील सर्वच गाणी अक्षरशः 'ऑल टाईम हीटस' या यादीत येतात..
पैकी खालील काही कायमचीच लक्षात राहणारी गाणी..
दिवाना लेके आया है दिल का तराना.., चला जाता हूं किसी की धून मे.. (मेरे जीवन साथी)
नदिया से दरीया... मै शायर बदनाम.... (नमक हराम)
झिंदगी के सफर मे गुजर जाते है... जय जय शिव शंकर... (आपकी कसम)
एक अजनबी हसीना से... भिगी भिगी रातों मे.. (अजनबी)
अमर प्रेम मधिल सर्वच गाणी..
pancham5.JPG
(किती सुंदर आणि भरभरून जगलेले असतील ते क्षण? स्त्रोतः फिल्मफेयर मासिक, जून १९८४..)

किंबहुना नमक हराम चित्रपटानंतर नंतर राजेश खन्ना पर्व संपून 'जंजीर' (१९७३) चित्रपटातून अमिताभ बच्चन नावाचे नवे पर्व सुरू झाले होते. माझ्या मते अमिताभ पर्वात चित्रपट संगीत सृष्टीमध्ये एक अमूलाग्र बदल घडून आला तो या अर्थी की त्याच्या बर्‍याचश्या चित्रपटात हिरो हिरॉईन ची ड्युएट गीते, लव्ह साँग्स, गोंधळ/जल्लोश, धांगडधिंगा गाणी यांचा भरणा अधिक होता. अर्थात यात दोष अमिताभचा नव्हे तर एकंदरीत तेव्हाच्या पाश्चात्य, हिप्पी कल्ट्स, ई. चा प्रभाव आपल्या चित्रपट सृष्टीवर पडत होता. म्हणजे १९६-७० च्या दशकात माधुर्य, मुख्यत्वे दु;खी, प्रेम गीते किंवा ईतर अपवादाने आलेली समूह वा जल्लोश गीते हाच मुख्य संगीत साचा होता. मात्र १९७५ च्या नंतर चित्रपटसंगीत हे नाच, 'दृष्य', ऑर्केस्ट्रेशन या अंगाने अधिक बहरू लागले. त्यातही 'पार्श्वसंगीत' या एव्हाना सूप्त असलेल्या प्रकाराने अचानक 'शोले' (१९७५) चित्रपटाच्या माध्यमातून एक पुनर्जन्म घेतला.

सर्व प्रस्थापित, व नेहेमीच्याच वाटा चोखाळणार्‍या संगीतकारांसाठी खरे तर हे आव्हान होते, एक अमूलाग्र बदल होता- पण बरेच जण त्यासाठी तयार नव्हते. किंबहुना असे संगीत देण्यासाठी लागणारी सर्व संगीत साधने, तंत्र, जागतीक संगीताची अभीरुची व ज्ञान, ई. सर्वाबद्दल ऊदासीन दृष्टीकोन व अभाव हा त्याकाळच्या संगीतकारांत दिसून येत होता. यात ओ.पि. नय्यर, विश्वास, चौधरी, नौशाद या सर्वच मंडळींचा समावेश होता. त्यांच्या प्रतीभा व क्षमतेबद्दल वाद नव्हताच पण कालानुसार आपले संगीत बदलण्याची कला, वा 'कळ' त्यांच्यात तितकीशी नव्हती. अशातून मग या प्रकारच्या संगीताला नुसते धिंगाणा संगीत, वेस्टरर्नाईझ्ड संगीत, कर्णकर्कश्य संगीत अशी लेबलं दिली गेली. या सर्व प्रकारच्या संगीत बदलावर व लाटेवर स्वार होणारा एकच गडी होता- आर. डी. बर्मन ऊर्फ पंचम.

थोडक्यात , १९७५ च्या नंतर मारधाड, मसाला अशा चित्रपटांच्या जमान्यात चित्रपटाचा फोकस हा निवळ मधुर संगीत नसून किंबहुना त्यापासून हटकून मल्टिस्टार कास्ट, पटकथा, चित्रकथा-फॉर्म्यूले, अ‍ॅक्शन अशाकडे वळला. तरिही चित्रपटातील गाणी 'हीट' होणे आवश्यकच होते. फक्त त्यांचा चित्रपटातील संदर्भ व प्रेक्षकाच्या अभिरुचिचा संदर्भ बर्‍याच अंशी बदलला होता. स्वातंत्र्या नंतरची पहिली 'तरूण पिढी' प्रेक्षक म्हणून त्याकाळच्या संगीताचा दर्जा, भविष्य ठरवत होती. 'अधिक तालब्ध्द' (rythm based) संगीत लोकांना आवडू लागले होते. अशा मसाला व मल्टीस्टारर चित्रपटात प्रामुख्याने अमिताभ, शशी कपूर, धरमेंद्र, रिशी कपूर, शत्रुघन सिन्हा मग संजय दत (रॉकी -१९८१ व नंतर), सनि देओल (बेताब-१९८३ व नंतर) अशा अनेक हिरो मंडाळींसाठी पंचम ने अनेक हीट गाणी दिलेली आहेत- त्यातही किशोर कुमार, आशा हा धागा कायम आहेच.

