सोड्याची खिचडी

Submitted by अवल on 7 November, 2012 - 00:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सोडे एक मूठ ( सोडे म्हणजे वाळवलेल्या मोठ्या कोलंब्या. मुरुड, अलिबाग, म्हसाळ इथले सोडे प्रसिद्ध आहेत. मला म्हसाळ इथले जास्त आवडतात. )
बासमती तुकडा ( किंवा जो आवडत असेल तो सुटा होणारा तांदूळ ) दोन वाट्या
सुके खोबरे किसलेले एक मूठ
कांदे उभे चिरून दोन
लसून ८ ते १० पाकळ्या
एक हिरवी मिरची
५-६ लवंगा , दोन दालचिनीचे तुकडे
हळद, तिखट, मीठ चवीप्रमाणे
तेल
ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू वरून
तळलेले पोह्याचे पापड अन गव्हाच्या कुरडया सोबतीसाठी

क्रमवार पाककृती: 

प्रथम सोडे पाण्यात भिजत घालावेत. ५-१० मिनिटांनी सोडे जरा भिजतात. मग त्याचे कात्रीने/सुरीने दोन तुकडे करावेत. पुन्हा पाण्यात भिजत ठेवावेत.
तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
चिरलेला उभा कांदा कढईत दोन चमचे तेलावर; तपकिरी होई पर्यंत परतून घ्यावा. तो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावा.
पुन्हा एक चमचा तेल कढईत घेऊन त्यात किसलेले सुके खोबरे, लवंगा, दालाचीनीचा एक तुकडा, ६-७ लसून पाकळ्या हे सगळे लालसर रंगावर परतून घ्यावे. आता हेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यावे. हे वाटण छान गुळगुळीत वाटून घ्यावे.
सोडे पाण्यातून काढून निथळत ठेवा.
आता एका भांड्यात अधाणासाठी चार वाट्या पाणी गरम करत ठेवा.
दुसरीकडे लगडीत (जाड बुडाच्या पसरटत भांड्यात) ५-६ चमचे तेल घेऊन ती आचेवर ठेवा. आच बारीक ठेवा. तेल गरम झाले कि त्यात उरलेल्या लसणाच्या पाकळ्या चेमटून टाका. लसून छान काळा झाला की त्यात एक दालाचीनिचा तुकडा टाका. आता लगेच सोडे फोडणीत टाका. आच मध्यम ठेवा. २-४ मिनिटं परता. सोड्याचा घमघमाट पसरेल. काहींना हा वास सहन होत नाही, आमच्या पोटात मात्र भुकेने खड्डा पडू लागतो Happy
सोडे छान परतले कि त्यात तांदूळ टाका. पुन्हा ५-७ मिनिटं परता.
आता त्यात हळद, तिखट टाका. पुन्हा २ मिनिटं परतावा.
आता त्यात वाटण टाका. ७-८ मिनिटं परता. सगळ्याला तेल सुटायला हवे.
आता आधाणाचे पाणी यात टाका. लागले तर अजून पाणी घाला. एक उकळी आली कि त्यात चवीपुरते मीठ टाका. आच मंद करा. खिचडीला भोकं पडू लागली कि झाकण ठेवा. ८-१० मिनिटं छान शिजू द्या.
वाढताना खिचडीची मूड, त्यावर ओलं खोबरं, त्यावर कोथिंबीर अन त्यावर साजूक तूप वाढा, सोबत लिंबाची फोड ठेवा. सोबत तळलेले पोह्याचे पापड, गव्हाच्या कुरडया, वा ! मनसोक्त खा सोड्याची खिचडी.

