उई काप्याsssssssssssssss!

Submitted by मानुषी on 17 January, 2013 - 01:29

उई काप्या sssssssssssssss!

दिवाळीच्या फ़टाक्यांचा हवेतला वास अजून विरतोच आहे, तेवढ्यातच एखादा चुकार पतंग आकाशात घिरट्या घालताना दिसायला लागायचा. हीच आमच्या गावातली संक्रांतीची खरी चाहूल!
लग्नानंतर जेव्हा पहिली संक्रांत अनुभवली, त्यातला एक मह्त्वाचा आणि वेगळा वाटलेला मुद्दा म्हणजे पतंग! माझ्या माहेरी, सांगली भागात इतकं पतंगाचं वेड कधीच पहायला मिळालं नव्हतं. म्हणूनच हे पतंगाचं वेड मी जेव्हा अनुभवलं, तेव्हा वाटायचं ...इतकं काय त्या कागदाच्या टिचभर तुकडयामागे वेडं व्हायचं? पण पुढे माझी मुलं मोठी झाली आणि दस्तुरखुद्द आमचे चिरंजीवच त्या कागदाच्या चतकोरामागे वेडे व्हायला लागले! मग काय बोलणार?

मला आठवतं........संक्रांतीच्या दिवशी तर खूपच लवकर सर्व साधनसामग्रीसह तो गच्चीत जायचा. त्याची तयारी ३/४ दिवस आधीपासून चालायची. भरपूर चक्र्या पतंग विकत आणून! हो लढणार्‍या सैनिकांना ऐनवेळी रसद कमी पडली असं नको ना व्हायला! पतंग विकत आणला की त्याला "सुत्तर" पाडण्याचा एक विधी असतो. म्हणजे पतंगाच्या मधल्या कामटीच्या दोन्ही बाजूला, वर दोन आणि खाली १०/१२ बोटांच्या अंतरावर दोन अशी एकूण ४ बारीक छिद्रं पाडून त्यातून दुहेरी धागा ओवून घ्यायचा. त्याला पुढे मांजा आणि मग चक्री.
आणि हा पतंग फ़ायनली उडविण्यापूर्वी हवेत सावधानतेने एकदा वार्‍यावर हलवून पहायचा. थोडक्यात पतंगाची तब्ब्येत तपासून पहायची. एखाद्या पतंगाची आडवी कामटी जर अगदीच पातळ असेल तर या पतंगाची "लफ़्फ़ू पतंग" म्हणून संभावना केली जायची. आणि हे लफ़्फ़ूसाहेब मग बाद गडयासारखे कडेलाच पडून रहायचे! कधी कधी एखाद्या लिंबूटिंबूकडे लफ़्फ़ूसाहेबांची पाठवणी व्हायची. तसंच बर्‍याच वेळेला चक्री पकडण्याचा बहुमानही लिंबुटिंबूकडेच जातो.

DSCN1510.JPG
(पतंग उडवणारा दादा आणि चक्री पकडून लिंबूटिंबू!)

या खेळात आमचे नबरोबा आणि धाकटा दीर हेही सामील असायचे. मग काय सकाळी कसंबसं दूध पिऊन लेक एकदा गच्चीत गेला की आपणच त्याच्या चपला, टोपी पाठवावी. नंतर हळूहळू पाण्याच्या बाटल्या, जेवणाच्या वेळी गुळाच्या पोळीचं ताट!
सकाळपासूनच परिसरातून "उई काप्याssssss," "ए सोड ए सोड"(बरोबरीने एखादी हलकीशीच पण वरच्या पट्टीतली शिवी सुद्धा!),"खल्लाsssस", " ए ढील दे रे"... आणि कित्येक अनाकलीय आरोळ्या, किंकाळ्या ऐकू येत रहायच्या. त्यातल्या बर्‍याच... पतंग कापल्यानंतरच्या विजयोन्मादात मारलेल्या! या किंकाळ्या मारणार्‍यांचे घसे नंतर नक्कीच कामातून जात असणार!
डोक्यावरचं छप्पर गच्चीतल्या मुलांच्या पळण्या बागडण्याने धडधडत रहायचं. मग संध्याकाळी आम्ही सगळेच गच्चीत जायचो. लेकाला खूप वाटायचं की आपल्या मातोश्रींनी निदान चक्री धरण्याचं तरी काम करावं...मी मात्र फ़क्त बघ्याचं काम करायची.
तर आत्तापर्यंत गच्चीत आजूबाजूची १०/१५ मुलं तरी जमलेली असायची. तश्या बर्‍याच गच्च्या सगळ्या एकमेकांना कनेक्टेडच! मग गच्चीतल्या सगळ्यांनाच खाऊ मिळायचा. तोही काकाने आधीच आणून ठेवलेला असायचा. फ़रसाण, वेफ़र्स आणि असंच काहीबाही! तिळगूळ तर असायचाच.

