तस पाहील तर चित्रपट सृष्टी आणि मी ह्यात भरपूर अंतर आहे. लग्नापूर्वी वेळ भरपूर असल्याने माझ्या तुलनेने बरेच चित्रपट पाहिले आहेत, त्यातील हिरो- हिरॉईन पाहणे आणि ती कथा जाणणे एवढ्यातच इंटरेस्ट असायचा. बाकी त्या चित्रपटाचे दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, गायक कोण हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच नाही केला. त्यामुळे चित्रपटसृष्टीबद्दल लिहिणे म्हणजे माझ्यासाठी बालवाडीतल्या विद्यार्थ्याने जोडाक्षरे लिहिण्यासारखे आहे. तरी पण चित्रपट सृष्टीच्या माध्यमांच्या संदर्भात जी काही माहिती डोळ्यांनी पाहिली, अनुभवली आहे ती नम्रपणे रेखाटण्याचा प्रयत्न करते.
पूर्वी १०० घरांतून एखाद्याकडे टीव्ही असायचा. माझ्या भावाला चित्रपटांची-गाण्यांची आवड असल्याने माझ्या वडिलांनी टीव्ही घेतला. अर्थात त्या काळात ब्लॅक अॅन्ड व्हाईटच. आमच्या गावातील आमच्या घरातील तो पहिला टीव्ही असावा. तेव्हा मला वाटत फक्त शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी असे आठवड्यातून दोनच चित्रपट लागायचे. पण ते चित्रपट पाहण्यासाठी आमचा हॉल गावातील लोकांनी पूर्णं भरलेला असायचा. मी खूप लहान होते तेव्हा. मी कधी ते चित्रपटही पाहत नसत जे जमलेले लोक इतके उत्साहाने पाहत असत. पण ह्या दोन दिवसांसाठी माझा उत्साह मात्र दुसर्याच गोष्टीत ओसंडलेला असायचा तो म्हणजे शाळा शाळा खेळण्यासाठी. त्या दोन दिवसांत मी शाळेतली शिक्षिका व्हायचे व बसलेल्या माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना पट्टीने मार द्यायचे घरातील मंडळी माझ्या ह्या कृत्याबद्दल ओरडायचे पण मी त्यांचे लक्ष चुकवून परत आपली शिक्षिकेची भूमिका बजावायचे. घरातल्यांना वाटत की हिने एवढे मारल्यावर आता पुढच्या आठवड्यात बहुतेक कोणी येणार नाही पण चित्रपट पाहण्यासाठी बिचारी गावकरी मंडळी माझा मारही सहन करत एवढे क्रेझ तेव्हाही चित्रपटाचे होते.
पुढे एकदा मला माझ्या वडिलाने नाच रे मोरा हे गाणं ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट दाखवला. त्यात तिची आई नसते हे मला इतकं वाईट वाटलेलं की मी पुन्हा चित्रपट पाहिलाच नाही. माझे वडील माझ्या भावाला आणि आईला घेऊन आमच्या उरणच्या चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी नेत पण मला वडील सांगतात तेव्हाही मी बाहेरची फुले पाने पाहण्यातच रंगून जायचे.
आमच्या घरी मे महिना म्हटला म्हणजे सगळ्या भावंडांची जत्राच. आत्या, काका, मामांची मुले आमच्या घरी महिना-पंधरा दिवसांसाठी असायचीच. मला कळायला लागल्यावर त्यांनी मला एक माझ्याबद्दलची राज की बात सांगितली. मला कळत नव्हते तेव्हा मला सगळे माझ्या वडिलांजवळ हट्ट करायला लावायचे की मला सिनेमाला जायचे आहे. त्यांच्या सांगण्यावरून मी वडिलांजवळ हट्ट करायचे आणि मी लाडकी असल्याने माझ्यामुळे सगळ्याच भावंडांना सिनेमाच्या तिकिटाचे पैसे मिळायचे. पण माझी भावंडे इतकी बदमाश होती हे मला त्यांनी त्यांच्या तोंडाने मला समजायला लागल्यावर सांगितले. मला भावंडे सिनेमागृहापर्यंत घेऊन जात आणि तिथे लागलेले भयानक पोस्टर्स मला दाखवून रडवत आणि परत घरी नेऊन सोडत आणि मग आरामात स्वतः चित्रपट पाहून येत.
