रोलर कोस्टरवर, उलटेसुलटे, वर, खाली, गरागरा फिरल्यावर, शेवटच्या दहा मीटर्समधे, हाय एक्साइटमेंटमुळे, जसे आपले डोके सुन्न झाले असते, त्याप्रमाणे, गेल्या कित्येक महिन्यांच्या, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूक-प्रक्रियेत रणधुमाळीच्या आणि वादविवादाच्या अखेरच्या टप्प्यात आपण पोचलोय. पु. लं. च्या भाषेत सांगायचे तर मला सगळ्यांची मते पटतात. यंदा सहा नोव्हेंबरला अमेरिकेच्या (पुढील चार वर्षांकरिता) अध्यक्षपदासाठी चाललेली ही चुरस संपेल. तुम्हा सर्वांप्रमाणे मीही यादिवशी मतदानाचा हक्क बजावत आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचा ( बृ. म. मं.) अध्यक्ष या नात्याने मी जेव्हा विविध मंडळांना भेटी देतो, तेव्हा लोक मला हमखास विचारतात, डेलावेअर म्हणजे, न, कुठे आहे? त्यावर मीही सांगतो, डेलावेअर हे अमेरिकेची कॉन्स्टिट्युशन (संविधान) स्वीकारणारे पहिले राज्य. फ्रेंडली कॉर्पोरेट लॉ मुळे अमेरिकेतीला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त Fortune 500 कंपन्यांची अधिकृत कार्यालयेही याच राज्यातली. फिलाडेल्फिया आणि बॉल्टिमोर या शहरांमधले सँडविच राज्य म्हणजे डेलावेअर. मला आशा आहे की, यापुढे, डेलावेअरचे Dela- Where? होणार नाही!
ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात देशाच्या राजधानीत, म्हणजेच वॉशिंग्टन डीसी येथे गेलो होतो. वॉशिंग्टन कला मंडळाच्या अध्यक्षा अदिती लोणकर यांचे मंडळाच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी, अगत्याचे आमंत्रण होते. अप्रतिम नियोजन, नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची अदाकारी, सभासदांचा फेसाळणारा उत्साह, या सर्व जमेच्या बाजू घेऊनच मी घरी परतलो. पण त्या दिवसाची सुरुवात झाली ती पुण्याच्या बिल्डर्स बरोबरच्या सदिच्छा भेटीने! पुण्याचे साठ (60) मराठी बिल्डर्स (बांधकाम व्यावसायिक) एकत्ररित्या अमेरिकेत बांधकामाच्या अभ्यासाच्या निमित्ताने (स्टडी टूर) आले होते. (आता या वाक्यात, तुम्ही पुणे, साठ, मराठी, किंवा एकत्र यापैकी कुठलाही शब्द अधोरेखित करून वाचू शकता!)
अमेरिकेत आपण गुजराती समाजाने बांधलेले शांतीनिकेतन सारखे प्रकल्प बघतो तेव्हा मला अगदी मनापासून वाटतं की आपल्या मराठी कुटुंबांसाठी, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, टेक्सास अशा सौम्य हवामानाच्या राज्यात असे प्रकल्प व्हायला हवेत. पुण्याच्या बांधकाम व्यावसायिकांसमोर मी नेमका तोच प्रस्ताव मांडला. मुंबई पुण्यातल्या जागा विकण्याव्यतिरिक्त, अमेरिकेतील मराठी समाजासाठी जर काही बांधकाम प्रकल्प केले तर त्याची चांगली दखल घेतली जाईल. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या उत्तररंग विभागातील अग्रणी, क्लब 55, ह्या सारख्या मंचावरून, अमेरिकेतील मराठीसमाजातील जेष्ठ आणि सेवानिवृत्तांसाठी वसाहतीचे जोरात प्रयन व्हायला हवेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाचा या विधायक कामासाठी, नक्कीच, पाठिंबा राहील.