दरमान, १९७५ च्या आसपास पंचम ने गीत संगीतातील मंत्र व तंत्राची मक्का म्हणजे अमेरिकेतील लॉस एंजेलीस ला भेट दिली होती. तिथे व शिकागो सारख्या अमेरिकेतील सांस्कृतीक शहरांतून भ्रमण करताना पंचम ने एकंदर जॅझ संगीत, ध्वनिमुद्रण तंत्र, ऊपकरणे, 'सिंथेसाईझ्ड साऊंड' ईत्यादी बद्दल भरपूर माहिती करून गेतली होती. भारतीय चित्रपट्सृष्टीचा पुढील काळ हा अशा मंत्र-तंत्राच्या मिलाफातूनच पुढे सरकणार आहे हे त्याने जाणले होते. एका संगीतकाराच्या दीर्घायुषी कारकिर्दीमागे हे 'द्रष्टेपण' दडलेले आहे. एल्व्हिस, अब्बास (मामा मिया), फ्रांसिस लेई, सर्जिओ लेयोन, चबि चेकर, डेमी रौस, ई. अनेक नावाजलेल्या पाश्चात्य संगीतकार गायक मंडळींकडून प्रेरणा घेऊन पंचम ने काही ऊत्कृष्ट गीते बनवली आहेत. पाश्चात्य संगीताच्या या खजिन्याने निवळ हरपून न जाता त्याचा भारतीत चित्रपट संगीतात नेमकी कसा, कधी, व कुठे वापर करता येईल हा पुढील विचार आर.डी. बर्मन मधिल स्वतःला बदलत्या काळाशी कायम 'अवगत' ठेवणार्‍या कलाकाराने केला आणि त्यातूनच निर्माण झालेल्या 'मेहबूबा मेहबूबा..' (शोले १९७५), 'यम्मा यम्मा' (शान- १९८०), "सपना मेरा टूट गया' अशा गीतांनी (खेल खेल मे १९७५), तर हम किसी से कम नही (१९७७), द बर्निंग ट्रेन (१९८०) सत्ते पे सत्ता (१९८१), बडे दिलवाला (१९८३) मधिल गीतांनी तरूण पिढीला अक्षरशः वेडं करून सोडलं. पंचमच्या संगीत कारकिर्दीमधिल १९७५ ते १९८० चे दशक व काळ हे "वेस्टर्न" गीत संगीताचा प्रभाव, 'पंचम कॉपी करतो', अशा एक ना अनेक वाद विवाद वा कुतूहलांनी गाजला. गंमत म्हणजे, "माझ्यावर जॅझ चा प्रभाव आहे.. पाश्चात्य संगीतातील मला जे आवडते, जे अभिनव वाटते ते मी घेतो, विश्वातील सर्वच सूर माझ्या प्रेरणेचे स्त्रोत आहेत.." असे खुद्द पंचम ने अनेक वेळा मान्य केले आहे. मुळात पंचम सारख्या कलाकाराला बाजारातून संगीत 'ऊचलण्याची' गरज नव्हतीच पण त्या काळच्या गरजेचे पाणी भारतीय चित्रपट संगीताच्या विहिरीत जन्मजात फुटत नसल्याने अर्थातच साता समूद्रापलिकडले पाणी असे कालव्यातून ईकडे वळवण्याचे काम मात्र पंचम ने संधी मिळेल तेव्हा व गरज असेल तेव्हा केले. आणि हे म्हणजे रेशन च्या रांगेत ऊभे राहून घासलेट आणण्याएव्हडे सोपे काम नक्कीच नाही! आज 'ती' सर्व गाणी त्यांचा आत्मा, त्यांचे प्रकटीकरण, या सर्वांवर एक निश्चीत 'पंचम ठसा' आहे ईतका की ती गाणी लोकप्रिय झाल्यावर मागाहून "अरे हे अमुक गाणे तर त्या तमुक पाश्चात्य गाण्यासारखे वाटते" असा शोध घेतला गेला.. खरे तर दोन्ही बाजूंसाठी हे एक वरदानच म्हणायला हवे. "आराधनाच्या मेलडीज एका जॅपनिज चित्रपटाने वापरल्या आहेत त्या रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत, "असे खुद्द पंचमने एका मुलाखतीत म्हटले आहे.

एरवी, cross training, cultural exchange, knowledge transfer अशा मोठ मोठाल्या वजनदार शब्दांनी आपण २० व्या शतकातील जवळ जवळ सर्व कॉपी वा ऊचलल्या गेलेल्या कलाकृतीस, अगदी संशोधन प्रबंधास देखिल मान्यता देतो पण त्या वेळी जे भारतात सहज ऊपलब्ध नव्हते, त्याचा अभ्यास करून, त्याच्या मुळाशी जाऊन, त्यातून प्रयोग करून पुन्हा आपल्याच संगीत सृष्टिला पंचम ने दिलेले योगदान याकडे मात्र निव्वळ 'प्रेरणा' म्हणून न पाहता संशयात्मक नजरेने पाहण्याची आपली जुनी खोड आहे. असो तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल. ईथे ते मुद्दामून नमूद करण्यामागे हेतू हाच की पंचमच काय पण कुठलाही कलाकार हा चतुरस्त्र, परीपक्व होण्यात भोवतालच्या सर्व परिस्थितीचा, सामाजिक, सांस्कृतिक परिघ व स्थित्यंतरांचा मोठा वाटा असतो हे अधोरेखित करणे हा आहे.
pancham 4.JPG
(स्त्रोतः पंचम सिल्व्हर ज्युबिली- आणि पहिल्या फिल्मफेयर पुरस्काराची पार्टी- मुलाखत चैतन्य पडूकोण)

२.३ स्वतःचा शोध

असे म्हणतात कुठलाही कलाकार जेव्हा स्वांतसुखाय निर्मिती करत असतो तेव्हा तो स्वताच्या कलेशी व भावनांशी सर्वात जास्त प्रामाणिक असतो. प्रसिध्दी, पैसा, मान, मरातब हे सर्व व्यावहारीक अर्थाने लाभल्यावर आपल्या कलेतून आपल्या स्वतःचा, आपल्या अभिव्यक्तीचा शोध घेण्याचा प्रवास सुरू होतो. व्यावहारीक अर्थाने संपूर्णपणे त्रूप्त, तुडूंब झालेला कलाकार "सुकून, आत्मशांती, आत्मशोध, आत्मबोध' या मार्गाने बरेच वेळा पुढील प्रवास करत असतो. एखाद्या शुध्ध शास्त्रीय गायकाला वा वाद्य वाजवणार्‍याला हा प्रवास तसा शक्य असेल, किंबहुना तर्कशुध्द वाटेल पण चित्रपट संगीत क्षेत्रात हा प्रवास निश्चीतच तितका लॉजिकल वा सोपा नाही आणि यात धोका खूप अधिक आहे. याचे कारण, चित्रपट असेल, चालेल तर त्यातील संगीत असेल असे साधे समीकरण आहे. चित्रपट पडला तर त्यातील संगीत कितीही ऊत्तम असले तरी ते अल्पायुषी ठरते. पंचम चे संगीत (कितीही) ऊत्कृष्ट असले तरी असे अनेक चित्रपट व्यावहारीक दृष्ट्या 'फ्लॉप' ठरले होते.

ऊदाहरणादाखलः संजय खान हिरो असलेला 'त्रिमूर्ती' (१९७४), देवेन वर्माचा 'बडा कबूतर' (१९७३), मेहबूबा (१९७६), रत्नदीप (१९७९), हरजाई (१९८१) स्वामी दादा (१९८२), लवर्स (१९८३), मंजिल मंजिल (१९८४), मुसाफीर (१९८४)- या चित्रपटात आपल्या रविंद्र साठेने एक गझल देखिल गायली आहे, लावा (१९८५), अगर तुम ना होते (१९८३), सागर (१९८५), जोशिले (१९८९)....
यातील काही गाणी नमूदे केली तर धक्का बसतो:
१. मिलेगी एक नयी झिंदगी मिलेगी.. (त्रिमूर्ती)
२. मेरे नैना सावन भादो (मेहबूबा)
३. कभी कभी सपना लगता है (रत्नदीप)
४. तेरे लिये पलकोंकी झालर बुनू (हरजाई)
५. जिंदगी ये कैसी है जैसे जीयो (स्वामी दादा)- यात किशोर, आशा, अमित कुमार एकत्रीत गायले आहेत
६. आ मुलाकातों का मौसम आ गया (लवर्स)
७. ओ मेरी जान अब नही रेहेना तेरे बीना (मंजिल मंजिल)
८. ना जा जाने जा (जोशिले)

हे पंचम चे दुर्दैव का चित्रपटसृष्टीतील यश अपयशाचे क्रूर वास्तव हा प्रश्ण अनुत्तरीत आहे.

