२१ ऑक्टोबरला निघालो. संध्याकाळी वापी रेल्वे स्टेशनहून शताब्दीत बसलो.. बोरिवलीहून मुंबई एअरपोर्टवर पोचलो. लांबूनच आजी-आजोबा आणि नीला आजी दिसल्यावर आदित्य तर पळतच सुटला. आता १५ दिवस त्याच्या डोक्याशी आईची कटकट होणार नव्हती ना...!!!
आपल्या देशातला सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट... मी आणि आदित्य तर डोळे फाडफाडून सगळ्या गोष्टी पाहत होतो. सगळं खूप भव्य-दिव्य वाटत होतं ... (हा आमचा समज लवकरच खोटा ठरणार होता पण त्याचं वर्णन येईलच पुढे !!) आपण नवीन काहीतरी करायला निघालोय याची उत्सुकता होती !!!! रात्री ११ वाजता चेक-इन होतं...त्यावेळी पोचवणारी योग्य गाडी नसल्याने आम्ही ९.३० लाच पोचलो होतो तिथे (एअरपोर्ट झाडायला !!!) मुंबई बाहेरून येणारे सगळेच लवकर पोचले होते. त्यांच्याशी ओळखी करून घेण्यात, प्राथमिक गप्पा मारण्यात वेळ मस्त गेला. खरं म्हणजे, इथून पुढे १५ दिवस वेळ मस्त जाणार आहे हे आत कुठेतरी माहीत होतं !! कल्याण-डोंबिवलीच्या सहप्रवाश्यांना घेऊन येणारी बस थोडी उशिरा म्हणजे ११.३० ला आली. तोपर्यंत इकडे आदित्यचा जीव वर-खाली व्हायला सुरुवात झाली होती. '११ वाजता चेक-इन' हे त्याच्या डोक्यात होतं - पण म्हणजे नक्की काय ते माहीत नव्हतं. '११ ची वेळ टळून गेली म्हणजे आता आपल्याला आपलं विमान मिळतंय की नाही' या विचाराने तो जाम अस्वस्थ झाला होता !!!
शेवटी रात्री पावणे-बाराच्या सुमाराला आमची ४९ जणांची वरात एअरपोर्टच्या आत शिरली. त्यातले बहुतेक जण प्रथमच परदेश प्रवासाला निघालेले - एखाद्या शाळेच्या सहलीला नेताना जसे शिक्षक पोरांना सूचना देत असतात तसेच आमचे सहल आयोजक - श्री. व सौ. शिंदे - ओरडून आम्हाला निरनिराळ्या सूचना देत होते.
कार्गो सामानात काय-काय ठेवायचं, केबिन बॅगमध्ये काय ठेवायचं, पर्स वेगळी हातात धरली तर चालेल का - अनेक शंका आजुबाजूने ऐकू येत होत्या. सगळ्यांचा जाम गोंधळ उडाला होता...काही जणांची टूथपेस्ट पर्समध्ये होती, काही जणांचं कोल्ड क्रीम, काही जणांनी थोडे खाद्यपदार्थ केबिन बॅगमध्ये ठेवले होते...लोकांच्या आपापसातल्या चर्चा कानावर आल्या की ऐकणारे घाईघाईने असलं सगळं सामान इकडून तिकडे हलवत होते. त्यांत मी पण होते म्हणा !! मग अजय खास सल्ला द्यायला पुढे यायचा. ३०-४० मि. ओळीत उभं राहिल्यावर आदित्य कंटाळला. खाण्यापिण्याची दुकानं समोरच दिसत होती - मग साहजिकच, त्याला भूक लागली. एक पिझ्झा, एक बर्गर चापून झाला - तो सुध्दा रात्री १२ वाजता. सगळी मजा वाटत होती.
शेवटी एकदा काऊंटर्स सुरू झाले - श्रीलंकन एअरवेजच्या लोकांनी नव्याच सूचना आणि नियम सांगायला सुरूवात केली. मग लिपस्टिक, टूथपेस्ट, कोल्ड क्रीम गटातल्या वस्तू सगळ्या कार्गो बॅगेत सरकवल्या. बॅग बनवताना बाहेरच्या बाजूला एक कप्पा करण्याचे ज्या कुणाला सर्वात आधी सुचले असेल तो महानच म्हणायला हवा. ज्यांच्या बॅगला असे कप्पे नव्हते, त्यांनी वस्तू सहप्रवाश्यांच्या बॅगमध्ये सरकवल्या. तिथे थोडी मंडळींची तारांबळ उडली खरी पण ही तर सुरूवात होती. पुढच्या १५ दिवसांत सर्वजण 'तय्यार' होऊन इथून बाहेर पडणार होते. यथावकाश पुढचे सगळे सोपस्कार पार पडले ... इमिग्रेशन, बोर्डिंग पासेस वगैरे ... प्रत्येक काऊंटरपाशी सर्वात आत्मविश्वासाने कोण उभं रहात होतं तर आदित्य !! मान लिया उसको ... एकदम अनोळखी गोष्टी होत्या त्याच्यासाठी खरंतर ह्या, पण कुठेही गांगरला नाही, आमच्या मदतीची गरज लागली नाही ...
