दरवेळी प्रवासात असतांना प्रवासवर्णन लिहायचेच असे मनाशी पक्के ठरवत असतो, पण प्रवासातून परतल्यावर लिहावेसेच वाटत नाही.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फेसबुक. (पूर्वी ऑर्कूट.)
हो. कॅमेरा हातात पडल्यापासून लिहिणे कमी झाले आहे आणि फोटोग्राफी जोमात सुरू झाली आहे.
त्यामुळे एकदा का प्रवासाच्या फोटो फेसबुकवर टाकल्या की मग लिहावेसेच वाटत नाही.
पण आता लेखनसुद्धा परत सुरू करण्याचा विचार करतोय. त्यामुळे एक आत्मिक समाधान मिळते.
असो, पुरे झाले माझे लेखनपुराण, विषयावर येतो.
दरवर्षी आम्ही कुठेतरी फिरायला जातो आणि या वर्षातली ही दुसरी वेळ.
(फेब्रुवारीमध्ये ताडोबाला जाऊन आलो. त्याबद्दलही लिहितो नंतर.)
चौघांच्या (आई, वडील, भाऊ आणि मी) चार चॉइस असल्यामुळे आम्हा चौघांना किमान एक महिना अगोदर एकत्र बसून चर्चा करावी लागते.
यावेळीही परिस्थिती काही वेगळी नव्हती.
‘दाजीपूरचे गवा अभयारण्य’ हे ठिकाणही ठरले होते, पण प्रवासाला निघण्याच्या पाच दिवस अगोदर काही कारणास्तव थोडा बदल झाला आणि देवबाग हे ठिकाण ठरले. (दाजीपूरलाही ४ तासांचा वेळ दिला.)
देवबाग हे दाजीपूरपासून फार दूर नाहीये, त्यामुळे प्रवासात मोठा फेरफार करायची गरज भासली नाही.
आणि आता खरंच वाटत आहे की आम्ही ऎनवेळी ठिकाण बदलले ते फार चांगले झाले. (जे होते ते चांगल्यासाठीच !)
१८ नोव्हेंबरला संध्याकाळी ५:०० च्या सुमारास आम्ही मालवणमध्ये प्रवेश केला.
खरं तर फोंडा घाटापासूनच निसर्ग आपल्याला मोहीत करत असतो, पण कोकणातील गावा-खेड्यांच्या रस्त्यांवरून जातांनासुद्धा निसर्गाची निरव शांतता आपल्याला ऎकू येत असते.
मालवणपासून तारकर्ली ७ कि.मी. आहे तर तारकर्लीच्या पुढे ५-६ कि.मी.वर देवबाग आहे.
देवबागच्या तुलनेत पर्यटक तारकर्लीला प्राधान्य देतात आणि हा तर दिवाळीच्या सुट्ट्यांचा काळ होता.
त्यामुळे मुद्दाम आम्ही पर्यटकांच्या गोंगाटापासून थोडा बाजूला असलेला, पण तितकाच चांगला किंबहुना त्यापेक्षा थोडा सरस असलेला देवबागचा समुद्रकिनारा निवडला होता.
मालवणपासून देवबागला येईपर्यंत इंटरनेटवर पाहिलेले अनेक बीच रिसॉर्टस आणि होमस्टे दिसत होते.
आम्ही देवबागचे ‘हेरंब न्याहारी निवास’ अगोदरच बुक केले होते. (यांनी अजून स्वतःची वेबसाईट बनवलेली नाही. यांचा फोन नंबर आम्हाला दुसर्या एका रिसॉर्टकडून मिळाला होता.)
साहजिकच यांच्या रिसॉर्टच्या फोटो पाहिल्या नसल्यामुळे मनात थोडी धाकधुक होतीच.
पण यांच्या रिसॉर्टजवळ गाडी थांबताच माझ्या तोंडून फक्त ‘WoW’ हेच शब्द बाहेर पडले. (हल्ली मराठीमधून अशा उत्कट भावना व्यक्त करता येत नाहीयेत.)
