पॉवर सेंटर
विज्ञानाचा प्रसार झाला, ज्ञानाची जगभराची कवाडे खुली झाली, तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि विश्वाचे गूढ उकलण्याची शक्ती माणसाच्या हाती आली.. तरीही, समाजातला एखादाच वर्ग मात्र यापासून उपेक्षित, वंचित का?
या वर्गाला विकासाची फळे चाखता येत नाही, ज्ञानाचे दरवाजे यांच्यासाठी उघडलीच जात नाहीत, तंत्रज्ञान तर यांच्यापासून कोसो दूर राहते आणि विज्ञानाचा तर यांच्या जगण्याला स्पर्शदेखील नाही.. असे का?
..पैसा! या सगळ्या प्रश्नांचं हेच उत्तर आहे. हाती पैसा नसेल तर विकासाच्या प्रवाहात झोकून देण्याची उमेदच राहात नाही, उलट या प्रवाहापासून लांब पळावे, अशीच मानसिकता रुजत जाते आणि हा वर्ग उपेक्षितच राहतो.
सुस्थापित कुटुंबांतील मुलांना शिक्षण आणि संस्कार जणू वारसा हक्कानेच मिळत जातो. त्यामुळे जगाच्या प्रवाहासोबत ही मुले सहजपणे पुढे जात राहतात.
आणि एक दरी आपोआप रुंद रुंद होत जाते. एका वर्गाचा कोणताही दोष नसताना. त्यांच्या पिढय़ांना हे अंतर सतत सोसत राहावे लागते.
सुशिक्षितांच्या संपूर्ण जगात याची प्रत्येकजण दखल घेतोच असे नाही, कारण ते प्रवाहासोबत बरेच पुढे गेलेले असतात. मागे राहिलेल्या सगळ्यावरच कधी कधी लक्ष राहिलेले नसते. मग मागे राहिलेले मागेच राहतात आणि प्रवाह पुढे जातच असतो.
..मन अस्वस्थ करणारे हे वास्तव असह्य़ झाले आणि त्यावर बराच विचार केलेल्या अशाच काही कुटुंबांतील तरुणांनी एक निर्णय घेतला.
आपण जे शिकतो, जे ज्ञान आपल्या जगण्याची शिदोरी म्हणून साठवितो, त्या शिदोरीचा काही वाटा अशा उपेक्षितांसाठी राखून ठेवायचा, असं या तरुणांनी ठरवलं आणि इंजिनीअरिंगच्या पदव्या घेऊन बाहेर पडलेल्या या तरुणांनी डोंबिवलीत एका संस्थेला जन्म दिला.
स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा या तरुण मनांवर प्रभाव होता. समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आपल्याकडील ज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करून त्यांच्या जीवनातही आनंद पेरायचा, असं या तरुणांनी ठरवलं. व्हीजेटीआयमधील काही प्राध्यापकांनीही या तरुणांना साथ द्यायचं मान्य केलं आणि प्रकल्प आखला गेला.. ‘पॉवर सेंटर’.. शक्ती केंद्र!
या शक्ती केंद्रात निर्माण होणारी ऊर्जा, उपेक्षितांच्या जगात आनंद फुलविण्यासाठीच वापरली जावी, असा उद्देश निश्चित झाला. डोंबिवलीतील आणखीही काही तरुण या केंद्रात सामील झाले आणि १९९५ मध्ये डोंबिवली पूर्वेच्या दत्तनगरातील संगीतावाडीमध्ये विवेकानंद सेवा मंडळाची स्थापना झाली. या शक्ती केंद्रातून तयार होणारे कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात काम करतील, त्यांचा समाजासाठी, देशासाठी उपयोग होईल आणि समाजाच्या उन्नतीच्या कामात आपलाही खारीचा वाटा राहील, एवढय़ा लहानशा भावनेने काम सुरू झाले. त्यासाठी केंद्रात येणाऱ्या तरुणांमध्ये समाजभान जागविण्याची गरज होती. वाचन, संवाद आणि कामातून हे समाजभान रुजविण्याचे ठरले आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांकरिता एक ग्रंथालय सुरू करण्यात आले.
