गोबी मांचुरीयन

Submitted by यशस्विनी on 3 August, 2012 - 01:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. ताजा फ्लॉवर - मध्यम आकाराचा
२. मैदा - एक मोठी वाटी
३. कॉर्नफ्लॉवर - एक ते दिड चमचा
४. तेल - तळण्यासाठी
५. मीठ - चवीपुरते
६. हिंग - चिमुटभर
७. कांदा - एक मध्यम आकाराचा बारीक चिरुन
८. टोमॅटो सॉस
९. सोया सॉस
१०.कोथिंबिर
११.लसुन पेस्ट - एक चमचा
१२.बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - दोन (तिखटासाठी, नसल्या तरी चालतात) किंवा चिली सॉस - एक चमचा

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम एका मोठया बाउल मध्ये मैदा चाळुन घ्यावा, त्यात थोडे कॉर्नफ्लॉवर घालावे. मग चवीपुरते मीठ, चिमुटभर हिंग आवडत असल्यास घालावे ( नाही घातले तरी चालते)
२. वरील मिश्रणात हळु हळु पाणी घालावे,याचा थिकनेस बटाटा भजी करताना जेवढा लागतो तेवढा ठेवावा, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही
३. फ्लॉवरची फुले मध्यम आकारात काढुन घ्यावी व त्यांना मीठाच्या कोमट पाण्यात थोडयावेळ घालुन ठेवावे.
४. कढईत तेल गरम करावे व त्यामध्ये एक एक फ्लॉवरचे फुल घेउन ते मैदाच्या पीठात डीप करावे व कढईत सोडावे..... हलक्या सोनेरी रंगावर सर्व फुले तळुन घ्यावीत....
५. आता एका पॅन मध्ये थोडे तेल घालावे व त्यात बारीक चिरलेली मिरची (चिली सॉस वापरणार असाल तर इतर सॉस बरोबर घालावा) व कांदा घालावा.... तो हलका गुलाबी झाला की त्यात लसुन पेस्ट घालावी.
६. लसुन पेस्ट हलके परतुन झाली की त्यामध्ये ३ चमचे सोया सॉस व ६-७ चमचे टोमॅटो सॉस घालावा ( सोया सॉस कमी घालावा व टोमॅटो सॉस त्याच्या दुप्पट घालावा)
७. या मिश्रणात तळलेली फ्लॉवरची फुले (भजी) घालावीत व हलक्या हाताने ढवळावे..... सर्व फुलांना ते मिश्रण नीट लागले पाहीजे..... यावर बारीक चिरलेली कोथिंबिर भुरभुरुन डिश सर्व्ह करावी.
८. गोबी मांचुरीयन ही डिश स्टार्टर म्हणुन छान लागते. लहानांपासुन मोठयापर्यंत सर्वजन ही डिश आवडीने खातात. ही डिश गरम गरम खायला खुपच चविष्ट लागते.
९. जर तुम्हाला ही डिश मेन कोर्स मध्ये ठेवायची असेल व त्यावेळी जास्त ग्रेवी हवी असेल तर थोडे कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिसळुन घ्यावे व सॉसबरोबर घालावे. गोबी मांचुरीयन ग्रेवी फ्राईड राईस, नुडल्सबरोबर मस्त लागते.
१०. अजुन थोडे वेरीएशन हवे असेल तर फोडणी देताना साधा कांदा न वापरता पातीचा कांदा वापरावा त्याने देखील छान चव येते.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जण....
अधिक टिपा: 

समारंभासाठी करायचे असल्यास त्याप्रमाने फ्लॉवर, कांदा, मैदा व सॉसचे प्रमाण वाढवावे Happy

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आणि लसुन पेस्ट साधारण किती चमचे?
मी स्वयंपाकात अगदीच "ढ" असल्याने प्लिज माप नीट सांगा तरच मला करून पहाता येईल Sad

रीया थोडयावेळ थांब अग, तु स्वयंपाकात "ढ" असलीस तरी मी मराठी टाइप करण्यात "ढ" आहे, मी आज पहिल्यांदाच पदार्थाची कृती मायबोलीवर टाकली आहे व इतक्या डिटेलमध्ये सर्व लिहावे लागते हे मला देखील आताच कळते आहे.... लसुन पेस्ट एक लहान चमचा Happy

कोल्हापूरात हा प्रकार खुप लोकप्रिय होता.>>>>>>>> हो मी २००९ ला गेले होते तेव्हा ५ रुपये प्लेट खाल्ली होती,...छान लागत होत.. Happy

मीं आज केला. पातीचा कांदाच वापरला व एक सिमला मिरची पण टाकली स्वादाकरतां [ फ्रीझमधे बिचारी एकटीच पडलेली दिसली म्हणूनही]. असला कांहीं प्रयोग मीं केला कीं बहुतेक वेळां तो नविन पदार्थ मला एकट्यालाच खावा लागतो; आज मलाच चव घेण्यापुरता तरी उरतो कीं नाहीं, अशी परिस्थिती आली.
धन्यवाद, यशस्विनी.