अंगणात नारळीची छोटीशी बाग, खाली समुद्रातली पांढरीशुभ्र रेती, पुढे नवीनच बांधकाम झालेल्या रूम आणि त्यांच्यामागे अथांग पसरलेला शुभ्र समुद्रकिनारा.
आम्ही हे सगळे सौंदर्य न्याहाळतच होतो की तितक्यात ‘हेरंब न्याहारी निवास’चे मालक श्री. सुनील केळुस्कर आले.
आमचे वेलकम करून त्यांनी आम्हाला आमची रूम दाखवली आणि थोड्याच वेळात चहा पाठवला.
सूर्यास्ताची वेळ होत होती म्हणून चहा रूममध्ये पिण्याऎवजी मस्तपैकी बीचवरच जाऊन पिला.
थोड्या वेळाने समुद्रकिनार्यावरील सुर्यास्ताचे मनमुराद फोटोसेशन केले आणि रूमवर येऊन पडलो.
आदल्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यामुळे कोल्हापूर ते मालवणपर्यंत सगळ्या बाजारपेठा बंद होत्या.
उत्स्फूर्त आणि कडकडीत बंद काय असतो हे त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवले.
अगदी कुठेही एखादी चहाची टपरीसुद्धा चालू नव्हती.
या गोष्टीचा विचार करूनच आम्ही आल्या आल्या रात्रीच्या जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली होती.
पण रात्रीचे ८:३० होऊन गेले तरी जेवणाचा पत्ता नव्हता.
दिवसभर उपवासच घडला होता, आता रात्रीचेही जेवण मिळणार नाही असे वाटत होते.
इतक्यात जेवणाची ताटं आली.
आता कोण वाट पाहणार होतं ?
तुटून पडले सगळे जेवणार.
दोन फिशच्या (पापलेट) थाळी आणि दोन शाकाहारी थाळी मागवल्या होत्या.
मागच्या ७-८ दिवसांच्या कोकण दौर्यात माशाच्या काट्यांच्या भीतीमुळे मी मासे न खाण्याचा मूर्खपणा केला होता.
यावेळी पूर्वतयारीनीशी आलो असल्याने तसा करंटेपणा करण्याचा प्रश्नच नव्हता.
मालवणी जेवणाचे, विशेष करून पापलेट आणि सोलकढीचे शब्दांत वर्णन करताच येणार नाही.
त्यामुळे एक फोटो टाकतोय, काय ते समजून घ्या.
जेवण झाल्यावर केळुस्करांचे छोटे बंधू आणि त्यांचा मित्र वैभव खोबरेकर यांच्याशी गप्पा मारत बसलो.
बारावीत शिकत असलेला वैभव फार चुणचुणीत आणि कामात अग्रेसर वाटला.
तो सुट्ट्यांमध्ये केळुस्कर बंधूंना त्यांच्या या व्यवसायात मदत करतो.
जेव्हा त्याला कळाले की त्याच्या १२ वीच्या पुस्तकात असलेल्या ‘तिची वाटच वेगळी’ या कथेच्या लेखिका ह्याच आहेत, (माझी आई, मथु सावंत) तेव्हा त्याच्या चेहर्यावर आनंदयुक्त आश्चर्याचे भाव होते.
केळुस्कर आणि वैभवने नंतर देवबागच्या आसपासच्या परिसराची आणि कोकणी संस्कृतीची बरीच माहिती दिली.
त्यांना गुडनाईट करून रूमवर आलो आणि निद्रादेवीने कधी आमच्यावर कब्जा केला कळालेच नाही.
भल्या पहाटे उठून बीचवर एक फेरफटका मारला.
कालच्या तुलनेत आज बीचवर बरेच स्टारफिश आणि वेगवेगळे खेकडे पाहायला मिळाले.
रात्री समुद्राच्या लाटांनी तयार करून ठेवलेले सॅंडस्केप्ससुद्धा बघायला मिळाले.
पण आज इतरही काही स्पॉट पाहायचे ठरवले होते, त्यामुळे बीचवरून लवकर काढता पाय घेतला.
