गोवा स्टाईल पनीर

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 4 January, 2013 - 11:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर - २०० ग्रॅम
कांदे - मध्यम आकाराचे २ बारीक चिरून
हिरव्या मिरच्या - २ उभ्या चिरून
चिंचेचा कोळ - १ टीस्पून
नारळाचे दूध - अर्धा कप (ऐच्छिक - मी घातले नाही)

वाटण :

खोवलेला नारळ - पाव ते अर्धा कप
लाल सुक्या मिरच्या - ३-४
धणे - दीड टीस्पू
जिरे - पाऊण टीस्पू
आले - पाऊण इंचाचा तुकडा
लसूण - ६ ते ८ पाकळ्या
दालचिनी - १ इंचाचा तुकडा
लवंग - ५-६
हळद - पाव टीस्पू

तेल, मीठ.

gp4 copy.jpg

क्रमवार पाककृती: 

धणे व जिरे कोरडे भाजून घ्यावेत. खोवलेला नारळ किंचित तांबूस रंगावर कोरडा परतून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले धणे, जिरे, भाजलेला नारळ, सुक्या मिरच्या, आले, लसूण पाकळ्या, दालचिनी, लवंग, हळद हे घालून त्यांत थोडेसे पाणी मिसळून गुळगुळीत वाटून घ्यावे.
तेलावर कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. पाण्याचा किंचित शिडकावा करावा, जेणेकरून कांदा जळणार नाही. त्यात वाटण घालून २-३ मिनिटे परतावे. नंतर हिरव्या मिरच्या व मीठ घालून परतावे. पनीरचे तुकडे घालून परतावे. सर्वात शेवटी चिंचेचा कोळ घालावा व नारळाचे दूध घालावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. चव घेऊन मीठ अ‍ॅडजस्ट करावे. वाढताना वरून आवडीप्रमाणे लिंबू पिळावे.
गरमागरम पोळी/ फुलका किंवा भाताबरोबर खावे.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

१. ही काही फार खास, वेगळी अशी पाककृती नाही. नेहमीच्याच गोवन स्टाईलच्या ग्रेव्हीत पनीरचे तुकडे मिसळलेत. पण चवीला मध्यम-सौम्य असल्यामुळे व नेहमीचे गरम मसाला -टोमॅटो प्यूरी कॉम्बो नसल्यामुळे चवीत पालट म्हणून छान.

२. मसाला मुरल्यावर ही भाजी आणखी मस्त लागते.

३. फोटो केवळ कल्पना यावी म्हणून! संजीव कपूरच्या कृतीतील भाजी केशरीसर रंगाची दिसते. माझ्या फोटोतली भाजी पिवळसर-ब्राऊनीश रंगाची दिसते आहे.

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर फूड-फूड संकेतस्थळ
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेस्पी अकु. वाटणात कांदापण घातला तर लज्जत वाढेलसं वाटतं.
भाजीचा रंग तिखट / सु. मि. वर अवलंबून असणार. माझ्याही ग्रेव्ही भाज्यांचा रंग वरच्या फोटोसदृश्यच येतो.

धन्यवाद चिन्नु व सिंडरेला. Happy हो, यात छोटे बटाटे सुद्धा छान लागतील हाच विचार आला भाजी केली तेव्हा.

चिन्नु, हो, मग चवही वेगळी लागेल बहुतेक. सध्याच्या कृतीप्रमाणे चव आवडली मला.

या गेव्हीची मला आठवण येतेय अगदी. वाटणात ब्याडगी किंवा गोवा मिरच्या वापरल्या तर तसा रंग येईल.
आणि गोवेकरांचा वाटणासाठी शब्द, "गंधासारखे" ( गोवेकर मात्र गणपतिच्या दिवसात, हा प्रकार करत असावेत Happy )

गोव्यात कोलवा बीचवरच्या हॉटेलात अशीच भाजी 'पनीर मसाला' नावाखाली मिळाली होती. 'ह्याला खोबर्‍याची चव आहे' असं मी म्हटलंही, त्यावर नवर्‍याने 'माशांच्या करीत पनीर घालून तुला दिलंय' असं म्हणण्याची संधी साधली. नाही म्हटलं तरी मूड गेलाच. तीच भाजी 'गोवन पनीर मसाला' नावाने दिली असती तर आवडली असती.. मानसिकता मॅटर्स! Wink

भाजीचा फोटो छान आहे अरुंधती.

दिनेशदा,

गोवेकर मात्र गणपतिच्या दिवसात, हा प्रकार करत असावेत .... हे आवडल !

फक्त गणपतीच्या दिवसात शिवराग ( वेजीटेरीयन) जेवणारे गोवेकर, ईतर

दिवसात वेज जेवण त्यांच्या घश्याच्या खाली ऊतरत नाही.

धन्यवाद अंशा.

दिनेशदा, गंधासारखे गुळगुळीत... , हा हा हा, पण त्या मसाल्याचा सुगंध घेताना गंधाची अजिबात आठवण होत नाही! Wink

मंजूडी Happy धन्स.