पुढे एकदा मी एक सिनेमा चित्रपटगृहात पाहिल्याच आठवत. एका आत्ये बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही मुंबईला गेलो होतो. तेव्हा वडिलांनी आम्हाला थिएटर मध्ये नेले होते. तेव्हा नवीनच राम तेरी गंगा मैली हा चित्रपट लागला होता. कसा होता वगैरे काही माहीत नव्हते. पण टाईमपास म्हणून आम्ही गेलो आणि तो सिनेमा पाहून आलो. नंतर आम्हाला सगळ्यांनी विचारले कुठल्या सिनेमाला गेलात तेव्हा नाव ऐकून सगळ्यांनी डोक्याला हात मारल्याचे आठवते.
पूर्वी मे महिन्यात प्रत्येक गावात गावकीची पुजा होत असे. अशा गावकीच्या पूजेला पडद्यावर चित्रपट दाखवत असत. एक भला मोठा पडदा रस्त्यावर मधोमध लावला जात. त्याच्या दोन्ही बाजूने चित्र दिसत असे. जागा मिळेल तिथे गावकरी गर्दी करून बसत असत. हे चित्रपट रात्री ८-९ च्या दारम्यान लावत. कारण त्यावेळी इतक्या रात्री रहदारी चालू नसे त्यामुळे गाड्यांचा अडथळा येत नसे. मी एक-दोनदाच असे चित्रपट पाहण्यासाठी भावंडांबरोबर गेले पण मला अमिताभ आणि त्याच्या बाजूला लागलेली आग असेच अजून त्या पडद्यावरचे डोळ्यासमोर येते बाकी काही आठवत नाही.
त्यानंतर काही दिवस गेले आणि बाजारात तसेच काही घरांमध्ये रंगीत टीव्ही येऊ लागले तसे माझ्या वडिलांनीही भावाच्या हट्टा खातर रंगीत टीव्ही आणला. पण हा रंगीत टीव्ही येईपर्यंत घरात येणार्या गावकर्यांची गर्दी कमी झाली होती. ती माझ्या मारामुळे नाही हो :स्मितः नंतर बर्याच जणांच्या घरात टीव्ही आल्याने ही गर्दी विभागून गेली.
ह्या पूर्वीच्या टीव्हींना अँटीना असे. जरा वारा आला की टीव्हींचे चित्र हालत असे, त्यावर पट्टे येत असत. अॅन्टीना छपरावर असे मग छपरावर कोणीतरी चढून वरून ओरडत असे चित्र दिसते का बरोबर? ह्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मात्र मी सदैव सतर्क असे. चित्र एकदा का स्पष्ट दिसू लागले की लगेच ओरडून सांगायचे बस्स.. बस्स.. दिसते आता. मग अॅन्टीना हालवणारी व्यक्ती थांबून खाली येत असे. हा प्रोग्राम बर्याच वेळा होत. पण असे होत तेव्हा मला मजा वाटे
अजून थोडी मोठी झाले. जवळ जवळ ५वी ६वीत गेले तेव्हा आमच्या घरी भावाने व्हि. सि. आर आणला. आता हा दिवस, दिवस म्हणण्यापेक्षा रात्र मला चांगलीच अजून आठवते. कारण तेव्हा मला समजू लागले होते. टीव्हीवरचे शनिवार-रविवारचे जर पिक्चर चांगले वाटले तर पाहू लागले होते. व्हि. सी. आर. आणला त्या रात्री आम्ही लागोपाठ ३ सिनेमे पाहिले. मला ते सिनेमे आठवतात. पहिला खुदगर्ज, दुसरा डान्स डान्स डान्स आणि तिसरा नगमा. नगमा सुरू असताना सकाळ झाली होती. आणि चक्क आम्ही त्या रात्री झोपलो नव्हतो. माझी काही भावंडेही होती आमच्याबरोबर. ह्या व्हि. सी. आर बरोबर माझी सिनेमे पाहण्याची सुरुवात झाली होती. पण माझ्यावर भावाची जरबही होती. तो मला अभ्यास असेल तर पिक्चर पाहू देत नसे. नंतर भाऊ आणि वडील बाजारातून भाड्याने कॅसेट विकत आणून सिनेमे लावायचे आणि आम्ही ते अधून मधून पाहत असत. त्यावेळी मराठी सिनेमे खूप चालत. वडील मराठी तर भाऊ हिंदी सिनेमा घेऊन येत असत. त्यावेळी भाड्याने मिळणार्या कॅसेटची दुकानेही बरीच होती बाजारात. आता त्या कॅसेटही दिसत नाहीत.