संस्थेच्या कामाची ही सुरुवात होती. संस्था स्थापनेसाठी एकत्र आलेल्या तरुणांनी आपल्याकडील इंजिनीअिरगची पुस्तके एकत्र केली आणि तीस-पस्तीस पुस्तकांचे ग्रंथालय सुरू झाले. उद्देश असा की, ज्यांना गरज आहे पण पुस्तके विकत घेण्याची क्षमता नाही, त्यांना याचा वापर करता यावा. ही गोष्ट सतरा वर्षांपूर्वीची! काही तरुणांना या तोकडय़ा ग्रंथालयातील पुस्तकांचा मोठा आधार झाला. आज या ग्रंथालयात सात-आठ हजार पुस्तकं आहेत आणि पाच हजारांहून अधिक विद्यार्थी ग्रंथालयाचा उपयोग नियमितपणे करताहेत.
अनेकांना अभ्यासासाठी हवी असलेली एकाग्रता घरी मिळत नाही. मोठे कुटुंब, मर्यादित जागा, परिसराचे राहणीमान, आर्थिक कुवत अशी अनेक कारणे त्यामागे असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभी करण्याचेही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आणि संस्थेची स्वत:ची इमारतच असावी, असे उत्तुंग स्वप्न आकार घेऊ लागले. कालांतराने ते प्रत्यक्षातही आले. आता मंडळाची स्वत:ची दोन मजली इमारत उभी आहे. पहिल्या मजल्यावरील ज्ञान मंदिर अभ्यासिकेत, दररोज सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत, जवळपास १०० मुले अभ्यासात मग्न झालेली केव्हाही पाहायला मिळतात. इमारतीचा दुसरा मजला ग्रंथालयाने व्यापला आहे.
..मंडळाच्या कामाची व्यवस्थापकीय घडी बसली आणि ज्या उद्देशाने मंडळाची स्थापना झाली, त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. ग्रामीण भागात जिथे शिक्षणाचे, विकासाचे वारे फिरकत नाहीत तेथे जाण्याचे ठरले.
ठाणे जिल्ह्य़ाचा शहापूर तालुका आदिवासी तालुका आहे. याच तालुक्यातील विहीगाव नावाचे दीड-दोन हजार वस्तीच्या गावात विकास प्रकल्प राबवायचं नक्की झालं. त्याआधी दोन वर्षे मंडळाचे कार्यकर्ते न चुकता गावात जायचे. अंतराअंतरानं वसलेल्या १२ आदिवासी पाडय़ांच्या या गावातील लोकांशी संवाद सुरू झाला. त्यांच्या जीवनशैलीचे निरीक्षण करताना, त्यांच्या समस्या आणि गरजांचा अभ्यासही सुरूच होता. त्यातूनच, विहीगावच्या या आदिवासींना जगाच्या प्रवाहासोबत येण्याची खूप इच्छा आहे हे जाणवलं आणि त्यांच्या इच्छेला साथ द्यायचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. विहीगावात विकास प्रकल्प सुरू झाला.
गावाच्या विकासाचा पहिला टप्पा म्हणजे, आरोग्याची जाणीव जागी करणे! आदिवासींच्या जगात, आजार म्हणजे देवाचा कोप ही कल्पना घट्ट रुतलेली असते. त्यामुळे कोणतीही साथ आली, आजार सुरू झाले, की डॉक्टरऐवजी भगताकडे गर्दी व्हायची. मंत्रतंत्र, अंगारे-धुपारे आणि गंडेदोरे असले उपाय केले जायचे. आजार बरा झालाच नाही की देवाचा कोप प्रचंड आहे, या भीतीने पाडे थरकापून जायचे. पण भगतावरचा विश्वास कायमच असायचा.. दैवी कोपापुढे भगताचेही काही चालत नाही या भावनेने मग हा भाबडा समाज, आजारांना शरण जायचा आणि जे होईल ते हतबलपणे सोसायचा.