(फोटो उद्या टाकते )

वाढणी/प्रमाण: 
चौघांना पुरावी
अधिक टिपा: 

ज्यांना सुक्या माशांची सवय नाही. त्यांनी सोडे परतत असताना इतर दारं, खिडक्या उघडी ठेवावीत. एक्झॉस्ट चालू ठेवावा. मुख्य दार मात्र आवर्जून बंद ठेवा. कारण न खाणा-यांना हा असा भयाण वास तुमच्या घरातून येतो हे कळणार नाही अन खाणारे लोक तुमच्याकडे जेवायला टपकणार नाहीत Happy भरपेट जेवणं झाल्यावर निवांत दुपारच्या गप्पांत " काय भयाण वास पसरला होता ना सकाळी" यावर सुखाने चर्चा करा Wink
खास नंदनच्या फर्माईशी वरून

माहितीचा स्रोत: 
खास सी. के. पी. पदार्थ
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, पुण्यात तुला ताजे समुद्रातले मासे कुठे मिळतात माहित आहे का?
ही रेसिपी मस्त आहे.

Fishes in Pune try Balaji fish , Paud Road, Opposite to Kelewadi Phata, where the flyover ends approx.

Fresh means may be atleast caught in early morning and transported to Pune...They r in ice

धन्स ग अवल, आधी इथले सोर्सेस तपासते Wink नाही मिळालं तर कळवते तुला Proud

रच्याकने, जर विकत घ्यायचे झाले तर निवडायचे कसे चांगले ते पण सांग मला.

पौर्णिमा, कोथरुडास गितांजली मॉल समोर अमोल सी फुड किंवा मग सुपणेकर. औंधास आरु( की तारू Uhoh ) कँपात शिवाजी मार्केटमध्ये. बालाजी कडे मी अजून कधी घेतले नाहीत पण चांगले असावेत.
जागू, सोडे विकत घेताना शक्यतो ओळखीचा विक्रेता असावा. कारण सोडे म्हणून वामचे तुकडेही गळ्यात येण्याची शक्यता असते. सोड्याच्या एका बाजूला काळसर असते ( कोलंबीचे तोंड) परंतु इतर मोठ्या माशांचे( उदा. वाम ) तुकडे असतील तर असा फरक आढळणार नाही. तेव्हा घेताना एका टोकाला काळसरपणा आहे ना हे तपासून पहा. Happy

अवल, मी बघितलेले सोडे नेहमी गोलसर असायचे. म्हणजे कोलंबी सोलल्यावर, जशी दिसते तसे. हे फोटोतले सरळ, कसे दिसताहेत ?
मुंबईत, दादरला किर्तीकर मार्केटमधे मिळायचे चांगले सोडे. आता ते मार्केट, आहे का, कल्पना नाही. ( कोहीनूरच्या मागच्या रस्त्यावर ते मार्केट होते. )

आयुष्यात एक तरी सीकेपी मित्र असावा, त्याची आई अशी झकास सुगरण असावी. आणि आपण नियमितपणे त्यांच्या घरी जावे. मग असले पदार्थ आयते खायला मिळतात.

माझा एक वेगळाच प्रश्न आहे. इथे सगळे सी फूडचे अव्वल दिसले म्हणून विचारतो. Happy

मी इंडोनेशियात असताना , रस्त्या बाजूच्या साध्या हॉटेलात, (आपल्या कडे गोव्याला असतात तशा) एक सी फूडचा मस्त पदार्थ मिळायचा. काउंटर वरच्या बरणीत ठेवलेला असायचा. तो दिसायचा पण अगदी उपासाच्या बटाट्याच्या तिखट चिवड्या सारखा. तळलेले शेंगदाणे , खोबरे, वगैरे घातलेले. नाकाजवळ नेई पर्यंत ओळखताही येणार नाही. अगदी बारीक सुके मासे किंवा प्रॉन्स पासून बनलेला असावा. चव आणि वास अशक्य भयंकर मस्त. दुर्दैवाने मला त्याच नाव पण आठवत नाही. गुगलून सापडला नाही. कुणाला माहिती आहे का? आपल्याकडे आहे का तसा काही पदार्थ.

