मंडळी नमस्कार!
दर वर्षी जसजसा सप्टेंबर महिना जवळ येत जातो तशी मला ’Come September’ या चित्रपटाची आठवण येते. १९६१ सालच्या या चित्रपटात रॉक हडसन हा इटली मधल्या आलिशान व्हिलाचा दरवर्षी सप्टेंबरमध्ये सु-ला येणारा मालक अचानक एक वर्षी जुलैमध्ये येतो. मालक येणारा महिना सोडला तर त्या व्हिलाची देखभाल करणाऱ्याने तिथे हॉटेल चालवलेले असते असे गमतीदार चित्रण त्या चित्रपटात होते. या चित्रपटाचे कथासूत्र नंतर १९६४ सालच्या कश्मिर की कली’ साठीही वापरले.
या महिन्याचे अध्यक्षीय मी टोरांटोच्या पूर्व घोषित विश्व मराठी संमेलन -Aka मराठी साहित्य आणि संस्कृती संमेलनासाठी जाताना लिहितोयं. विमानात बसून लिहिताना लेखनाला उंची प्राप्त होते (असा माझा गोड गैरसमज आहे. असो !!!) साहित्य, नाट्य यांची संमेलने जेव्हा जगाच्या पाठीवर विविध देशात होतात तेव्हा त्याचा उद्देश आपली मराठी भाषा वैश्विक पातळीवर नेणे असाच असतो. मी त्या संमेलनाच्या आशयाकडे बघतोच पण त्याचप्रमाणे कार्य पार पाडण्यासाठी ज्या स्वयंसेवकांनी ढोर मेहनत घेतलेली असते त्यांच्या प्रयत्नांचीही तेवढ्याच उत्साहाने दाद देतो. परदेशातल्या अधिवेशनांची गंगोत्री म्हणजे आपले बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन. अधिवेशनाच्या तयारीसाठी माझ्या बॉस्टनला वेळोवेळी फेऱ्या होतातच. गेल्या आठवड्यात न्यू इंग्लंड मराठी मंडळाने बॉस्टन हार्बर मध्ये डिनर क्रूज (Dinner Cruise) आयोजित केला होता. अधिवेशनाच्या आयोजनानिमित्त दरवेळेच्या दिवसभराच्या इनडोअर सभा आणि कामकाजापेक्षा ह्यावेळी अधिक मोकळ्या वातावरणामध्ये बॉस्टनच्या ३०० मराठी सदस्यांबरोबर समन्वय साधता आला.
जोडीला अनुष्का आणि आश्लेषाही होत्या. त्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या आणि कौटुंबिक वातवरणात अतिशय वेगळ्या प्रकारचे सोशल नेटवर्किंग झाले.
बॉस्टनला शिक्षणाची पंढरी म्हणतात ते काही खोटे नाही. बॉस्टन परिसरातल्या ७५ पैकी सहा शिक्षणसंस्थांना आम्ही भेटी दिल्या. मध्यमयुगीन बांधकामे, अद्ययावत प्रयोगशाळा, आणि निष्णात प्राध्यापक असलेल्या हार्वर्ड, एम आय टी, येल आणि ब्राउन विद्यापीठांचा परिसर बघून तिथल्या विद्यार्थ्यांचा प्रचंड हेवा वाटला. प्रगत संशोधनावर भर असलेली महाविद्यालये आणि प्रवेशासाठी आलेल्या अर्जांपैकी मंजूरीचे प्रमाण केवळ ८ टक्के! तेव्हा अशा - Ivy league - कॉलेजेसचा दबदबा अमेरिकेत असल्यास नवल नाही आणि तो तसाच चालू राहील. ह्याच कॉलेजेसमधल्या नोबेल पारितोषिक विजेत्यांना आपण २०१३च्या अधिवेशनात बोलावणार आहोत. अमेरिकेतल्या आपल्या युवा पिढीला त्यांचे अनुभव ऐकता येतील आणि ह्या विद्यापीठांमधे प्रवेशासाठी जाण्यासाठी काय करावं हेही कळेल. बॉस्टनमधून शिकून कॉर्पोरेट जगामध्ये स्थिरावलेल्या आपल्या युवा पिढीलाही त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आम्ही अधिवेशनात आग्रहाने बोलावणार आहोत. अधिवेशनामधील बिझिनेस कॉन्फरन्सचे प्रमुख श्री. मुकुंद चोरघडे यांनी २ दिवसात माझ्या ज्ञानात खूप भर टाकली.
खरं तर ऑगष्टमध्ये एव्हाना गणपतीचे आगमन होते. लहानपणी महिनाभर पाळलेला श्रावण आम्ही गणपती विसर्जन झाले की सोडत असू. यंदा नेमका अधिक महिना भाद्रपदाचा आला. त्यामुळे गणेश चतुर्थी लांबली. आता तुम्हीच सांगा की हा मधला महिना पाळावा की नाही?
सार्वजनिक गणेशोत्सव टिळकांनी १८९४ साली पुण्यात सुरु केला, पण त्याआधी एक वर्ष १८९३ साली पुण्यातल्याच दगडूशेठ हलवाई यांनी थोड्याफार प्रमाणात गणेशोत्सवाला सार्वजानिक स्वरुप दिलं होतं. प्लेगच्या साथीत दगडूशेठांचा मुलगा गमावला. व्यथित दगडूशेठ यांनी गुरूच्या सांगण्यानुसार श्री दत्ताची आणि श्री गणेशाची मूर्ती बनवून घेतली आणि स्थापना केली. आजही ती मूर्ती अकरा मारुती चौकातील राम मंदिरात आहे. पुढच्या पुणे भेटीत मी ती जरूर बघणार आहे.
यंदा गणेशोत्सवासाठी मी क्लिव्हलँड आणि पिट्स्बर्ग मंडळात भेटी देणार आहे. हा येणारा गणेशोत्सवाचा सण तुम्हा सर्वांचं आयुष्य मंगलमय आणि यशस्वी करो ही मनोकामना. आपला,
आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com,
फोन: ३०२-५५९-१३६७