अर्धा किलो घेवडा, २ बटाटे, ४ हिरव्या मिरच्या आणि मीठ किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, ओले खोबरे, कडीपत्ता, कोथींबीर, कांदा ऐच्छीक, मेथीची भाजी ऐच्छीक, फोडणीचे जिन्नस.
घेवड्याच्या शेंगा निवडून १ किंवा अर्धा इंचाचे तुकडे कापणे. बटाटा, कांदा चिरणे. मेथीची पाने निवडणे.
कढईमध्ये फोडणीसाठी तेल तापवा. जीरे-मोहरी तडतडल्यावर कडीपत्ता, कोथींबीर घाला. हिरव्यामिर्च्या वापरणार असाल तर आता घाला. कापलेल्या सर्व भाज्या कढईत घाला. ठेचा वापरणार असल्यास घाला नाहीतर मीठ घाला. कढईवर झाकण लावून त्यात थोडं पाणी घाला. मंद आचेवर भाज्या शिजू द्या. अधून मधून परतत रहा. बटाटा शिजल्यावर हळद, ओले खोबरे घाला. आता झाकण लावयचे नाही. जरा लवकर परतावे लागते अन्यथा भाजी करपण्याची शक्यता वाढते. ४-५ मिनिटांनी भाजी तयार होते.
१. सुके खोबरे वापरले तरी चालेल. पण चवीत फरक पडतो.
२. मेथीची पाने थोडीशीच घालावी नाहीतर भाजी कडू होते.
३. बटाटा आणि खोबर्यामुळे ही भाजी थोडी गोडसर होते, साखर घालायची गरज पडत नाही.
४. खोबरे घातल्यावर भाजी थोडावेळ शिजवावी. यामुळे खोबर्याचा गोडवा भाजीत छान उतरतो.
५. या सर्व भाज्या कापल्यावर पाण्यात घालून मग फोडणीत घालाव्या. पाण्याच्या अंशाने आणि वाफेने भाजी छान शिजते.
६. सर्व भाज्या एकाच वेळी फोडणीत घालाव्यात. नाहीतर चव बिघडण्याची तसेच भाजी करपण्याची शक्यता वाढते.
७. वाढणी/प्रमाण अंदाजे दिला आहे.