ह्या व्हि. सी. आर. चीही गंमत असे. कॅसेट टाकल्यावर कधी कधी पिक्चर क्लिअर दिसत नसे तर कधी मधूनच कॅसेट अडकत असे अशा वेळी व्हि. सी. आर. चा हेड साफ करावा लागे. मला ह्या गोष्टीचीही मजा वाटे. हेड साफ करण्यासाठी एक स्प्रे मिळायचा तो हेडवर मारायचा आणि पेन किंवा लांब काडीला टिश्यु पेपर, रुमाल किंवा कॉटन गुंडाळून तो हेडपर्यंत पोहोचवून हेड साफ करायचा. नंतर नंतर हेड साफ करायची कॅसेट मिळू लागली. पण त्यात मला मजा वाटली नाही ह्या व्हि. सी. आर. ची अजून एक गंमत मला येई ती म्हणजे फॉरवर्ड आणि रिवाइंड करताना टीव्हीवर दिसणारे दृश्य. पिक्चर पाहताना पिक्चरमधली गाणी आम्ही नेहमीच फॉरवर्ड करत पण तिच गाणी टीव्हीवर छायागीत, चित्रगीत कार्यक्रमात डोळ्याची पापणी न हालवता पाहत
खास करून जेव्हा घरातील एखाद्या समारंभाची कॅसेट असेल तेव्हा फॉरवर्ड, रिवाईंडने आपलीच माणसे तुरुतुरू नाचताना पाहायला खूप मजा येत असे.
अजून काही काळ लोटला आणि मी जवळ जवळ १० वीत गेली असेन त्या वेळी केबल टीव्हीची केबल रस्त्या रस्त्यावर लोंबकळू लागली आणि कॅसेटच्या खर्चापेक्षा केबल स्वस्त म्हणून आम्ही केबल लावून घेतली. पण केबल लावल्यावरही मी काही जास्त चित्रपट पाहिले नाहीत कारण भावाचा माझ्यावर अभ्यास करण्यासाठी दरारा कायम होता. मग फक्त रात्री सारेगम, काही सीरियल्स पाहू लागले. नंतर एकदा १० वी १२ वी पास झाल्यावर भावानेही माझ्यावरचा दरारा कमी केला आणि मी त्या काळी लागणार्या सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, चुनौती अशा काही सीरियल्स पाहू लागले. मग त्यावेळचे मैने प्यार किया, हम आपके है कौन?, दिल, कयामतसे कयामत तक, दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे, हम साथ साथ है असे काही चित्रपट पाहू लागले व ते आवडू लागले. पण मला फायटिंग असलेले चित्रपट आवडत नव्हते आणि अजूनही आवडत नाहीत. असे सौम्य चित्रपट आवडायचे. त्यातील गाणीही आवडायची. तेव्हा केबलवर नवीन पिक्चर लावण्याचाही एक दिवस ठरलेला असायचा. त्या दिवसाची सगळे उत्सुकतेने वाट पाहत. तसेच गणेश विसर्जन, नवरात्रीच्या देवीचे विसर्जन सारखे सार्वजनिक उत्सव होत त्याचे थेट प्रक्षेपण पाहताना आपली माणसे शोधण्याची मजाही केबल वर यायची.
ह्या केबलचीही एक गंमत होती. ती म्हणजे केबल वाल्याने त्याचा मेन बॉक्स आमच्याच इथे बसवला होता. त्यामुळे तो आमच्याकडून कमी पैसे घ्यायचा आणि अजून गंमत म्हणजे त्या बॉक्सच्या वायर वगैरे हालल्या की अख्ख्या गावात केबल दिसायची नाही. त्यामुळे आमचा असा अजून एक फायदा व्हायचा की आमच्या घरातील केबलवर चित्र दिसले नाही की आम्ही लगेच त्या बॉक्सच्या वायर हालवून बघायचो. त्या हालल्या की आपोआप गावामध्ये सगळीकडे चित्र हालायचे. मग लगेच केबल वाल्याला कंप्लेंटवर कंप्लेंट जाऊन केबलवाला तातडीने दुरुस्ती करण्यास यायचा.