Photo0902.jpg

आणि संक्रांतीच्या दिवशी सर्व पतंगबाजांचा जोष अगदी टिपेला पोचलेला. आमच्या गच्चीतून माझा लेक त्याच्या मित्रांना हाकारे घालायचा(आणि व्हायसा व्हर्सा....हे वार्‍याच्या दिशेवर अवलंबून!)..जे मित्र आपापल्या गच्चीतून हेच पतंग उडवण्याचं सत्कर्म करत असायचे. ..............हो.........या साध्या हाका नसायच्या.
कारण हे मित्र चांगले २/३ गल्ल्या आणि एखादा मेन रोड पलिकडे ....इतक्या लांब असायचे! मग हे हाकारे काही सेकंदाने त्यांच्यापर्यंत पोचायचे. हे मला कळायचे कारण म्हणजे त्या इतक्या लांबच्या गच्च्यातून ३/४ हात आनंदाने जोरजोरात हललेले दिसायचे! अर्थातच हे वार्‍याच्या दिशेवर अवलंबून असायचे. पण मुलांनी पतंग उडवायच्या आधीच आजच्या हवामानाचा भरपूर अभ्यास केलेला असतोच. एकदा गच्चीत गेलं की एखाद्या कुशल रणनीतीज्ञाप्रमाणे सभोवार नजर फ़िरवून परिस्थितीचा जायजा घेतला जायचा. कोणत्या गच्चीत कोण कोण आहेत.......आज वार्‍याची दिशा कशी आहे, जोर कितपत आहे, एकंदरीत आकाशात किती पतंग आहेत, कुणाच्या टीममधे कोण कोण आहेत.....इ.इ.!
बर्‍याच गच्च्या कनेक्टेड असल्याने काही मुलं तर ३/४ तरी गच्च्या ओलांडून आलेली असायची.
मग हळूहळू संध्याकाळी अंधार पडायला लागल्यावर आयांच्या हाका ऐकू यायच्या. हळूहळू सगळे सामान आवरायला लागायचे. आमचे चिरंजीवही तांबरेल्या डोळ्यांनी आणि दिवसभर उन खाऊन काळ्या मिचकुट्ट पण समाधानी चेहेर्‍याने, कापलेले पतंग अंगाखांद्यावर मिरवत खाली यायचे! जसा एखादा शूर सेनानी त्याला मिळालेली पदकं युनिफ़ॉर्मवर मिरवतो! दिवसभर मनसोक्त पतंग उडवलेले आणि भरपूर पतंग कापलेले असायचे. या काळात एकमेकांना भेटलेली मुलं बहुतेक, "किती कापले?" हाच प्रश्न विचारून संभाषण सुरू करतात! असो......
नंतरच्या कालावधीत मात्र शिक्षण/नोकरी मुळे हळूहळू माझ्या लेकाचं पतंग उडवणं बंदच झालं म्हटलं तरी चालेल. पण आमच्या गावातला पतंग महोत्सव अव्याहतपणे चालूच आहे.

त्यामुळे माझाही आता या विषयावर बराच अभ्यास झालेला आहे. प्रत्यक्ष खेळात भाग न घेताच!
तर ......पतंगांचेही ब्रॅन्ड असतात, त्यानुसार नावं, कधी आकारानुसारही! बॉम्बे टॉप, झोपड, टुक्कल, रबदान..................इ.इ. टुक्कल म्हणजे गोंडेवाला, रबदान म्हणजे मोठा आणि लफ़्फ़ेदार!
आमच्या गावातल्या "बागडपट्टी" नावाच्या गल्लीत पतंगांबाबतीतलं सर्व काही मिळतं. आणि "लोटके" हे आडनाव सबकुछ पतंग या श्रेणीत येतं. "लोटके" हा पतंगातला किती मोठा ब्रॅन्ड आहे हे त्यांची प्लॅस्टिकची सुबक पिशवी पाहिल्यावर कळतं! यांचा "लोगो"ही आहे बरं! "बरेली मांझेकी असली पहचान!" हेच ते घोषवाक्य! मांजात मांजा बरेली मांजा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही!
Photo0894.jpgPhoto0893_0.jpgPhoto0890.jpg
(संक्रांतीच्या बरेच दिवस आधीपासून "बागडपट्टी" अशी सजलेली असते....पतंगांच्या दुकानांनी!)

