सहप्रवास १३

Submitted by भारती.. on 26 July, 2012 - 14:54

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450
http://www.maayboli.com/node/36481
http://www.maayboli.com/node/36480
http://www.maayboli.com/node/36550
http://www.maayboli.com/node/36570
http://www.maayboli.com/node/36582
http://www.maayboli.com/node/36620
http://www.maayboli.com/node/36644
http://www.maayboli.com/node/36676

सहप्रवास १३

( इनामदारांच्या वाड्याचा तोच दर्शनी भाग. उमा चक्क बैठ्या मेजावर डोके टेकून झोपलेली आहे. साहेब आरामखुर्चीत बसून पेपर वाचताहेत. )

साहेब- उमा,उठ. आत जाऊन नीट तरी झोप. हा काय वेडेपणा ? बरं नसेल तुला तर डॉक्टरला बोलावून घेऊ का ? फार हयगय करतेस तू.

उमा- (गडबडून जागी होत) कधी डोळा लागला कळलंच नाही !तुम्ही सर्वजण रात्री इतके उशिरा आलात- त्याच्यापुढे जेवण करणं आणि वाढणं यात नुसती तारांबळ झाली माझी. तुमच्या बायकोचं वय होत चाललंय हे लक्षातच येत नाही तुमच्या.

साहेब -(हसत) पण माझं कुठे वय झालंय अजून ? आणि बघणारा कोणी तर तुला वयस्कर म्हणणार नाही . बरं ती तुझी मुंबईची पाहुणे मंडळी आली काय, मला न भेटताच गेली काय ! कमालच करता तुम्ही लोक.

उमा- मी खूप आग्रह केला हो पण दोघेही आपापल्या गडबडीत होते.संसार कसाबसा सांभाळून जवळजवळ चोवीस तासांची ड्यूटी करणारी ही माणसं- मीनू आणि प्रकाश.पण आपल्याच एका महत्त्वाच्या कामासाठी आली होती दोघंही. काल रात्रीच्या गडबडीत तुम्हाला सांगू शकले नाही. आमच्या ग्रूपमधल्या मेघःश्याम धुरंधरने संजीवनच्या पुढच्या शिक्षणासाठी दहा हजार डॉलर्सचा चेक पाठवला तो घेऊन आले मीनू,प्रकाश.

साहेब -(धक्का बसून ) दहा हजार डॉलर्स ! कुणीही,कुणासाठीही इतके पैसे काय म्हणून पाठवावेत ? कुणीही ,कशासाठीही काय म्हणून स्वीकारावेत ?

उमा -पण मी उत्स्फूर्तपणे स्वीकारले, एक नैतिक कर्ज म्हणून ! पाठवणार्‍याने पाठवले एक नैतिक जबाबदारी म्हणून!

साहेब- कसली नैतिक जबाबदारी ? कोण हे धुरंधरसाहेब ? म्हणजे तसा कधीतरी उल्लेख ऐकल्यासारखं वाटतंय तुझ्याकडून, पण या भेटीच्या समर्थनाइतका पुरेसा नव्हता तो.

उमा- तो एक खूप आवडता मित्र होता. (अधिक काही न सुचून गप्प होते. )

साहेब- परत करून टाक ते पैसे. म्हणजे त्यांची सदिच्छा कळते मला, पण एवढं ओझं झेपणार नाही आपल्याला.

उमा- (समजावणीच्या स्वरात) साहेब, तुमच्याकडे मी कधीच कशासाठी हट्ट धरला नाहीए. आज धरते आहे. एका भल्या माणसाने चांगल्या हेतूने हे पैसे पाठवले आहेत. त्यांची आज संजीवनच्या भवितव्यासाठी गरज आहे. तो ते उद्या त्याला जमेल त्या पद्धतीने फेडेल या अटीवरच स्वीकरले मी ते.

साहेब- आणि त्याला फेडायला नाही जमलं तर ?

उमा- मला तसं वाटत नाही. संधीअभावी त्याचं मेरिट फुकट जाऊ नये म्हणून देवानेच सुबुद्धी दिली मेघःश्यामला.दुसर्‍या कोणत्याही कारणासाठी मी कोणाकडूनही काहीही घेतलं असतं असं वाटतंय तुम्हाला साहेब ? गेली दहा वर्षे पहाताय ना तुम्ही मला ?

साहेब- दहा वर्षे पहातोय पण कधीकधी अगदी अनोळखी वाटतेस. एवढ्यातेवढ्यावरून तत्त्वांचे मुद्दे करत जगायचं आणि महत्त्वाच्याच वेळी ती तत्त्वं बाजूला ठेवायची ? !