आज नाश्त्यामध्ये कोकणी खाद्यसंस्कृतीमधला अजून एक पदार्थ अनुभवायला मिळाला, घावण आणि चटणी.
घावण आणि चटणीवर ताव मारत असतांना समुद्रात बोटीने फिरायचा बेतसुद्धा आखला.
इथे पर्यटकांसाठी बोटींचीसुद्धा व्यवस्था आहे.
एका राऊंड ट्रिपसाठी प्रत्येक फॅमिलीला साधारणतः १,००० ते १५०० रू. मोजावे लागतात.
या बोटीने तुम्हाला समुद्रात १८ कि.मी. आत फिरवतात. (बहुधा ९ नॉटिकल मैल.)
या समुद्रसफारीमध्ये डॉल्फीन पॉईंट, गोल्डन रॉक, संगम आणि सुनामी आयलंड हे चार पॉईंट दाखवल्या जातात.
१) संगम
कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा जिथे संगम होतो, त्याला संगम पॉईंट असे नाव देण्यात आले आहे.
बहुतेक सगळ्या बोटी कर्ली नदीतूनच सुटतात.
नदीच्या शांत पाण्यातून समुद्राच्या लाटांमध्ये जातांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो.
२) डॉल्फीन पॉईंट
ताडोबात जसा सध्या हमखास वाघ दिसतोय, तसे इथे हमखास डॉल्फीन दिसतात म्हणे.
संगमाजवळ छोटे मासे सहज सापडतात त्यामुळे या भागात डॉल्फीन मोठ्या प्रमाणावार दिसून येतात.
१-२ नव्हे तर तब्बल १०-१५ च्या थव्यानेच इथे डॉल्फीन दिसतात असे ऎकले होते.
पण त्यादिवशी आमच्या समवेत अनेक लोकांना डॉल्फीन दिसले नाहीत असे नंतर समजले.
३) गोल्डन रॉक
संगम पॉईंटच्या थोडे पुढे गोल्डन रॉक आहे.
समुद्रात असलेल्या या मोठ्या कातळावर सूर्यप्रकाश पडल्यावर तो गोल्डन दिसतो म्हणून गोल्डन रॉक.
या पॉईंटपासून सगळ्या बोटींचा परतीचा प्रवास सुरू होतो.
तुम्ही बोट चालवणार्याला एक्स्ट्रा पैसे दिले किंवा विनंती केली तर तो तुम्हाला जवळच असलेल्या निवती आणि भोगवे बीचवर घेऊन जाऊ शकतो.
हे दोन बीच अगदी खर्या अर्थाने निर्मनुष्य आहेत.
भोगवे बीचवर ‘श्वास’ या चित्रपटातील काही प्रसंग शूट करण्यात आले आहेत.
४) त्सुनामी आयलंड
गोल्डन रॉकवरून बोटीचा परतीचा प्रवास सुरू होतो.
परतीच्या प्रवासातला शेवटचा पॉईंट म्हणजे त्सुनामी आयलंड.
नाव ऎकून २००४ च्या त्सुनामीची आठवण आली ना ?
त्या त्सुनामीमुळेच हे बेट तयार झाले आहे.
२००४ च्या त्सुनामीने तिकडे हजारो लोकांचा बळी घेतला आणि इकडे आपल्याला मौजमजा करायला हे बेट बनवून दिले.
मौजमजा यासाठी म्हणतोय की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोटींमधून वाटरस्पोर्ट्स खेळण्याची सुविधा आहे.
तसेच बेटावर अनेक छोटछोटे स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला आईस्क्रिम, सरबत, पोहे, घावन इ. खाद्यपदार्थ मिळतील.
भरतीच्या वेळी मात्र या बेटावर पाणी चढायला सुरूवात होते.
सुदैवाने आम्हाला ते रोमांचकारी दृष्य पाहायला मिळाले.
सोबत त्सुनामी आयलंडचा पॅनोरॅमिक फोटो टाकलाय, तो मोठ्या साईझमध्ये बघा.
