सनम - ६

Submitted by बेफ़िकीर on 24 July, 2012 - 04:44

नदीच्या या अंगाने ती कधीच नदीत उतरलेली नव्हती. परिणाम व्हायचा तोच झाला. माहीत नसलेल्या पाण्यात थेट सूर मारल्यामुळे दाणकन आपटली कशावर तरी आणि असह्य वेदना झाल्याने तडफडत पुन्हा पाण्याबाहेर आली.

काठावर उभी राहिल्याराहिल्या तिचे दोन्ही हात तिच्या गुडघ्यावर दाबले गेले आणि आक्रोश तोंडातल्या तोंडातच दाबत ती वेदना संपायची वाट पाहात अगतिकपणे पडून राहिली. उजवा गुडघा निकामी झाल्यासारखे वाटत होते तिला. मागून लांबून आवाज येत होते. आज सापडलो तर कायमचे गजाआड जाणार याची तिला कल्पना होती. कोणत्याही परिस्थितीत सापडायचे नाही हे तिने ठरवलेले होते. पण दैवाच्या मनात काय होते कळत नव्हते. सुसाट, भन्नाट वारा, जो मगाशी सुखद आणि उल्हासित करणारा वाटत होता तो आता त्या ताज्या जखमेमुळे भयानक बोचरा वाटू लागला होता. नदीची खळखळ आणि सळसळ जी मगाशी आईच्या कुशीसारखी वाटत होती ती आता अंगावर काटे आणणारी वाटू लागली होती. काहीच काळापूर्वी हातून घडलेले पाशवी कृत्य, मागे लागलेले पोलिस आणि गावकरी, झालेली जखम, सोबत कोणीही नसणे आणि असहाय्यता!

आयुष्यात पहिल्यांदाच सनमला 'रडणे' म्हणजे काय याचा अनुभव आला. आजवर तिला रडूच आले नव्हते. पण रडणे सुरू झाल्याझाल्याच थांबलेही. ती मनाशी म्हणाली. यात काय विशेष? आता असल्या गोष्टी तर फारच किरकोळ ठरणार आहेत. आता यापेक्षा भयंकर आयुष्य असणार आहे. रडकी कुठली! ऊठ! बांध ती जखम!

मागून येणारे आवाज जरा अधिक जवळ आल्यासारखे वाटल्याने सनम घाईघाईत कशीबशी मगाचच्याच झाडावर चढली. तिच्या माहेरच्या रानात एक प्रकारचा पाला असायचा, ज्याने रक्त थांबायचे. आत्ता हाताशी काहीच नव्हते. स्वतःच्याच पातळाने काहीशी जखम बांधून ती बराच वेळ बसून राहिली. हळूहळू वेदनाही कमी होत होती. पण गुडघा चांगलाच सणकलेला होता. हालचाल करताना दुखत होता. नुसते बसून राहिले तर कळ जाणवत नव्हती.

किर्र अंधार, सुसाट वारा, झाडाच्या फांद्या बोचत असणे आणि नदीचा अंधारलेला खळाळ! एखादा भरभक्कम पुरुष जेथे दचकून राहील अशा परिस्थितीत सनम आता आरामात बसली होती. उजेड झाल्याशिवाय नदीत उतरण्यात अर्थ नाही हे तिच्या लक्षात आले होते. दुपारच्या जेवणांनंतर अन्नाचा कण गेलेला नव्हता. येथे विस्तव करायलाही जवळ काही नव्हते. केला तरी त्यावर भाजणार काय? पाखरं तर आता एकदम उजाडतानाच दिसणार होती.