पतंगाच्या मांज्यांचेही बरेच प्रकार आहेत. आता सध्या पतंग संस्कृतीवरही चिन्यांचं आक्रमण झालंय. पतंग, मांजा सगळं काही चायना मेडही मिळतं! दिवाळीतले आकाश कंदिलही चायना मेड...इथपर्यंत ठीक आहे. पण चक्क आपले देवाधिदेव गणराजही चायना मेड? असो..........तर हा चायनामेड मांजा खूपच धारदार आणि सिंथेटिक असल्याने चिवट असतो. आणि त्यामुळेच तो तुटता तुटत नाही. याने खूप अपघात होण्याची शक्यता असते. तसंही पतंगाच्या दिवसात गावातल्या छोट्या रस्त्यांवरून टू व्हीलर चालवणं प्रचंड कठीण आणि धोकादायक असते. कारण बरीच मुलं आकाशाकडे बघत भर रस्त्यांवरून सैरावैरा पळत असतात. कटून खाली आलेला पतंग पकडण्यासाठी! कधीकधी आपण टूव्हीलरवर... आणि लक्षात येतं की आपल्याबरोबर मांजाही पुढे पुढे चाललाय. चक्क गळ्याशी आलेला. धावण्याच्या शर्यतीच्या शेवटी रनर जसा त्या आडव्या फ़ितीला स्पर्श करतो, अगदी तस्संच!
पण या मांजामुळे वाहनचालकांच्या गळ्याला खरंच जखमा झाल्याचीही कित्येक उदाहरणे आहेत.
पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेले पक्षी ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. आपला होतो खेळ आणि बिचार्‍या पक्ष्यांचं नुकसान. कालच्याच पेपरमधे ३०० जखमी पक्ष्यांना वाचवल्याची बातमी वाचली. एका कोकिळेचा मांजात गुरफ़टलेला फ़ोटोही पाहिला.
पतंगाच्या सीझनमधे कधी कधी बिचार्‍या मुलांच्या दुर्दैवाने आणि घरातल्या मोठ्यांच्या दुर्लक्षामुळे मुलं उंचावरून पडून कायमची पंगू झालेली किंवा दगावलेलीही आहेत. ही एक या उत्सवातली काळी बाजू आहे.

DSCN1524.JPGDSCN1523.JPG

(सुत्तर पाडण्याचा विधी मन लावून चालू आहे.)

पूर्वी बरेच पतंगबाज.........जे खरे अस्सल पतंगबाज असतात..... ते मांजा रेडिमेड कधीच आणत नसत.
"आम्ही किनई... मसाले, लोणची, पापड...वर्षाचं, सगळं घरीच करतो बाई! आम्हाला नाही ते आयतं, बाजारचं, रेडिमेड आवडंत! आणि पुरवठयाला कुठे येतं ते?" असं एखाद्या सुगृहिणीने म्हणावं, अगदी त्याच धर्तीवर हे पूर्वीचे अस्सल पतंगबाज कधीच हा आयता, रेडीमेड मांजा वापरत नसंत. अर्थात जेव्हा मुलांच्या हातात भरपूर वेळ असायचा, टीव्ही आणि कंप्यूटर/इन्टरनेट/सेलफ़ोन यांसारखी भुतं अजून मुलांच्या मानगुटीवर बसलेली नव्हती, त्या काळातल्या या गोष्टी!
DSCN1526.JPG
(या खेळात मुली फारश्या दिसत नाहीत. तरीही ही एक कटलेला पतंग घेण्यासाठी आमच्या अंगणात आली होती.)