सारांश, प्रस्थापित व यशस्वी वाट माहित असताना, अपयश देखिल पदरी असताना आपल्यातील कलाकाराला, निर्मितीक्षमतेला न्याय देणे व त्यासाठी प्रसंगी प्रयोगशीलता व नाविन्य याचा धोका पत्करणे यासाठी फार मोठे मनोबल, आत्मविश्वास, कलेवरील "श्रध्दा" व "अब ईस पार या ऊस पार" अशी बेफिकिरी असावी लागते.

१९७५ च्या सुमारास स्वताचे स्थान हळू हळू बळकट करताना, नंतर वर लिहीले तसे मसाला चित्रपटातही 'हिट' गाणी देताना, पंचमच्या नशीबाने 'गुलजार' ऊर्फ संपूरण सिंग नावाच्या ईसमाशी परिचय झाला आणि पंचम च्या आतला संगीतकार खर्‍या अर्थाने बहरला. तसे दादा बर्मन ना असिस्ट करताना गुलजार व पंचम एकत्रीत भेटत असतच पण मुद्दामून गुलजारच्या निर्मितीसाठी संगीत देणे या अर्थाने त्यांचे व्यावसायिल संबंध साधारण १९७० च्या नंतर जुळले. अर्थात, गुलजार निव्वळ स्वांतसुखाय चित्रपट बनवत होता असे मुळीच नाही, ऊलट व्यावसायिक व मसाला चित्रपटांच्या धामधूमीत चित्रपट कलेच्या मुळाशी असलेला आत्मा, प्रेक्षक व कलाकार यांमधील नातेसंबंध, पडद्यावरून कलाकाराची अभिव्यक्ती व संदेश लोकांपर्यंत पोचवण्याची प्रामाणिक खटपट करणारा गुलजार हा एक हाडाचा कलाकार होता. त्यातही स्वतः गीतकार, ऊत्कृष्ट गझलकार, दिग्दर्शक, ई. भूमिकेत असल्याने दर्जाशी तडजोड नाही या त्याच्या तत्वामूळे पंचम कुठलेही व्यावसायीक ओझे न घेता त्याच्याबरोबर मुक्त काम करू शकला.

'परिचय' (१९७२) हा गुलजारचा पहिला चित्रपट. त्यातील "सारे के सारे...", "मुसाफिर हूं यारो..", या गाण्यात किशोर दा असताना 'बिती ना बिताई रैना' या गाण्यात भूपेंद्र सारख्या नव्या गायकाला पंचम ने संधी दिली. याकडे निव्वळ नविन लोकांना संधी देणे हा पंचमचा गुण म्हणून पहाणे अगदीच कमीपणाचे आहे. यामागे पंचम मधिल एक परीपूर्ण संगीतकार होता ज्याला "कुठल्या गाण्यासाठी कुठल्या गायकाचा आवाज योग्य ठरेल" हे पक्के माहित होते आणि त्या विश्वासाशी तो प्रामाणिक होता. त्या गाण्याला आवश्यक दु;खद किनार, एक शास्त्रीय्/गझल बैठक, वडील (संजीव कुमार) व मुलगी (जया) यांमधिल आवाजात आवश्यक असलेला खर्जातील भेद, ई. सर्व पडद्यावर हे गाणे पहाताना आपल्याला भिडते. नेमके हेच संगीतकार म्हणून पंचमचे वेगळेपण आहे. त्याही पलिकडे निव्वळ गाण्याच्या एकंदर कंपोशिझन बद्दल काय लिहावे? सितार, बासरी, सरोद, स्ट्रिंग गिटार चा रिदम किंवा ठेका देण्यासाठी केलेला वापर, तबला, निवळ याच्या आधारावर पंचम ने या गीताला ऊच्च दर्जावर नेऊन सोडले आहे. गुलजार-पंचम च्या पुढील जोडीच्या कारकिर्दीची ही नांदीच होती. आणि त्या समीकरणात आणखिन एका नावाची भर पडली- लता मंगेशकर. त्याआधी पंचम ने लता बरोबर गाणी केली होतीच (अमर प्रेम, कटी पतंग, प्यार का मौसम) पण गुलजार च्या पुढील सर्व चित्रपटांत लता ने पंचमसाठी गायलेली अनेक गाणी हे आजही 'बेंचमार्क' म्हणून पाहिली/ऐकली जातात.

लताच्या आवाजाची ढब, थेट काळजाला छेडणारा तीचा सूर, लताच्या गायकीतील ठेहराव, गळ्यातील बारकावे, भाव, आणि यासम दुसरे नाही असे कर्णमाधुर्य याचा पंचम ने ईतका खूबीने व नेमका वापर केला आहे की हे गाणे फक्त लताच्याच तोंडी शोभेल असे ऐकल्यावर खात्री पटते. त्यापैकी काही कायम लक्षात राहणारी....
"तेरे बिना झिंदगी से कोई शिकवा..." आंधी (१९७५), "दो नैनो मे आसू भरे है.. ", खुशबू (१९७५), "नाम गूम जायेगा"... किनारा (१९७७), "तुझसे नाराज नही झिंदगी.." मासूम (१९८२)
"सिली हवा छू गयी"... लिबास (१९८८), "कुछ ना कहो..." (१९४२ लव्ह स्टोरी)