समुद्रसफारीहून परत यायला दुपारचा एक वाजला होता आणि सगळ्यांना कडाडून भूक लागली होती.
मालवण शहरात असलेल्या ‘अतिथी बांबू’ या हॉटेलबद्दल इंटरनेटवर बरेच वाचले होते म्हणून मोर्चा तिकडे वळवला.
रस्ता विचारत विचारत हॉटेलजवळ पोहोचलो.
आता लवकरच पोटातले कावळे शांत होतील या आशेने हॉटेलमध्ये प्रवेश केला.
समोर पाहिले तर १५-२० फॅमिली अगोदरच जेवायला बसल्या होत्या आणि ७-८ फॅमिली वेटींगमध्ये होत्या.
हे दृष्य पाहून पोटातील कावळ्यांनी एव्हाना आत्महत्याच करून टाकली होती.
नाइलाज को क्या इलाज म्हणत आम्हीही एक कोपरा पकडून आमचा नंबर यायची वाट बघत बसलो.
तब्बल ४०-५० मिनिटांनंतर आम्हाला एक टेबल मिळाला. (तोही दुसर्या एका फॅमिलीसोबत शेअर करावा लागला.)
पण ‘दुनिया जाए तेले लेने ऎश तू कर’ या उक्तीला शिरसावंद्य मानून मी आणि लहान भावाने सुरमई आणि सरंगाला त्यांची खरी जागा दाखवलीच.
अरे हो, एक सांगायचेच राहिले.
माझ्यासारख्या नवशिक्यांना ऑर्डर द्यायला सोपे जावे म्हणून त्यांनी हॉटेलच्या दर्शनी भागात एका मोठ्या बोर्डवर त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सीफुड आणि त्यांच्या फोटो लावल्या होत्या.
जेवण करून रूमवर आलो आणि थोडा वेळ विश्रांती घेतली, पण लाटांची गाज काही स्वस्थ बसू देत नव्हती.
त्यामूळे कॅमेरा घेतला आणि बीचवर जाऊन फोटोग्राफीला सुरूवात केली.
थोड्याच वेळात आई-वडील आणि भाऊसुद्धा मला जॉईन झाले आणि मस्त फॅमिली फोटोसेशन चालत राहिले.
सूर्यास्ताची वेळ जशीजशी जवळ येत होती, तशी बीचवर पर्यटकांची संख्या वाढायला लागली होती.
तरी सूर्यास्त होईपर्यंत देवबागच्या बीचवर फार तर १०-१५ फॅमिली जमा झाल्या होत्या.
पण कॅमेर्यातून झूम करून तारकर्ली बीचकडे पाहिल्यावर तिकडे तर पर्यटकांचीच त्सुनामी आलेली दिसली. (फोटो टाकलाय.)
सूर्यास्ताच्या अनेक फोटो काढल्यावर कॅमेरा बाजूला ठेवून डोळ्यांनीच त्या सूर्यनारायणाला समुद्रात शिरतांना पाहत राहिलो.
ते दृष्य इतके सुंदर होते की सूर्यास्त होऊन बराच वेळ उलटून गेल्यावरही पावलं तिथंच रेंगाळत होती.
रात्री ८:३० च्या सुमारास सगळे जेवायला बसलो, पण कालच्यासारखी उत्सुकता नव्हती, कारण दुसर्या दिवशी सकाळी लवकरच परतीच्या प्रवासाला लागायचे होते.
जेवण झाल्यावर वैभवने त्याच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकावर माझ्या आईची सही मागून घेतली.
उद्या सकाळी त्याला येणे शक्य नव्हते त्यामुळे त्याने रात्रीच आमचा निरोप घेतला.
जाता जाता मला फेसबुकवर ‘ऍड’ करा असे सांगायलाही तो विसरला नाही.
उद्या उठल्या उठल्या समुद्रकिनार्यावर एक चक्कर टाकायची असे ठरवून आम्ही झोपी गेलो.
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे पहाटे लवकर उठून बिचवर गेलो.
