डायव्हिंग

Submitted by ललिता-प्रीति on 28 July, 2012 - 01:03

१३ दिवस, १३६ खेळाडू, ८ सुवर्णपदके

- १९०४ साली सेण्ट लुई इथल्या ऑलिंपिक खेळांमधे डायव्हिंगचा सर्वप्रथम समावेश झाला. लयबध्द डायव्हिंग या प्रकाराचा सिडनी २००० मधे सर्वप्रथम समावेश केला गेला.
१९व्या शतकात जिमनॅस्टस्‌ पाण्यात सराव करत. त्याला ‘फॅन्सी डायव्हिंग’ असे म्हटले जाई. आधुनिक डायव्हिंग या स्पर्धाप्रकाराची ही सुरूवात मानली जाते.

- लंडन येथे डायव्हिंगच्या स्पर्धा ऑलिंपिक पार्क-अ‍ॅक्वेटिक सेण्टर इथे भरवल्या जाणार आहेत.

- डायव्हिंगचा तलाव ५ मीटर खोल असतो.

- दोन प्रकारच्या डायव्हिंग-बोर्डचा वापर केला जातो :
१. प्लॅटफॉर्म : हा पाण्यापासून १० मीटर उंचीवर असतो.
२. स्प्रिंगबोर्ड : हा पाण्यापासून ३ मीटर उंचीवर असतो.

- पुरूष आणि महिलांच्या प्रत्येकी चार स्पर्धा असतात.
१. १० मीटर प्लॅटफॉर्म
२. ३ मीटर स्प्रिंगबोर्ड
३. लयबध्द १० मीटर प्लॅटफॉर्म
४. लयबध्द ३ मीटर स्प्रिंगबोर्ड
लयबध्द स्पर्धाप्रकारात खेळाडूंची जोडी भाग घेते.

- अनेक प्रकारचे सूर अथवा उड्या मारल्या जातात.
१. फॉरवर्ड डाईव्ह
२. बॅकवर्ड डाईव्ह
३. रिव्हर्स डाईव्ह
४. इनवर्ड डाईव्ह
५. ट्विस्टिंग डाईव्ह
६. हॅण्डस्टॅण्ड डाईव्ह

- प्रत्येक स्पर्धाप्रकाराची सुरूवात करण्यापूर्वी खेळाडू परिक्षकांना आपण कोणत्या प्रकारची डाईव्ह मारणार ते सांगतात.

- पुरूष एका फेरीत सहा डाईव्ह मारतात, तर महिलांसाठी ही संख्या ५ असते.

- परिक्षक प्रत्येक खेळाडूला दहापैकी गुण देतात. सर्वाधिक गुण १०, तर सर्वात कमी गुण ० असू शकतात.

- गुण देताना डाईव्ह मारण्याच्या चार टप्प्यांना विचारात घेतले जाते :
१. डाईव्ह मारण्यासाठी खेळाडू ज्या स्थितीत उभा राहतो, ती स्थिती
२. डाईव्ह मारण्यासाठी खेळाडूने घेतलेली झेप
३. प्रत्यक्ष डाईव्ह
४. खेळाडूचा पाण्यातील प्रवेश (पाण्यात प्रवेश करताना कमीत कमी पाणी उडले तर त्याला उत्तम प्रवेश मानले जाते.)

- काही डाईव्हज्‌चे प्रकार कठीण असतात, तर काही तुलनेने सोपे असतात. कठीण डाईव्ह निवडल्यास खेळाडूंना अधिक गुण मिळू शकतात. जितक्या उत्तम प्रकारे डाईव्ह पार पाडली जाते, तितके अधिक गुण मिळतात.

- लयबध्द स्पर्धाप्रकारात दोन्ही खेळाडू एकाच वेळी एकाच प्रकारची डाईव्ह मारतात. काही परिक्षक त्यातील प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक कामगिरीनुसार गुण देतात. उरलेले परिक्षक दोन्ही खेळाडूंच्या डाईव्हज्‌ किती एकसारख्या होत्या ते पासून त्यानुसार गुण देतात.

- वैयक्तिक स्पर्धाप्रकारांसाठी ७ परिक्षक असतात; तर लयबध्द स्पर्धाप्रकारांसाठी ११ परिक्षक असतात.