तर गुलजार व्यतिरीक्त ईतर चित्रपटांतून देखिल पंचम ने संगीतबध्द केलेली व लता ने गायलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत, पैकी- "बाहो मे चले आ".. अनामिका (१९७३), "रिमझिम गिरे सावन "(मंझिल १९७९), "मेरे नैना सावन भादो.." (मेहबूबा). त्यातही, रिमझिम गीरे सावन व मेरे नैना हे किशोरदांच्या तोंडी असूनही लता चे व्हर्शन स्वता:ची वेगळी छाप सोडणारे आहे. तेच शब्द, तीच चाल, तोच वाद्यमेळा, पण निव्वळ गाण्याचे एकंदरीत चलन/ठेका बदलून पंचम ने तीच गाणी लताच्या तोंडून अतीशय वेगळ्याच खुबीने समोर ठेवली आहेत. अगदी खोलात जाऊन विचार केला आणि संवेदनांच्या खिडक्या थोड्या अधिक ऊघडल्या तर लक्षात येईल- किशोरदांच्या तोंडी असलेले गीत हे त्यातला नायक (अमिताभ) एका घरगुती मैफलीत मनातील गोष्ट, प्रेम हळूच ऊघडे करतो आहे.. त्याच्या भावना हळू हळू व्यक्त होत आहेत- ठेका तसा मध्यमच आहे. तर लताच्या आवाजातील गीत हे बेभान पावसात अक्षरशः कसलीही तमा न बाळगता तो पाऊस अंगावर घेत आपल्या प्रियकराशी सलगी करू पाहणार्‍या नायिकेचे प्रतीक आहे- अर्थातच प्रेयसीच्या मनात ऊचंबळून आलेल्या भावना, मागे अल्लड तुफान पाऊस अश्या वेळी पंचम ने काय मस्त वेगवान ठेका दिला आहे.. (ती क्लिप पहाच! मुंबईतला पाऊस अनेक चित्रपटांमधून ईतका सुंदर आजवर दिसलेला नाहीच!). एकाच गाण्यासाठी, पण दृष्य व भावना यांच्या अनुशंगाने एव्हडा विचार व सहज बदल, अनुभूतीने परिपक्व झालेला एखादा संगीतकारच करू शकतो.

लता-पंचम-गुलजार या समीकरणाखेरीज गुलजार बरोबरच्या कारकिर्दीत (गुलजार हा चित्रपट गिग्दर्शक, वा गीतकार, निर्माता या भूमिकेत) पंचम ने संगीतबध्द केलेल्या गाण्यांची खूबी ही आहे की त्यात भारतीय व पाश्चिमात्य वाद्य व संगीताचा एक ऊत्कृष्ट मेळ आढळतो. The Best of Both Worlds Mixed असे काहिसे याचे स्वरूप आहे. त्याच बरोबर प्रयोगशीलता देखिल आढळून येते. ऊदाहरणादाखलः
१. तुझसे नाराज नही झिंदगी- अख्खे गाणेच गिटार लिड्/स्ट्रींग गिटार च्या तुकड्याने सुरू होते. मध्ये मध्ये बेस गिटार ची भरण, जोडीला सितार, बासरी, आणी पुन्हा एक्दा झायलोफोन्स.. कुठेही मूळ गीताच्या धब्द व आत्म्याला धक्का न देता हा वाद्यमेळा भारतीय-ईंग्रज असे आपले मूळ विसरून एक होऊन जातो.
२. आजकाल पांओ जमीपर नही पडते मेरे (घर १९७८)- यातही सुरुवातीचा लताचा आलाप/गुणगुणणे आणि नंतरचा अख्खा म्युझिक तुकडा अक्षरशः पुढे येणार्‍या शब्दांमधील गूढत्वाला व शृंगाराला एक जमिन देतो. तो तुकडा ऐकून्/आठवून पहा आणि तेव्हाच "क्यूं नये लग रहे है ये धरती गगन..." (१९४२ लव्ह स्टोरी) चा असाच सुरुवातीच तुकडा आठवून पहा- दोन्हीत प्रचंड साम्य आहे, दोन्हीच्या शब्दात एक गूढगर्भी शृंगार आहेच.. पंचमसे असे बरेच तुकडे, गाणी ही एकातून एक सहज मिसळत जातात, त्याबद्दल आणि पंचमच्या प्रयोगशीलतेबद्दल याच लेखाच्या "तंत्र आणि मंत्र" या पुढील ऊप- विभाग/परिच्छेदात
अधिल विस्ताराने ऊल्लेख येईलच.

थोडक्यात, ज्या काळात पंचम हा ईतर मसाला चित्रपटातून ताल वा रिदम चा फोकस ठेवून हीट्स देत होता त्याच काळात गुलजार बरोबर अक्षरशः संगीत समुद्राच्या तळाशी बुडी मारून नव नविन रत्ने बाहेर काढत होता. हे म्हणजे एकाच क्रिकेटपटूला आज तुला कसोटी सामना खेळायचा आहे, ऊद्या एकदिवसीय आणि परवा २०/२० चा, आणि सर्व सामन्यात तुला यशस्वी व्हावेच लागेल असे सांगण्यासारखे आहे. मुळात तंत्र व गुणवत्ता कितिही असली तरी अशा वेळी मानसिकता, शरीर, एकंदर अ‍ॅप्रोच जसा दर वेळी बदलावा लागतो तसेच पंचमलाही करावे लागले असेल.. आणी या सर्वात परत संगीतकार म्हणून प्रत्त्येक फॉर्मॅटशी प्रामाणिक राहणे याला पर्याय नाही. हे येर्‍या गबाळ्याचे काम तर नव्हेच पण भल्या भल्या पंडीत लोकांना देखिल हे जमलेले नाही. पंचमच्या आई ज्या स्वतः दादा बर्मन चे सहाय्यक म्हणूनही काम पहात असत त्या विचारतात, "असे कुठल्या संगीतकाराचे ऊदाहरण आहे जो एकावेळी 'मेहबूबा मेहबूबा' असे गीत बनवतो तर दुसरीकडे 'बिती ना बिताई रैना" हे रागावर आधारीत गीतही बनवतो?