का कोण जाणे पण आज समुद्र गेल्या दोन दिवसांपेक्षा जास्त नितळ आणि स्वच्छ वाटत होता.
वातावरणही इतके आल्हाददायक वाटत होते की तिथून पायच निघेना.
परतीच्या प्रवासाची वेळ चुकवायची नव्हती म्हणून शेवटी आम्हाला रूमवर परत यावेच लागले.
सामानाची पॅकिंग सुरू असतांनाच सुनील केळुस्कर आले.
आठवण म्हणून त्यांनी कोकम आणि एक मोठा शंख आम्हाला भेट म्हणून दिला.
आदरातिथ्यात कुठे कमी पडलो का ? काही सुचना आहेत का ? अशी त्यांनी आस्थेवाइकपणे चौकशी केली.
जिथे पर्यटनातल्या प्रत्येक पैलूला बिझनेसचे स्वरूप आले आहे तिथे यांच्यासारखी माणसं आहेत हे पाहून खरोखरच आश्चर्य वाटले.
मोठ्या जड अंतःकरणाने देवबागचा निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
देवबाग-तारकर्लीला महाराष्ट्राचे मॉरिशस का म्हणतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एकदा तिथे जावेच लागेल.
फोटो इथे पाहा
www.flickr.com/photos/14588967@N08/sets/72157632262277283/
मस्त आले आहेत फोटो
मस्त आले आहेत फोटो
तरकार्ली ला जावुन आलोय
तरकार्ली ला जावुन आलोय ...अप्रतिमच आहे !!
आता देवबाग करेन निवन्त्पणे ...
फोटो मस्तच आहेत. गवे दिसले
फोटो मस्तच आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गवे दिसले का नाय?
मेन म्हणजे व्हेज जेवण कसे होते?
छान आहेत फोटो. इथे पण लिंक्स
छान आहेत फोटो. इथे पण लिंक्स देता आल्या असत्या.
मायबोली परिवारात सामावून
मायबोली परिवारात सामावून घेतल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ झकासराव
दाजिपूरला आम्ही दुपारी जवळपास १२ वाजता पोहोचलो, त्यामुळे गवे नाही दिसले.
व्हेज जेवणही छात होते.
@ दिनेशदा
धन्यवाद.
फोटो जास्त होत्या म्हणून इथे लिंक दिल्या नाही.
@ विनायक जी & गिरीजा ताई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद.
सुंदर... खरच देवांची बाग
सुंदर... खरच देवांची बाग आहे... देवबाग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो वृत्तांत वाचायला आवडेल.
@ इंद्रधनुष्य जी फोटो
@ इंद्रधनुष्य जी
फोटो वृत्तांत ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
टाकल्यात ना फोटो ?
मित्रा, फोटो ईथेच टाकायचे
मित्रा, फोटो ईथेच टाकायचे वृत्तांताच्या मध्ये मध्ये....
ईतरांची प्रवास वर्णनं वाच...
फोटो जास्त होत्या म्हणून इथे
फोटो जास्त होत्या म्हणून इथे लिंक दिल्या नाही.
पिकासावरुन लिंक देता येईल.
पिकासावरुन लिंक देता येईल. ईथे डायरेक्ट लोड करायची गरज नाही. "इरफान व्यू" म्हणुन एक फ्रिवेअर आहे. त्यात बल्क साईझ रीड्यूस करता येईल
मी आणि अन्य तीन जालीय मित्र
मी आणि अन्य तीन जालीय मित्र देवबाग सहल पूर्ण केली आहे. मालवणमधील एका मित्राने रात्रीच्या मुक्कामासाठी तारकर्लीपेक्षा देवबागला पसंती द्या असे सांगून त्याने तिथेच वर सौरभ यानी उल्लेख केलेल्या सुनील केळुस्कर यांच्यासारख्याच 'देवानंद' [आत्ता आडनाव विसरलो] यांच्या देवकी या निवासस्थानाची माहिती दिली शिवाय आमच्या संमतीने तात्काळ फोनवरून बुकिंगही केले. मालवण पासून देवानंद [जे आता देवबागचे सरपंच झाले आहेत] यांचे सी-शोअर हॉटेल अगदी देवबागच्या शेवटच्या तुकड्यात आहे. तिथेही आम्हाला 'हेरंब' धाटणीचेच आदरातिथ्य मिळाले. दरही योग्य वाटले.