अवल, मी बघितलेले सोडे नेहमी गोलसर असायचे. म्हणजे कोलंबी सोलल्यावर, जशी दिसते तसे. >> दिनेशना अनुमोदन.
माझ्या जुन्या ऑफिसात एका कलिगने सोड्याची भाजी(उसळ) आणलेली. ती मला चक्क मोठ्या चवळ्यांसारखी दिसली. मी त्याला विचारलंही, तर म्हणतो कसा गावकडची चवळी आहे, खाऊन बघ, मी इमानदारीत एक घास खाल्ला.... Sad
गिळला नाही.. तोवर जेवलेलं होतं ते सगळं बाहेर आलं.
मी खात नव्हते(अजूनही नाहीच खात) पण लोकांचा जे खात नाहीत त्यांना खाऊ घालण्याचा इतका हट्ट का असतो देवच जाणे.
कोल्हापूरात तर हे प्रकार फार.. Sad

दिनेशदा, सोडे चांगले कडकडीत सुकवलेले असतात. मोडले तर तुटतात इतके Happy ओलसर सोडे असतील तर मग ते टिकत नाहीत. आम्ही वर्षाचे भरतो, त्यामुळे ते चांगले कडकडीतच असलेले चांगले. म्हणून तर म्हणाले खात्रीचा विक्रेताच हवा Happy
नंदिनी कधी येतेस ? Happy
विक्रमसिंह, शोधला पाहिजे. पण शक्यता आहे सोड्यांना तळून काही मसाले घालून केलं असण्याची शक्यता आहे.
सोड्याचे प्रचंड प्रकार करता येतात. सोडे भाजून, भिजवून, तळुन, पावडर करून, हर प्रकारे त्याचे चविष्ट पदार्थ करता येतात. वेगवेगळ्या भाज्यांत, उपमा, पोह्यात सगळ्यात आपला ठसा उमटवतात ते Wink
पोहे प्रेमींनो, सोडे घालून पोहे भयानक सुंदर लागतात Happy
दक्षिणा, सोडे हा सर्वात स्ट्राँग प्रकार आहे. चिकन्-अंड न चालणा-यांना फारच घातक. असं का करतात लोकं Uhoh त्यामुळे जास्त शिसारी बसते, राग येतो Sad

अवल सोखीचा परिणाम वरती कविताची जागू झालेय बघ Wink म्हणजे मला अम्या नाहीतर तोषाला साकडं घालावं लागणार खात्रीशीर चांगले सोडे घ्याय्चे असेल तर

पदुकानंदा, इथे सुक्या मासळीचं चाल्लंय. ताजी नाही.
इब्लिस , माझ्या वर्चे पोस्त बघा पौर्निमा यान्चे त्यात त्यानी ताजे मासे बद्दल विचर्ले आहे...

विक्रमसिंह, तुम्हांला क्रिस्पी इकान बिलिस अभिप्रेत असावं. पण त्यात सोडे नसतात बहुधा. दुसरेच छोटे सुके मासे असतात.त्यांना इकान बिलिस असं नाव आहे. सिंगापुरातही इकॉन राईस वा मलय स्टॉलांवर हमखास मिळते ही डिश.

कविता Happy सॉरी गं Happy
अरे वा जागू ? मी अन कविताने आठव्ण काढली म्हणून उचक्या लागल्या का Happy
श्रद्धा, अरे वा हे काय जरा पाहिले पाहिजे चव चाखून Happy असं काही जवळ्याचे करावे का :स्वप्नरंजन: Happy

माझ्याकडे का नांकडून आलेले पूर्व किनार्‍यावरचे सुके श्रिंप होते. पेण, थळ, श्रीवर्धन , महाड इथून येणार्‍या सोड्यांपेक्षा वेगळे दिसतात अन चव पण वेगळी असते. तरिही खिचडी एकदम मस्त झाली होती.
रेसिपी छापून फोल्डरमधे ठेव असा सल्ला मिळालाय Happy
विक्रमसिंह, इथे मलेशियन रेस्टॉ मधे असाम इकन बिलिस नावाचा प्रकार मिळतो - सुके अँचोव्हीज घालून करतात - तो असावा कदाचित तुम्ही खालेल्ला प्रकार . मेनु मधे असे लिहिलेले असते.