माझा धाकटा दीर हा मांजा बनवण्यात अगदी माहीर! मग माझी मुलं त्याच्या मागेमागे असायची. हा मांजा बनवण्याची एक जबरदस्त प्रोसेस असायची. प्रथम "बागडपट्टी"तल्या "लोटके" यांच्या पतंगाच्या दुकानातून दोरा बंडल आणायचं. ते रात्रभर पाण्यात भिजत घालायचं. दुसर्‍या दिवशी शेजारच्या मोकळ्या मैदानात(हो ....तेव्हा गावातून मोकळी मैदानंही खूपच असायची!) दगड किंवा विटा मांडून चक्क चूल पेटवली जायची. त्याच्यावर एका भांड्यात(हा एखादा जाड बुडाचा डबा वगैरे असायचा, जो नंतर फ़ेकूनच द्यायचा) शिरसाचे तुकडे टाकून त्यात पाणी घालून ते शिजवायचे. या चुलीत जाळण्यासाठी घरातूनच एखादं सायकल/स्कूटरचं जुनं टायर मैदानात नेलं जायचं. इसको बोलते प्लॅनिंग! या रटारटा शिजणार्‍या शिरसाचा + जळत्या टायरचा एक विशिष्ठ आणि विचित्र वास सगळ्या हवेत पसरलेला असायचा! आणि त्या मैदानात असा मांजा बनवणार्‍या अनेक टीम्स दिसायच्या. इथे मात्र अगदी एकमेका सहाय्य करू.....याच भावनेने, सर्व वेगवेगळ्या टीम्स झपाटल्यासारख्या मांज्या बनवण्यात गुंतलेल्या असत. नंतरच्या गच्चीतल्या पतंगयुद्धाचा इथे मागमूसही नसे!
काही जण लोखंडी खल बत्त्यात काचा कुटत असत. यासाठी आधीच बल्ब, ट्युबा, बाटल्या जमवलेल्या असत.(प्लॅनिंग!!) बाटल्या जास्तीत जास्त रंगीबेरंगी असाव्यात असा विचार असे. एकदा का काचा कुटून झाल्या की त्याची अगदी वस्त्रगाळ पावडर बनवायची आणि ती पातळ तलम कापडातून गाळूनच घ्यायची. नंतरचं दृश्य: मैदानात आता एक जण धागा पकडून बसलेला, त्यानंतर काही अंतरावर शिरसाचं गरम मिक्ष्चर असलेला डबा घेऊन एकाला बसवायचं. आता पहिला.. हातातून धागा पुढे पाठवतो, दुसरा तो धागा एका दाभणाच्या छिद्रातून शिरसाच्या मिश्रणातून काढून पुढे पाठवतो. हा धागा शिरसातून पुढे जाताना एका चुट्टीतून पुढी जातो. "चुट्टी" म्हणजे एका कापडाची दोन बोटात धरलेली चिमूट. ही चुट्टी दोन्ही हाताच्या अंगठा व तर्जनी यामध्ये धरलेली असते.
यातून हा शिरसाच्या योग्य तेवढ्या मिश्रणात भिजलेला धागा तिसर्‍या मुलाकडे जातो. हा मुलगा आपल्या दोन्ही हाताच्या बंद मुठीत कापडावर वस्त्रगाळ कुटलेली काच घेऊन असायचा. आता शिरसात भिजलेला मांजा या काचेच्या कुटातून गेला की या मांजाला समप्रमाणात छान काच लागायची. पुढे हाच मांजा थोडा पुढे ओढून चक्रीभोवती गुंडाळायचा. मधल्या वेळात हा मांजा वाळूनही जायचा. गुंडाळा आता पाहिजे तेवढा मांजा चक्रीभोवती!
आमच्या गावात दिल्ली गेटच्या बाहेर एक शनी मंदिर आहे. याच्या बाहेरच्या ओट्यांवर खास याच कामासाठी खोलगट खळगे बनवलेले होते. फ़ार पूर्वी मुलं याच ठिकाणी आपापल्या बाटल्या, बल्ब घेऊन काचा कुटायला जायची असं नवरोबांकडून कळलं.
DSCN1520.JPGPhoto0901.jpg