२.४ "तुम साथ हो जब अपने".. पंचम-आशा पर्व

पंचम च्या या वाटचालीत एव्हाना स्वतः पंचम व त्याचे संगीत जितके वेगाने पुढे जात होते तितकेच पंचमच्या प्रयोगशीलतेला व अक्षरशः ३६० अंशातून फिरणार्‍या प्रतीभेला न्याय देणारा तितकाच "फिरता" गळा आणि कुवत देवाने आशा भोसले नामक गायिकेच्या रूपाने निर्माण केला होता. पंचम बरोबरील स्वताच्या सांगितीक वाटचालीबद्दल एका मुलाखतीत आशाताई म्हणतातः
.." माझ्या संगीत वाटचालीचे तीन टप्पे आहेत. पहिल्यात ओ.पि. नय्यर ने माझ्या गळ्यातील खालच्या (खर्जातील) सुरांचा वापर, विचार केला. दुसर्‍या टप्प्यात शंकर जयकीशन यांनी जे मी आधी सिध्द केले होते तेच पुढे नेले, पण तीसर्‍या टप्प्यात मात्र केवळ पंचमनेच माझ्यातील गायक व गायकीची सर्व अंगे व कुवत याचा पूर्ण्पणे वापर, विचार व विस्तारही केला. मी स्वतः खालच्या 'प' पासून वरच्या 'प" पर्यंत गाऊ शकते हे पंचम बरोबर काम केल्यावर मला ऊमगले. "
आशाताईं मध्ये एक गायक म्हणून नेमकी कुठले गुण तुम्हाला दिसले असा प्रश्ण पंचम ला विचारला गेला त्यावर त्याचे ऊत्तर असे होते:
.."निव्वळ गायकीच नव्हे तर ऊत्तम नकलाकार व ऊत्तम अभिनय करणे या दोन गुणांमूळे आशा ईतर गायकांपेक्षा या बाबतीत निश्चीतच वेगळी, विशेष ठरते. वैयक्तीक आयुष्यातही ती तितकीच अवखळ, ऊत्साही, मिश्कील, असल्याने एखाद्या सवाल जवाब किंवा छेडखानी सारख्या गाण्यात ती तितक्याच सहजतेने "एक्स्प्रेशन्स" देऊ शकते. आणि त्यात जोडीला किशोर दा असतील तर एक संगीतकार म्हणून माझ्या प्रतीभेवर कसलेच बंधन नसायचे... त्यातूनच सीता और गीता मधिल "हवा के साथ साथ..." या गितांतील य दोघांचा संवाद, ट्युनिंग... किंवा "भली भली सी एक सुरत भला सा एक नाम.." (बुढ्ढा मिल गया) सरख्या गाण्यांमध्ये मस्ती, मधले शब्द, आयत्या वेळी सुचलेले एक्स्प्रेशन्स हे सगळं अगदी सहज करता येत असे.."
मला वाटते या वरील दोन्ही ऊत्तरात आशाताई व पंचम यांची अनेक वर्षांची एकत्रित व यशस्वी संगितीक वाटचालीचे रहस्य दडलेले आहे....
आशा बरोबर पंचम ने खरे तर सुरुवात केली ती "आजा आजा मै हू प्यार तेरा", "पिया तू अब तो आजा" सारख्या रॉक अ‍ॅड रॉल व कॅबरे गाण्यांपासून. त्यातही पंचम चे प्रत्त्येक आव्हान तितक्याच ताकदीने पेलायची जीद्द आणि त्यातून दोघांच्यात एकमेकांच्या कामाबद्दल निर्माण झालेला आदर, विश्वास हा त्यांच्या पुढील अनेक हीट व सदाबहार गाण्यांमधून दिसून येतो. आशा बरोबर पंचम ने मध्येच गाण्याचा ठेका बदलणे, हार्मनी, संवादात्मक गाणी, पाश्चिमात्य, जॅझ धाटणीची गाणी असे अगदी सहज ऊस्फूर्तपणे प्रयोग केलेले दिसून येतात.
ऊदाहरणादाखलः
मेरा नाम है शबनम .. प्यार से लोग मुझे शब्बो कहते है (कटीपतंग)
दुनियामे लोगों को (अपना देश)
ओ मेरी जा मैने कहा (आशा, पंचम एकत्र) (द ट्रेन)
मेरी नझर है तुज पे (द बर्निंग ट्रेन)
थोडे डिस्को टाईप चे: जानेजा.. ओ मेरी जानेजा.. निशा (सनम तेरी कसम)

त्याचबरोबर गुलजार साठी दिलेल्या संगीतात आशा ताईंच्या गाण्यातून मेलडी-बिट यांचा ऊत्तम संगम दिसून येतो:
१. सारे के सारे .. (परिचय)
२. बेचारा दिल क्या करे सावन जले भादों जले (खुशबू)
३. ईजाजत चित्रपटातील सर्वच गाणी विशेषतः "मेरा कुछ सामान" ज्यासाठी आशाताई व गुलजार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता..

अशी अनेक ऊदाहरणे आहेत, आणि हम किसीसे कम नही चित्रपटा मधिल "है अगर दुश्मन" ही रफी-आशा ची फेमल कव्वाली देखिल विसरता येत नाही.
पंचम आणि आशा यांच्या एकतत्रीत संगीत वाटचालीचे वर्णन, अनुभव, त्यातले कुतूहल, तृप्ती असे सर्वकाही या शब्दांतून व्यक्त करावेसे वाटते:
"चल जरा हात हातात धरू..
पावलांचे आपल्या किनारे करू..."

pancham 6.JPG
(स्त्रोतः 'आर.डी. आशा ईंटरफेस' १९८९- गिरीजा राजेंद्रन)

राहुल अ‍ॅंड आय या अलबम च्या प्रकाशनानंतर दिलेल्या मुलाखतीत आशाताई म्हणतात- "माझे व पंचम चे नाते असे आहे की संगीत हे माझे हृदय असेल तर पंचम हा त्याचा आत्मा आहे, मि दोघांना वेगळे नाही करू शकत.."

क्रमशः
पुढील भाग २.४ तंत्र आणि मंत्र, २.५ पंचम ठसा २.६ दैवयोग

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासू उतरला आहे लेख. आर. डीं.चा सर्वांगीण आढावा, उत्तम अभ्यास, संबंधीत प्रत्येक गोष्टीवरचे तुझे स्वतःचे भाष्य, चपखल उदाहरणे आणि निरिक्षणे आणि तरीही मांडणी मनोरंजक झाली आहे. नाहीतर एवढा मोठा लेख माहितीच्या भडिमाराने तांत्रिक किंवा रटाळही होऊ शकला असता. तुझे भाषेवरचेही प्रभुत्वही विशेष जाणवते आहे.

खुपच छान. वाचता वाचता एकीकडे लेखात उल्लेखलेल्या प्रत्येक गाण्याची, अनुषंगिक वाद्यांची आणि त्या कालावधीच्या पडताळणीची प्रक्रियाही होत होती त्यामुळे जास्त मजा आली. कित्तीतरी रोजच्या गाण्यांची पुन्हा नव्याने ओळख झाली, कुणाकुणाकडून ऐकलेल्या काही घटना अधिक विस्ताराने पुन्हा कळल्या. तुझं हे ताजंताजंच लिखाण आहे की ब-याच काळापासून लिहीतो आहेस? आर. डी. महान आहेतच, पण तू ते महात्म्य आणखी डोळसपणे पोचवतो आहेस. मनापासून धन्यवाद.

>>तुझं हे ताजंताजंच लिखाण आहे की ब-याच काळापासून लिहीतो आहेस?

पंचम माझ्यात कायम "ताजाच" असतो.. लिखाण मात्र गेल्या रविवारीच सुरू केले आहे, पहिला भाग पोस्ट्ला तेव्हाच. ऑफिसला दांडी मारून एकदा सर्व घडा घडा (बदा बदा) ओतून मोकळे व्हावे असे वाटते आहे.. 'पण'.. Happy
रच्याकने: ईथे जे माहित आहे ते लिहायला एव्हडी आधीरता व बेचैनी आहे.. जेव्हा अक्षरशः जळी स्थळी, अगदी स्वप्नातही पंचम ला ट्युन्स स्फुरत, दिसत, तेव्हा त्या संपूर्ण करायला त्याची काय अवस्था होत असेल याची एक कल्पना मलाच येत आहे.. एखाद्या लहान मुलाला त्याच्या आवडीचे खेळणे दिले की त्याची जी अवस्थ होते नेमके तेच माझे झाले आहे... त्यामूळे माझाच मला आनंद आहेच पण त्रासही!