Assam Ikan Bilis | Anchovies with shrimp paste, sliced onion, chili and tamarind sauce

मला सोड्याचा वास आवडत नाही Sad आत्त कुठे नॉनव्हेज खायला सुरवात केलेय मी

पण छान रेसिपी मातोश्रीना फार आवडतात सोडे, हे सोडे म्हसळ्याचे चवीला चांगले असतात तसे आमच्या पेणला पण चांगले मिळतात पण पारखी नजर हवी.

एक सल्ला सोडे फ्रीज मध्ये पिशवीत सील करून ठेवलेतर खूप दिवस टिकतात

अवलताई तुम्हाला रेफ्याच्या वड्या माहिती आहेत काय ? भाजून मऊभाता सोबत खातात Happy

केदार, रेफ्याच्या वड्यांची आठवण नका हो काढू! गरम गरम खिमट आणि रेफ्याच्या वड्या.....:(

अगो, अवल सांगेलच पण बहूतेक वाटून घ्यायची असेल. मी सोड्यांना थोडे आले, लसुण, कोथिंबीर मिरचीचे हिरवे वाटण लावून १० मिनिटे बाजूला ठेवते आणि मग तेलात ठेचून लसूण पाकळ्या टाकून परतून घेते.

सोडे अहाहा ऐकूनच बर वाटलं इंडियात जावून काय काय खायचं त्याच्या यादीत भर धन्यवाद . तसे माझे सोडे संपून ४ महिने झाले . Uhoh

सोडे अहाहा ऐकूनच बर वाटलं इंडियात जावून काय काय खायचं त्याच्या यादीत भर धन्यवाद . तसे माझे सोडे संपून ४ महिने झाले . <<<<< +100.......pan indiatoon baher he gheoon zaata yetaat ka? सस्मिता???please answer me somebody...I crave for Sode and sukat....but its difficult to get it in europe....

सोडे विकत घेताना सांभाळुन हल्ली वाम माशाचे सोड्यांप्रमाणे तुकडे करुन ओरिजनल सोड्यात मिक्स करुन देण्याचे प्रमाण वाढलेय...म्हणजे एक किलो सोडे आपण विकत घेतले तर पाव किलो वामचे तुकडे भेसळ केलेले असतात...पारखी नजर असलेल्यांना काही प्रॉब नाही पण ज्यांना इतकी माहीती नसते त्यांनी खात्रीच्या माणसाकडुन सोडे विकत घ्यावे...
माझ्या जावेने असे भेसळ्युक्त सोडे आणलेले..

ठीक अनिश्का पण श्रावणी सोमवारी हा धागा वर काढलास म्हणून णिषेढ... >>>>>>> १००+अनुमोदन

आमच्याकडे श्रावण दसर्‍याच्यानंतर संपणार त्यांमुळे १०० वेळा अनुमोदन.;)

यातील फोटो असे लांबट माशासारखे का दिसत आहेत? आम्ही सोडे जे आनतो ते असे मनुक्यासारखे आणि मनुक्याच्याच आकाराचे असतात. ब्राउन कलरचे.

मी बघितलेले सोडे नेहमी गोलसर असायचे>>>> अगदी अगदी.
एकवेळ मला मुशीचे सोडे मिळाले होते.सगळे टाकून दिले.मागच्या वर्षी नागावहून सोडे आणले आहेत ते मस्त आहेत्,पण अवलनी दाखवल्याप्रमाणे लांब काडी सोडे! घेताना भरपूर घेतले.एका कोलंबीचे (,कदाचित ती मोठी करंदी असावी) मधोमध चिरून दोन तुकडे केले आहेत.त्यामुळे अवल यांच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे आहेत.
सोड्यांची खिचडी माहित नव्हती.थोड्या प्रमाणात करून बघणार.

Pages