तेवढ्यात खुसपूस झाली. संपूर्ण शरीराचे कान करत सनमने झाडाखाली चाललेल्या हालचालीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि पुढच्याच क्षणी तिच्या अंगावर सरसरून काटा आला. दोन जांभळे हिरे! कुत्रा! नक्कीच कुत्रा होता. अर्थ सरळ होता. गावकर्‍यांनी सनमच्या मागावर कुत्री सोडलेली असणार होती. ते डोळे वरच्या दिशेला वळले आणि त्याच क्षणी अख्खे रान हादरेल अशा आवाजात ते कुत्रे भुंकायला लागले. त्या भुंकण्याच्या आवाजाच्या रोखाने सरकणारे बत्ती दिवे आता पळत पळत तेथे येऊ लागले. उपाय दोनच! कुत्रं तरी मेलं पाहिजे किंवा आपण झाडांवरून इतक्या वेगात गेले पाहिजे की कुत्र्यालाही समजू नये कुठे गेलो.

पण कुत्र्याची नजर चांगलीच तीक्ष्ण होती. ते भुंकत भुंकत वरच पाहात होते. शेवटी एकदाची अपेक्षेप्रमाणे एका बत्ती दिव्यापासून हाक ऐकू आलेली. कोणीतरी त्या कुत्र्याला हाक मारत होते.

मालकाची हाक ऐकू येताच जिवाच्या आकांताने कुत्रे त्या दिशेला धावत सुटले. हेच काय ते दहा पाच क्षण हाताशी होते सनमच्या! जमीनीवर उतरली असती तर माग काढत कुत्रे पुन्हा आलेच असते. झाडांवरून जावे तर जवळपास झाड नव्हते. कुत्र्याला ती घाबरत नव्हती. असली कुत्री तिने नुसत्या लाथेने उडवली असती. पण मागून येणारे दहा वीस आवाज? त्यांचे काय? आपल्याला घेरण्यात आलेले असले तर? त्याचे काय?

कुत्रे मालकाला धरून झाडापाशी आणणार यासाठी लागणारे काही क्षणच सुटकेचे क्षण होते. कसलाही विचार न करता सनम ताडकन खाली उतरली.

बत्त्या तश्या लांब होत्या. पण सनम तीरासारखी धावत सुटली. किर्र काळोखात ती मधेच कशाला तरी धडकत होती, पडत होती, वेदना विसरून पुढे धावत सुटत होती. किती ठिकाणी ठेचले गेले होते आणि रक्ताळले होते ते आत्ता बघत बसण्यात अर्थच नव्हता.

थोडा मोकळा भाग आला आणि चांदण्यात लख्ख दिसले. नदीच्या चढ्या बाजूला आली होती ती. येथून पुढे पोहत गेलो तर बापाच्या म्हणजे झुर्क्याच्या रानात आपण पोचणार हे आठवून तिचे काळीज गलबलले. आई बापाला भेटावेसे वाटू लागले. पण दगड ठेवून ती नदी आडवी कापत पैलतीरावर गेली. केवळ बारा चौदा मिनिटांत!

कुत्री जन्मापासून पोहू शकतात हे तिला माहीत होते. पण माणसे कशी येणार इकडे?

कुत्रं आलं तर येऊदेत! लाथा घालू त्याला.

नदीत पोहताना जखमा चुरचुरत होत्या. आता वर आल्यावर तर किंचाळून रडावेसे वाटत होते त्या वेदनांमुळे! गुडघा निकामी झालेला असूनही कसाबसा काम करतच होता. पण फक्त दोन पायांवर अवलंबून असली तर ती सनम कसली?

सनमने सरळ पातळ पुढून मागे खोचले आणि दोन्ही हात जमीनीवर टेकवून ती हातांवर चालू लागली. आत्ता कोणी आपल्याला पाहिले तर भूत म्हणून पळून जातील या विचाराने त्यातही ती खुदकन हासली.

दोन तीन हात चालले की बसायचे, पुन्हा दोन तीन हात चालायचे असा विक्रम करत काही वेळात ती रानात बर्‍यापैकी आत पोचली. आता मात्र थंडीने अंगात कसकस वाटू लागली होती. हातही भरून आलेले होते. पोटात अन्न नव्हते. पाणी मात्र पिता येत होते नदीचे. पुन्हा एकदा तिने आपला गुडघा तपासला. हे रान कुठले असेल हे तिच्या लक्षात येत नव्हते. भयानक पार्श्वभूमी मागे ठेवून सनम आता या रानाचा एक भाग होत होती.