उमा- आपल्या माणसांसाठी बाजूला ठेवण्यासाठीच तर जपायची सगळी तत्त्वं.

साहेब- छान.अजबच आहे तुझं हे तत्त्वज्ञान. ठीक आहे. तुला योग्य वाटतं ते कर. तू करतेयस त्याअर्थी ते फारसं चुकीचं नसणारच.

उमा- (भारावलेली )थँक्स साहेब.

साहेब -शहर पुरतं सुटलं नाही तुझं.थँक्स कसले ? संजीवनसाठीच तर करते आहेस सगळं. माझ्यापेक्षाही. ( गप्प होतात. )

उमा- जरा विश्रांती घ्या तुम्हीही. ही डुलकी काढल्यावर ताजंतवानं वाटलं मला. जरासुद्धा वागण्याची पद्धत बदलायला तयार नाही तुम्ही. वय तुमचंही होतंय. अगदी माझ्यापेक्षा जास्त.

साहेब- जातो आता . दोन तीन तास विश्रांती घेतो.. कुणी आलं तर सांग मी घरात नाहीय म्हणून.

उमा- पटकन विश्वासही बसेल कुणाचाही.असताच कुठे तुम्ही घरी फारसे ?

( साहेब आत जातात. उमा उगीच थोडीशी आवराआवर करतेय. इतक्यात दरवाजात एक सावली हलते. आता रंगमंचावर एक अतिमानवी निळसर प्रकाश.)

स्वामी- श्री गुरुदेव दत्त !

उमा- स्वामी तुम्ही ? इथे? यावेळी ?

(तिला आश्चर्य वाटलंय पण का कोण जाणे धक्का बसलेला नाही.)

स्वामी- होय उमा,तसा खूपदा मी अवतीभोवती असतो तुझ्या पण तुला जाणवत नाही एवढंच.

उमा- तुम्हीच एकदा म्हणाला होतात, या ढोबळ चर्मसंवेदनांच्या जगातून बाहेर पडण्यासाठी साधना करावी लागते तेव्हा कुठे विशुद्ध अस्तित्वलहरींच्या जगात प्रवेशतो आपण. तुम्ही तिथूनच बोलताय ना स्वामी?

स्वामी- मी नेहमीच इथे होतो.हाडामांसाच्या देहात असतानाही. आता तोही त्रास संपला.

( हसतात- उमा विस्मयचकित होऊन पहातेय-)

उमा- स्वामी मला भास होतोय का हो काहीतरी ? तुमचा चेहरा एकदा मला बाबांसारखा दिसतो, एकदा काहीसा मेघ्;श्यामसारखा.

स्वामी- वेडे तो माझा चेहरा आहेच कुठे ? निळ्या पाण्यात सगळीच प्रतिबिंबं उमटतात,तरीही कुठे काहीच नसतं. 'जळ जळावरी लोळे !" वाचली होतीस ना ज्ञानेश्वरी ?

उमा- तुम्हीच तर वाचून घेतली होती. पण खूपसं विसरले आहे आता. मधल्या काळात पुरती संसारी झाले! स्वामी, तुमच्या त्या निळ्या पाण्यात माझी आई आहे का हो कुठे ?

(रडते. स्वामी जवळ घेऊन थोपटतात.)

स्वामी- संसारीच झाली आहेस ! माझी आई ! बेटा, ज्या गावाला जायचं,ते गाव स्वतःच व्हायचं! तूच तुझी आई झाली आहेस्.संजीवनची इतकी प्रेमळ आई ! आई म्हणजे आईपणा उमा,जो तू आनंद-ओवरीतल्या मुलांना कुमारिका असतानाच दिला होतास्,आणि नंतर संजीवनवर ज्याचा वर्षाव केलास !

उमा- (जरा शांत होत ) कळतंय थोडंसं.पण खूप कठीण आहे. खूप कठीण गेलं जगणं तुम्ही गेल्यावर .. म्हणजे तशी सगळी प्रेमाची माणसं होती,पण त्यांना आधार द्यायला मीच होते. मला आधार द्यायला तुमच्यानंतर कुणीच नव्हतं स्वामी.

स्वामी- तोंडाने म्हणतेस ,कळतंय थोडंसं. खरंच थोडंसंच कळतंय तुला ! काल मेघःश्यामने जो आधार दिला तो काय त्याने दिला? मी नाही? आणि मी म्हणजे तरी कोण बेटा ?

उमा- (गोंधळलेली )- खरंच कोण तुम्ही स्वामी ? कोण आहे तुमच्यामागे? तुमच्या पलिकडे ? पडद्यामागे ज्योत हलावी तसं ?