तिथल्या सार्या यात्री निवासस्थानाची बांधकामे अशी काही झाली आहेत की, खोलीबाहेर पडल्या क्षणीच समुद्राच्या लाटा पायाला स्पर्श करतात....शिवाय हवेत दमटपणाही नाही.
@ सौरभ....
'हेरंब निवास' चे प्रोप्रायटर सुनील केळुस्कर यांचा मोबाईल इथे देवू शकाल ? शक्य झाल्यास दरही दिल्यास उत्तम.
अशोक पाटील
@ बागुलबुवा जी मी साइझ किंवा
@ बागुलबुवा जी
मी साइझ किंवा हॉटलिंकिंगबद्दल बोलत नाहीये.
सगळ्या फोटो ऑलरेडी रिसाइझ केल्या आहेत.
इथे ४० फोटो टाकल्या तर स्क्रॉल करून करून माउस खराब होतील सगळ्यांचे.
@ अशोक जी "तिथल्या सार्या
@ अशोक जी
"तिथल्या सार्या यात्री निवासस्थानाची बांधकामे अशी काही झाली आहेत की, खोलीबाहेर पडल्या क्षणीच समुद्राच्या लाटा पायाला स्पर्श करतात....शिवाय हवेत दमटपणाही नाही."
+१
हा त्यांचा फोन नंबर : ९४०४९३२००१
पर नाईट १५०० रूपये आकारले त्यांनी.
क्रमशः करून तीन भागात फोटो
क्रमशः करून तीन भागात फोटो टाकता येतील ना.
छान आलेत फोटो, लिहिलेत पण
छान आलेत फोटो, लिहिलेत पण चांगले, (माबो सदस्यांच्या वरील सूचना लक्षात घेऊन उदा. संपर्क क्रमांक) आता ताडोबावरचा लेख ही येऊदेत...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ अश्विनीमामी ठिक आहे,
@ अश्विनीमामी
ठिक आहे, पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.
@ हर्पेन जी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रयत्न करतो.
छान वर्णन. फोटोपण
छान वर्णन. फोटोपण मस्त.
लेखामधे (निवडक) फोटो कसे टाकायचे इथे वाचः "लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?"
सौरभ माझ्या हापिसात फ्लिकर
सौरभ माझ्या हापिसात फ्लिकर वगैरे बॅनड आहे, इथे २-४ फोटो टाकले असतेत तर बरं झालं असतं. मला देवबाग पहायचं आहे. वेबसाईटवरचे फोटो पाहिलेत पण ऑथेंटीक पहाण्याचा हाच चान्स.
व्वा मस्त वर्णन आणि
व्वा मस्त वर्णन आणि फोटोही.....
फोन नं., माहिती बद्दल धन्यवाद
@ सॅम जी मी ITक्षेत्रातलाच
@ सॅम जी
मी ITक्षेत्रातलाच आहे हो.
या गोष्टी मला माहित आहेत.
तुम्ही सगळे मला समजून का घेत नाही आहात.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
माझे फक्त इतकेच म्हणणे होते की फोटोंची संख्या जास्त असल्यामुळे मी त्या फोटो इथे टाकायचे टाळले.
@ दक्षिणा
@ दक्षिणा ताई
http://www.flickr.com/photos/14588967@N08/sets/72157632262277283/
^^ ही लिंक कॉपी करा आणि खालीलपैकी कोणत्याही एका वेबसाईटमध्ये जाऊन पेस्ट करा.
http://kproxy.com/
http://www.zend2.com/
http://www.youhide.com/
जर तुमच्या ऑफिसमध्ये या प्रॉक्झी वेबसाईट्ससुद्धा ब्लॉक असतील तर मग इथेच २-४ फोटो टाकतो.