हळूहळू थोडे स्पष्ट दिसू लागल्यावर तिला एक कातळ दिसला. चमकलीच ती! कारण त्या कातळात एक आडोसा असावा तशी गुहेसारखी जागा होती. निदान तीन बाजूंनी वारा रोखला जाईल. सनम हळूहळू त्या कातळावर चढली. दोन वेळा घसरली. त्यातल्या एकदा तर चक्क खालीच आली आठ एक फूट!

शेवटी एकदा त्या गुहेत तिचे दोन्ही हात घुसले आणि हातांच्या जोरावर शरीर वर आणून ती गुहेत प्रवेशली. जेमतेम आरामखुर्चीसारखे बसता येईल अशी गुहा होती. आत किडे असावेत. सनमके हातानेच गुहा साफ केली. त्यातही काहीतरी चावलेच. पण असल्या बाबी आता क्षुल्लक होत्या.

दम खाल्ला तिने! या क्षणी मात्र ती पूर्णपणे श्रमलेली होती. भूकेचा डोंब स्वस्थ बसू देत नव्हता. पण डोळे तर गपागप मिटत होते. ओले कपडे अंगावर सहन होत नव्हते. त्यातच त्या कपड्यांवर तुफान वारा एका बाजूने हल्ला करून आणखीनच गारठवत होता. बसल्या जागी सनमने अंगावरचे कपडे काढले आणि गुहेतलेच एक दोन दगड वजनाला ठेवून कपडे लटकवून ठेवले.

तिचे अनावृत्त अंग आपली ऊब त्या कातळात पाझरवत कुडकुडू लागले होते. कातळ आपला थंडावा तिच्या अंगात भिनवत स्वतः उबदार होऊ लागला होता. कोणता प्रहर असेल हेही सनमला आता आठवत नव्हते. उघडेच पडल्याने आता थंडीमुळे झोप येणे शक्यच नव्हते. खाली उतरावे तर पुन्हा पातळ नेसावे लागले असते आणि आता ओले पातळ नेसायचा उत्साहही नव्हता. हाताला काहीतरी हाललेले लागले म्हणून सनमने पटकन ते हातात पकडले. कसलासा किडा होता तो. खावा की नाही या विचारात सनमने तो थोडा वेळ हातातच धरून ठेवला. पण इच्छाच झाली नाही. मग फेकून दिला.

हा एका बाजूने येणारा वारा जर रोखता आला तर भन्नाटच होईल असे तिला वाटले. पण कसा रोखणार? आणि तेवढ्यात कोल्हेकुई ऐकू आली. कोल्हा आहे म्हणजे ससा असणारच! क्षणभर सनमला वाटले की सश्याचा शोध घ्यावा.

पण कणकण वाढल्यासारखे वाटू लागले आणि एकंदरच श्रमांमुळे तिला ग्लानी आली.

आपले डोळे कधी मिटले आणि नंतर वार्‍याचा त्रास कसा काय झाला नाही हे तिला समजलेच नाही.

===================

असली सकाळ तिच्या आयुष्यात आजवर आलेली नव्हती.

उन्हाचे किरण थेट तोंडावर पडले आणि सात तासांच्या विश्रांतीनंतर परफेक्ट फिट झालेली सनम ताडकन उठून बसायला गेली तर डोके वर आपटले. ते धरून खाली वाकू लागली तर खाली असलेले दृष्य दिसले. काल अंधारात आपण जिथून चढून येथे आलो तिथून थोडेसे घसरलो असतो तर चाळीस एक फूट खाली पडलो असतो हे तिला जाणवले. देवाचे आभार मानत तिने पातळ गुंडाळले. राठ झाल्यासारखे झाले होते ते पातळ! पण आता पुन्हा नदीतच जायचे असल्याने काही प्रश्न नव्हता.

