बीटाचे थालीपीठ

Submitted by निंबुडा on 18 October, 2012 - 03:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मोठा बटाटा उकडून किसलेला
१ छोटे बीट साल काढून किसलेले
२ चीज क्युब्स किसून (ऑप्शनल)
२ मूठी जाडे पोहे भिजवून व पाणी निचरून
१ मध्यम सफरचंद सालासकट किसलेले (सफरचंदाचा कीस आयत्या वेळी किसून लगेच घालायचा. कारण सफरचंद लगेच काळे पडायला लागते.)
थालीपीठाची नेहमीची भाजणी किंवा उपासाची भाजणी (मी उपासाची घेतली) - ५ मूठी भरून
मीठ
कोथिंबीर + पुदीना बारीक चिरून
जिरं
हिरवी मिरची + लसणीची पेस्ट
ब्रेड चा चुरा (ऑप्शनल. माझ्या कडे आदल्या दिवशी कटलेट केले होते त्यावेळचा उरला होता. तो इथे वापरला.)

क्रमवार पाककृती: 

१) भाजणीच्या पीठात दिलेले जिन्नस घालून (वर सांगितल्यानुसार आयत्या वेळी सफरचंदाचा कीस घालून) चांगला गोळा मळून घ्यायचा. सफरचंदाच्या किसाला पाणी सुटते. त्यामुळे गोळा मळण्यासाठी अतिरिक्त पाणी आवश्यक वाटले तरच टाकावे.
२) थालीपीठ थापून तव्यावर तेल सोडून खरपूस भाजावे.

हे प्रचि:

वाढणी/प्रमाण: 
दिलेल्या प्रमाणाची ४ मोठी थालीपीठे झाली.
अधिक टिपा: 

१) लिंबाच्या गोड लोणच्या बरोबर तोंपासू लागतात एकदम.
२) पालल, मेथी, घोळाची भाजी इ. पालेभाज्या बारीक चिरूनही घालता येतील गोळा मळताना.
३) सफरचंदामुळे थोडी गोडसर चव येते.
४) बीटामुळे छान लाल रंग येतो.

माहितीचा स्रोत: 
स्वतःच्या मनाने करून पाहिलेला प्रकार
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटाटा कच्चा आणि बीट उकडून घेतले तर पावाचा चुरा लागणार नाही.
>>
दिनेशदा, मला थालीपीठ हा प्रकार मऊ मऊ आवडतो. तव्यावरून काढल्या काढल्या वाफेजलेले मऊ थालीपीठ व त्यावर लोण्याचा/ दह्याचा गोळा हा माझा आवडता प्रकार. कच्चा बटाटा घातलेले थालीपीठ जरा वातड होते असा माझा अनुभव. म्हनून मग उकडून व किसून घालते मी बटाटा. बीट मऊच असते मूळात. बटाट्याइतके टणक नसते. म्हणून मग ते उकडले नाही.

निंबुडा सफरचंदाला पर्याय काय?
>>>
नाहीच घातले तरी चालेल. माबो गणेशोत्सवा दरम्यान अगो ची किसलेला सफरचंद घालून केलेल्या थालीपीठाची कृती वाचली होती. म्हणून मी इथेही ट्राय करून पाहिले.

उपासाच्या थालीपीठा साठी बटाट्याबरोबरच सफरचंद किसून घालावे असे वाटले. कारण उपासाचे थालीपीठ गोड लोणच्या बरोबर खातात. सफरचंदाची गोडसर चव छान लागते. बीटही चवीला गोडसर असते.

वरील थालीपीठ उपासासाठी करायचे असल्यास लसूण, बीट, ब्रेड चा चुरा ह्यांना सोडचिठ्ठी द्यायची व दाण्याचे कूट घालायचे थोडे. Happy

मी नो उपास तापास कॅटेगरीतली >>> मी पण. म्हणूनच उपासाच्या भाजणी मध्ये लसूण काय बीट काय असले व्हेरीएशन्स ट्राय केलेत Lol

निंबे मस्तच केलंस गं Happy अप्रतिम एकदम. Happy मी ही करून पाहिन. बीट मला जीव की प्राण एकदम. आठवड्यातून २ वेळा तरी कोशिंबिर खातेच मी बिटाची.

बीट मला जीव की प्राण एकदम. >> माझ्या केस मध्ये उलट आहे अगदी. बीटाची चव आवडतच नाही मला. कच्चा ही नाही आणि उकडूनही नाही. म्हणून मग बीट पोटात जाण्यासाठी ही तरकीब! Happy

हो बरोबर, अशाने मऊ होईल थालिपिठ... बाकी उपास तापास न करणार्‍या अनेक जणी आहेत बघून, छान वाटले.
आत्म्याला त्रास देऊन, परमात्मा कसा प्रसन्न होईल ?

मस्त वाटेय. करुन पाहणार. कशातही सफरचंदाचा कीस ही कल्पनाच कशीशी वाटते, सॅलड वगळता. पण पाहतेच आता करुन.