- वैयक्तिक स्पर्धांमधे आधी खेळाडूंची प्राथमिक फेरी पार पडते. प्रत्येक खेळाडू डाईव्हज्‌ची एक फेरी पूर्ण करतो. सर्वोत्तम १८ खेळाडू उपांत्य फेरीत प्रवेश मिळवतात. उपांत्य फेरीत पुन्हा डाईव्हज्‌ची एक-एक फेरी पूर्ण केली जाते. त्यांतून सर्वोत्तम असे १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
अंतिम फेरीत पुन्हा डाईव्हज्‌ची प्रत्येकी एक फेरी पार पडते. सर्वोत्तम खेळाडूला सुवर्णपदक बहाल केले जाते. द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूला रौप्यपदक, तर तृतीय क्रमांकाच्या खेळाडूला कास्यपदक बहाल केले जाते.

- लयबध्द स्पर्धाप्रकारात खेळाडूंच्या आठ जोड्या भाग घेतात. प्रत्येक जोडी एक-एक फेरी पूर्ण करते. त्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या जोडीला अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक बहाल केले जाते.

----------------------------------

मूळ माहितीची लिंक - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/62...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीशी घाईगर्दीत तुमच्या 'जलतरण' धाग्यावर डायव्हिंगबद्दलच मी मत मांडले होते. पण भारतीयांच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित असा हा देखणा क्रिडाप्रकार तुम्ही इथे स्वतंत्र दिला त्याचा मला आनंद होत आहे.

'सिन्क्रोनाईज्ड' साठी तुम्ही वापरलेले 'लयबद्ध' मराठीकरण छान वाटले. हिंदीमध्ये याला 'समसमय छ्लांग' असे नाम आहे.

अशोक पाटील

व्वा.....आजचे गूगल पेज....खास "डायव्हिंग" साठी. या कल्पकतेला सलाम. उगाच परेडमध्ये कुठल्या देशाचा ड्रेस चांगला आणि कुणाचा वाईट यावर फालतू चर्चा घडवून आणणार्‍या 'याहू' आचरटपणासमोर गूगलची ही खेळाविषयी प्रीती आनंददायीच वाटते.

Aolympics-diving-2012-hp.jpg

हे आजचे गूगल पान.

अशोक पाटील

देखण्या अशा या क्रीडाप्रकारात शेजारच्या चीनने जी गरुडभरारी मारली आहे ती पाहताना/वाचताना जलतरणप्रेमी थक्क होऊन जातात. काल चीनच्या 'वू मिनझिया' या तरुणीने ३ मीटर सिन्क्रोनाईझ्ड डायव्हिंगमध्ये आपल्या साथीदारासह 'सुवर्णपदक' मिळवून जलतरण गटात आपल्या देशाचे खाते उघडले. जलतरण स्पर्धेतील चीनचे पहिले गोल्डमेडल मिळविले एवढ्यासाठीच वू मिनझियाची महती नाही तर या प्रकारात तिचे हे तिसरे ऑलिम्पिक गोल्ड मेडल आहे. १९८५ चा जन्म असलेल्या वू मिनझियाने २००४ च्या "अथेन्स, ग्रीस" मध्ये या गटात प्रथम सुवर्णपदक जिंकले, त्यावेळी ती १९ वर्षाची होती....तर २००८ मध्ये आपल्याच देशातील 'बिजिंग ऑलिम्पिक्स' मध्ये पुन्हा 'सुवर्णपदक'.....आणि आज ती चक्क २७ वर्षाची असूनही 'लंडन ऑलिम्पिक' मध्ये त्याच उत्साहाने उतरली....उतरली नव्हे तर सुवर्णपदकाची हॅटट्रिकही करून दाखविली.

diving.jpg

सलामच करावा लागेल 'वू मिनझिया' या सूरपटू राणीला.

अशोक पाटील

फारच भारी झाला हा खेळ काल. चीनने पहिल्यापासूनच वर्चस्व राखले. नंतर गुणांपेक्षा आम्ही फक्त त्यांच्या 'सूरां'चा आनंद घेतला Happy

नंतर गुणांपेक्षा आम्ही फक्त त्यांच्या 'सूरां'चा आनंद घेतला >>> अगदी !! Happy

चीनचे डायव्हर्स अशा आविर्भावात असतात, की - "इतरांनो, काय उड्या मारायच्या त्या मारून घ्या, म्हणजे मग आम्ही आपले गोल्ड-मेडल उडी मारायला मोकळे!"

इतरांनो, काय उड्या मारायच्या त्या मारून घ्या, म्हणजे मग आम्ही आपले गोल्ड-मेडल उडी मारायला मोकळे!">> Lol खरच अप्रतीम होते त्यांचे डाइव्ह्ज.

आज स्प्रिन्गबोर्डमध्ये रशियाच्या इल्या झाखारॉव्हलाही पहा. कालच्या हीटमध्ये चांगली कामगिरी केली.