प्रश्न एकच होता. भूक! खायचे काय? अनार गावात आता काय चाललेले असेल? आपला कुठेकुठे शोध घेत असतील? आई बाबाला काय केले असेल? पेपरात काय आले असेल? लोकांची बोबडीच वळलेली असेल खरे तर.

आपली सासू रत्नी आणि हरामखोर जावा बेशुद्धच पडलेल्या असतील.

सनमला जाणवले की चढून गुहेत येणे, अगदी अंधारातही, हे उजेडात गुहा उतरून खाली जाण्यापेक्षा सोपेच होते.

कशीबशी घसरत ती खाली आली. गुडघा आता कालपेक्षा जरा बरा असला तरी ठुसठुसत होताच. इकडे तिकडे पाहात सनम एका झाडामागे लपून बसली. तब्बल अर्धा तास ती नुसतीच बसलेली होती. उपासमार झालेली असली तरी अस्सल रानावर पोसलेला देह होता. अजून अंगात चिक्कार ताकद होती.

कुठेही काहीही हालचाल नाही हे पाहून सनम अलगद नदीकडे चालू लागली. कुठे खुट्ट झालं तरी पटकन झाडांमागे लपत होती ती! पण माणसाची चाहुल नव्हतीच. मग नदी समिर दिसू लागल्यावर ती बिनदिक्कत चालू लागली. पण मनात चिंता होतीच. पुन्हा नदीत भिजायचे, पुन्हा कणकण! राहायचे कुठे नंतर? खायचे काय? काही का सेनात, विस्तवाची सोय ताबडतोब करायला पाहिजे हे तिने ठरवले. त्याचबरोबर एखादी गोफण आणि एखादे धारदार शस्त्रही हवेच. निदान पाखरं मारून तरी खाता येतील.

नदीच्या काठाशी आल्यावर मात्र ती जरा वेळ नुसतीच बसून राहिली. काय घाई आहे नदीत सूर मारण्याची? आता दिवसभरात पोहत पोहत कुठेतरी जायचेच आहे. ही तर सकाळच आहे. अगदी दुपारी निघालो तरी कुठेतरी पोहोचूच. त्यापेक्षा इथे बसून काही भुकेची व्यवस्था होते का पाहूयात.

सनम काठावर बसून राहिली. किरकोळ पाखरे नदीवर उडत होती. एखादा लहानसा किडा आजूबाजूला दिसत होता. आत्ता सनमला काहीही खायला चालले असते.

ही वेळ विचार करायला चांगली असली तरी घातकही होती. आजूबाजूला कोणी नाही आहे असे वाटत असतानाच अचानक पोलिसांची टोळी येऊही शकेल असे सनमच्या मनात आले.

पण आज सकाळचा सूर्य तिच्याबाजूने होता.

एक मच्छीमार लांबवर मासेमारी करू पाहात होता. किंवा खेकडे वगैरे! ही नदीची चढाची बाजू होती. म्हणजे माहेरी जायची. क्षणभरही विचार न करता सनमने नदीत सूर मारला. निव्वळ काही मिनिटांत ती त्या माणसाच्या होडीच्या उलट्या बाजूला पोचली आणि काही कळायच्या आत, त्या माणसाची पाठ असतानाच तिने होडीत उडी मारली.

गचकलेल्या होडीतला तो माणूस ४४० चा शॉक बसावा तसा बघत राहिला. ही कोण जलदेवता अचानक नावेत आली?

सनमने फार वेळ न घालवता त्याला विचारले.

"माचिस आन मासं द्ये"

त्या माणसाला गंमत वाटली. ही अशी पोरगी जाळ्यातच सापडली असती तर मोठी मिरवत नेली असती घरी. पण मागून नावेत चढलीय आणि शानपत्ती करतीय. हिला घ्यावंच घोळात!