स्वामी- तो पडदा दूर करायचं काम ज्याचं त्यालाच करायला लागतं.. वेळ भराभर जात असतो..

उमा-मी खूप प्रयत्न करेन. पण म्हणजे काय करायचं?

स्वामी- येथ जो जो कीजे तरणोपावो, तो तो होईजे अपावो ! मुद्दाम काहीच नाही करायचं उमा. वरवर स्वतःसारखंच रहायचं. आतून वाळलेल्या बीसारखं वेगळं व्ह्यायचं.

उमा- विचार करत होते आता घरकामाबरोबर पुनः अभ्यासाला सुरुवात करेन.. चांगलं डॉक्टरेटसारखं काहीतरी.

स्वामी- असल्या उपाधींमध्ये आता गुरफटू नकोस उमा. घरकाम कर, अधूनमधून आनंद-ओवरीला भेट दे, अभ्यासही कर,पण पदवीसाठी नको. तो टप्पा आता संपलाय. आणि हे सगळं करताना यातून वेगळी रहा.

उमा- कठीणच आहे सगळं.

स्वामी- तुला नाही. आपल्याला साजेलशा वाटेनेच आपण जायचं..आणि ती पडद्यामागची ज्योत- ती शोधायचीं. निघू मी बेटा ? आज तुझ्याशी खूप बोलावंसं वाटलं..

(निळसर प्रकाश लोपत जाऊन क्षणभर अंधार.पुनः नित्याचा प्रकाश.रंगमंचावर उमाखेरीज कुणीही नाही.)

उमा -(एकदम वास्तवात परतून आलेली )-स्वामी! स्वामी! मला सोडून जाऊ नका.मला खूप पोरकं वाटतं तुमच्याशिवाय. का सगळे सोडून जाता मला ? आई! आई!

साहेब-(आतून बाहेर येतात -काहीसे घाबरलेले) उमा काय झालं तुला ? केवढा घाम फुटलाय! आणि आई म्हणून कोणाला हाक मारत होतीस ?

उमा- आईलाच! म्हणजे स्वामींना !

साहेब- किती असंबद्ध बोलते आहेस! मला विश्रांती घ्यायला सांगतेस, खर्‍या विश्रांतीची गरज तुलाच अहे उमा.

उमा- (त्यांच्या कुशीत शिरत ) तुम्ही किती छान गात होता मठात पूर्वी.. आठवतं तुमचं तुम्हाला तरी ? आज गा ना माझ्यासाठी .

साहेब- (तिला थोपटत) कोणतं गाणं?

उमा- 'सुखदु:खांपैल' !
|
साहेब - (गातात) सुखदु:खांपैल | गूढार्थांचे रान |
तिमिराचे गान |घुमे जेथे ||
तेथे मज जाणे| एकटे दिनांती|
सावळा सांगाती | वाट पाहे||
आता अंगांगाला |जडे श्यामरंग|
होऊनी नि:संग | नटेन मी||

(उमा ऐकताऐकता निद्राधीन ..आणि पडदा .)

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 

यात कथा फार पुढे सरकलेली दिसत नाहीये ....
ज्ञानेश्वरीचा चांगलाच अभ्यास दिस्तोय तुमचा........
तो शेवटचा अभंग फारच बहारीचा - संपूर्ण अभंगच अतिशय आवडला, हृदयस्पर्शी.

- जर इनामदारांची सांपत्तिक स्थिती ठीक नाही तर संजीवनला मुंबईला शिक्षणाकरता ठेवणे कसे परवडते ? (माझा एक बावळट प्रश्न )

- जर इनामदारांची सांपत्तिक स्थिती ठीक नाही तर संजीवनला मुंबईला शिक्षणाकरता ठेवणे कसे परवडते ? (माझा एक बावळट प्रश्न )

एक संभाव्य उत्तर -ती इतकी वाईटही नाही.बेताची आहे.
शिवाय उमाच्या आईवडिलांचे एक घर मुंबईत होते.. त्या बाजूने काही सोय झाली असावी :))

खरे आहे मुंबईत मूळ मुंबईकर नसलेल्यांना काहीही परवडण्यासारखे नाही.भ्रष्टाचारी राजकारणी अन विधिनिषेधशून्य व्यापारी हे सन्माननीय अपवाद वगळून.

ज्ञानेश्वरीचे वाचन आहे.अभ्यास करण्याची पात्रता नाही.

शेवटचा अभंग माझाच.. धन्यवाद!

कथा शेवटाकडे सरकतेय..