या समजुतीतून या समाजाला बाहेर काढून, आजार बरे करण्यासाठी भगत नाही तर डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे, हे पटविण्याकरिता, पहिले आरोग्य शिबीर गावात आयोजित केले गेले. डोंबिवलीतून डॉक्टर विहीगावात दाखल झाले आणि आदिवासींची आरोग्य तपासणी झाली.
कामाची सुरुवात अशी झाली. पुढे नियमितपणे गावात शिबिरे होत राहिली. आता आदिवासी कुटुंबे डॉक्टरकडे गर्दी करतात.
बालमृत्यू, कुपोषण ही आदिवासींच्या जगाला कवटाळून राहिलेली सार्वत्रिक समस्या इथेही होतीच. पण कुपोषणाची नेमकी कारणे शोधण्याचे ठरवून कार्यकर्ते कामाला लागले आणि आरोग्याची अनास्था हेच या समस्येचेही मूळ असल्याचे दिसू लागले. आदिवासी मुलाच्या जन्मापासूनच या समस्येचा विळखा सुरू होतो हे स्पष्ट झाले. आदिवासी महिलांच्या बाळंतपणाच्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल घडविण्याची गरज अधोरेखित झाली. सुईणीकरवी केल्या जाणाऱ्या बाळंतपणात, अनेकदा नेमक्या अडचणींचा अंदाजच येत नसे. मग अडल्यानडलेल्या एखाद्या गर्भवतीचे बाळंतपण हा दैवाचा खेळ म्हणूनच मानला जायचा. मूल जगले तर सुदैव.. नाही तर दैवाची इच्छा! अशा समजुतीत बाळंतपण पार पडले की पडवीतल्या कोयत्याने किंवा बाणाच्या लोखंडी पात्याने नाळ कापली जायची. म्हणजे, धनुर्वाताची भय.. पण शिक्षणाच्या अभावामुळे सुईणीला आणि कुटुंबालाही याची जाणीव नसे. यात बदल घडवायचा असेल तर सुईणीला शास्त्रशुद्ध बाळंतपणासाठी करावयाच्या उपचारांचे प्रशिक्षण देण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले. सुरक्षित प्रसूतीसाठी सुईणींचे प्रशिक्षण उपक्रम सुरू झाला. प्रसूतीकाळातील नेमक्या अडचणीचे भान सुईणींना यावे, अधिक उपचारांची गरज लक्षात यावी, एवढे ज्ञान या प्रशिक्षणातून सुईणींना दिले जाऊ लागले. आता घरच्या घरी होणारी अनेक बाळंतपणे सुरक्षित असतात आणि इमर्जन्सीचे भान वेळेवर येते, त्यामुळे गरज पडताच स्त्रीला उपचारासाठी शहापूर, कसारा किंवा इगतपुरीलाही नेले जाते..
साध्या साध्या आजारांवर घरच्या घरी घेतल्या जाणाऱ्या औषधांचे भान गावकऱ्यांना यावे यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नामी शक्कल लढविली. औषधांच्या रंगीत गोळ्यांची.. कोणत्या आजारावर कोणत्या रंगाची गोळी घ्यायची, एवढेच गावक ऱ्यांना शिकविले गेले. १२ पाडय़ांवर औषधांच्या रंगीबेरंगी गोळ्या असलेल्या आरोग्य-पेटय़ा दाखल झाल्या. आता ताप आला की कोणत्या रंगाची गोळी घ्यायची, अतिसारावर कोणत्या रंगाची गोळी आणि कोणत्या आजारावर कोणत्या रंगाची गोळी हे गावक ऱ्यांना पाठ झाले आहे..