आता मी मोठी झाल्याने आणि पिक्चर्स आवडू लागल्याने मी आणि माझ्या एका चुलत बहिणीने धिटाईने सिनेमागृहात जायचे ठरवले. आमच्या उरणचे सिनेमागृह बंद पडल्याने आम्ही पनवेलला जाऊन बॉम्बे हा सिनेमा पाहिला. सिनेमागृहात तो छान वाटला म्हणून एकदा सलमान खानचा जुडवाही परत जाऊन पाहिला. अगदी दोघीच गेलो होतो आता आठवूनच मला भिती वाटते
त्यानंतर नोकरीला लागले आणि सगळ्या मैत्रिणींनी मिळून चलते चलते हा सिनेमा वाशीला जाऊन पाहायचे ठरवले आणि तोही दिवस माझ्या शेवट पर्यंत लक्षात राहण्यासारखा ठरला. इंटरव्हल मध्ये आम्ही चहासाठी उठलो मी चालता चालता सिनेमा गृहातच पडले. तिथले प्रेक्षक माझ्याकडे पडली पडली म्हणून बोट दाखवू लागले आणि माझा तिथे चलते चलते पडले झाला.
नोकरी लागल्यावर १-२ वर्षांत माझे लग्न झाले. लग्न झाल्यावर पुन्हा आमच्या त्याच मैत्रिणींच्या ग्रुपने पुण्याला पिकनिक काढायचे ठरवले. त्यामध्ये माझे नवीन लग्न झाल्याने माझे आणि एका दुसर्या मैत्रिणीचे असे दोन कपल्स तर बाकी ३-४ मैत्रिणी होत्या. तेव्हा एक दिवस पुण्यात चालू नवरा भोळी बायको सिनेमा पाहिला. तो सिनेमा पाहताना मी खूप हसले आणि नवर्या बरोबर पहिला सिनेमा पाहिला म्हणून तोही सिनेमा माझ्या चांगला लक्षात राहिला.
आता केबल वगैरेचा जमाना जाऊन प्रत्येकाच्या घरी सेट टॉप बॉक्स आलेत, कम्प्युटरवर, सीडी प्लेयरवर सिनेमे पाहण्याची सोय झाली आहे. तसा माझ्याही घरी ह्या सोयी आल्या पण आता टीव्हीवर सिनेमे पाहण्या पेक्षा मुलीचे कार्टून्स जास्त लागतात. ह्या सेट टॉप बॉक्स वरही मी काही सिनेमे पाहिले पण जास्त नाही. त्यातला मुन्नाभाई एम. बी. बी. एस. हा आम्ही घरातील सगळ्या मंडळींनी बसून एक सिनेमा चांगला आठवतो. तर बाकीचे मराठी सिनेमे ज्यांची मला नीट नावे माहीत नाहीत.
हल्ली मराठी सिनेमांकडे आम्ही लक्ष देऊन असतो त्याचे खास कारण आहे. कारण ह्या मराठी सिनेमांमध्ये आमच्या उरणची, आमच्या अगदी ५ मिनिटे अंतरावर घर असणारी एक सिने अभिनेत्री काम करते तिला टीव्हीवर पाहण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. तिच नाव आहे विणा जामकर. बाकी कुठलीच अभिनेत्री मी अजून समोरा समोर पाहिली नाही किंवा कुणाशी संबंध आला नाही. पण विणा जामकर म्हटल्यावर ती आपल्या घरातलीच आहे असे वाटते. मला असे वाटण्याचे कारण मी लहान पणापासूनच तिच्या फॅमिलीला विशेषतः तिच्या आईला ओळखते.