>>आर. डी. महान आहेतच, पण तू ते महात्म्य आणखी डोळसपणे पोचवतो आहेस. मनापासून धन्यवाद
धन्स! पंचमेश्वराचा रेडा होणं मला मान्य आहे Happy

>>धन्स! पंचमेश्वराचा रेडा होणं मला मान्य आहे
पण त्याने वेदांना चाली लावल्याचे काही ऐकिवात नाही ! Wink Light 1

मस्त लेख योग्या!

>> "छोड दो आचल जमा क्या कहेगा" गाण्याच्या आधी असेच "आह!" असे ऊद्गार आशाच्या तोंडी घालून संपूर्ण गाण्याला एक अवखळ आणि लज्जायुक्त प्रेम्/शृंगाराची अभिव्यक्ती दादांनी बहाल केली होती.
आरडीने त्याचं अमर प्रेम मधलं गाणं 'बडा नटखट है रे' आधी साधं भक्तिगीत बनवलं होतं. सदेला ऐकवल्यावर त्यानं इतकंच सांगितलं की हे गाणं म्हणणारी नायिका तरूण आहे हे लक्षात घे. आणि मग आरडी स्वत:च म्हणाला की त्यानंतर ते गाणं माझं राहिलं नाही.

"घर आजा घिर आये बदरा सावरीया.." याची चाल लतानं प्रथम ऐकली तेव्हा ती म्हणाली (म्हणे) 'बाबांचा हात फिरलेला दिसतोय'

'भूत बंगला' गाजला नसेल पण त्याची गाणी आवडली होती. तेव्हा मी लहान होतो आणि ती गाणी (बाहेर ऐकूण) माझ्या तोंडात बसल्याचं मला आठवतंय!

>> माझ्या मते अमिताभ पर्वात चित्रपट संगीत सृष्टीमध्ये एक अमूलाग्र बदल घडून आला तो या अर्थी की त्याच्या बर्‍याचश्या चित्रपटात हिरो हिरॉईन ची ड्युएट गीते, लव्ह साँग्स, गोंधळ/जल्लोश, धांगडधिंगा गाणी यांचा भरणा अधिक होता.

तुझं नक्की म्हणणं काय आहे ते समजलं नाही बुवा! अमिताभच्या आधी हिरो हिरॉईन ची ड्युएट गीते, लव्ह साँग्स नव्हती? हे तर पूर्ण चुकीचं विधान वाटतंय.

की गोंधळ/जल्लोश, धांगडधिंगा गाणी नव्हती? तीसरी मंझिल तसेच किशोरने व शम्मीने काम केलेल्या बहुतेक चित्रपटात अशी गाणी होती की!

>> चित्रपट पडला तर त्यातील संगीत कितीही ऊत्तम असले तरी ते अल्पायुषी ठरते. पंचम चे संगीत (कितीही) ऊत्कृष्ट असले तरी असे अनेक चित्रपट व्यावहारीक दृष्ट्या 'फ्लॉप' ठरले होते.

ऊदाहरणादाखलः संजय खान हिरो असलेला 'त्रिमूर्ती' (१९७४), देवेन वर्माचा 'बडा कबूतर' (१९७३), मेहबूबा (१९७६), रत्नदीप (१९७९), हरजाई (१९८१) स्वामी दादा (१९८२), लवर्स (१९८३), मंजिल मंजिल (१९८४), मुसाफीर (१९८४)- या चित्रपटात आपल्या रविंद्र साठेने एक गझल देखिल गायली आहे, लावा (१९८५), अगर तुम ना होते (१९८३), सागर (१९८५), जोशिले (१९८९)....
<<

यातला मेहबूबा सोडला तर बाकीच्या चित्रपटातली गाणी 'ऊत्कृष्ट' कॅटेगरीत माझ्या मते तरी बसत नाहीत.

मेरा नाम है शबनम .. प्यार से लोग मुझे शब्बो कहते है (कटीपतंग) हा एक मास्टरपीस आहे!

>> अब्बास (मामा मिया)
तुला अ‍ॅबा म्हणायचंय का?

>> किंबहुना असे संगीत देण्यासाठी लागणारी सर्व संगीत साधने, तंत्र, जागतीक संगीताची अभीरुची व ज्ञान, ई. सर्वाबद्दल ऊदासीन दृष्टीकोन व अभाव हा त्याकाळच्या संगीतकारांत दिसून येत होता. यात ओ.पि. नय्यर, विश्वास, चौधरी, नौशाद या सर्वच मंडळींचा समावेश होता.
<<
यातली नय्यर व चौधरी ही नावं खटकली.

चिमण,
"बडा नटखट..." ची पूर्ण कहाणी थोडी वेगळी आहे..
..
>>याची चाल लतानं प्रथम ऐकली तेव्हा ती म्हणाली (म्हणे) 'बाबांचा हात फिरलेला दिसतोय'
"म्हणे" ... धोकादायक शब्द Happy

>>'ऊत्कृष्ट' कॅटेगरीत माझ्या मते तरी बसत नाहीत.
माझ्या मते: हरकत नाही रे... Happy

अप्रतिम, पुन्हा एकदा!
'रिमझीम गिरे सावन'च्या वेगवेगळ्या ट्रिटमेंट्बद्दल एकदम अनुमोदन.
पण लेख इतका भरभरुन लिहिला आहेस की त्यामुळेच कदाचित जरा विस्कळीत वाटला. पंचमच्या कारकिर्दिबद्दल लिहिताना त्याचा उदय, त्याचा उत्कर्ष, त्याचा पडता काळ आणि शेवटचा जोरदार कमबॅक अशी मांडणी हवी होती.

पाश्चात्य संगीताच्या या खजिन्याने निवळ हरपून न जाता त्याचा भारतीत चित्रपट संगीतात नेमकी कसा, कधी, व कुठे वापर करता येईल हा पुढील विचार आर.डी. बर्मन मधिल स्वतःला बदलत्या काळाशी कायम 'अवगत' ठेवणार्‍या कलाकाराने केला >>
Plagiarism आणि inspiration मधे फरक काय हे उदाहरणासकट लिहणार का पुढच्या भागात?

>> "म्हणे" ... धोकादायक शब्द
Proud मुद्दाम घातलाय. लता त्या रिहर्सला गेली तेव्हा मी तिथे नव्हतो ना म्हणून!