"कोन तू?"

"तुझी आई... माचिस द्ये..."

हासत हासत त्याने खिशातून माचिस काढून तिच्याकडे फेकली. सनमने त्याला अजिबात न विचारता दोन मासे उचलले आणि तो माणूस काही म्हणणार याच्या आत ती नदीत गुप्त झाली.

सनमच्या मते त्या माणसाच्या दैवात आजवर अशी भुताटकी झालेली नसावी. काही काळ पाण्याआड दिसणारे ते गोरेपान शरीर नंतर दिसेनासे झाले तसा नावाडी घाईघाईने परतायला निघाला. नदीत भुताटकी झाली हे त्याला कित्येकांना सांगायचे असावे असे खुसखुसणार्‍या सनमला वाटले.

इकडे सनम जुन्या जागी परतली आणि पुढच्या एक तासात तिच्या पोटात दोन बर्‍यापैकी भाजलेले लहान लहान मासे पुनर्जन्माची वाट पाहू लागलेले होते. कित्येक तासांनी सनमच्या चेहर्‍यावर नेहमीचेच खट्याळ, आत्मविश्वासयुक्त आणि खणखणीत स्मितहास्य पसरले.

नदीत सूर मारून ती सुसाट पोहत निघाली. तीन तासांनी ती गुताड या गावी पोचणार होती. तिला हे माहीत नव्हते की आबाजीने हनुमानावर केलेल्या अन्यायाचा ती लगेचच समाचार घेणार होती.

... आणि तिला हेही माहीत नव्हते... की होडीत अचानक आलेली पोरगी म्हणजे काल पाच मुडदे पाडून पळालेली सनम झुर्केच आहे हे नावाड्याने ओळखलेले होते...

आता मजा येणार होती...हनुमानासाठी सनम आबाजीला अद्दल घडवायला जातानाच गुताड गावात पोलिस पथक येणार होते...

========================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

सनम ही कादंबरी पूर्ण करावी असे वाटत नव्हते, पण ही चित्रे पाहून पुन्हा वाटू लागले आहे.>>>>>>>>>> हे आधीच माहित असतं तर मी पण काढली असती एकदोन चित्रं Proud

सनम ही कादंबरी पूर्ण करावी असे वाटत नव्हते, पण ही चित्रे पाहून पुन्हा वाटू लागले आहे. धन्यवाद>>>>>>>>>>>>>>>>

अजून वेळ मिळत नाहि का लिहीण्यास.

वाट पाह्तोय. Happy

सनम ही कादंबरी पूर्ण करावी असे वाटत नव्हते, पण ही चित्रे पाहून पुन्हा वाटू लागले आहे. धन्यवाद>>>>>>>>>>>>>>>>

अजून वेळ मिळत नाहि का लिहीण्यास.

वाट पाह्तोय.

हरवली हरवली पाखरे.....

हरवली हरवली पाखरे.....

( सनम, अन्या आणि भूक्कड )

उर्दू मध्ये सनम म्हणजे बहिरी ससाणा - जो निष्ठूरतेच प्रतिक मानला जातो. या अर्थाने उत्कंठा वाढ्वून कथा अर्धवट सोडून आपणच सनम होत आहात, बेफिकिर!

सनम

Where is the rest of part after 6th episode. Where can i read the rest of story please confirm.

सनम ही कादंबरी पूर्ण करावी असे वाटत नव्हते, पण ही चित्रे पाहून पुन्हा वाटू लागले आहे. धन्यवाद>>>>>>>>>>>>>>>>
अजून वेळ मिळत नाहि का लिहीण्यास.
वाट पाह्तोय.
हरवली हरवली पाखरे.....
हरवली हरवली पाखरे.....
( सनम, अन्या आणि भूक्कड )

*येणार नाही पुढचा भाग असे मी बेफीकिर ह्याच्यावतीने जाहिर करतो* Wink

Pages