माझी आई आणि विणा जामकरची आई एकाच शाळेत (कन्याशाळा) शिक्षिका होत्या. जामकरबाई ह्या नावाने त्या अजूनही ओळखल्या जातात. त्या नवीनच आल्या तेव्हा आई नेहमी घरी आल्यावर त्यांची स्तुती करत असे. आमच्या शाळेत जामकर बाई म्हणून नवीन बाई आल्या आहेत. त्या नाटकांत काम करतात, हुशार आहेत, इंग्लिश शिकवतात वगैरे वगैरे आई त्यांची खूप स्तुती करत असत. माझ्या आईला शामला बाई म्हणून ओळखतात. मी पण कन्या शाळेतच शिक्षण घेतले. पण मी ४थी नंतर हायस्कुलमध्ये अॅडमिशन घेतले. आता तिच्या आणि माझ्यामधील अंतरही मला माहीत नाही. विणा कन्या शाळेत शिकत होती. ४ थीत असताना माझी आई तिची वर्गशिक्षिका होती. तेव्हा ती एवढी मोठी सिनेतारका होईल असे कुणाला माहीतही नसेल. पण आज आई सगळ्यांना अभिमानाने सांगते विणा जामकर ४थीत असताना माझी विद्यार्थिनी होती. तशा जामकर बाईंना मी त्या उरणमध्ये आल्यापासून ओळखत होते. पण गेल्या दोन वर्षात इनरव्हिल ची सेक्रेटरी पदाची भूमिका बजावताना माझा संबंध जामकर बाईंशी आला आणि जामकरबाई आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती आहेत अशा वाटू लागल्या. त्याही चांगल्या समाज सेविका आहेत. त्यांनी मी माझ्या रिटायर्ड शिक्षिका आईची मुलगी असल्याने अगदी आपल्या शाळेशी माझी नाळ जुळलेली आहे अशी ओळख कन्या शाळेत करून दिली. त्यावेळी त्यांनी विणाचेही कौतुक केले पण ते कौतुक होते ते बोलताना त्यांच्या शब्दात फक्त अभिमान होता चढलेला गर्व नव्हता. त्या सांगत होत्या की माझी मुलगी जरी कितीही मोठी सिनेतारका असली तरी मी ज्या मुलांना शिक्षण देते त्या मुली अगदी तळागाळातील असतात व त्यात मला आनंद आहे. मी माझ्या मुलीला सांगते की तुझे पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत आणि विणा तशीच आहे ह्याची प्रचितीही आम्ही घेतो. विणा सुट्टीत उरणला तिच्या आई वडिलांकडे येते. ती गाडी वगैरे न वापरता तिच्या आई सोबत बर्याचदा बाजारात चालत जाताना दिसते. अशा वेळी तिच्या सरळ वागण्याने ही इतकी गाजलेली अभिनेत्री आहे हे लक्षातच येत नाही. उरणमध्ये खास कार्यक्रमांसाठीही तिला आमंत्रणे असतात. पण ती स्वतः बद्दल न बोलता नेहमीच उरण बद्दलच कौतुक करून उरणच्या नगरवासियामध्ये आपलेपणा दुणावते.
मागील वर्षी विणाला आमच्या रोटरी स्कूलवर गॅदरिंगसाठी प्रमुख पाहुणी म्हणून बोलावले होते. अगदी जितक्यांना ओळखते तितक्यांना तिने तेव्हा ओळख दाखवली होती हे पाहून खूप आनंद वाटला होता. एक खंत माझ्यात आहे ती म्हणजे इतक्या जवळ येऊन माझी आणि तिची ओळख मात्र तेव्हा झाली नव्हती. तर अशी ही सिनेतारका माझ्या मनात जवळीक साधून आहे.
एक दिवस विणाच्या घरी जामकर बाईंना कामानिमित्त भेटण्यासाठी गेले होते. तेंव्हा आत पाऊल टाकताच त्यांची शोकेस पूर्ण सिने अॅवॉर्ड्सने भरलेली दिसली. मला फोटो काढण्याचा मोह झाला होता पण मी आवरता घेतला. विणाला जे अॅवॉर्ड्स घेताना टीव्ही वर पाहीले होते ते अॅवॉर्ड्स प्रत्यक्षात नजरेसमोर होते. जामकर बाईंनी यंदाचा अॅवॉर्ड काढून आम्हाला दाखवला. तो अॅवॉर्ड हातात घेताना काही वेगळच फिल झाल. विणाबद्दलचा अभिमान, आनंद त्यावेळी शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता.