>> माझ्या मते: हरकत नाही रे...
ठीक आहे रे! इतकं काही मनावर घेऊ नकोस. प्रत्येकाची आवड थोडी वेगवेगळी असतेच ना?

पाश्चात्य संगिताची ढापाढापी ही आपल्या बहुतेक संगीतकारांनी केलेली आहे त्यामुळे त्यावर मी आधी मुद्दामच काही लिहीलं नव्हतं. एखाद्या संगितकाराकडचं लोड वाढलं की त्याला ढापाढापी केल्या शिवाय डेडलाइनी गाठता येत नसणार असा माझा एक तर्क आहे. पण Plagiarism आणि inspiration मधला फरक माझ्या मते असा आहे. Plagiarism म्हणजे चक्क कॉपी.. याची काही उदाहरणं..

१. दोस्तोंसे प्यार किया हे शान मधलं गाणं. यातली गिटार रिफ ढापलेली आहे. चाल ढापली आहे की नाही ते लक्षात नाही.

२. मिले सबके कदम.. बातों बातोंमें ही चाल (हे राजेश रोशनचं आहे)

३. मराठीतली 'घरकुल' मधली गाजलेली गाणी 'पप्पा सांगा कुणाचे?' आणि 'बांबुच्या वनात' यांच्या चाली ढापलेल्या आहेत. (हे सी रामचंद्रचं आहे)

inspiration म्हणजे दुसर्‍या संगितातलं नेमकं वैशिष्ट्य घ्यायचं.. त्याची मला वाटलेली उदा. ही..

१. एखाद्या गाण्यातलं एखादं कडवं एका पट्टीत तर दुसरं कडवं वेगळ्या पट्टीत म्हणणे. हा प्रयोग आरडीने काही गाण्यात केला (हवाँके साथ साथ). हे बर्‍याच इंग्रजी गाण्यात सापडतं.

२. गाण्याच्या ओळी दोन वेगळे गायक दोन वेगळ्या पट्ट्यात म्हणतात. हे पाश्चात्य चर्च म्युझिक मधे नेहमी दिसतं. या प्रकाराचा ही वापर आपल्याकडे झाला आहे. आरडीने थोड्या वेगळ्या प्रकारे 'जाने जाँ ढूंढता फिर रहा' मधे केला आहे. इथे आशाच्या दोन पट्ट्या लगेच लक्षात येतात.

डिस्क्लेमर: वरील सर्व वाक्यं 'माझ्या मते' या कॅटेगरीतली आहेत. Proud

>>इतकं काही मनावर घेऊ नकोस
छे रे!... Happy
खुद्द पंचम ने कधी मनावर घेतलं नाही... अपुन तो किस झाड की पत्त्ती..

तुम्ही आवर्जून वाचता आहात, अभिप्राय देता आहात, भरून पावलो.. हेतू सफल झाला.. असेच पुढचेही वाचत रहा काय? Happy

आणि ते ढापाढापी वगैरे बद्दल बोलण्यात मला रस नाहीये.. संगीतकार कुणिही असो. जे लिहायचं ते वर लिहीलच आहे. ज्यांना त्यावर अधिक बोलायचे आहे त्यांना मंच खुला आहे!

शेवटी ज्या चष्म्यातून पाहू तसेच जग दिसेल..

(माझ्यापुरता) आर्.डी. हा अनुभवाचा विषय आहे असे मी आधीच नमूद केले आहे. असो.

>>१. एखाद्या गाण्यातलं एखादं कडवं एका पट्टीत तर दुसरं कडवं वेगळ्या पट्टीत म्हणणे. हा प्रयोग आरडीने काही गाण्यात केला (हवाँके साथ साथ).

ऑ...? Uhoh

लेख खूप आवडला.

पंचमच्या गाण्याचा संगीत संयोजाकांबद्दल थोड लिहाल का? मला माहित नाही ते पंचम स्वतः करायचा का कोणाची मदत घायचा. त्या अनुषंगाने संगीतकार आणि संयोजक यांच्या कामाची ढोबळमानाने त्याकाळी आणि हल्लीच्या काळी कशी विभागणी होती हे पण जाणून घायला आवडेल.

पुढील लेखांची आणि.. top १० लिस्टची वाट बघतोय.

मस्त माहितीपूर्ण लेख योग.

आर्.डी. हा अनुभवाचा विषय आहे >>> अगदी अगदी, तुझ्या लेखातून ते प्रतित होतय.
@ चिमण
एखाद्या गाण्यातलं एखादं कडवं एका पट्टीत तर दुसरं कडवं वेगळ्या पट्टीत म्हणणे. हा प्रयोग आरडीने काही गाण्यात केला (हवाँके साथ साथ). >>>> "दम मारो दम" किंवा "जाने जा ढुंडता फिर रहा" मधे जास्त ठळकपणे जाणवतो हा फरक.(मला तरी).
मिले सबके कदम..>>> उठे सबके कदम म्हणायचय का ?

किंबहुना असे संगीत देण्यासाठी लागणारी सर्व संगीत साधने, तंत्र, जागतीक संगीताची अभीरुची व ज्ञान, ई. सर्वाबद्दल ऊदासीन दृष्टीकोन व अभाव हा त्याकाळच्या संगीतकारांत दिसून येत होता. यात ओ.पि. नय्यर, विश्वास, चौधरी, नौशाद या सर्वच मंडळींचा समावेश होता.>>> सलिल चौधरी आणि ओ पी ह्याला अपवाद होते अस मलाही वाटत.

मुळात पंचम सारख्या कलाकाराला बाजारातून संगीत 'ऊचलण्याची' गरज नव्हतीच पण त्या काळच्या गरजेचे पाणी भारतीय चित्रपट संगीताच्या विहिरीत जन्मजात फुटत नसल्याने अर्थातच साता समूद्रापलिकडले पाणी असे कालव्यातून ईकडे वळवण्याचे काम मात्र पंचम ने संधी मिळेल तेव्हा व गरज असेल तेव्हा केले. >>>
मस्तच. Happy

रिमझिम गीरे सावन >>
इथे गिर्‍याच्या लेखाची लिंक देता आली तर बघ ना. जबरी होता तो लेख.

बाकी मस्त लिहील आहेस. लिहीत रहा. Happy

पुढिल लेखांमधे त्याच्या सोबत वाजवणार्‍या कलाकारांबद्दल व कुठले वाद्य वाजवत असत हे पण लिही. त्यात पंचमने केलेल्या बदलांविषयी काही माहीती देता आली तर मस्तच.