पतंगाची स्वता:ची अशी एक खास टर्मिनॉलॉजी आहे. जसं.......... गोत, काटाकाटी, कण्णी, लफ़्फ़ू, बिलिंग , थप्पी , आखड पेच, झिलबिंडा, अट्टी, बैठी बैठी खुट्टुडुक........इ.इ.
गोत म्हणजे पतंग काटण्यासाठी टाकलेला डावपेच.
कण्णी म्हणजे अपघाने अगदी कडेला फ़ाटलेला पतंग.
बिलिंग म्हणजे पतंग एकदम खूपच लांब जाऊन अगदी सूक्ष्म अवस्थेत स्थिर होणे.
थप्पी म्हणजे काटलेला पतंग लगेच खाली न येता तो तसाच गोल गोल आकाशात फ़िरत रहाणे.
अट्टी म्हणजे उजव्या हाताची पाची बोटं फ़ाकवून डाव्या हाताच्या सहाय्याने उजव्या पंजाभोवती मांजा गुंडाळत रहाणे. असं करताना "नाही" म्हणताना हलवतो तसा उजवा पंजा सारखा हलवत ठेवायचा. म्हणूनच कोणी जर फ़ार थापा मारायला लागला तर त्याला इकडे "अट्ट्या सोडतो" असं म्हणतात.
झिलबिंडा म्हणजे कोणत्याही छोटया व जड वस्तूला मांजा बांधून ती वस्तू पर उडणार्‍या पतंगाच्या मांज्यावर टाकणे आणि पतंग ओढून घेणे. पतंग उडवण्याच्या रणांगणात न उतरता तो डायरेक्ट चोरण्याचा एक अत्यंत खुष्कीचा मार्ग आहे.
झिलबिंडा बनवणे आणि तो टाकून पतंग ओढून घेणे हेही एक कौशल्यच समजले जाते. यासाठी छोटे दगड किंवा वेळप्रसंगी सापडेल ती छोटी आणि थोडीशी जड वस्तू मांज्याला बांधून झिलबिंडा बनवण्यात येतो.

या पतंग युद्धात "दगडफ़ेक" हाही एक रीतसर एपिसोड होत असतो. जेव्हा आपला पतंगाचा मांजा समोरच्या गच्चीत पडतोय आणि समोरची व्यक्ति आता आपला पतंग तावडीत घेणार हे आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण खुशाल समोरच्या गच्चीत आपल्या गच्चीतून दगडफ़ेक करू शकतो. फ़क्त एकच आहे की त्यावेळी प्रतिस्पर्धी हा आपल्या दगडाच्या आवाक्यात असायला हवा. तर ही दगडफ़ेक यशस्वी होते.

संक्रातीच्या दिवशी सर्व गच्च्या माणसांनी फ़ुलून गेलेल्या दिसतात. आणि जोडीला लाउडस्पीकरवर अत्यंत
कर्णकर्कश्य संगीतही वाजवतात. नाचही चालू असतो. सध्या तर एकंदरीतच हा खेळ, चालू असलेला आरडा ओरडा, कर्कश्य संगीत हे जरा जास्तच आक्रमक होत चाललंयसं वाटतं.

या वर्षी बहुतेक मुन्नी अर्थातच झंडू बाम, फ़ेव्हीकॉल, ढिंकचिका, हलकट जवानी..जोडीला ए अंटे आणि इतरही काही परप्रांतिय गाण्यांची चलती दिसली. शीलाचा पत्ता...पतंग म्हणू हवं तर......यावर्षी काटलेला दिसला.
थोडं पूर्वीचं.........कधी कधी मात्र हे पतंगवेड हाताबाहेर जातंय आणि पतंगोत्सव थांबण्याची काही चिन्हंच दिसली नाहीत तर घरातून धमक्या मिळायच्या की,"थांब आता...तुझी चक्रीच बंबात टाकते." आणि खरंच तेव्हाच्या मुलांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा पालकांच्या सुदैवाने म्हणा, या चक्र्या त्या काळच्या बंबाच्या वरच्या धुराड्याच्या अगदी मापात असत! जर का एखाद्याच्या मातेच्या सहनशक्तीच्या पलिकडे हा पतंगोत्सव गेला तर चक्री खरंच बंबार्पणमस्तु व्हायचीच! मग मात्र पतंगवेड संपुष्टात आणून अभ्यासाला लागण्यापलिकडे काही उपाय नसायचा!
सध्याच्या काळात बंबच नसल्याने या धमक्या आता अस्तित्वात नाहीत. असो.......
संक्रांतीनंतर दोन तीन दिवसच ही धूम चालते. मग आकाश एकदम रिकामं वाटायला लागतं!
आणि नंतर परीक्षेचे वारेच वहायला लागतात!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिमुरी धन्यवाद गं! पण अजून बरेच फोटो आहेत....पण बहुतेक मला पहिले काही फोटो डिलिट करायला लागतील. कारण फोटो अपलोड होत नाहीत.

(.... तेव्हा आपण खुशाल समोरच्या गच्चीत आपल्या गच्चीतून दगडफ़ेक करू शकतो. फ़क्त एकच आहे की त्यावेळी प्रतिस्पर्धी हा आपल्या दगडाच्या आवाक्यात असायला हवा. तर ही दगडफ़ेक यशस्वी होते....))