बाकी काही जणांना सिनेमाची खूपच आवड असते हे मी पाहिले आहे. काही तरुण मुले मुली तर सिनेतारकांचे फोटोही आपल्या जवळ बाळगतात त्यांच्या सारखे कपडे घालतात त्यांच्यामध्ये स्वतःला म्हणण्यापेक्षा स्वतःमध्ये त्यांना पाहतात. इतकी जवळीक मात्र माझी आणि सिनेमाची कधीच आली नाही. त्यामुळे ह्या विषयावर अजून मुद्देसूत लिखाण करणे मला अशक्य आहे. पण आजच्या तरुण पिढीला माझे एकच सांगणे आहे. सिनेमा पाहून सिनेमातील चांगल्या गोष्टी उचला त्यातील दादागिरी, गुंड प्रवृत्ती, चंचलता दूर सारून हिरो-हिरॉइन्सचे दाखवण्यात येणारे चांगले गुण आत्मसात करा. विणा सारखेच तुमचेही पाय जमिनीवरच राहू द्या.
जागू, किती उत्साही आहेस तू!
जागू, किती उत्साही आहेस तू!
खुप आवडलं तुझं साधं-सोप्पं कथन!
पुलेशु!
जागू, मस्तच लिहीलास ग तुझा
जागू, मस्तच लिहीलास ग तुझा चित्रपट प्रवास.
छोटी जागू-तरूण जागू अश्या वयाच्या अनेक उंबरठ्यावरची एअक गोड चुणचुणीत मुलगी समोर उभी राहिली..
पु.ले.शु. 
मस्त आहे जागु
मस्त आहे जागु
बाकी काही जणांना सिनेमाची
बाकी काही जणांना सिनेमाची खूपच आवड असते हे मी पाहिले आहे. काही तरुण मुले मुली तर सिनेतारकांचे फोटोही आपल्या जवळ बाळगतात त्यांच्या सारखे कपडे घालतात त्यांच्यामध्ये स्वतःला म्हणण्यापेक्षा स्वतःमध्ये त्यांना पाहतात. इतकी जवळीक मात्र माझी आणि सिनेमाची कधीच आली नाही. >>>> किती मोकळेपणाने आणि कोणताही गंड न बाळगता लिहिलंस तू हे जागू - मला अतिशय आवडलं तुझं लिखाण.....
जागू, छान लिहिलेय. माझ्या
जागू, छान लिहिलेय.
माझ्या बाबतीत हा प्रवास आणखी १५/२० वर्षे मागे न्यावा लागेल.
जागुले.. मस्तच लिहिलंयस..
जागुले.. मस्तच लिहिलंयस..
वा! स्पर्धेतली पहिलीच एंट्री
वा! स्पर्धेतली पहिलीच एंट्री मस्त अगदी.
वत्सला, अनघा, इन्ना, शशांक,
वत्सला, अनघा, इन्ना, शशांक, दिनेशदा, वर्षू, साजिरा धन्यवाद.
जागू, छान लिहिलाहेस गं लेख.
जागू, छान लिहिलाहेस गं लेख. आवडला.
छान लिहिले आहेस जागू. आवडले.
छान लिहिले आहेस जागू. आवडले.
विषयाला दिलेले अनपेक्षित आणि
विषयाला दिलेले अनपेक्षित आणि धमाल वळण.
ठीक आहे. पण स्पर्धेच्या
ठीक आहे. पण स्पर्धेच्या विषयाशी मेळ बसत नाही. असेच वीणा जामकर ह्या परिक्षक आहेत. तेव्हा त्याचा उल्लेख टाळायला हवा होता असे मला वाटले.
जागू, http://www.maayboli.com
जागू,
http://www.maayboli.com/node/36775 या धाग्यावर लिहिल्याप्रमाणे तुझ्या लेखाच्या शीर्षकात विषय क्रमांक लिहून योग्य तो बदल कृपया करशील का?
शांकली, अरुंधती, भरत
शांकली, अरुंधती, भरत धन्यवाद.
मंदार तुमचे बरोबर आहे. पण सिनेसृष्टीबद्दल मला जास्त माहीती नाही म्हणून मी माझे अनुभव लिहीले आहेत. मी म्हणूनच वरती लिहीले आहे की मी ह्या विषयावर लिहीण म्हणजे बालवाडीतल्या मुलाने जोडाक्षरे लिहीण्यासारखे आहे. आणि विणा जामकरच म्हणाल तर ती वस्तूस्थिती आहे ती मी कशी बदलणार ?