स्मिता,
धन्स!
>>सलिल चौधरी आणि ओ पी ह्याला अपवाद होते अस मलाही वाटत.
पोटेंशियल बद्दल शंका नाही पण थेट ऊदाहरणे दिलीत तर मलाही समजेल... मुळात ८० च्या दशकातलं जे संगीत होतं (डिस्को, रिदमफोकस, ई..) त्याची जी "ढब" होती त्याला पंचम खेरीज कुणी व कशाप्रकारे हाताळले आहे हे जाणून घ्यायला मलाही आवडेल.. Happy
किंबहुना या बाबतीत ईथल्या 'जाणकारांनी' तशी एक वेगळी लेखमाला लिहावी- १९८० च्या दशकातील व नंतर बदलेलं हिंदी चित्रपट्संगीत अन त्या अनुशंगाने आधीच्या दिग्गज संगीताकारांचा प्रवास असे काहीसे, अशी माझी आग्रहाची विनंती आहे.

लक्ष्मी प्यारे, बप्पी, कल्याणजी आनंदजी हे पंचमचे समकालीन संगीतकार सोडल्यास माझ्या लक्षात दुसरे कुणी येत नाहीये..
असो.

त्याची जी "ढब" होती त्याला>>>>>सलिल चौधरींनी वेस्टर्न क्लासिकलचा वापर करुन केलीली २ /३ गाणी आठवली -
इतना न मुझसे तु प्यार बढा - मोझार्टच्या सिंफनीवर आधारीत किंवा जॅझ स्टाईल चा वापर केलेल - जिंदगी कैसी ये पहेली, किंवा न जाने क्यूं होता है.

नुस्तेच जॅझ च्या स्टाईल बदल नव्हतो म्हणत मी... वाद्यमेळा, गाण्याचं प्रकटीकरण, सिंथसाईझ्ड साऊंड्स,western effect, ईत्यादी सर्वच गोष्टी तपासायला हव्यात. सर्वांगीण, सर्वंकश, विचार व प्रकटीकरण अपेक्षित आहे.

असो.

>>१. एखाद्या गाण्यातलं एखादं कडवं एका पट्टीत तर दुसरं कडवं वेगळ्या पट्टीत म्हणणे. हा प्रयोग आरडीने
>> काही गाण्यात केला (हवाँके साथ साथ).
>>ऑ...?
आयला ते गाणं नाहीये का ते? पण त्याच पिक्चरमधलं एक गाणं होतं. सीता और गीता ना? मग ते कोई लडकी मुझे कल रात सपनेमें मिली हे असेल.

>> किंबहुना असे संगीत देण्यासाठी लागणारी सर्व संगीत साधने, तंत्र, जागतीक संगीताची अभीरुची व ज्ञान, ई. सर्वाबद्दल ऊदासीन दृष्टीकोन व अभाव हा त्याकाळच्या संगीतकारांत दिसून येत होता. यात ओ.पि. नय्यर, विश्वास, चौधरी, नौशाद या सर्वच मंडळींचा समावेश होता.
यातली नय्यर व चौधरी ही नावं खटकली.
पोटेंशियल बद्दल शंका नाही पण थेट ऊदाहरणे दिलीत तर मलाही समजेल... मुळात ८० च्या दशकातलं जे संगीत होतं (डिस्को, रिदमफोकस, ई..) त्याची जी "ढब" होती त्याला पंचम खेरीज कुणी व कशाप्रकारे हाताळले आहे हे जाणून घ्यायला मलाही आवडेल.
<<
'बाकीचे संगीतकारांना पाश्चात्य संगीताची अभिरुची व ज्ञान इ. इ. नव्हतं किंवा ते ऊदासीन होते' असा तुझ्या विधानातून जो अर्थ येतोय तो मला खटकतोय. कारण सर्व संगीतकारांनी आपापल्या परीने पाश्चात्य संगीताशी मिलाफ करायचा प्रयत्न केला. ८० च्या दशकात चौधरी, नय्यर ही मंडळी संपलेली होती. त्या सुमारास उषा खन्ना अधून मधून द्यायची. तिची गाणी पण चांगली असायची. त्यांनी त्यांच्या काळात त्यांना योग्य वाटेल तिथे त्यांना योग्य वाटेल तसं पाश्चात्य पद्धतीचं संगीत दिलं. ते भले आरडीनं ज्या पद्धतीनं वापरलं तसं नसेल पण दिलं हे निश्चित! लक्ष्मी प्यारेची अगदी जुनी किशोरची गाणी 'ये दर्दभरा अफसाना', 'खूबसूरत हसीना', 'प्यार बाटते चलो', 'मेरे महबूब कयामत होगी' किंवा शंकर जयकिशनचं 'नखरेवाली' (हे ५६ सालचं आहे) ही गाणी माहिती असतीलच. चौधरीबद्दल स्मिताचा लेखच वाच - http://www.maayboli.com/node/19285

मस्तच.

मुळात ८० च्या दशकातलं जे संगीत होतं (डिस्को, रिदमफोकस, ई..) त्याची जी "ढब" होती >> ती RD, LP आणि KA यांनीच तर आणली होती, त्यात ते निपूण होतेच. त्या तिघांत आर्डी खूपच उजवा होता.

पण त्या आधीचे संगीत, जे अगदी वेगळे होते, त्यात पाश्चात्य संगीत मिसळणे हे खूप कठीण होते. ते अण्णा चितळकर, शंकर जयकिशन, नय्यरसाब अशांनी करून दाखवले होते. त्यामुळे या गोष्टीकरता तरी मला आरडीपेक्षा त्यांचे जास्त कौतुक वाटते.

सी रामचंद्राचे रॉक अँड रोल प्रकारातले 'इना मिना डिका' विसरणे अशक्य आहेच पण त्याही आधी सरगम मध्ये 'मै हू एक खलासी' या गाण्यात भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही संगितांचा अप्रतिम मेळ आहे.

एस.जे.नी भारतिय चित्रपट संगितात सिंफनी रुजवली.

खर्जातले गाणे चित्रपट संगितात तरी वापरले जात नव्हते. ओपीने आशाच्या गळ्यावर तसे संस्कार करून जी गाणी केली ती निव्वळ लाजवाब होती, चैनसे हमको कभी तर अप्रतिमच. आता हा प्रकार ओपीला नक्की कसा सुचला असेल हे नक्की माहीत नाही कारण भारतिय शास्त्रीय संगितात खर्जाचा सढळ वापर होतो. पण ओपीच्या संगितातला खर्ज मला पाश्चात्य संगिताच्या जवळ वाटतो. सॅक्सोफोन त्यानेच रुजवले (म्हणे).

माधव,
धन्यवाद!' ईना मिना डिका' निश्चीतच एक 'माईलस्टोन' आहे.

>>एस.जे.नी भारतिय चित्रपट संगितात सिंफनी रुजवली.
तद्वतच, पंचम ने "पॉलिफोनी" रूजवली असे म्हणता येईल..

Pages