चक्क दगडफेक !! कोणी रक्तबंबाळ नाही का झालं का कधी?

बाकी छान लिहिलंय

हं तिथेच लिहिणार होते..........ही दगडफेक अगदी अहिंसक असते. कुणालाही फार लागू नये पण आप्ला पतंग मिळावा..........!

मानुषी ताई खुप मस्त लिहीलय. माझ्याकडुन काही भर
१. शिरस गरम झाल्यावर पहिली उकळीनंतर त्यात रंग टाकतात. लाल्,पिवळा,निळा,केशरी,काळा.
२. दोर्‍याचे बंडलाचे प्रकार २ गोष्टींवर अवलंबुन असायचे. त्यातल्या पेड(जाडी) आणि किती मिटर. यात साखळी , हातोडा , डबल हातोडा , पांडा हे फेमस प्रकार होते. ९५-९६ नंतर रेडिमेड मांजा पण आला बाजारात तो बरेली या नावान मिळायचा.
३. ९१-९२ साली मांजा रेडीमेड सुतऊन पण मिळु लालगा. यात आपण दोर्‍याचा बंडल / रंग / काच निवडायची. मांजा शिरस / काच यातुन बाहेर आला की येका मोठ्या चकरीला(साधारण १ मी व्यासाची आणि तेव्हडीच रुंद) जी ईलेक्ट्रीक मोटार किंवा हँडलन फिरवली जायची आणि सगळा मांजा त्यावर घेऊन थोड्यावेळ उन्हात ठेउन तुमच्या चकरीवर ईलेक्ट्रीक मोटारन २ मि. येकसारखा गुंढाळुन मिळायचा.
४. मोठा पतंगांसाठी जाडसर पण मऊ मांजा वापरायचा. त्यासाठी काच सोडताना काचेच पुडक घट्ट धरल जायच आणि धागा शिरसेच्या डब्यात जायच्या आधी कोकम तेलाचे खडे किंवा कोरपडीच्या गरेदार पानातुन पाठवायचा.
५. टुक्कल म्हण्जे छोटा पतंग ज्याला शेपटी लाऊन ऊडवावा लागत असे. नवशिके सगळ्याच पतंगांना शेपट्या लावतात. बाँबेटाईपला खालच्या टोकाला अजुन येक छोटाचा चौकोन असायचा. गोंडा म्हण्जे खालच्या टोकाला कागदी झिरमाळ्यांचा गोंडा. रबदान आणि झोपडी यात खालच्या दोन्हीबाजुला पंख असायचे. पंख जर गोलाकार आणि पतंग येकसारखा समांतर्भुज चौकोनाचा असेल तर रबदान हा बराच मोठा असायचा ४-५ फुटांपर्यंत पण. जर पंख टोकदार सरळ्सोट आणि पतंग थोडा बसका असेल तर झोपडी. हा रबदान पेक्षा छोटा असायचा.
बाकीच जेवणानतर टाकतो

वावावा.. मानुषी..कित्ती मस्त आणी खुसखुशीत लिहिलंयस.. लहानपणी केलेली धम्माल तशीच्यातशीच डोळ्यासमोर उभी केलीस..
पतंगीची टर्मिनॉलॉजी तर एकदम ईस्पेशल है.. फोटोज समर्पक आहेत्..थोडे मोठे आणी चुनिंदा फोटोज अ‍ॅड कर Happy