इमिग्रेशन काऊंटर पार करून समोरच्या मोठ्या काचेतून एकदम जवळून विमान दिसल्यावर मात्र त्याच्यातलं लहान मूल जागं झालं आणि त्यावेळची त्याची जी उस्फूर्त प्रतिक्रिया होती आणि चेहेऱ्यावरचे जे भाव होते त्याचं वर्णन इथे लिहिणं केवळ अशक्य !!!
विमान समोर दिसत होतं तरी त्यात चढायला अजून खूप वेळ होता. रात्रीचा १ वाजत होता. वेटिंग लाऊंजमध्ये जरा ऐसपैस खुर्च्या मिळाल्यावर मात्र डोळ्यावर झापड यायला लागली. पण तरीही लाऊंजमधले इतर देशी-विदेशी प्रवासी निरखण्याची संधी सोडाविशी वाटली नाही. मला आणि आईला एका टोकाला जागा मिळाली होती आणि अजय, आजी-आजोबांना दुसऱ्या टोकाला. आणि या दोन जागांच्या दरम्यान आदित्य नुसता बोकाळला होता !! असा सराईतासारखा इकडेतिकडे वावरत होता की जणू ते त्याचं घरच असावं !!!
दोन वाजायच्या सुमाराला 'सिक्युरिटी चेक' सुरु झाला. आईच्या बॅगेत नेलकटर होतं आणि सूचना वाचून कळलं की ते केबिन बॅगेत चालत नाही. मग 'घेतलं कशाला, १५ दिवसांत काय तुझी नखं वाढणार आहेत का तिथे' वगैरे वगैरे खास मायलेकींचे संवाद झाले, सापडलं तर इथेच टाकून द्यायचं ठरलं आणि गम्मत म्हणजे बॅगेज स्कॅनिंगमध्ये सापडलंच नाही !!! याला सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी म्हणायचं का?
सिक्युरिटी चेक नंतर पुन्हा एकदा ३०-४० मि.ची प्रतिक्षा आणि शेवटी आदित्य ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला - श्रीलंकन एअरलाईन्सच्या फ़्लाईट नं. यू एल-१४२ मध्ये आम्ही चढलो ... आमच्यापैकी बहुतेक जण आजी-आजोबा वयोगटातले होते ... सीट बेल्टपाशी बऱ्याच जणांचं गाडं अडलं ... मग आसपासच्या आजी-आजोबांना मी त्याचं प्रात्यक्षिक दिलं. ३+३ अश्या सीट्स होत्या , आदित्यने खिडकीची जागा पकडली. वैमानिकाने सूचना दिली. ती सूचना देण्याची पध्दत, फ़्लाईट अटेंडंटचे लाईफ़ जॅकेटचे प्रात्यक्षिक हे सगळं बघायला पण खूप मजा आली ... शेवटी तीन-सव्वातीनच्या सुमाराला 'इमान फलाटावरून हाललं'.
गेले ६-८ महिने ज्याची चर्चा, नियोजन, फोनाफोनी, नेट-सर्फ़िंग इ. इ. सुरू होतं ती आमची सहल सुरू झाली होती ....
छान सुरूवात आहे. बर्याच
छान सुरूवात आहे. बर्याच दिवसांपासून तुझे लेख बॅकलॉग मधे आहेत. आता वाचायचा प्लान आहे पुढचे वाचतो आता.
मस्त !
मस्त !
हे आज कसे दिसायला लागले?
हे आज कसे दिसायला लागले?
मस्त आहे वर्णन. एकदम उत्कंठावर्धक, तेव्हा जास्त वेळ न घालवता पुढल्या प्रवासाला निघते.
वा! सुरेख सुरुवात !!
वा! सुरेख सुरुवात !!
मस्त सुरुवात!
मस्त सुरुवात!