२७ ऑक्टोंबरला महाराष्ट्र फौन्डेशनच्या फंड रेजर (निधी संकलनाच्या) कार्यक्रमासाठी गेलो होतो. उत्तर अमेरिकेत आणि महाराष्ट्रात, फौन्डेशनचं चाललेलं कार्य वाखाणण्याजोगं आहे. माझ्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्र फौन्डेशन या दोन्ही संस्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी नेहमी म्हणतो की बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्र फौन्डेशन या अमेरिकेतल्या मराठी माणसाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बृ. म. मंडळ आहे, त्याच्या संस्कृती, परंपरा याच्या जपणूकीसाठी तर महाराष्ट्र फौंडेशन आहे सामाजिक बांधिलकीसाठी. म्हणूनच की काय, बृ. म. मंडळाचे पाच- आजी आणि माजी अध्यक्ष त्या दिवशी महाराष्ट्र फौन्डेशनच्या कार्यक्रमास उपस्थित होते, आणि यातूनच या दोन संस्थांमधली परस्परपूरकता दिसते.
माणसाने विज्ञानाच्या जोरावर जरी जग पादाक्रांत केले असले तरी निसर्गापुढे तो कसा नतमस्तक होतो याचे ताजे उदाहरण म्हणजे सँडी हे चक्रीवादळ. महाराष्ट्र फौन्डेशनच्या कार्यक्रमावरून परतल्यावर पुढे ४८ तास अतिशय भीषण नाट्यातून आम्ही गेलो. सँडीने उडवली दांडी म्हंटलं तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. स्वजनांना खुशाली कळवताना सोशल मीडियाचा बराच वापर केला. राहून राहून BMM Directory ची आठवण येत होती. 2001 साली हॅरीस्बर्गच्या विद्याधर सहस्त्रबुद्धे यांनी उत्तर अमेरिकेतल्या मराठी भाषकांची एक डिरेक्टरी तयार केली होती. पण गेल्या ११ वर्षात ती अपडेट केलेली नाही. तुम्हाला कळवण्यास आनंद वाटतो की आमच्या कार्यकारिणीने २०11च्या अधिवेशनापर्यंत ती डिरेक्टरी अपडेट करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातली नांवे, पत्ते, फोन नंबर्स यांच्या गोपनीयतेची खात्री बाळगून तुम्हा सर्वांचा या उपक्रमास पाठिंबा मिळेल अशी आशा करतो. 9/11, कटरीना, सँडी अशा आपत्तींबरोबरच नेटवर्किंगच्या दृष्टीने या डिरेक्टरीचा विधायक कार्यासाठी नक्कीच वापर करता येईल. या आणि इतर अनेक, बृ. म. मंडळाच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी यंदा डिसेंबरमधे सर्व सदस्यांसाठी, web based town hall meeting घेतली जाईल. याबद्दल मी आपल्याशी संवाद साधीनच. संवादावरुन आठवलं, बृ. म. मंडळाच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) मी ’Presidential Corner’ नावाचा ब्लॉग तयार केला आहे. त्या ब्लॉगच्या माध्यमातून नियमीतपणे आपल्याशी संवाद साधणार आहे.
26 ऑक्टोबरपासून अमेरिकेतल्या 12 शहरात बृहन्महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेले जादूगार रघुवीर यांचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. बऱ्याच मंडळींनी दिवाळीच्या निमित्ताने त्याचे आयोजन केले आहे.
सणांची राणी दिवाळी. तिच्या मंगलमय वातावरणात संकटरूपी तमाची तमा न बाळगता, तुमच्या आयुष्यात आशेचे,आकांक्षाचे दीपप्रज्वलन होवो हीच सदिच्छा.
(जर महाराष्ट्रात असाल तर दिवाळीनिमित्त तुम्हाला सातवा सिलिंडर मिळो हीच सदिच्छा!!)
आपला,
आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com फोन: 302-559-1367