६. पेच खेळायला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात वाईट पतंग म्हण्जे बाँबेटाईप. हा पतंग खुप गिरक्या घेतो , आणि जर कंट्रोल करता आला तर याची मजा दुसर्‍या पतंगात नाही.
७. हवा वहात असेल तर पतंग चढवण सोप जात. दोन तिन हात आखडुन थोडी ढिल देऊन पतंग आरामात वर चढतो. पण हवा नसेल तर ठुमक्या देऊन (ही क्रीया हात खांद्याच्या वर ठेऊन करावी लागते) देऊन वर चढवावा लागतो आणि वरच्या हवेत बराच ऊंच ठेवावा लागतो.
८. गोत मारणे : आपला पतंग उंचावर नेऊन त्याच डोक ठुमक्या देऊन खाली करायच आणि जोर जोरात आखडायच म्हण्जे पतंग जोरात खाली गोलाकार डायरेक्श्नन येतो. आपला पतंग मोठा असेल तर आपल्या खाली उडणार्या चिल्ल्या पिल्ल्यांना गोत मारुन सहज ताणावर कापता येत. पण जर खालच्या ऐखाद्या चिल्ल्यान वेळातच त्याचा पतंग ताणात ठेऊन ढिल देत राहीला तर लंबी पेच होते.
९. कण बांधणे : येका बाजुला फाटलेला पतंग चिटकवल्यावर त्याबाजुला जड होतो. त्याचा तोल सावरण्यासाठी दुसर्‍या बाजुला चिंधी , धाग्यांचा गठ्ठा बांधतात याला कण्णी म्हणतात. हल्ली तावाचे (कागदाचे) पतंग कमी झालेत आणि प्लास्टीकचे वाढलेत त्यामुळ पतंग चिटकऊन उडवणे हा प्रकार नसतो.
१०. लटकवणे : कटुन चाललेला पतंगाचा मांजा आपल्या उडणार्या पतंगाच्या मांज्यात लपेटुन घेऊन तो पतंग पण मिळवणे. यात कधीकधी आपला पतंग पण कटतो.
११. आखड पेच : पेच लाग्ल्यावर आपला पतंग जवळच असेल तर जोर जोरात आखडुन आपला पतंग आणि दुसर्याचापण पतंग ओढुन आपल्याकड घ्यायचा आणी दुसर्‍याच्या पतंगाचा मांजा तोडुन टाकायचा. पतंगातल्या भांडणांच हे येक मोठ कारण असत.
ऐका सिझन मधे कमीत कमी (१० वी आणि १२ वीच्या वेळेस) २ वेळेस मांजा सुतवावा लागायचाच.
भोगीला "लोटके" कड जाउन १००-१५० पतंग आणुन ठेवायचो आणि संध्याकाळी सगळ्या पतंगांना सुत्तर पाडुन रेडी करुन ठेवायचो. संक्रांतीला रात्री तिळगुळ घेऊन आल्यावर पण मांज्याला दिवा बांधुन पतंग उडवायचो.यासाठी स्थिर गोंडा बाजुला काढुन ठेवला जायचा. जवळपास सकाळी ७-८ वाजता पतंग उडवायच चालु झालेल रात्री १०-११ पर्यंत चालायच. संक्रांतीनंतर ३-४ दिवस तरी चमच्यानीच खाव लागायच. पुण्यात पतंगांची मजाच नाही.

वर्षुताई पतंग हा नाताळनंतर आमचा जीव की प्राण होता.
अजुन येक राहीलच चकरीचा आसारी म्हणुन येक प्रकार असतो यात चकरी धरायला कोणाची गरज पडत नाही पतंग उडवणे मांजा गुंढाळणे येकजण करु शकतो. कोपरगावला साध्या चकर्यापेक्षा आसारीवरच बहुतेक सगळे पतंग ऊडवतात.

वा छानच लिहीलेय...... Happy
मानुषी मस्तच गं .... Happy

ओ एम जी. सुशांत ने तर पी एच डी केलीये या विषयात.. >>> +१
सुश.... Happy

हो रे सुश्........आमच्याकडे जालन्याला माझा चुलत भाउ शिकायला होता आणि माझा मोठा भाऊ सोबत.......त्यामुळे मी त्यांच्यातच खेळायची........विटी दांडु आणि पतंग उडवने हेच आमचे आवडते खेळ.......आणि सुटीत नगरला ही मला तीन मामे भाऊच सो तिथेही त्यांच्यातच विटी दांडु आणि पतंग उडवने आणि हो ते डब्बा डुलही खूप खेळायचे (कारण माझा मोठा भाऊ सोडला तर बाकी आम्ही सर्व एकाच वयाची आणि एकाच ईयत्तेत शिकत होतो ).......सो मी ही पतंगबाजी छान करते बरं का..... Happy

अग मग लिही की तु पण.... तुझ्या आठवणी. मी १-२ संक्रांती बडोद्यात केल्या पण तिथ आकाशात येव्हडे पतंग होते की माझे १०० पतंग २-३ तासात संपले. मग कटुन आलेल्या पतंगांवर दिवस काढला. तिथ कटलेले पतंग पोर पकडायचे आणि परत विकायचे पण. २ रुपयाचा पतंग १ रुपयाला सुत्तरासहीत.