जाणकारांकडून पुढे भरपूर चांगले लेख येणार आहेत त्यामुळे माझा लेख ह्या स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही हेही मला ठाऊक आहे. आयोजकांनी केलेल्या विपुला मान द्यायचा होता आणि मला माझ्या भावना पोहोचवायच्या होत्या त्या मी ह्या लेखात सादर केल्या आहेत. आणि परिक्षक विणा हिचा उल्लेख आल्याने मला वाटत हा आपोआपच लेख बाद होईल पण मला त्याबद्दल खंत मुळीच नाही. ह्या स्पर्धेला सुरुवात माझ्य कडून झाली ह्यात मी आनंद मानते.
जागू, मस्त लिहिलं आहेस की.
जागू, मस्त लिहिलं आहेस की. (वरच्या तुझ्या पोस्टवरुन : गोड आहेस तू
)
खुप छान लेख! व्ही. सी. आर.,
खुप छान लेख! व्ही. सी. आर., केबल, अॅन्टेना यांच्या आठवणींनी नॉस्टॅल्जिक व्हायला होते.
लहानपणी मी आई आणि तिच्या मैत्रिणींबरोबर 'माहेरची साडी' बघायला गेलो होतो, एक काकू तर हुंदके देत रडत होत्या. आजही अलका कुबलचा सिनेमा लागला की त्या काकू आठवुन हसायला येते.
छान लिहिलंय जागू
छान लिहिलंय जागू
"मला बॉ पिक्चर-बिक्चर बद्दल
"मला बॉ पिक्चर-बिक्चर बद्दल फारसं काय कळत नै, पण जे काही सांगावं, लिहावं वाटतं ते हे असं.."
जागुतै हा सरळपणा आवडला!
छान लिहलेस!!
छान लिहलेस!!
अश्विनी, गमभन, रुणुझुणू,
अश्विनी, गमभन, रुणुझुणू, ट्यागो, शाम धन्यवाद.
छान
छान
किती मोकळेपणाने आणि कोणताही
किती मोकळेपणाने आणि कोणताही गंड न बाळगता लिहिलंस तू हे जागू >> +१.
खूप प्रामाणिक लिहिलय.. मस्त
खूप प्रामाणिक लिहिलय..
मस्त लेख.
छान लिहिलंय जागू खूप
छान लिहिलंय जागू
खूप प्रामाणिक लिहिलय..>>>>पराग +१
पराग, रैना +१
पराग, रैना +१
शेळी, रैना, पराग, जिप्सी,
शेळी, रैना, पराग, जिप्सी, प्रिती धन्यवाद.
साधंसोपं प्रामाणिक लिखाण.
साधंसोपं प्रामाणिक लिखाण. आवडलं
धन्यवाद अगो.
धन्यवाद अगो.
मस्त लिहिलंय्स जागू... माझे
मस्त लिहिलंय्स जागू... माझे बालपणही अगदी असेच गेलेय...
खरेतर ह्या स्पर्धेबद्दल वाचल्यावर आपल्याला ह्यात भाग घेता येईल असे मला अजिबात वाटले नाही. म्हटले यात लिहिणारे लोक चित्रपटदुनियेबद्दल माहितगार, एक्स्पर्ट असेच असणार. आपल्याला काय माहित आहे या दुनियेबद्दल???
त्यामुळे तुझा लेख पाहुन आश्चर्य वाटले, लगेच लेख वाचुन काढला. (प्रतिक्रिया मात्र नेहमीसारखीच द्याय्ची राहुन गेली).. आज परत लेख वाचताना वर विषय नंबर दिसल्यावर परत लेखनस्पर्धेबद्दल वाचले आणि वाटले की अरे, आपल्यालाही काहीतरी लिहिता येईल की.. इतकी वर्षे चित्रपटांवर आणि त्यातल्या गाण्यांवरच तर जीव जगलाय, मग त्याबद्दल दोन ओळी का नाही लिहिता येणार??
तुझे आभार गं.. तु हा लेख लिहिला नस्ता तर मीही विचार केला नस्ता लेख लिहायचा
लेख सुंदर आहे. तांत्रिक
लेख सुंदर आहे. तांत्रिक मुद्द्यांचे माहीत नाही, मात्र वाचन म्हणून अतिशय आवडला.
Pages