आरोग्य शिक्षणाचे हे पाढे गावाने गिरविले आणि गावात शेतीच्या नव्या प्रयोगांचे पर्व सुरू झाले. चारसूत्री भातशेतीचा प्रयोग गावक ऱ्यांनाही पटला आणि भाताचे दुप्पट उत्पन्न शेतक ऱ्याला मिळू लागले. शेतक ऱ्यांनी शेतीचे नवे तंत्र आपलेसे करावे, यासाठी स्पर्धाची आखणी केली गेली. उत्कृष्ट शेतीला पुरस्कार देण्याची, उत्कृष्ट पिकांसाठी बक्षिसे देण्याची योजना मंडळाने जाहीर केली आणि शेतीचा दर्जा सुधारू लागल्यावर शिक्षणाच्या सुविधांवर विचार सुरू झाला. गावात वनराई बंधाराही बांधून झाला. त्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. पाणीटंचाईचे दिवस काहीसे कमी झाले आणि बायकांची वणवण थांबली.. रिकामा वेळ मिळू लागल्याने, बायकांच्या हाताला काम देण्याचे ठरले आणि महिलांचे बचत गट स्थापन झाले. या गटांनी बनविलेले उटणे आता डोंबिवलीच्या बाजारात दिवाळीच्या दिवसात घरोघर विकले जाते आणि त्यातून मिळणारा पैसा गावाच्या गरजांसाठी वापरला जातो.
गावात चौथीपर्यंत शाळा होती. त्यामुळे त्यानंतर मुले घरीच बसत. शिक्षणाला पूर्णविराम. मुलांनी शिकावे, पुढे जावे, यासाठी गावक ऱ्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्नदेखील फारसे होत नसत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावक ऱ्यांनाच विश्वासात घेतले आणि सातवीपर्यंतच्या शाळेसाठी पाठपुरावा सुरू झाला. गावात सातवीपर्यंतचे वर्ग सुरूही झाले आणि बाहेरगावी जाऊन शिक्षण घेण्यासाठी मुलांची मानसिक आणि शारीरिक क्षमता निर्माण झाली. आता अनेक मुले बाहेरगावी जाऊन पुढचे शिक्षण घेताहेत.. याच योजनेतून शिकलेल्या काही आदिवासी मुली आता मुंबईत नर्सिगच्या कोर्ससाठी दाखल झाल्यात. काही मुले संगणकाचं शिक्षण घेताहेत.. गावात एका देणगीदाराने दिलेला संगणकही बसला आहे. आदिवासींची मुले संगणकाशी खेळताना दिसतात तेव्हा विवेकानंद सेवा मंडळाचे कार्यकर्ते सुखावतात..
..मंडळाचे कार्यकर्ते सेवाभावाने हे काम करतायत. डोंबिवलीतही काही उपक्रम मंडळाने सुरू केलेत. काही महिन्यांपूर्वी करिअर गायडन्सचा एक उपक्रम कार्यकर्त्यांनी आखला आणि शिकलेल्या, कमी शिकलेल्या तरुणांसाठी नोकरीच्या संधी दारी आणल्या. प्लेसमेंट प्रोग्राममध्ये २५ कंपन्या सहभागी झाल्या आणि डोंबिवलीतच नव्हे तर ठाणे जिल्ह्य़ातील जवळपास अडीच हजार तरुणांच्या मुलाखती झाल्या. अनेक मुलांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवडले गेले.
उपेक्षितांच्या, गरजवंतांच्या जगण्यात आनंद फुलविण्यासाठी एक शक्ती केंद्र आता शक्तिमान होत आहे.
लोकप्रभा, २७ जुलै २०१२
http://www.lokprabha.com/lokprabha/20120727/matiakash.htm
खुप छान उपक्रम. मनापासून
खुप छान उपक्रम. मनापासून शुभेच्छा. आणि जर ह्या चळवळीला थोडाफार हातभार लावायचा असेल तर कोणाशी संपर्क साधावा लागेल?