तुम्ही ज्याला सुत्तर म्हणता आहात, त्याला आम्ही (नाशिकमध्ये तरी) मंगळसुत्र म्हणायचो Lol
आणि गई बोला रे धीना... असं पतंग कापल्यावर ओरडायचो...पेचचे प्रकार म्हणजे ढील देत कापणे, खेचाखेची करणे, दोन जणांचा चालू असतांना तिसर्‍याने मध्येच येऊन आधीचे दोन्ही कापणे... मांजा लुटणे, आठ घरांच्या लाईनमध्ये असणार्‍या धाब्यांवरून उड्या मारत मारत जाऊन कटलेले पतंग पकडणे, दुसर्‍या कुणी जर पतंग पकडला, आणि आपल्याला नाही मिळाला की तो फाडणे Proud असले प्रकार खूप केलेत. पण याच पतंगांच्या नादामुळे कित्येक मुलं छतावरून पडून त्यांना इजा होणे, काही वेळा जीव गमवावा लागणे ही बाब अजुनही कमी झाली नाही असं बातम्यांवरून तरी वाटतं Sad

शाळेत असताना हे सगळे प्रकार केलेले आहेत त्याची फारच आठवण झाली... आणि पुण्यात आतशा पतंग कमी दिसायला लागले आहेत.. पण तरी काही ठराविक भागात दिसतातच... बोहरी आळीत ओळीनं दुकानं आहेत पतंगाची..

९. कण्णी : येका बाजुला फाटलेला पतंग चिटकवल्यावर त्याबाजुला जड होतो. त्याचा तोल सावरण्यासाठी दुसर्‍या बाजुला चिंधी , धाग्यांचा गठ्ठा बांधतात याला कण्णी म्हणतात. हल्ली तावाचे (कागदाचे) पतंग कमी झालेत आणि प्लास्टीकचे वाढलेत त्यामुळ पतंग चिटकऊन उडवणे हा प्रकार नसतो.

>>>>>>>>>>>>>

हे नक्की का?
कारण आमच्याकडे पतंग आणि दोरा यांचे जंकशन जे असते, म्हणजे पतंगीला चार भोके पाडून त्याला मांजाने बांधणे याला कन्नी आणि कन्नी बांधणे असे बोलतात... जी अंड्याला कधीच तोलून मापून बांधता आली नाही.. नेहमी एका दादाकडूनच बांधून घ्यायचो..

नंतर लिहितो मी देखील इथे.. जाम आठवणी चाळवल्यात राव या पतंगीच्या धाग्याने.. अन हो, लेख अजून वाचला नाही.. तो देखील वाचतो..

मजा आली.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. > +१

कारण आमच्याकडे पतंग आणि दोरा यांचे जंकशन जे असते, म्हणजे पतंगीला चार भोके पाडून त्याला मांजाने बांधणे याला कन्नी आणि कन्नी बांधणे असे बोलतात... > अंड्या बरोबर मुंबई उपनगरात त्यालाच कन्नी म्हणतात.

मुंबईत टॉवर संस्कृती रुजू लागल्या पासून पतंगबाजी नाहिशी झाली आहे. तरी उपनगरातील गुर्जर बंधूचे पतंग प्रेम आटलेले नाही.

अंड्या चुक सुधारलीय. जर तु १००-१५० सुत्तर (कण्णी) बांधल्या असत्या तर तुला पण जमल असत रे.
मोठे पतंग तागाभरी असायचे. सगळ्या कडांना दुमडुन आत बारीक धागा ठेऊन चिटकवलेल असायच.
कोणी घरी पतंग बनवायचे का? का कुणास ठाऊक पण घरी पतंग कधी बनवावा अस वाटलच नाही.
चौथीत होतो , क्रिकेट खेळता खेळता मैदानातच कटुन आलेला पतंग पकडायला पळालो. कावळा बसायला आणि फांदी तुटायला येकच वेळ झाली. वडीलांनी पाहिल. आयुष्यात वडीलांचा तेव्हडा येकमेव मार खाल्ला. मोठ्या भावान मधे पडुन मला सोडवल होत. त्यानंतर परत कधीच कटुन आलेल्या पतंगामाघ पळण्याची हिंम्मतच नाही झाली. आपसुक गच्चीवर आला तरच पकडायचो.

मलाही बनवायला आवडायचे नाही, पण विकत घेऊन आणायला हातात पैसे नसायचे, आणि द्यायला घरी कुणी नसायचं. ते बरंच होतं म्हणा, नाहीतर हुंदडणंच बंद झालं अस्तं Lol

मानुषी मस्त लिहिलयं , जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
तुम्ही ज्याला सुत्तर म्हणता आहात, त्याला आम्ही (नाशिकमध्ये तरी) मंगळसुत्र म्हणायचो >>> +१

Pages