छान वर्णन आणि फोटोसुद्धा @
छान वर्णन आणि फोटोसुद्धा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ सॅम जी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी ITक्षेत्रातलाच आहे हो. या गोष्टी मला माहित आहेत.
माझे फक्त इतकेच म्हणणे होते की फोटोंची संख्या जास्त असल्यामुळे मी त्या फोटो इथे टाकायचे टाळले.
>>>>>अहो म्हणुनच सॅमने "निवडक" फोटो टाका म्हणुन सुचवलंय ना
@ जो_एस जी धन्यवाद,
@ जो_एस जी
धन्यवाद,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ जिप्सी जी स्वतःच्या
@ जिप्सी जी
स्वतःच्या अपत्यांमधून सगळ्यात चांगले अपत्य निवडा म्हणण्यासारखे आहे हे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
१५०-२०० फोटोंमधून सॉर्ट करून या ४० फोटो निवडल्या आहेत.
आता त्यातूनही काही निवडक मी बाजूला करू शकत नाही.
सॅम जी किंवा तुम्हीच सुचवा यातल्या निवडक फोटो.
तुम्ही निवडलेले सगळेच फोटो
तुम्ही निवडलेले सगळेच फोटो अप्रतिम आहे (स्टारफिश आणि खेकड्याचा फोटो बेहद्द आवडला).![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यातील काही फोटोंचे कोलाज करा, काहि फोटो लेखाच्या मध्ये पेरून प्रदर्शित करा.
लेख वाचताना जर फोटो असतील तर अजुनच मस्त वाटेल म्हणुनच हा फु. सल्ला.
पर्यटनामुळें त्या स्थळांची
पर्यटनामुळें त्या स्थळांची शांतता बिघडते म्हणतात, त्याची इथं प्रचिती येऊं लागलीय ! तारकर्ली- देवबाग माझं 'होम पीच' आहे म्हणून तर अधिकच तीव्रतेने हें जाणवलं !!!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भाऊकाका, कोकण तसेच मागास
भाऊकाका,
कोकण तसेच मागास रहावे असे मनापासून वाटते.
मागे नांगरतास धबधब्याला गेलो होतो. चहाचा ग्लासांचा खच आणि बियर बाटल्यांच्या काचा बघावे तिकडे होत्या. पर्यटक आले म्हणजे जागा घाण करणारच हीच आपली परंपरा आहे..
शंखातल्या किड्याचा फोटोही
शंखातल्या किड्याचा फोटोही मस्त आलाय.
आणि रंगीबेरंगी खेकड्याचाही
परदेसाई आणी भाऊंना अनुमोदन.
परदेसाई आणी भाऊंना अनुमोदन. पण आम्हा देशावरच्या लोकांना तरी कधी हे स्वर्गसुख अनुभवयाला मिळणार.
विनय देसाई तुमच्या आणी भाऊंच्या भावना समजल्यात हो. पण खरच आतापर्यंत आम्ही जिथे गेलो आहोत तिथले कायदे नियम नक्कीच पाळले आहेत आणी आताही पुढे पाळणारच्.:स्मितः
आपण सर्व लोकांनी तिथे येणार्या इतर पर्यटकांशी बोलुन असे प्रश्न सोडवले पाहीजेतच. नाहीतर समुद्र त्याची जागा दाखवतोच.
सौरभ धन्यवाद फोटो आणी वर्णन मस्त.
टुनटुन , तुमच्या आमच्या सारखे
टुनटुन , तुमच्या आमच्या सारखे लोक असतातच. पण '१०० में से ९९ बेईमान' हेच खरे आहे. माझी मजा झाली ना, मग त्याठिकाणचे काही का होईना हीच भारतीय टुरिष्टांची वृत्ती जावे तिथे दिसते.. जगात भारताएवढी सुंदर स्थळे आणि पूजास्थाने कुठेही नसतील याचबरोबर त्याठिकाणी लोकांनी घाण करून ठेवलेली स्थाने इतर कुठेही नसतील..
Pages